Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

मुरबाड तालुक्यातील तंटामुक्त गाव कमिट्या बाद

मुरबाड तालुक्यातील तंटामुक्त गाव कमिट्या बाद अवैध धंद्यांना गुन्हेगारी घालते साद. राजीव चंदने मुरबाड: गावातील वाद गावातच मिटला जावा आणि गाव शांततेकडुन समृद्धीकडे कसा जाईल यासाठी शासनाने तंटामुक्त गाव मोहीम…

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार दगडू सकपाळ यांचा शिवसेनेत प्रवेश ठाणे: उबाठाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार दगडू सकपाळ यांनी शेकडो समर्थकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.…

तामिळनाडूतील पेरियार विद्यापिठाच्या कुलपतींकडून ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाची प्रशंसा नवी मुंबई : महानगरपालिकेचे ऐरोली येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारक हे बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना व्यापक अवकाश उपलब्ध करुन देणारे स्मारक म्हणून देशा-परदेशातील नामवंतांकडून तसेच नागरिकांकडून नावाजले जात आहे. स्मारकाला दररोज मोठया संख्येने नागरिक व पर्यटक भेट देत असतात. तामिळनाडू येथील पेरियार मणियम्मई विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेचे (अभिमत विद्यापीठ) कुलपती डॉ. के. वीरमणी यांनी स्मारकाला भेट देत येथील वैविध्यपूर्ण दालनांचे, त्याच्या मांडणीचे व त्यामध्ये जपलेल्या कलात्मकतेचे मनापासून कौतुक केले. स्मारकातील समृध्द ग्रंथालय हा अभ्यासकांसाठी माहिती व ज्ञानाचा खजिना असून येथील दुर्मीळ छायाचित्र संग्रहालयातील बाबासाहेबांचे जीवन चरित्र पाहून भारावून गेलो असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. महत्वाचे म्हणजे हे स्मारक अत्यंत विचारपूर्वक डिझाईन केलेले, सुव्यवस्थित आकर्षक मांडणी असलेले आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रभावी असल्याचे असल्याचे ते म्हणाले. त्यांनी असेही निरीक्षण नोंदविले की, हे स्मारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, घटनात्मक दृष्टी आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रत्येक माणसापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे महत्वाचे काम करते तसेच वर्तमानातील व भावी पिढ्यांना संवेदनशील बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतांना दिसते. या भेटीदरम्यान कुलपती डॉ. के. वीरमणी यांनी स्मारकाविषयीच्या भावना आणि सदिच्छा अंत:करणापासून असल्याचे सांगत यामधून आयुक्तांची दूरदृष्टी आणि समतेची मूल्ये जपण्याची वचनबद्धता दिसून येते असे मत व्यक्त केले. त्यांनी स्मारकासोबत संयुक्त उपक्रम आणि कार्यक्रमांद्वारे शैक्षणिक आणि विद्यापीठीय सहकार्य वाढवण्याची इच्छाही व्यक्त केली.

गंधर्व गुरुकुलचा ८वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

गंधर्व गुरुकुलचा ८वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा कल्याण : गंधर्व गुरुकुलचा नेत्र दीपक आठवा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा अतिशय उत्साहात नुकताच पार पडला. विद्यार्थ्यांच्या कला, नृत्य, गायन व नाट्य सादरीकरणाने सर्वांची मने जिंकली.  प्रत्येक सादरीकरणातून शिक्षकांनी मुलांवर घेतलेली मेहनत आणि तितक्याच तन्मयतेने विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचा आणि रियाज याचा प्रत्यय सर्वांना आला.  ‘श्रीराम’ हा विषय घेऊन सादर करण्यात आलेल्या या स्नेहसंमेलनात श्रीराम हा धर्म नाही तर जीवनाच्या दृष्टिकोन आहे आणि ह्या नामाच्या जपाने होणारे शारीरिक आणि मानसिक फायदे पालक आणि मुलांपर्यंत पोहोचवण्यात गंधर्व गुरुकुल यशस्वी झाले. गजानन पंडीत गुरुजी यांच्या वैदिक मंत्रोच्चारात झालेली कार्यक्रमाची सुरुवात, डॉ प्रमोद नांदगावकर यांनी मोजक्या व मुद्देसूद शब्दात सादर केलेली गंधर्व गुरुकुलाची वाटचाल, प्रभू रामचंद्रांचा प्रेरणात्मक विषय घेऊन गंधर्व गुरुकुल शिक्षिका पूर्वा शिंपी यांचे मुद्देसूद व लाघवी सूत्रसंचालन, बैठक व्यवस्था, गायन, हार्मोनियम, कीबोर्ड, भरतनाट्यम, कथ्थक, वेस्टन डान्स, बासरी, तबला याचे लाईव्ह परफॉर्मन्स आणि त्याला लाभलेली  वादकांची उत्तम साथ लाभली. विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची उत्तम संधी मिळाली. पालकांनीही कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले. स्नेहसंमेलनामुळे सर्वांमध्ये एकोप्याची भावना निर्माण झाली. या कार्यक्रमामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यातील स्नेह अधिक दृढ झाला, अशी आणि अशाच अनेक प्रेरणादायी पोहच पावत्या पालकांनी दिल्या.  या कार्यक्रमाला कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रविंद्र घोडविंदे, पाटील, जोशी, शीला नांदगावकर, सुधा जानविलकर, खिसमतराव, संदीप रेडकर, शीतल रेडकर, नितीन नांदगावकर, भूमी नांदगावकर, डॉ सचिन सातपुते, सन्नी नागदेव, डॉ सिद्वेश्वर चामनारू, ऍड. विलास भारती, तुषार शिंपी, दामोदर धोरडे महाराज, प्रशांत दीक्षित, विवेकानंद झरे, प्रवीण वाणी, मुकुंद नावकर, अमर धनावडे अशा अनेक मान्यवर आणि मित्रमंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवत मुलांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व शिक्षक मयूर सावर्डेकर, सिद्धी सावर्डेकर, ओमकार लवांदे, प्रशांत सावंत, सुनील गोडांबे, कोमल गायकवाड पाटील, कोमल नागावेकर जाधव, अनंता तरणे, पराग वाणी आणि पालकांचे आभार मानून गंधर्व गुरुकुलच्या संचालिका वैदेही नांदगावकर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

राज ठाकरे यांचा ठाण्यात झंझावात..!

राज ठाकरे यांचा ठाण्यात झंझावात..! प्रभाग क्र 8 मधील उमेदवारांचा थेट घराणेशाहीवर हल्ला.. ठाणे – (सिद्धेश शिगवण) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांऐवजी पक्षाच्या शाखा आणि उमेदवारांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार गुरुवारी  ८ जानेवारी सायंकाळी ५ वाजता त्यांनी ठाण्यातील मनसे उमेदवारांच्या पक्ष कार्यालये व शाखांना भेट दिली.ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने यंदा ठाण्यात महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी मनसेकडून २८ मराठी उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या या शिलेदारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे स्वतः ठाण्यात दाखल झाले. सायंकाळी ५ वाजल्यापासून त्यांचा दौरा सुरू झाला, विविध पक्ष कार्यालये व शाखांमध्ये त्यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.राज ठाकरे यांच्या या भेटीनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. ठिकठिकाणी घोषणाबाजी करत, फटाके फोडून व जल्लोष करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. राज साहेबांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, निवडणुकीत मनसे ठाण्यात निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. चौकट :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटी नंतर माजिवडा प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार सचिन कुरेल, कोमल वाडेकर, वर्षा पाटील,लॉरेन्स डिसोझा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षाच्या कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला. तर माध्यमांसमोर बोलताना सचिन कुरेल यांनी सांगितले कि आम्ही घराणेशाही च्या विरोधात प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक लढवत आहोत. विरोधक फक्त घराणेशाही करतात सर्व उमेदवार त्यांच्या घरातले मग 20 वर्षात विकास का नाही झाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

भूमी अभिलेखची फौज शेतकऱ्यांच्या बांधावर प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करणार

भूमी अभिलेखची फौज शेतकऱ्यांच्या बांधावर प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करणार रत्नागिरी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सचिन इंगळी यांचे आवाहन रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कार्यालयात तीन महिन्यांवरील प्रलंबित असलेल्या जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी १०, ११, १७ व १८ जानेवारी रोजी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पावसाळ्यात काम होऊ न शकल्याने जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी कार्यालयाच्या अधीनस्थ कार्यालयात माहे ऑक्टोबर अखेरील १२११ मोजणी प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यापैकी ५१२ मोजणी प्रकरणे मोजणी पूर्ण होऊन कार्यालयीन कामावर प्रलंबित असून उर्वरित प्रकरणांपैकी १०२ मोजणी प्रकरणे वरील नमूद सुट्टीचे दिवशी कार्यालयातील उपलब्ध भूकरमापकांमार्फत निपटारा करण्यात येणार आहे. ज्यासाठी ५१ भूकरमापक सहभागी होतील, अशी माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी दिली. या विशेष मोहिमेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने होणार आहे. या मोजणी प्रकरणांचा निपटारा जलदगतीने करण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (म. राज्य) पुणे सुहास दिवसे यांच्या निर्देशानुसार व उपसंचालक भूमी अभिलेख, कोंकण प्रदेश, मुंबई अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडून या प्रलंबित मोजणी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ही विशेष मोहीम राबविली जात आहे. यातील १२११ मोजणी प्रकरणे मुदतबाह्य झालेली असून, तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीवर प्रलंबित आहेत. यापैकी ५१२ प्रकरणांत मोजणी पूर्ण झालेली असून, ६०४ प्रकरणांच्या मोजणी तारखा जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात लावण्यात आलेल्या आहेत. उर्वरित ९५ मुदतबाह्य मोजणी प्रकरणांना अद्याप मोजणी तारीख मिळण्यावर शिल्लक असून, सदर प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत नमूद सुट्टीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात निपटारा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. यासाठी इतर तालुक्यातील ५१ सर्वेअर यांना बोलावून मोहीम यशस्वी केली जाणार आहे. पक्षकारांनी विशेष मोहिमेचा लाभ घ्यावाया मोहिमेअंतर्गत १०२ मोजणी प्रकरणे १०, ११, १७ व १८ जानेवारी या शासकीय सुट्टीच्या दिवशी मोजणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांत मोजणीच्या नोटीस सर्व संबंधितांना पाठविण्यात आल्या असून, संबंधित अर्जदार व हितसंबंधित यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असून, अर्जदार यांनी उपस्थित राहून आपल्या जमिनींची मोजणी करून विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख इंगळी यांनी केले आहे.

अलिबाग कुरूळ येथे आज रंगणार भजन महोत्सव

अलिबाग कुरूळ येथे आज रंगणार भजन महोत्सव अशोक गायकवाड रायगड-अलिबाग :  क्षात्रैक्य समाज, अलिबाग या संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त शनिवार १० जानेवारी रोजी अखंड भजन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या कुरूळ येथील सभागृहात संपन्न होणाऱ्या, स्व . प्रभाकर सदाशिव राणे स्मृती भजन महोत्सवात निमंत्रित दहा भजन मंडळे सहभागी होणार आहेत. यामध्ये अलिबाग तालुक्यातील कु. जागृती पाटील (वेलवली) जयवंत पाटील व संदीप पाटील (कुरूळ), प्रकाश नाईक (बेलकडे), चेतन पाटील (सहाण), भूषण माळवी व दयानंद भगत (आवास) , समर्थ पाटील (वायशेत), नरेश कडू (वाडगाव) निलेश जंगम (वेश्वी) नितीन पाटील (मापगाव) हे आपल्या भजन मंडळा सह सहभागी होणार आहेत. याशिवाय सुप्रसिद्ध भजन गायिका प्रणिता देशमुख (कर्जत) यांनाही निमंत्रित केले आहे. सुप्रसिद्ध पखवाज वादक सुशांत पाटील हे आपल्या शिष्यवृंदा सोबत पखवाज सहवादन करणार आहेत. शेवटी चक्री भजन जुगलबंदी चा कार्यक्रम होणार आहे. यात आदिनाथ सटले (आळंदी) आणि महेश कंठे (मुरबाड) हे दोन सुप्रसिद्ध भजन सम्राट सहभागी होणार आहेत. या भजन महोत्सवाचा लाभ संगीत आणि भजन रसिकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष द्वारकानाथ वामन नाईक, सचिव प्रदीप कृष्णाजी नाईक आणि भजन महोत्सव समिती प्रमुख ॲड. प्रसाद शांताराम पाटील यांनी केले आहे.

मराठा समाजाचा वधु-वर  मेळावा

मराठा समाजाचा वधु-वर  मेळावा आज सानपाडा येथे करण्यात आले आहे आयोजन मुंबई, दि. (प्रतिनिधी ) : नवी मुंबईत सानपाडा येथे मराठा विकास प्रतिष्ठानच्या वतीने   १०  जानेवारी  २०२६ रोजी  दुपारी २ ते  सायंकाळी ७ या दरम्यान केमिस्ट भवन, सेक्टर ८,  सानपाडा, नवी मुंबई येथे  १६ वा मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजित  करण्यात आला आहे.  मराठा विकास प्रतिष्ठान  ही संस्था २००६  पासून सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात गेली २०  वर्षे सातत्याने कार्यरत आहे. सध्याच्या काळात समाजामध्ये विवाहासाठी योग्य वधू-वर जुळवणे ही एक गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. ही गरज लक्षात घेऊन संस्थेमार्फत वधू-वर सूचक केंद्र चालविले जाते. या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक विवाह जुळविण्यात  संस्थेला यश आले आहे, अशी माहिती मारुती विश्वासराव यांनी दिली.

कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी मुंबईत रंगणार

कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी मुंबईत रंगणार महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने  २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२०२६ चे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. श्री हालारी ओसवाल समाज, दादासाहेब फाळके रोड, रणजीत स्टुडिओ समोर, दादर (पूर्व ), मुंबई – ४०००१४ येथील भव्य वातानुकूलित हॉलमध्ये हि स्पर्धा रंगणार आहे. पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी खुला गट ठेवण्यात आला असून स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल ८ लाखांची रोख पारितोषिके जाहिर करण्यात आली आहेत. विजेत्याला रोख रुपये १ लाख पन्नास हजार, उपविजेत्याला रोख रुपये १ लाख व चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी ७५ हजार व चषक, चौथ्या क्रमांकासाठी ५० हजार शिवाय उपउपांत्य फेरीसाठी प्रत्येकी २५ हजार, उपउपांत्य पूर्व फेरीसाठी प्रत्येकी १० हजार व उपउपांत्यपूर्व फेरी अगोदरच्या फेरीत हरणाऱ्या खेळाडूस प्रत्येकी रुपये ५ हजारांचे ईनाम जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीपासून व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्या खेळाडूस रोख रुपये १ हजारांचे बक्षीस तर उपउपांत्य फेरीपासून हे बक्षीस रुपये २ हजार ठेवण्यात आले. आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला खेळाडूंना विशेष उत्तेजन देण्यासाठी सामना खेळून दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये १ हजार, तिसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये २ हजार, चौथ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस ४ हजार, पांचव्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रुपये ८ हजार तर सहाव्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये १५ हजारांचे अतिरिक्त ईनाम जाहिर करण्यात आले आहे. सिस्का कंपनीच्या शुअर स्लॅम कॅरम बोर्ड व बुलेट शॉट सोंगट्या वर हे सामने खेळविण्यात येणार आहेत. गेली दोन वर्षे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने गणवेश देण्यात येणार असून खेळाडूंच्या चहा-नाश्ता व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धा जरी सर्वांसाठी खुली असली तरीही स्पर्धेत मर्यादित खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून भाग घेणाऱ्या राज्यातील इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेमार्फत आपली नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या www.maharashtrcarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. नावे नोंदविण्यासाठी खेळाडूंनी दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन. पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजा राणी  चौकजवळ, शिवाजी पार्क, दादर येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ वर संपर्क साधावा.

विझू न देण्याची जिद्द: क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम”

विझू न देण्याची जिद्द: क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम” हेमंत ढोमे लिखित व दिग्दर्शित “क्रांतिज्योती विद्यालय  मराठी माध्यम” हा चित्रपट थेट प्रेक्षकांच्या मनाला हात घालतो आणि विचार करायला भाग पाडतो. अवघ्या १ तास ४९ मिनिटांच्या कालावधीत हा चित्रपट मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठीतून शिक्षण घेऊन घडलेल्या पिढीचा ठोस, वास्तववादी आणि प्रभावी आरसा उभा करतो. २०२६ च्या सुरुवातीलाच हा चित्रपट आला  आणि मराठी माध्यमाविषयी नव्याने चर्चा सुरू झाली. कथा चित्रपटाची कथा अलिबागजवळील नागाव येथील क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम या ९० वर्षे जुन्या शाळेभोवती फिरते. काळाच्या ओघात आणि खोट्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे ही शाळा बंद करून त्या जागी ‘इंटरनॅशनल स्कूल’ उभारण्याचा डाव आखला जातो. शाळेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. या संकटसमयी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के गुरुजी आणि माजी विद्यार्थी बबन शाळेच्या जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र आणतात. सुरुवातीला ही लढाई थोड्या विनोदी, हलक्याफुलक्या पद्धतीने सुरू होते; मात्र जसजशी गोष्ट पुढे सरकते, तसतशी ती गंभीर व विचारप्रवर्तक बनते. पुढे  काय होते त्यासाठी चित्रपट बघण्यास जा . दिग्दर्शन हेमंत ढोमे यांनी कमी कालावधीत भरपूर आशय मांडला आहे. अनावश्यक मेलोड्रामा टाळत त्यांनी पात्रे आणि कथावस्तू यांवर ठाम भर दिला आहे. कलाकारांकडून संयमी पण प्रभावी अभिनय करून घेतला आहे. “आपल्या मराठी भाषेची लाज वाटते… या पृथ्वीवर कदाचित पहिलीच जमात असेल तिला  आपल्या आईची लाज वाटते” किंवा“छापखाना आणि कारखान्यात फरक असतो; कारखान्यात माणसं घडतात”असे संवाद थेट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात.एक वेगळं ऊर्जा ,नवं चैतन्य चित्रपट गृहात बघण्यास मिळते. अभिनय अमेय वाघ याचा बबन हा संपूर्ण चित्रपटाचा कणा आहे. आगरी बोलीतील ही त्याची पहिली भूमिका असून ती अत्यंत प्रभावी झाली आहे.पाजक्ता कोळी अंजली या संशोधकाच्या भूमिकेत शांत, विचारशील आणि शाळेची हुशार विद्यार्थी  आहे . पहिला मराठी चित्रपट असूनही तिचा अभिनय सहज वाटतो. क्षिती जोग सलमा हसीना अंतुले या केंद्र सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेत ठामपणे लक्ष वेधून घेतात.हरीश दुधाडे राकेश या वकील आणि शेतकऱ्याच्या भूमिकेत जमिनीशी जोडलेली मूल्यं प्रभावीपणे मांडतात.कादंबरी कदम आणि पुष्कराज चिरपुटकर दुबईतील यशस्वी व्यावसायिक असूनही आपल्या शाळेची ‘क्रांतिज्योती’ विझू न देण्याची जिद्द ठसठशीतपणे व्यक्त करतात.या सगळ्यांच्या केंद्रस्थानी सचिन खेडेकर मुख्याध्यापक दिनकर शिर्के म्हणून उभे राहतात. त्यांच्या संयमी , ठाम आणि भारदस्त अभिनयामुळे ही क्रांतिज्योती अधिक तेजाळते. निर्मिती सावंत नार्वेकरबाईंच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे सहजसुंदर वाटतात. शिक्षणमंत्री म्हणून जितेंद्र जोशी लक्षात राहतात. तांत्रिक बाजू/गीत हर्ष-विजय यांचं संगीत कथेला योग्य साथ देतं. ईश्वर अंधारे यांची गीतं आशयाला साजेशी आहेत. पार्श्वसंगीत कुठेही आक्रस्ताळं किंवा अनावश्यक वाटत नाही. सत्यजीत शोभा श्रीराम यांचं छायांकन वास्तवदर्शी आहे. शाळेचे वर्ग, मैदान आणि परिसर आपलेसे वाटतात. भावेश तोडणकर यांचं संकलन विषयाच्या गांभीर्याशी सुसंगत आणि संतुलित आहे चित्रपट संपल्यानंतर मराठीतून शिक्षण घेऊन घडलेल्या व्यक्तींची नावं, हुद्दे आणि चेहरे पडद्यावर झळकतात. तेव्हा प्रेक्षक स्वतःलाच प्रश्न विचारतो आपण कोणत्या शाळेत शिकलो? त्या शाळेने आपल्याला काय दिलं? आणि आज आपण आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत का घालत नाही? “क्रांतिज्योती विद्यालय –मराठी माध्यम” हा केवळ चित्रपट नाही, तर मराठी भाषा आणि शिक्षणाविषयीची एक शांत पण ठाम क्रांती आहे. संपदा सावंत