Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

प्रभाग क्र. ४ मध्ये ठाकरे गटाच्या विजयामागे भाजपाचा हात ?

प्रभाग क्र. ४ मध्ये ठाकरे गटाच्या विजयामागे भाजपाचा हात ? नगरसेविका तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाचे भाजपाने लावले बॅनर कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये शिवसेनेचे ५३, भाजपा ५०, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ११, मनसेचे ५, कॉंग्रेसचे २ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे १ नगरसेवक निवडून आले आहेत. यात प्रभाग क्र. ४ मध्ये शिवसेनेच्या दोन उमेदवारांचा पराभव करत शिवसेना ठाकरे गटाचे दोन नगरसेवक निवडून आले असून या विजयामागे भाजपाचा हात असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. त्याला कारण हि तसे असून ठाकरे गटातून निवडून आलेल्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी निवडून येताच भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली. तसेच मोहने परिसरात तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाचे बॅनर लावले असून या बॅनरवर माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपा पदाधिकारी संतोष शिंगोळे यांचा फोटो असल्याने तर्क वितर्क लावले जात आहेत. केडीएमसीच्या प्रभाग क्र. ४ मध्ये लागलेल्या निकालाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रभागात शिवसेनेचे दिग्गज मानले जाणारे माजी नगरसेवक मयूर पाटील त्यांच्या पत्नी नमिता पाटील, शिवसेनेचे शाखा प्रमुख रोहन कोट आणि शिवसेना विभाग प्रमुख अंकुश जोगदंड यांच्या पत्नी पूजा जोगदंड यांना उमेदवारी देण्यात आली होती. यापैकी नमिता पाटील या अवघ्या ८ मतांनी तर रोहन कोट हे १७०३ मतांनी निवडून आले. मात्र शिवसेनेच्या मयूर पाटील आणि पूजा जोगदंड यांचा ठाकरे गटाच्या राहुल कोट आणि तेजश्री गायकवाड यांनी पराभव केला आहे. हा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागला असतानाच, मोहने परिसरात लावलेल्या  तेजश्री गायकवाड यांच्या अभिनंदनाच्या बॅनरवर भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार आणि भाजपा पदाधिकारी संतोष शिंगोळे यांचे फोटो आहेत. तर तेजश्री गायकवाड यांनी निवडून येताच माजी आमदार नरेंद्र पवार यांची भेट घेतली होती. प्रभाग क्र. ४ मध्ये भाजपाला एकही जागा न दिल्याने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांचे काम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे शिवसेना भाजपा महायुतीमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा चारोटी ते पालघर ५०,००० लोकांच्या  मोर्चाची सुरुवात!

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा चारोटी ते पालघर ५०,००० लोकांच्या  मोर्चाची सुरुवात! मागण्या पूर्ण होईपर्यंत अनिश्चित काळासाठी पालघरमध्ये धरणे आंदोलनाचा निर्धार अनिल ठाणेकर ठाणे : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आज पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून आलेल्या सुमारे ५०,००० लोकांचा एक अतिभव्य पायी मोर्चा काढला. हा मोर्चा डहाणू तालुक्यातील चारोटी येथून सुरू झाला असून, रात्री मनोर येथे मुक्काम करेल आणि उद्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करेल. जोपर्यंत सरकारच्या वतीने निश्चित कालमर्यादेसह लेखी स्वरूपात आपल्या ज्वलंत आणि प्रलंबित मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत हा प्रचंड जनसमुदाय पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करणार आहे. अखिल भारतीय किसान सभा (एआयकेएस), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू), अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (एडवा), डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच (एएआरएम) यांसारख्या संघटनाही मोठ्या संख्येने सामील झाल्या आहेत. या मोर्चाचे नेतृत्व माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि एआयकेएसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, पॉलिट ब्युरो सदस्य आणि एडवाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, केंद्रीय समिती सदस्य, माकप राज्य सचिव आणि किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले, केंद्रीय समिती सदस्य आणि सीटूचे राज्य सचिव, डहाणूचे दोन वेळा आमदार असलेले विनोद निकोले, राज्य सचिवमंडळ सदस्य आणि एएआरएमचे राज्य निमंत्रक किरण गहला आणि इतर अनेक जण करत आहेत. उद्या सीपीएमचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस विजू कृष्णन हे देखील या मोर्चात सामील होतील. या मोर्चाच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: वनाधिकार कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे; सर्व देवस्थान, इनाम, वरकस आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करणे; मोदी सरकारने रद्द केलेली मनरेगा योजना पूर्ववत सुरू करणे; स्मार्ट मीटर योजना रद्द करणे; पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे; चार श्रम संहिता रद्द करणे; वाढवण आणि मुरबे बंदरांचे जनविरोधी प्रकल्प रद्द करणे; पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची सोय करणे; शिक्षण, रोजगार, रेशन, आरोग्य इत्यादी सुविधांमध्ये वाढ करणे.

गोरेगाव फिल्म सिटी हत्याकांड प्रकरणात सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता

गोरेगाव फिल्म सिटी हत्याकांड प्रकरणात सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता गोरेगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई :   गोरेगाव बहुचर्चित फिल्म सिटी हत्याकांडातील राजू उर्फ श्रीकांत शिंदे खून प्रकरणात दिंडोशी येथील बोरवली विभागाच्या सत्र न्यायालयाने सर्व आठही आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे. ५ जानेवारीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी टी आगलावे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील इम्रान पी शेख यांनी बाजू मांडली. सदर खटला गोरेगाव येथील आरे पोलीस ठाण्याच्या तपासावर आधारित होता. अभियोजन पक्षानुसार फिल्मसिटी परिसरात सुरक्षा सेवा व्यवसाय करणाऱ्या श्रीकांत उर्फ राजू शिंदे यांच्यावर २२ मे २०१५ रोजी गोरेगाव आरे कॉलनीतील फिल्मसिटी परिसरात कालिया मैदानाजवळ बालाजी टेलिफिल्म्सच्या सेट समोर गळी बार करण्यात आला होता. हेल्मेट घातलेले दोन अज्ञान व्यक्ती मोटरसायकल वरून येऊन त्यांनी राजू शिंदे यांच्यावर गोळी झाडल्याचा प्रत्यक्ष दर्शनी पोलिसांना सांगितले होते. या हल्ल्यात राजू शिंदे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. त्यावेळी त्यांना तत्काळ नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे ४५ दिवस उपचार सुरू असताना २ जुलै २०१५ रोजी गोळीबाराच्या जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तपास करून पुन्हा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करत २१ ऑगस्ट २०२५रोजी आरोप पत्र सादर केले. हे प्रकरण सत्र खटला क्रमांक १८९/२०१५ म्हणून नोंदवण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपीं विरुद्ध भारतीय दंड संहिताच्या कलम ३०२, १२०ब तसेच शस्त्र कायद्याच्या कलम २५ व २७ अंतर्गत आरोप निश्चित केले होते. या प्रकरणात सुरेश सुभाष गायकवाड यांना मुख्य सूत्रधार म्हणून दर्शविण्यात आले होते. खटल्याच्या सुनावणी दरम्यान अभियोजन पक्षाने एकूण ३८ साक्षीदार तपासले मात्र उलट तपासणी दरम्यान साक्षीदारांच्या जबाबांमध्ये गंभीर विसंगती आढळून आल्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या साक्षीत फिर्यादी पक्षाने सांगितलेल्या तीन गोळ्यांच्या जखमान ऐवजी क्षविच्छेदन अहवालात चार गोळ्यांच्या प्रवेश जखमा आढळल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हल्ल्याच्या दिवसापासून मृत्यू होईपर्यंत राजू शिंदे हे वैद्यकीय देखरेखीखाली होते. तसेच बॅलेस्टिक तज्ञांच्या साक्षीनुसार जप्त करण्यात आलेली शस्त्रे ही कथित गुन्ह्यात वापरलेले शस्त्रांशी जुळत नसल्याचे स्पष्ट झाले. तपास अधिकाऱ्यांच्या साक्षीतून हेही निष्पन्न झाले की पीडिताचा मृत्यूपूर्वी जबाब नोंदवण्यात आला असल्याचा दावा असूनही तो जबाब न्यायालय समोर सदर प्रकरणात आलेला नव्हता. या सर्व त्रुटी आणि संशयस्पद बाबी लक्षात घेता अभियोजन पक्ष आरोप कोणत्याही रास्त शंकेपलीकडे सिद्ध करण्यात अपयशी ठरण्याचे नमूद करत न्यायालयाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले या प्रकरणात सुरेश सुभाष गायकवाड यांचे मुख्य प्रतिनिधित्व अ‍ॅड श्रीकांत सुरेशराव शिरसाट यांनी तर जुगल उर्फ पप्पू बाबू दोडिया याचे प्रतिनिधित्व अ‍ॅड सपना दिलीप हजारे यांनी केले तसेच सहकारी वकील म्हणून अ‍ॅड रवींद्र सोपान लिहिणार अ‍ॅड नरेश मुरलीधर गायकवाड अ‍ॅड प्रशांत वसंत जाधव आणि सहकारी आयुष्य राम शंकर पांडे यांनी काम पाहिले.

 उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिंधुदुर्गात एक खिडकी योजना…!

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज! उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सिंधुदुर्गात एक खिडकी योजना…! सिंधुदुर्ग- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व मदतीसाठी एक खिडकी योजना लागू करण्यात आली आहे.  ही माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी तृप्ती जोडमिसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील आठ तालुक्यांसाठी आठ निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रत्येकी दोन याप्रमाणे १६ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत अशीही माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात १४ हजार १५३ दुबार मतदार आहेत त्यांच्याकडून ज्या ठिकाणी मतदान करणार त्याचे ‘ऑप्शन’  भरून घेण्यात येत आहेत असे धोडमिसे यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ५० सदस्य आणि पंचायत समित्यांचे १०० सदस्य असून या निवडणुकीत ५ लाख ९९ हजार ५६४ मतदार निश्चित झाले आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या जास्त असून ती ३ लाख १९०३ इतकी आहे तर पुरुष मतदार २ लाख ९७ हजार ६६० इतके आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. प्रतिबंधात्मक कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा हा गोवा राज्याच्या सीमेवर येतो.त्यामुळे निवडणूक काळात अवैध धंद्यांना चाप बसावायासाठीदोडामार्ग,सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यांमध्ये १० ठिकाणी ‘तपासणी नाके ‘ तयार करण्यात आले आहेत.तसेच जिल्हाभर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी यावेळी दिली. जिल्ह्यात एकूण ८७० मतदान केंद्रे असून कुडाळ तालुक्यात सर्वाधिक १५३ तर सावंतवाडी तालुक्यात १४३ मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी सुमारे ४,५०० कर्मचारी लागणार आहेत.जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागात असलेल्या ६५ मतदान केंद्रांमध्ये नेटवर्कची सुविधा नसल्याने त्या ठिकाणी अतिरिक्त व्यवस्था करण्यात येत आहे अशी माहिती जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी दिली.

जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन

जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन मुंबई: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर मानखुर्द येथील क्रांतीसम्राट डॉ. बाबासाहेब गोपले भवन येथे ४४ व्या मातंग समाज क्रांतीचक्र परिवर्तन दिनानिमित्त क्रांतीज्योती कुसुमताई बाबासाहेब गोपले यांच्या हस्ते जय लहुजी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. मातंग समाजाचे नेते समाजभूषण सुदाम आवाडे, बी जी गायकवाड, मदन आवाडे, योगेश शिंदे,बंडु चांदणे, तुलसिराम ताटे, नितिन हिवाळे, हरीभाऊ कांबळे, दत्तात्रय आवाडे, रवी थोरात, पार्वती  आवाडे, अश्विनी शिंदे, द्वारकाबाई लोंढे, आदी मान्यवर उपस्थित होते.

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सानपाडा प्रभाग क्रमांक १९ मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार गणपत (भाऊ) दगडु भापकर, सुनिल  रामदास कुरकुटे, सौ. शैला जगदीश पाटील आणि सौ. शिल्पा राजेश ठाकूर हे विजयी झाल्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने १८ जानेवारीला सत्कार करण्यात आला. सत्कार प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, शासकीय योजना ज्येष्ठ नागरिकांना मिळण्यासाठी आपण सहकार्य करावे. सानपाड्याचा उत्तम विकास करावा. नगरसेवकांनी सांगितले की, आता तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमच्याकडे येऊ आणि आपणास सहकार्य करू. काम करणं ही आमची सर्वांची जबाबदारी आहे. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव,  सचिव जगदीश एकावडे, खजिनदार महादेव पाटील, उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे, सीमा बोराडे,  सहसचिव राजेंद्र कदम, सहखजिनदार नाना शिंदे, कार्यकारणी सदस्य जे. पी.  देसाई,  मंगला मानधने, माजी अध्यक्ष मारुती कदम, माजी उपाध्यक्ष बळवंत पाटील, माजी सहखजिनदार सुभाष बारवाल  आदी मान्यवर व सभासद उपस्थित होते.

कल्याणचा राजाचे जल्लोषात आगमन

कल्याणचा राजाचे जल्लोषात आगमन कल्याण : कल्याण पूर्वेतील तिसाई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने “कल्याणचा राजा” श्री गणरायाची भव्य दिव्य आगमन मिरवणूक भक्तिभावात व जल्लोषात रविवारी संपन्न झाली. ढोल-ताशांच्या निनादात, हरिनामाच्या पवित्र गजरात विघ्नहर्त्याचे मंगलमय आगमन झाले. भक्तांच्या अपार श्रद्धा, आनंद आणि उत्साहाने संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारून गेला. या सोहळ्याला  आमदार सुलभा गायकवाड, माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, नगरसेविका मनिषा गायकवाड, तिसाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव गायकवाड यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्याणची अस्मिता आणि श्रद्धेचे स्थान असलेल्या “श्री तिसाई प्रतिष्ठाण” आयोजित “कल्याणचा राजा” – माघी गणेशोत्सवांचे यंदाचे वर्ष हे उत्सवाचे आणि अभूतपूर्व चैतन्याचे आहे. या वर्षापासून बाप्पाच्या “पारंपारिक आगमन सोहळ्याचे” आयोजन करण्यात आले आहे.  रविवारी कल्याण पूर्वेतील चक्की नाका, पुनालिंक रोड ते आई तिसाई देवी मंदिर, तिसगाव अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यंदाच्या माघी गणेशोत्सवाचे  विशेष आकर्षण पर्यावरणपूरक मूर्ती असून ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रथम अशी माघी गणेशोत्सवातील “टिशू पेपर” पासून (कागदी) बनवलेली भव्य श्री गणेश मूर्ती आहे. तसेच ६१ फूट उंच केदारनाथ मंदिराची नेत्रदीपक प्रतिकृती देखील याठिकाणी साकारण्यात आली आहे.

 मनसेचे गणेश लांडगे ठरले केडीएमसी निवडणुकीत जायंट किलर

मनसेचे गणेश लांडगे ठरले केडीएमसी निवडणुकीत जायंट किलर भाजपाचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांचा केला पराभव कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक नुकतिच पार पडली असून, या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक तथा केडीएमसीचे माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांचा देखील सहभाग आहे. मनसेचे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे यांनी त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कल्याण मधील प्रभाग क्र. ७ ड मधून भाजपाच्या वतीने डॉ. पंकज उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पक्ष आदेशानुसार उपाध्याय यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर भारतीय जनता पार्टीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या माजी स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांना भाजपा पुरस्कृत उमेदार म्हणून जाहीर केले. मात्र कोविड काळानंतर प्रभागात न फिरकल्याने मतदारांनी त्यांना नाकारत मनसेच्या गणेश लांडगे यांना पसंती दिल्याची चर्चा आहे. तर मनसेचे विभाग अध्यक्ष कपिल पवार आणि मनसेचे शाखा अध्यक्ष गणेश लांडगे हे गेली १० वर्षे प्रभागासः कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात सक्रीयपणे काम करत असल्याचे पाहायला मिळाले. प्रभागातील नागरिकांच्या समस्या असो कि शहरातील नागरिकांच्या संदर्भात एखादा विषय, या दोघांच्या जोडीने अनेक विषय लावून धरत नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे. त्याप्रमाणे मनसे पक्षातर्फे प्रभाग क्र.७ ड मध्ये गणेश लांडगे यांना आणि कपिल पवार यांच्या पत्नी सोनल पवार यांना प्रभाग क्र. ९ ब मधून उमेदवारी देण्यात आली. मात्र सोनल पवार यांचा यात पराभव झाला असून गणेश लांडगे यांनी भाजपाच्या संदीप गायकर यांचा पराभव करत जायंट किलर ठरले आहेत. या निकालानंतर आता कपिल पवार यांच्याकडे शहराची जवाबदारी देण्याची मागणी मनसे कार्यकर्त्यांमधून होत आहे.

डॉ. विजय पंडित यांच्या “बडे भाग मानुष तन पाव” या कथासंग्रहाचे प्रकाशन

डॉ. विजय पंडित यांच्या “बडे भाग मानुष तन पाव” या कथासंग्रहाचे प्रकाशन कल्याण : कल्याण पश्चिमेतील के.एम. अग्रवाल महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवाद १६-१७ जानेवारीला संपन्न झाला. देशभरातील विविध विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील प्रतिष्ठित शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, संशोधक आणि विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परिसंवादात सक्रिय आणि उत्साहाने सहभाग घेतला. परिसंवादाचे उद्घाटन सत्र महाविद्यालयाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विजय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीच्या माजी अध्यक्षा प्राध्यापक शितला दुबे यांनी भूषवले. मुख्य भाषण प्राध्यापक मनोज सिंह यांनी केले. ज्यांनी हिंदी साहित्यातील समकालीन प्रवचन, सामाजिक चिंता आणि वैचारिक ट्रेंडबद्दल सखोल आणि विचारप्रवर्तक अंतर्दृष्टी दिली. या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स, मुंबई झोनल डायरेक्टर रेणू पृथियानी उपस्थित होत्या. उद्घाटन सत्राचे विशेष आकर्षण म्हणजे चार महत्त्वाच्या पुस्तकांचे प्रकाशन. यामध्ये अमरकांत वरील लेखांचा संग्रह, मध्य आशियातील हिंदीवरील लेखांचा संग्रह, पंडित विद्यानिवास मिश्रावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समीचिन मासिकाचा विशेष अंक आणि डॉ. विजय पंडित यांचा नवीनतम लघुकथा संग्रह, “बडे भाग मानुष तन पाव” यांचा समावेश होता. उपस्थितांनी डॉ. विजय पंडित यांच्या लघुकथा संग्रहावर आपले विचार व्यक्त केले, तो मानवी संवेदनशीलता, जीवन दृष्टिकोन आणि सामाजिक वास्तवाने ओतप्रोत एक शक्तिशाली काम असल्याचे म्हटले आणि त्याचे मनापासून कौतुक केले.

आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांचा आत्मदहनाचा इशारा

आझाद मैदानात आंदोलनास बसलेल्या नोवेल साळवे यांचा आत्मदहनाचा इशारा कल्याण:  आझाद मैदान येथे धरणा आंदोलन करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेश सचिव नोवेल साळवे यांनी सरकार त्यांच्या आंदोलनाची दखल घेत नसल्याकारणाने साळवे यांनी आपले आंदोलन तिव्र करून आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची दखल घेत मला महाराष्ट्र शासन गृह विभागाचे उप सचिव यमुना जाधव यांनी साळवे यांना बोलवून अडचण ऐकून घेत ठाणे पोलीस आयुक्त यांना कार्यवाही करण्यासाठी पत्र पाठविण्यात आले. परंतु त्या पत्रावर अद्याप कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने नोवेल साळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी नोवेल साळवे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्यावर त्यांचे ओपन हार्ट सर्जरी झाली  होती. नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेल्या दिवसांपासून साळवे यांनी आझाद मैदानावर न्याय मिळण्यासाठी आंदोलन सुरू केले होते व त्यांनी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी केली की त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून दोषींना वाचविणारे उल्हासनगर येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात यावे परंतु आजपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार पक्ष देखील याकडे लक्ष देत नसल्याने   त्यामुळे 28 जानेवारी रोजी साळवे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.