Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट

ठाणे जिल्ह्याचा डिजिटल कायापालट जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव अनिल ठाणेकर ठाणे, महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगाने नागरीकरण होणारा आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्याने आता डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. जिल्ह्याचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, शासकीय सेवा शेवटच्या घटकापर्यंत पारदर्शकपणे पोहोचविण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर होते. हे आव्हान स्वीकारून जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ई-गव्हर्नन्स सुधारणा अभियानांतर्गत राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमांमुळे ठाणे जिल्हा आज संपूर्ण राज्यासाठी एक प्रेरणादायी मॉडेल म्हणून उदयास आला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित विशेष कार्यक्रमात ठाणे जिल्हा प्रशासनाचा विशेष गौरव करण्यात आला. प्रशासकीय पारदर्शकता वाढविण्यासाठी डॉ.पांचाळ यांनी तंत्रज्ञानाचा वापर करीत ‘सेवा संवाद’ आणि ‘डिजी संवाद’ सारखे महत्त्वाचे उपक्रम कार्यान्वित केले आहेत. १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेल्या ‘सेवा संवाद’ या उपक्रमामुळे जिल्ह्यातील ८७३ ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांच्या कामकाजात मोठी शिस्त आली आहे. प्रत्येक केंद्रावर उपलब्ध असलेल्या QR-Code मुळे नागरिकांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा, सरकारी दरपत्रकाची अचूकता आणि केंद्र चालकाचे वर्तन यावर थेट ऑनलाईन अभिप्राय देण्याची सोय उपलब्ध झाली आहे. या रेटिंग प्रणालीमुळे केंद्र चालकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली असून, अतिरिक्त शुल्काच्या तक्रारींवरही प्रभावी नियंत्रण आले आहे. त्याचबरोबर, नागरिकांना तक्रार निवारणासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी ‘डिजी संवाद’ या WhatsApp आधारित (९९३०००११८५) उपक्रमाद्वारे २४x७ तक्रार नोंदणीची सुविधा दिली गेली आहे. घरबसल्या केवळ एका मेसेजद्वारे तक्रार नोंदवणे आणि तिचे डिजिटल ट्रॅकिंग करणे शक्य झाल्याने प्रशासन खऱ्या अर्थाने गतिमान झाले आहे.केवळ दैनंदिन कामकाजातच नव्हे, तर ऐतिहासिक वारसा जतन करण्यातही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दूरदृष्टी दाखवली आहे. ‘ई-संजीवन’ प्रणालीच्या माध्यमातून १८९० पासूनची जन्म-मृत्यू नोंदणीची जुनी ‘कोतवाल रजिस्टर्स’ आता AI आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षित करण्यात आली आहेत. यामुळे शंभर वर्षांपूर्वीच्या नोंदी शोधणे आता काही सेकंदांचे काम झाले आहे. तसेच, ‘राजभूमी’ पोर्टलच्या माध्यमातून शासकीय जमिनींचे डिजिटल व्यवस्थापन सुरू करून प्रशासनाने भू-माफियांवर मोठा वचक बसवला आहे. अक्षांश-रेखांश आणि जिओ-रेफरन्सिंगमुळे सरकारी जमिनींचे अचूक क्षेत्र निश्चित झाले असून, ‘लँड बँक’ सुविधेमुळे विकास प्रकल्पांसाठी जागा निवडणे आता अधिक सुलभ झाले आहे. या पोर्टलवरील ‘Street View’ आणि विविध GIS लेयर्समुळे अतिक्रमणे शोधणे आणि जमिनींचे संरक्षण करणे सोपे झाले असून हे भू-व्यवस्थापनातील एक मोठे पाऊल मानले जात आहे.जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचेही डिजिटल मॅपिंग डॉ. पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले आहे. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शासकीय शाळा आणि आपत्कालीन सेवांची माहिती नकाशावर उपलब्ध केल्यामुळे सामान्य नागरिकांना या सेवा शोधणे सुलभ झाले आहे. मुख्य रस्त्यांचे जाळे आणि ड्रेनेज व्यवस्थेची डिजिटल माहिती उपलब्ध असल्याने भविष्यातील आपत्ती व्यवस्थापन आणि पूरनियोजन अधिक शास्त्रोक्त पद्धतीने करणे शक्य झाले आहे. अतिदुर्गम शहापूर-मुरबाडपासून ते गजबजलेल्या ठाणे-कल्याणपर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचा वेळ, पैसा आणि श्रम वाचवण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद ठरले आहे. ‘१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमांतर्गत राबवलेल्या या मूलभूत परिवर्तनासाठी आज एका विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्यासह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक डॉ. डी. स्वामी आणि नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांचा गौरव करण्यात आला. हा सन्मान ठाणे जिल्हा प्रशासनातील प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आणि समस्त ठाणेकरांसाठी अभिमानास्पद असून, डॉ.पांचाळ व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी कार्यान्वित झालेल्या या डिजिटल अध्यायाने प्रशासकीय उत्तरदायित्वाचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे.

‘मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना आदरांजली

‘मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना आदरांजली विश्वास सामाजिक संस्थेतर्फे कार्यक्रम ठाणे: स्वरांचा शिलेदार पंडित प्रभाकर कारेकर यांच्या गायकीतील ठुमरी, होरी, नाट्यसंगीत, अभंग, भैरवीतील नजाकतीचे स्मरण करीत पार पडलेल्या `मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमातून प्रभाकर कारेकरबुवांना प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी पुढाकार घेत विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात `मर्मबंधातील ठेव’ कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन केले होते. प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आशा खाडिलकऱ कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होत्या. साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक, प्रसिद्ध गायक व कारेकरबुवांचे ज्येष्ठ शिष्य पंडित सुरेश बापट, अमित प्रभाकर कारेकर, संजय वाघुले, भाजपाचे महापालिकेतील गटनेते मुकेश मोकाशी, विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमित वाघचौरे, पदाधिकारी वृषाली वाघुले-भोसले यांनी दीपप्रज्वलन केले. पंडित सुरेश बापट यांनी `मर्मबंधातील ठेव’ या नाट्यगीताने कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर `धन्य आनंद दिन’ पूर्ण हे नाट्यपद, `राम होऊनि राम गा रे’ हे भक्तीगीत, `बोलावा विठ्ठल’ हा अभंग, `या कागदी फुलांच्या’ भावगीताने मैफल रंगत गेली. प्रत्येक कलाकाराच्या गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कारेकर बुवांनी स्वत:ची गायकी घडविली. सुरुवातीला त्यांचा पातळ गळा होता. मात्र, त्यांनी रियाझाने दमदार बनविला होता. एका मैफिलीसाठी अष्टपैलू व्यक्तिमत्व पु. ल.देशपांडे यांनी कारेकरबुवांना प्रिये पहा हे नाट्यपद शिकविले होते. अन्, त्या मैफिलीनंतर प्रभाकर कारेकर नावाचा उष:काल घडला, अशी आठवण निवेदिका अनघा मोडक यांनी सांगितली. `प्रिये पहा,रात्रीचा समय सरुनी’ या नाट्यगीताने पं. सुरेश बापट यांनी मैफिलीला उंचीवर नेले. चंदनाचे परिमळ, दिनांची माऊली, गगना गंध आला, माझ्या देहाची पालखी या गीतांनी मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. पंडित सुरेश बापट यांनी अजरामर झालेल्या `मै कही समझाऊं सब जग अंधा’ या भैरवीने रसिकांना मंत्रमुग्ध केलेल्या या मैफिलीचा समारोप केला. तत्पूर्वी कारेकरबुवा व प्रसिद्ध नाटककार सतीश दुभाषी यांच्या अखेरच्या भेटीचा किस्सा पंडित सुरेश बापट यांनी सांगितला. शिवाजी मंदिर येथे झालेल्या जून १९८० मधील प्रयोगावेळी अष्टपैलू अभिनेते सतीश दुभाषी यांनी `मै केही समझाऊं’ ही भैरवी ऐकली. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी कारेकर बुवांची भेट घेतली. पुन्हा कधी ही भैरवी ऐकेल माहित नाही, असे म्हणून दोन मिनिटे भैरवी सादर करण्याची विनंती केली. कारेकर बुवांनी सर्व वाद्यांसह संपूर्ण भैरवी सादर केली. दुर्दैवाने त्यानंतर सप्टेंबर महिन्यात सतीश दुभाषींचे अचानक निधन झाले होते. त्यावेळी एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली दाद आम्ही अनुभवली होती, या आठवणीने रसिक गहिवरून गेले. पंडित सुरेश बापट यांच्याबरोबरच गायक श्रीरंग भावे, ओंकार प्रभुघाटे, केतकी भावे जोशी, गोव्यातील संदेश खेडेकर यांनी कारेकर बुवांना सांगीतिक मानवंदना दिली. नीला सोहनी, हर्षल काटदरे, सुहास चितळे, गणेश मेस्त्री, धनंजय पुराणिक आणि श्रेयस व्यास या प्रतिथयश वादकांनी समर्पक साथ दिली. तर अनघा मोडक यांनी निवेदनाची धुरा सांभाळली.

एस.एस.टी. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा दिमाखात संपन्न

एस.एस.टी. महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा दिमाखात संपन्न कल्याण: एस.एस.टी. कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करणारा हा सोहळा महाविद्यालयाच्या वातानुकूलित प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला होता. या समारंभाला उल्हासनगर महानगरपालिकेचे उपमहापौर  अमर लुंड, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज मार्केटचे जनरल मॅनेजर संजीव बजाज तसेच सुप्रसिद्ध मेंटर आणि उद्योजक सागर पगार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे  संस्थापक अध्यक्ष डॉ. पुरस्वानी आणि प्रभारी प्राचार्य डॉ. दीपक गवादे यांचेही मार्गदर्शन लाभले. अध्यक्ष डॉ. पुरस्वानी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत महाविद्यालयाशी असलेले नाते पुढेही टिकवून ठेवण्याचे आवाहन केले. तसेच भविष्यातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. मेंटर  सागर पगार यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांना सामोरे जात आपल्या ध्येयाकडे ठामपणे वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले. समारंभात विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान समारंभाचा पोशाख परिधान करून पदव्या स्वीकारल्या. काही विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा साजरा करत महाविद्यालयाने त्यांच्या यशाचा गौरव केल्याने हा सोहळा संस्मरणीय ठरला.

नाशिक पोलीस आयुक्तालय राज्यात प्रथम

नाशिक पोलीस आयुक्तालय राज्यात प्रथम १५० दिवसांचा ई-प्रशासन उपक्रम हरिभाऊ लाखे नाशिक – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या १५० दिवसांच्या ई गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस आयुक्तालय गटात ‘नाशिक जिल्हा – कायद्याचा बालेकिल्ला’ उपक्रम राबविणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माहिती व तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी १५० दिवसांचा कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयांमध्ये ई – प्रशासन सुधारणा आणण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी १५० दिवसांचा ई प्रशासन सुधारणा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई कार्यालय, कार्यालयाचा ‘डॅश बोर्ड’, ‘व्हॉटस ॲप’, ‘चॅटबॉट’, कृत्रिम बुद्धिमत्ता व ‘ब्लॉक चेन’चा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणाली या सात घटकांवर सहभागी कार्यालयांचे मूल्यमापन करण्यात आले होते. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आले होते. त्यात ‘नाशिक जिल्हा- कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम’ राबविणाऱ्या नाशिक पोलिस आयुक्त कार्यालयाने सर्वाधिक १५६.२५ गुण मिळवून पोलिस आयुक्तालय गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक पोलीस आयुक्तालयाने डिजिटल उपक्रम राबविले. नागरिकांशी थेट संवादाचे उपक्रम राबविले. यामध्ये ‘ई मीट वीथ सीपी’, ‘वॉक इन टूर’, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य आदींचा समावेश आहे. यामुळे पोलिस दलाच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता येऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर झाला. या विषयी पोलीस आयुक्त संदीपकर्णिक यांनी राज्य शासनाने दिलेल्या १५० दिवसांच्या कार्यक्रमात नाशिक पोलिस दलाने प्रभावी कामगिरी बजावली. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलिस आयुक्तालय सदैव तत्पर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. जिल्हा परिषदेचाही गौरव ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांचा सन्मानपत्रक देऊन गौरव करण्यात आला. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. सात निकषांत उत्कृष्ट कामगिरी करत नाशिक जिल्हा परिषदेने एकूण १६५.७५ गुण मिळवून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला.

‘डिलिव्हरीचा मेसेज, पण सिलेंडर गायब!’

‘डिलिव्हरीचा मेसेज, पण सिलेंडर गायब!’ दिव्यात गॅस वितरणात गंभीर गैरव्यवहार दिवा, दि. २८ मार्च (आरती परब): दिवा शहरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणामध्ये मोठा गैरव्यवहार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांनी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर कंपनीकडून “सिलेंडर डिलिव्हर झाल्याचा” मेसेज येत असला, तरी प्रत्यक्षात ८ ते १० दिवस सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक कुटुंबांची रोजची स्वयंपाकाची व्यवस्था विस्कळीत होत आहे. विशेष म्हणजे, काही प्रकरणांमध्ये डिलिव्हरी बॉय किंवा संबंधित गॅस एजन्सीकडून नागरिकांना पुन्हा नवीन सिलेंडर बुक करण्यास सांगितले जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हा प्रकार सरळसरळ फसवणूक असून न दिलेले सिलेंडर काळाबाजारात विकले जात असल्याचा गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, देशात सध्या आंतरराष्ट्रीय युद्ध परिस्थितीमुळे गॅस तुटवड्याची चर्चा असताना, दिवा शहरातील काही गॅस एजन्सींकडून नागरिकांची उघडपणे लूट सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. विशेषतः भारत गॅस कंपनीशी संबंधित काही एजन्सींविरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. या गंभीर प्रकाराची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात संबंधित एजन्सींवर चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मनसेने प्रशासनासमोर पुढील मागण्या केल्या आहेत: १) संबंधित गॅस एजन्सींवर तात्काळ चौकशी करावी २) दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ३) गॅस वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणून नागरिकांना वेळेत सिलेंडर उपलब्ध करून द्यावा तसेच, काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर तातडीने कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणीही करण्यात आली आहे. प्रशांत प्रभाकर गावडे, सचिव, दिवा शहर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना–  दिवा शहरातील नागरिकांच्या या गंभीर समस्येकडे प्रशासनाने त्वरीत लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी मी केली आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त रंगली संगीत रजनी

सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त रंगली संगीत रजनी स्मरणिका `प्रतिबिंब’चे प्रकाशन ठाणे – ज. ए. ई. चे मो. ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय आणि अभिरुची मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त २८ मार्च, सायंकाळी ६ वा शाळेच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांद्वारे संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी विद्यार्थी, प्रसिद्ध निवेदिका, अभिनेत्री संपदा जोगळेकर कुलकर्णी या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विकास पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी, उपकार्याध्यक्ष प्रदीप राका, संस्थेचे कोषाध्यक्ष आणि अभिरुची मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तामरस, संस्थेचे उपकार्यवाह महेश केळकर आणि संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करताना संपदा जोगळेकर यांनी आपल्या शाळेविषयीच्या आठवणी सांगितल्या. शाळेतील खुल्या रंगमंचामुळे त्या रंगभूमी कडे वळल्या आणि आता रंगभूमी कडून प्रत्यक्ष भूमी कडे वळल्या आहेत असे सांगितले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रतिक्षा बोर्डे आणि माजी विद्यार्थी संदेश झारापकर यांनी केले. शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या सर्व कलाकार यांनी शाळेप्रती असलेली त्यांची कृतज्ञता त्यांच्या कलेमार्फत व्यक्त केली. यामध्ये माजी विद्यार्थी संवादिनी वादक डॉ.पंडित, प्रकाश चिटणीस, प्रसिद्ध गायक जगदीश पाटील, प्रसिद्ध गायक धीरज मढवी, गीतकार राजेंद्र ठाकूर, प्रिया सुरेश, खोल्लम आणि ग्रुप, रिद्धेश तरे, वृषाली दाबके आणि वर्षा कोल्हटकर, डॉ. वैशाली दुधे आणि समूह,  माजी शिक्षिका- ज्योती साटम, आजी शिक्षक मारुती सोनमोरे, सुनेत्रा मेस्त्री, उमेश महाजन, अर्जिता कुलकर्णी या सर्वांनी आपली कला सादर केली. शिवाय शाळेचे शुभचिंतक म्हणून प्रसिद्ध गायक अभिषेक कोसंबी यांनी देखील आपली कला सादर केली. तसेच यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी माजी शिक्षक आणि आजी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे सांगता सोहळा कार्यक्रमात नृत्य, गायन, वादन यांचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला व कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

 उपनगरीय रेल्वे गाड्यांचे तातडीने १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करा

उपनगरीय रेल्वे गाड्यांचे तातडीने १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करा खासदार नरेश म्हस्के यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी नवी दिल्ली – मुंबई-ठाणे उपनगरीय रेल्वे गाड्यांचे वेळेवर १५ डब्यांच्या गाड्यांमध्ये रूपांतर करावे, ‘स्वयंचलित’ दरवाजा बंद होणारी प्रणाली सर्व गाड्यांमध्ये अनिवार्य करावी आणि स्थानकांवरील गर्दीच्या व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावा, अशा महत्वपूर्ण सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या. दिल्ली येथे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे अध्यक्ष असलेल्या रेल्वेच्या तांत्रिक सल्लागार समितीची बैठक संसद भवन येथे शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या कमिटीचे सदस्य म्हणून महाराष्ट्रातून खासदार नरेश म्हस्के व खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते. रेल्वेच्या देशापातळीवरील विविध महत्वपूर्ण कामांची माहिती बैठकीत देऊन, चर्चा करुन निर्णय घेतले जातात व धोरण निश्चित केले जाते. रेल्वे राज्यमंत्री  वी. सोमन्ना, रवनीत सिंह बिट्टू तसेच रेल्वेचे केंद्रीय स्तरावरील सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित होते. त्यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबई उपनगरीय सेवेबद्दल महत्वपूर्ण सूचना केल्या.  सुरक्षितता, नोकर भरती, धोरण व उपाययोजनेबाबत यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत विस्तृतपणे माहिती दिली. देशभरातून प्रत्येक राज्यातून ज्यांना या कमिटीमध्ये प्रतिनिधीत्व दिले आहे त्यांनी सुध्दा या बैठकीत चर्चा केली. आज देशपातळीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेचा जो विकास होत आहे त्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी त्यांचे कौतुक केले. आज स्टेशनवर होत असलेल्या प्रचंड गर्दीमुळे ट्रेनमधून पडून हजारो प्रवाशांचा मृत्यू होत आहे. १२ डब्यांच्या ट्रेनमधून क्षमतेपेक्षा ४ पट अधिक प्रवासी मजबुरीने प्रवास करत आहेत. यामुळे ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होणे, जखमी होणे आणि कायमचा प्रवासी जायबंदी होण्याच्या घटना नित्याच्या झाल्याची गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांच्या निदर्शनास आणली. याकरता १५ डब्यांच्या लोकल गाड्या तातडीने मोठ्या संख्येने सुरु कराव्यात, स्वयंचलीत दरवाजे तातडीने बसवावेत, फलाटांची उंची व रुंदी वाढविण्याचे काम जे संथ गतीने सुरु आहे ते जलद गतीने सुरु करण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तसेच रेल्वे स्थानकांतील गर्दीवरील नियंत्रणासाठी स्वतंत्र नियंत्रण कक्षाची स्थापना करण्याची महत्वपूर्ण सूचनाही नरेश म्हस्के यांनी केली. ठाणे लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढे मांडल्या. सिडको प्राधिकरण आणि रेल्वे यांच्यात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे बेलापूर मधील रेल्वे स्थानकांचा विकास थांबला आहे. रेल्वे मंत्र्यांनी यात स्वत: लक्ष घालण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी करत दोन्ही प्राधिकारांमधील विसंवाद दुर करण्याची सूचना  केली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत रेल्वे अधिकाऱ्यांना तातडीने यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता बेलापूर दरम्यानच्या सर्व रेल्वे स्थानकांचा विकास होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळी ठाणे, मिरा भाईंदर, वाशी आणि एमएमआर रिजन मधील रेल्वे स्थानकांच्या समस्यांचे निवेदन खासदार नरेश म्हस्के आणि खासदार संजय दिना पाटील यांनी रेल्वे मंत्र्यांना दिले.

 फ्युएलचा सोशल आयपीओ ३० मार्चला एनएसईवर

फ्युएलचा सोशल आयपीओ ३० मार्चला एनएसईवर ४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन पदवी अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करुन देणार राजेंद्र साळसकर पुणे – सीएसआरच्या माध्यमातून विद्यार्थींना व्यावसायिक अभ्यासक्रमाचे मोफत प्रशिक्षण देणारी देशातील पहिली शैक्षणिक संस्था फ्युएलचा आयपीओ एनएसईच्या सोशल स्टॉक मार्केटमध्ये येणार आहे. सोमवार, ३० मार्चला दुपारी ३ वा. मुंबई येथील एनएसई अ‍ॅट्रियम, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे या आयपीओचा बेल रिंगिग समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्याचे कौशल्य विकास व उद्योग मंत्री मंगल प्रभात लोढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती फ्यूल ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी दिली. तसेच त्यांनी विश्वास व्यक्त केला की, संस्थेची विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेमुळे आयपीओला चांगला प्रतिसाद मिळेल. डॉ. देशपांडे यांनी सांगितले की, अत्यंत काटेकोर निकषातून निवड झालेल्या ४० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेनचा तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी आयपीओ काढण्यात येणार आहे. या माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी जमा करण्याचा मानस आहे. सोशल आयपीओच्या संकल्पनेनुसार हा आयपीओ घेणार्‍या भागधारकांना कोणत्याही स्वरुपाचा आर्थिक लाभ मिळत नाही. मात्र, सोशल आयपीओमध्ये येणार्‍या संस्थांची कार्यक्षमता, उद्दिष्ट आणि फलित, विश्वासार्हता याची काटेकोर छाननी करण्यात येणार आहे. या मुळे सामाजिक कार्यासाठी देत असलेल्या निधी योग्य ठिकाणी गेल्याची खात्री आणि समाधान भागधारकांना मिळेल. सामाजिक भरीव कार्य करणार्‍या संस्थांना निधी उपलब्ध व्हावा आणि सामाजिक कार्यासाठी देण्यात येणारा निधी योग्य ठिकाणी पोहोचावा या उद्देशाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तीन वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात ही योजना मांडली. सध्या ७० सामाजिक संस्था सोशल स्टॉक एक्सचेंजवर नोंदणीकृत आहेत. डॉ. देशपांडे यांनी सर्व संस्थांना आवाहन केले की, सामाजिक कार्य करणार्‍या ना नफा ना तोटा या तत्वावरील संस्थांनी सोशल आयपीओमध्ये भाग घ्यावा

इंदुमिल स्मारक उभारणीसाठी सरकारचा पुढाकार महत्वाचा

इंदुमिल स्मारक उभारणीसाठी सरकारचा पुढाकार महत्वाचा गाझियाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या कामाची उपाध्यक्षांसह शिस्थमंडळाने केली पाहणी.. मुंबई: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून, या दौऱ्यादरम्यान त्यांनी राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. मुंबईतील इंदू मिल येथे उभारल्या जाणाऱ्या या पुतळ्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या पाहणीवेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय सेलचे पदाधिकारी व इतर शिष्टमंडळ उपस्थित होते. २०१८ साली या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते. मात्र, २०२६ पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने किंमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज असल्याचे अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्यासोबतच MMRDA कडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, ३५० फूट उंचीच्या या भव्य पुतळ्यापैकी सध्या सुमारे ५० फूट काम पूर्ण झाले आहे. पुतळ्याचे बूट आणि पॅंटचा काही भाग तयार झाला असून उर्वरित काम गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू आहे. हा प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र स्मारकाच्या कामाला २०२८ उजाडणार असल्याचे चित्र आहे. या स्मारकाबाबत बोलताना अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक हे भविष्यात एक मोठे पर्यटन आणि प्रेरणास्थळ ठरणार आहे. देश-विदेशातील लाखो अनुयायांसाठी हे केंद्र आकर्षणाचे ठिकाण ठरेल, तसेच बाबासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे एक महत्त्वपूर्ण स्थळ म्हणूनही ते ओळखले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिव्यांग प्रमाणपत्राबाबत येणाऱ्या समस्यांचे आज निराकारण होणार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची उपस्थिती

दिव्यांग प्रमाणपत्राबाबत येणाऱ्या समस्यांचे आज निराकारण होणार पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची उपस्थिती अशोक गायकवाड रत्नागिरी : दिव्यांग प्रमाणपत्राबाबत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे आज सोमवार…