Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे – रामदास आठवले

छोटे पक्ष, गट, संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे – रामदास आठवले मुंबई / रमेश औताडे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणाऱ्या छोट्या राजकीय पक्षांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये झाले पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पीपल्स रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षात विलीन करून मिलिंद सुर्वे यांचा शेकडो कार्यकत्यांसह रिपब्लिकन पक्षात प्रवेश तसेच राष्ट्रवादीचे नेते जीवन जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन जाधव आणि डॉ रश्मी जीवन जाधव यांच्या नेतृत्वात त्यांच्या अनेक सहकान्यांनी जाहीर प्रवेश केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील प् आहोत. संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष आपण पोहचवला असून लवकरच रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. त्या दृष्टीने रिपब्लिकन  पक्षाची घोडदौड सुरू आहे. रिपब्लिकन पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी छोट्या रिपब्लिकन गटांनी, पक्षांनी आणि संघटनांनी रिपब्लिकन पक्षात सामील व्हावे असे आवाहन आठवले यांनी केले.

येथे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत आढावा बैठक

येथे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाबाबत आढावा बैठक उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेतला आढावा अशोक गायकवाड रायगड-कर्जत : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशातील ९ राज्ये व ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला सुरुवात झाली असून, पुढील टप्प्यात महाराष्ट्रातही हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत येथे कृषी संशोधन केंद्रात मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तहसीलदार धनंजय जाधव, निवडणूक नायब तहसीलदार गोविंद कोटुंबे यांच्या उपस्थितीत मंगळवारी आढावा बैठक पार पडली. बैठकीस ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), मंडळ अधिकारी, मतदान केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. यावेळी विविध पूर्वतयारी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात येऊन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. मतदान केंद्र अधिकारी ऐप द्वारे मॅपिंग पूर्ण करणे तसेच प्रोजेनी मॅपिंग तत्काळ पूर्ण कराव्या, ८५ वर्षांवरील मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणे, मयत मतदारांची नावे वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ भरून घेणे, मृत्यू दाखला उपलब्ध नसल्यास जबाब, पंचनामा व कुटुंबीयांची स्वाक्षरी घेऊन कार्यवाही करणे, अस्पष्ट / ब्लॅक अँड व्हाईट फोटो असलेल्या मतदारांचे रंगीत फोटो घेऊन फॉर्म क्रमांक ८ भरून घेणे, मॅपिंग कार्यवाहीबाबत मॅपिंगची प्रक्रिया तीन टप्प्यांत राबविण्याचे निर्देश टेबल टॉप एक्टिविटी द्वारे २००२ व २०२४ मतदार याद्यांचे जुळवणी (मॅपिंग) करणे, जुळवणी न झाल्यास प्रोजनी मॅपिंग(आई-वडील/आजी-आजोबा यांच्या आधारे) करणे, उर्वरित अद्याप सर्वेक्षण झालेले नाही अशा मतदारांसाठी घरभेट देऊन माहिती संकलन करणे, मॅपिंगनंतरची माहिती बूथ लेवल अधिकारी ऍप वर ऑनलाइन अपलोड करणे, राज्यातील ऑनलाइन मॅपिंग फक्त २१% पूर्ण असल्याने गती वाढविण्याचे निर्देश (मोजणी/ गणना फॉर्म) छपाई डेटा उपलब्ध झाल्यानंतर २ दिवसांत डाउनलोड व ३ दिवसांत छपाई पूर्ण करणे, छपाईसाठी जिल्हास्तरावर अभिकर्ता नियुक्ती तातडीने करणे, टप्प्याटप्प्याने (उदा. २०० फॉर्म) छपाई करून वितरण करणे, इंटरनेट वेग लक्षात घेऊन रात्रीच्या वेळेस डाउनलोड करण्याचे नियोजन, DSE पडताळणी भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावरील DSE Generation नंतर पडताळणी व वगळणी तातडीने पूर्ण करणे मतदान केंद्र अधिकारी व पर्यवेक्षक बाबत प्रत्येक मतदान केंद्रासाठी स्वतंत्र मतदान केंद्र अधिकारी नियुक्त करणे, मतदान केंद्र अधिकारी अधिकारी व पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देणे, BLO Call Book सुविधा वापरून नागरिकांच्या कॉलला त्वरित प्रतिसाद देणे, प्रशासकीय व्यवस्था कामाचा ताण कमी करण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटर्स नियुक्त करण्याची तयारी करणे , मतदान केंद्र अधिकारी पर्यवेक्षक मार्फत फॉर्म संकलन व नोंद प्रक्रिया करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करून लोकसहभाग वाढविण्याचे आवाहनकरणे, विशेष सूचना अस्पष्ट व मानवी नसलेल्या छायाचित्रांची पडताळणी तातडीने पूर्ण करणे प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करून विशेष सखोल पुनरिक्षणासाठी सज्ज राहण्याचे निर्देश यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून मतदार यादी शुद्ध, अद्ययावत व त्रुटीमुक्त करण्यासाठी प्राधान्याने कार्य करावे, असे आवाहन केले.

कुंभमेळा प्रकल्पांसाठी ५४.५३ कोटींचा निधी

कुंभमेळा प्रकल्पांसाठी ५४.५३ कोटींचा निधी नाशिक-त्र्यंबकेश्वरमधील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती हरिभाऊ लाखे नाशिक : केंद्र शासनाच्या ‘भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य २०२५-२६’ योजनेअंतर्गत नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या तीन महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी ५४.५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ५० वर्षांच्या बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आला असून, राज्य सरकारने तो संबंधित यंत्रणांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. या निधीतून प्रामुख्याने रस्ते विकासाशी संबंधित प्रकल्पांना गती दिली जाणार आहे. डहाणू-जव्हार त्र्यंबकेश्वर नाशिक-औरंगाबाद मार्गावरील सहा लेन काँक्रीट रस्ता व पालखी मार्ग बांधकामासाठी ३५ कोटी रुपये, शिर्डी-राहाता बायपास रस्त्याच्या सुधारणा कामासाठी १६.५ कोटी रुपये, तर नाशिक-दिंडोरी-वणी-नंदुरी रुंदीकरण व काँक्रिटीकरणासाठी ३.०३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या सर्व कामांची रस्त्याच्या अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे. सदर निधी नगर विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वितरित करण्यात येणार असून, यासाठी मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्यांना आहरण व नियंत्रण अधिकार देण्यात आले आहेत. तसेच कुंभमेळा आयुक्तांना समन्वय अधिकारी म्हणून नियुक्त करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रकल्पांसाठी वितरित करण्यात आलेला निधी केवळ मंजूर उद्दिष्टांसाठीच वापरणे बंधनकारक असून, त्याचा पूर्ण वापर ३१ मार्च २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे. निधीचा विनियोग केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळेत सादर करण्याचेही निर्देश शासनाने दिले आहेत. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रकल्पांवर दुबार निधी खर्च होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोणताही बदल करावयाचा असल्यास केंद्र शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. या निर्णयामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असून, वाहतूक सुलभता व भाविकांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प भूसंपादन मोबदला वाटपाला वेग

वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प भूसंपादन मोबदला वाटपाला वेग जिल्हाधिकारी डॉ.इंदु राणी जाखड यांनी घेतले महत्वाचे निर्णय अशोक गायकवाड पालघर : वाढवण बंदर ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्पासाठी भूसंपादन मोबदला वाटप प्रक्रियेला सुरुवात झाली असून, भूधारकांना मोबदला सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक कार्यपद्धती आखली आहे. जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उपजिल्हाधिकारी महेश सागर, तेजस चव्हाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहव्यवस्थापक संचित मंगला, विविध बँकांचे प्रतिनिधी तसेच पालघर व डहाणू तालुक्यातील अधिकारी सक्षम प्राधिकारी (CALA), बँकांचे अधिकारी, प्रकल्प क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. मोबदला थेट संबंधित भूधारकांच्या बँक खात्यात RTGS पद्धतीने जमा केला जाणार असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले . भूधारकांनी अद्ययावत ७/१२ उतारा, फेरफार नोंदी सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या प्रकरणांमध्ये वारस नोंदी प्रलंबित आहेत, त्या तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्राम महसूल अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. यासाठी तलाठी कार्यालये व ग्रामपंचायती येथे विशेष कॅम्प आयोजित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी सांगितले. नोटीस बजावणीदरम्यान अनुपस्थित असलेल्या भूधारकांपर्यंत पुन्हा संपर्क साधण्याचे, आणि आवश्यकतेनुसार सार्वजनिक ठिकाणी नोटीस प्रसिद्ध करून पंचनामा करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले. मोबदला मिळाल्यानंतर भूधारकांनी घाईघाईने खर्च न करता, तो सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले . नवीन जमीन खरेदी, बँक मुदत ठेवी किंवा पोस्ट ऑफिस बचत योजना यांसारख्या पर्यायांचा वापर करावा. याशिवाय, बँकांनी भूधारकांना नियमित उत्पन्नाचे स्रोत निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन करावे, तसेच मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा ठेवून कुटुंबीयांची संमती घेण्याची प्रणाली विकसित करावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी दिले. मोबदल्याच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या सायबर गुन्ह्यांचा धोका लक्षात घेता, OTP किंवा बँक तपशील कोणालाही देऊ नयेत, असे स्पष्ट करण्यात आले. बँका व पोलीस विभागाने संयुक्तपणे जनजागृती मोहीम राबवण्याचेही निर्देश देण्यात आले. भूधारकांनी कोणत्याही मध्यस्थ, एजंट किंवा दलालांमार्फत व्यवहार न करता थेट सक्षम प्राधिकाऱ्यांशी किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले.

अंगणवाड्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि बाल संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली? -वर्षा गायकवाड

अंगणवाड्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि बाल संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी सरकारने कोणती पावले उचलली? -वर्षा गायकवाड नवी दिल्ली : अंगणवाडीतील पायाभूत सुविधा व कुपोषणाच्या प्रश्नावर सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. स्वच्छता गृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या दाट लोकवस्तीच्या शहरी भागांमध्ये —विशेषतः अनधिकृत वस्त्यांमध्ये—अंगणवाडीची पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणाची बोंबाबोंब आहे. केंद्र सरकारने यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत, त्याची सविस्तर आकडेवारी द्यावी, असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. लोकसभेत प्रश्न उपस्थित करत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्यात सध्या किती अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत, जिथे स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी किंवा पुरेशी पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत आणि या त्रुटी दूर करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत?महाराष्ट्रातील आदिवासी व पोषणदृष्ट्या संवेदनशील जिल्ह्यांमध्ये ‘पोषण ट्रॅकर’  अंतर्गत संकलित करण्यात आलेल्या माहितीची सद्यस्थिती काय आहे व जन्मावेळी कमी वजन असलेल्या मुलांविषयीची अद्ययावत आकडेवारी काय आहे? ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत, मुंबईमध्ये काळजी आणि संरक्षणाची आवश्यकता असलेल्या मुलांची प्रभागनिहाय संख्या किती आहे? तसेच, त्यांच्या पुनर्वसनासाठी निधीचा वापर केला जात आहे का? मुंबईसारख्या महानगरांमध्ये पोषणसेवा, अंगणवाडीची पायाभूत सुविधा आणि बाल संरक्षण यंत्रणा बळकट करण्यासाठी कोणती पावले उचलण्यात आली आहेत? असे प्रश्न खासदार वर्षा गायकवाड यांनी विचारले आहेत. वर्षा गायकवाड यांच्या प्रश्नाला महिला व बाल विकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी उत्तर दिले आहे, मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ अंतर्गत, अंगणवाडी केंद्रांमधील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. १५ व्या वित्त आयोगाच्या कालावधीत, ‘मनरेगा’ (MGNREGA) योजनेशी समन्वय साधून, दरवर्षी १०,००० या दराने एकूण ५०,००० अंगणवाडी केंद्रांचे बांधकाम केले जात आहे. या योजने अंतर्गत, निधीची तरतूद करण्यात आली असून MGNREGA अंतर्गत ₹८.०० लाख, १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत (किंवा इतर कोणताही विना-निर्बंध निधी) ₹२.०० लाख, आणि महिला व बाल विकास मंत्रालयाकडून ₹२.०० लाख; हा निधी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामध्ये, निधी-वाटपाच्या विशिष्ट पद्धतीवर आधारित असलेल्या गुणोत्तरामध्ये विभागला जातो. अंगणवाडी केंद्रांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने, मंत्रालयाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत, यामध्ये, इतर बाबींसह, अंगणवाडी केंद्रांमधील पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि शौचालयांसाठी वाटप करण्यात येणारा निधी अनुक्रमे ₹१०,००० वरून ₹१७,००० पर्यंत आणि ₹१२,००० वरून ₹३६,००० पर्यंत वाढवण्याचा समावेश आहे.’मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांच्या अधिकारक्षेत्रात येते. ‘मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण २.०’ अंतर्गत, महाराष्ट्र राज्यातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांची (AWCs) एकूण संख्या—तसेच पिण्याचे पाणी, पायाभूत सुविधा आणि विकास देखरेख निर्देशकांवर आधारित कार्यरत अंगणवाडी केंद्रांची संख्या https://www.poshantracker.in/statistics या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गर्भवती महिला, स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींना ‘टेक-होम रेशन’ (THR) चा पुरवठा अखंडितपणे होत राहील याची खात्री करण्यासाठी, ‘पोषण ट्रॅकर’मध्ये ‘नॉमिनी मॉड्यूल’ सुरू करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ दरम्यान, ‘मिशन वात्सल्य’च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाला ₹१४४.९७ कोटींची रक्कम वितरित करण्यात आली. याव्यतिरिक्त, बाल संगोपन संस्थांच्या (CCIs) माध्यमातून ३,६६७ मुलांना लाभ मिळाला, आणि ‘मिशन वात्सल्य’च्या संस्थाबाह्य संगोपन घटकाअंतर्गत ३२,५२० मुलांना सहाय्य पुरवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ ३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी कायम ठाणे: शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांना अर्ज सादर करण्यासाठी तसेच आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अतिरिक्त वेळ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर केल्यानुसार, पालकांना ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची सुविधा कायम ठेवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची १ किलोमीटरची अट शिथिल करण्यात आल्यामुळे पालकांना अधिक शाळांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. या निर्णयामुळे अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीच्या शाळांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, ज्या पालकांनी यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत, त्यांना अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध आहे. याबाबत पालकांना पोर्टलवरील पॉप-अप सूचनांद्वारे माहिती देण्यात येत आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे श्री. बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, “आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांचा समावेश व्हावा, यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. पालकांनी या संधीचा लाभ घेऊन अर्ज सादर करावेत तसेच आवश्यक असल्यास दुरुस्ती करून प्रक्रिया पूर्ण करावी.” तरी सर्व पात्र पालकांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन नवीन अर्ज सादर करावेत किंवा पूर्वीच्या अर्जांमध्ये आवश्यक दुरुस्ती करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच ही माहिती अधिकाधिक पालकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्टतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिर

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्टतर्फे गरजूंना अन्न धान्य वाटप व आरोग्य तपासणी शिबिर कल्याण : कल्याणच्या श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट तर्फे दर महिन्याला गरीब गरजू लोकांना अन्नधान्य वाटप करण्यात येते.  कल्याण पश्चिम शहरात गेली ३५ वर्ष हा उपक्रम चालू असून अनेक गोरगरीब गरजू या योजनेचा लाभ घेत असतात. महिन्यातून एकदा हे धान्य वाटप केलं जातं. त्याचबरोबर रोज दुपारी भुकेल्या लोकांना जेवण दिले जाते. आधारवाडी च्या लोटस हॉस्पिटल समोर अन्नक्षेत्र असून येथे हे उपक्रम राबविले जातात. गुरूवार झालेल्या अन्नधान्य वितरण व आरोग्य तपासणी शिबिर या उपक्राला विशेष अतिथी म्हणून कल्याण पोलीस परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, नगरसेवक प्रतिक पेणकर उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे संचालक  जसू चंदाराणा व तुषार दाणी यांनी संस्थे तर्फे त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी उपस्थित विमल ठक्कर, केशु लिमानी, डॉक्टर अवधूत शेट्ये, मोनीस चंदाराणा,  सुभाष रायचुरा, विष्णूकुमार चौधरी, राजीव चंदाराणा आदी मान्यवरांच्या हस्ते अन्नधान्य वितरण करण्यात आले. यावेळी नगर सेवक प्रतिक पेणकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपल्या संस्थेचे चांगले कार्य असून आपल्या सेवा कार्य मघ्ये सहभागी होवू अशी खात्री दिली आणी संस्थेच्या सेवा कार्याचे कौतुक करुन कामात सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले व त्या कामात सहकार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.

अल्पवयीन मुलींशी छेडछाड प्रकरणी क्रिकेट प्रशिक्षकला टिटवाळा पोलिसांनी केली अटक     

अल्पवयीन मुलींशी छेडछाड प्रकरणी क्रिकेट प्रशिक्षकला टिटवाळा पोलिसांनी केली अटक कल्याण: दोन अल्पवयीन मुलींशी छेडछाड़ केलेल्या प्रकरणी क्रिकेट प्रशिक्षकला पोलिसांनी अटक केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा पोलिस हद्दीतील ५९ वर्षीय आरोपी खासगी क्रिकेट कोचला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने शेजारच्या दोन अल्पवयीन मुलींशी विनयभंग केला होता. पीडित कुटुंबांच्या तक्रारीवर कल्याण तालुका पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलींचे वय १२ ते १४ वर्षे आहे. गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात आरोपीने एका मुलीशी अयोग्य पद्धतीने स्पर्श केला होता, तर नुकत्याच एका मुलीशी त्याने अशीच कृत्य करण्याचा प्रयत्न केला. नुकत्याच्या घटनेची माहिती जेव्हा दुसऱ्या मुलीने आपल्या पालकांना दिली, तेव्हा त्यांनी परिसरातील लोकांना सांगितले. तेव्हा त्यांना कळले की आरोपीने शेजारच्या दुसऱ्या मुलीशीही अशीच चूक कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर दोन्ही पीडितांच्या पालकांनी बुधवारी कल्याण तालुका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

गोरेगावमध्ये श्रीराम नवमीची मिरवणूक ! 

गोरेगावमध्ये श्रीराम नवमीची मिरवणूक ! शहरातील असंख्य भाविकांनी केली अलोट गर्दी मुकुंद रांजणे माथेरान: २७ मार्चला, गोरेगांव येथे बजरंग दल गोरेगांव लोणेरे विभाग आणि श्रीराम नवमी उत्सव समितीचे वतीने श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. श्रीरामांच्या जयंतीनिमित्त गोरेगांव नागरीत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या अधिक होती. श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांचे चरणस्पर्श करण्यासाठी, त्यांची आरती करण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक होता. पहिल्यांदाच दलित वस्तीतून, अर्थात संत रोहिदास महाराज नगर येथून अखंड शहराची श्रीराम नवमी उत्सव मिरवणूक काढण्यात आली. संत रोहिदास नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे काम गेले १३ वर्षे, काही कारणास्तव प्रलंबित होते. असंख्य प्रयत्न करून सुद्धा मंदिराचे काम बरेच वर्षे रखडले होते. परंतू, या वर्षी योगायोगाने श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठापनाचे कार्यक्रम आणि श्रीराम नवमी उत्सव एका पाठोपाठ आल्याने, संत रोहिदास नगरातील जनतेने, श्रीराम नवमी समितीला मिरवणुकीचे प्रारंभ आमच्या मंदिरातून व्हावे अशी विनंती केली. समितीने यावर सभा आयोजित करून संगनमताने होकार देत हा ऐतिहासिक निर्णय घेतला व हे हिंदू एकात्मतेचे सर्वोत्तम उदाहरण कायम केले. आदित्य रमेश गोरेगांवकर (बजरंग दल रायगड जिल्हा संयोजक ), दिनेश हरवंडकर ( रा. जि. प. सदस्य ), हरेश शेठ (भा.ज.पा. वरीष्ठ नेते), युवराज मुंढे (भा.ज.पा. माणगांव ता. प्र.), जहेंद्र मुंढे (ता. सरचिटणीस भा.ज.पा), शैलेश महाडिक (विभाग प्र. शिवसेना) राजीव परांजपे, महावीर जैन, गौतम जैन, साई मळेकर, चिंतन गोरेगांवकर, अमोल गोरेगांवकर, राज भाटिया, अक्षय गांधी, राहुल पालीवाल, विवेक भाटिया, दीपक पालीवाल, दीपक भाटिया, दीप शेठ, साहिल चिंनके, दिनेश चव्हाण, अक्षय यादव, ओम गोरेगांवकर, आराध्य आंबेतकर, पियुष पहेलकर, गौरव घोसाळकर, रणजित कनोजिया, जयेश खामगांवकर, जय दोशी, आकाश वाठोरे यांनी या उत्सवासाठी अहोरात्र श्रम केले असून भव्य मिरवणूकीने संपूर्ण गोरेगांव शहर राममय झाले. बजरंग दल कार्यकर्ते “अयोध्या में जन्मे दशरथ के ललनवा…मेरी रामजी की सेना चली…एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए…भैरोबा तू है भैरवनाथ, उतारे तेरी आरती..हम” अश्या भक्तीगीतांमध्ये तल्लीन झाले. संपूर्ण अयोध्यानगरी गोरेगांव शहरात उतरल्याचा भास होत होते. रथ, श्रीरामांची भव्य मूर्ती, खालू बाजा, भगवे ध्वज, अश्या पारंपरिक पद्धतीत प्रभू श्रीरामाची भव्य रथ मिरवणूक काढण्यात आली. रणरागिणी लेझीम पथक महाड, यांनी पारंपरिक नृत्यकला दाखवत संपूर्ण गोरेगांव वासीयांचे मने जिंकले व ताराराणी ढोल-ताशा पथक मुरुड, यांनी पुणेरी ढोल गरजनेतून समस्त शहर हादरवले. स्त्री-पुरुषांनी घराबाहेर पडून आपल्या आराध्य श्रीरामांचे दर्शन घेतले व आरती केली. मिरवणुकीच्या स्वागतासाठी महिला व पुरुषांनी आपापल्या घराच्या दारात रांगोळ्या काढल्या, आरत्या सजवल्या आणि भक्त भगवान श्रीराम व आपले आराध्यांचे दर्शन घेण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. रामचरितमानस, आरती, सोहरगीत, प्रसाद, रथ शोभायात्रेचे २४ तास अखंड पठण करून श्रीराम नवमी उत्सवाची सांगता झाली. यावेळी रोजगार हमी, फलोत्पादन व खार भूमी खात्यांचे मंत्री भरतशेठ गोगावले आणि शिवसेना उ. बा. ठा. रायगड जिल्हा महिला संघटीका डॉ. स्वीटी गिरासे उपस्थित होते. गोरेगांव पोलीस दलाने संपूर्ण मिरवणूकीवर नियंत्रण ठेवत चोख कामगिरी पार पाडली व श्रीराम नवमी उत्सव अबाधित पणे साजरे जाहले.

धोरणात्मक बदलावर जोर द्या- प्रशांत जाधवर

धोरणात्मक बदलावर जोर द्या- प्रशांत जाधवर पार्किंग प्लाझा, ए आय, रोबोटिक्स तंत्रज्ञान, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातली धोरणात्मक बदलांबाबत मांडले विचार ठाणे: ठाणे शहराला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि धोरणात्मक उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे ठाम प्रतिपादन ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक प्रशांत (राजा) जाधवर यांनी केले. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेत सहभागी होत जाधवर यांनी शहराच्या ठोस विकासाची गरज बोलून दाखवताना विकासाबरोबर पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत. ठाणे महापालिकेचा पुढील आर्थिक वर्षाचा ६२२१ कोटी १२ रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव यांनी नुकताच सादर केला. ठाणे महापालिकेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या प्रशांत (राजा) जाधवर यांनी अर्थसंकल्पावर सुरु असलेल्या चर्चेत वेगवेगळे मुद्दे, आर्थिक उपाय योजना आणि उत्पन्नाच्या स्त्रोताबाबत विचार मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेत राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा दाखला दिला. विकासाभिमुख प्रशासनाकरिता आर्थिक नीतीची अमंलबजावणी करण्यासाठी उत्तम प्रशासकाची आवश्यकता असल्याची यशवंतराव चव्हाणांच्या वाक्याची आठवण करुन दिली. प्रशासकीय सुधारणा आणि महसूलवाढी करता जाधवर यांनी पार्किंगसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी वाहनतळ सुरु करणे, परिवहन सेवेत नव्याने सामील होणाऱ्या दुमजली बसेस फिरते डिजिटल फलक लावणे, महापलिकेच्या शाळा शालेय वेळेनंतर नाममात्र दरात खासगी शिबिरे, कार्यक्रमांना भाड्याने देणे, करवसुली करण्यासाठी १०० टक्के कर भरणाऱ्या गृहनिर्माण संकुलनांना विशेष सवलत देणे, स्वछ व प्रमाणिक गृहनिर्माण संकुल स्पर्धा घेण्याची मागणी केली आहे. याशिवाय शहरातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी नवीन बांधकामांच्या जागी डास्ट कंट्रोल युनिट सक्तीचे करण्याची गरज जाधवर यांनी बोलून दाखविली. सुमारे एक कोटी रुपयांचे नगरसेवकांचे अभ्यास दौरे आयोजित करण्यापेक्षा शहरात राष्ट्रीय महापौर परिषद आयोजित करून त्यातून विकास कामाबाबत विचाराची देवघेव करण्याची सूचना जाधवर यांनी यावेळी मांडली. पालिकेच्या शाळांची रंगरंगोटी करण्यापेक्षा शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम, रोबोटिक्स लॅब, परदेशी भाषांचे वर्ग सुरु करण्याची आग्रही मागणीही केली. स्वतः राष्ट्रीय कबड्डीपटू असल्याने दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये विविध खेळांचे हाय परफॉर्मन्स सेंटर सुरु करण्याची मागणी केली. महापालिकेच्या तिजोरीत वाढ होण्यासाठी कांदळवनाभोवती लोखंडी कुंपण लावण्याऐवजी त्याठिकाणी पर्यटन क्षेत्र तयार करताना लाकडी वॉकवेज, बोटिंग सुरू करण्याची मागणी जाधवर यांनी केली. शहरातील सुमारे ९५ टक्के पाण्याचे मीटर्स चोरी झाले असल्याने, सरसकट पाण्याचे मीटर हटवून त्याऐवजी १५६० रुपयांनुसार पाण्याची देयके आकारण्याची सूचना केली. शहरातील नाल्यांची पक्की डागडुजी करणे, विठ्ठल क्रीडा मैदान आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या छत्रपती शिवजी महाराजांच्या स्मारक परिसराचे सुशोभिकरण करण्याची आवश्यकता असल्याची भावना जाधवर यांनी बोलून दाखवली. प्रशांत (राजा) जाधवर यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तिकिटावर प्रथमच निवडणूक लढवून पहिल्याच प्रयत्नात प्रभाग क्रमांक सहामधून महापालिकेत प्रवेश केला आहे.