Category: ट्रेंडिंग न्यूज

trendlyne-news

आधारवाडी जेलमधील दोन कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

कल्याण: कल्याण आधारवाडी जेल येथे कार्यरत असलेल्या दोन जेल कर्मचाऱ्यांना लाच घेताना अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. शरद पानपाटील आणि सतीश…

नाल्याच्या कामासाठी तोडला नविन काँक्रीटचा रस्ता

एमआयडीसी निवासीतील रहिवाशी संतापले कल्याण :  डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये काँक्रीट रस्ते हे नियोजनविना घाईने बनविले गेले. त्यामुळे आता गटार, नाले, विद्युत, पाणी इत्यादी वाहिन्या यासाठी रस्ते तोडण्याचे काम सतत चालू असल्याने हे नविन बनविलेले सर्व काँक्रीट रस्ते आता खराब झाले आहेत. याचा फटका नागरिकांना व वाहनधारकांना येत्या पावसाळ्यात बसणार आहे. आतापर्यंत विद्युत, पाणी वाहिन्या टाकण्यासाठी पूर्ण आडवा रस्ता तोडायचा असेल तर जास्तीसजास्त दोन फुटाचा छेद मारून काँक्रीट रस्ता तोडला जायचा. पण आता एका नविन नाल्याचे बांधकामसाठी अंदाजे ४० फुट रुंदीचा काँक्रीट रस्ता आणि त्याला १० फुटाचा छेद देऊन हा रस्ता एमआयडीसी ठेकेदार कडून पूर्ण तोडण्यात आला आहे. हे काम मिलापनगर मधील गणेश विसर्जन तलाव रस्त्यावर ग्रीन्स स्कुल/श्रीराम वरदायीनी सोसायटी जवळ चालू आहे. यामुळे येथील रस्ता वाहतूकसाठी आणि पादचाऱ्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून बंद ठेवण्यात आला असून पुढे अनेक दिवस तो बंद राहणार आहे. त्यामुळे वाहनधारक, पादचारी आणि शालेय विद्यार्थी याना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. तर काही विद्यार्थी, पालक व रहिवाशी हा वळसा वाचविण्यासाठी त्यातूनच कसरत करीत वाट काढून पुढे जात आहेत. त्यामुळे त्यांना कदाचित मोठी दुखापत होऊन इजा होऊ शकते. एसएससी दहावी आणि बारावीचा परीक्षा चालू असून ग्रीन्स स्कुल हे त्याचे एक परीक्षा केंद्र आहे. प्रशासनाने  या विद्यार्थ्यांच्या परीक्षा काळात आणि होळी/रंगपंचमी/शिवजयंती/गुढीपाडवा या उत्सवात हे काम चालू करायला नव्हते पाहिजे होते. हे नाल्याचे काम तातडीने करणे गरजेचे नसतानाही थोडे दिवस थांबले असते तरी काय फरक पडला नसता असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. आता अजून कमीतकमी एक महिना हे काम पूर्ण होणार नसल्याने नागरिकांना व विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. या काँक्रीट रस्त्यावरील नाल्याचे बांधकाम पूर्ण झाल्यावर हा काँक्रीट रस्ता पूर्वीप्रमाणे ठाकठीक करण्यात येईल का ? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. येत्या पावसाळ्यात या नविन बनविलेल्या सर्व काँक्रीट रस्त्यांची परिस्थिती पूर्वीप्रमाणे खड्डेमय खराब होण्याची शक्यता असून नाले/गटार कामाच्या वेळी अनेक झाडांच्या खोडाला, मुळाना धक्के बसल्याने पावसाळ्यात अशी झाडे पडू शकतात.  एकंदरीत प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक नाही. कमीतकमी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी यात लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केली आहे.

 आनंद मेळावा आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा

सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने आनंद मेळावा आणि मराठी भाषा गौरव दिन साजरा नवी मुंबई, सानपाडा येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने समागसेवक मारुती विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या आनंद मेळाव्यात ६० सभासदांचा वाढदिवस साजरा करून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी संघाचे ज्येष्ठ सभासद ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण (वय ९१) व ज्ञानेश्वर भोगले (वय ७५) यांचा कुटुंबासमवेत शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. संघाचे सचिव जगदीश एकावडे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संघाच्या कार्याचा आढावा घेतला. तर संघाचे अध्यक्ष मारुती विश्वासराव यांनी सांगितले की, संघाच्या सभासदांसाठी लवकरच आरोग्य शिबिर घेण्यात येईल. त्याचप्रमाणे आपल्या सभासदांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे दिले जाणारे स्मार्ट कार्ड देण्यासाठी लवकरच एक कार्यक्रम आयोजित केला जाईल. संघाचे माजी अध्यक्ष मारुती कदम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मराठी भाषेचे महत्व सांगितले.  संघाच्या उपाध्यक्ष सीमा बोराडे यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन केले. संघाचे सहसचिव राजेंद्र कदम यांनी वाढदिवस असणाऱ्या मानकऱ्यांच्या नावांचे वाचन केले. संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण गोळे यांनी नवीन सभासदांचे स्वागत केले. तर संघाचे सहखजिनदार  नाना शिंदे यांनी देणगीदारांचे  आभार मानले.  संघाचे ज्येष्ठ सभासद पत्की आणि संघाच्या माजी उपाध्यक्षा डॉ.  विजया गोसावी व इतर सभासदांनी सामुहिकरित्या सुरेल आवाजात वाढदिवसाचे गीत म्हटले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासदांनी सहकार्य केल्याबद्दल अध्यक्षांनी सर्वांचे आभार मानून ९१ वर्षाचे ज्येष्ठ सभासद देणगीदार ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या स्नॅक वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

कल्याणमध्ये रंगांची उधळण उत्साहात

कल्याण : ‘बुरा ना मानो होली है’ असे म्हणत धुलीवंदनच्या दिवशी  कल्याणच्या रस्त्यांवर तरुणाई रंगांचा आनंद लुटताना दिसली. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वच जण या रंगांच्या उत्सवात नाहून निघाले होते. यंदाही कल्याणकरांनी पाणी…

 कुंभमेळ्याचा डोलारा आणि कर्जाचा डोंगर

कुंभमेळ्याचा डोलारा आणि कर्जाचा डोंगर नाशिक मनपाचे ३०१० कोटींचे बजेट म्युनिसिपल बाँड्सद्वारे ४०० कोटींची उभारणी; शेअर बाजारात नाशिकचा डंका हरिभाऊ लाखे नाशिक: पुढील वर्षी गोदा काठावर होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे शिवधनुष्य पेलताना महापालिकेच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडला आहे. शासनाने भरीव निधी दिला असला तरी एकाचवेळी रस्ते, पुलांसह विविध प्रकारची पायाभूत सुविधांची कामे हाती घेतली गेली. त्यासाठी मनपाला स्वनिधी द्यावा लागत आहे. प्रगतीपथावरील कामांचे १३२५ कोटींचे दायित्व आहे. ४०६ कोटींच्या ठेवी मोडल्या गेल्या. गोदावरी स्वच्छतेसाठी स्वच्छ गोदावरी आणि पाणी पुरवठा योजना विस्तारासाठी हरित म्युनिसिपल बाँड याद्वारे ४०० कोटींचा उभारणी तसेच खासगी-भागिदारी तत्वावरील मलनिस्सारण प्रकल्पात ठेकेदाराने ४४४.४८ कोटींची केलेली गुंतवणूक या जवळपास ८४५ कोटींच्या दायित्वाची परतफेड पुढील पाच ते २५ वर्षात व्याजासह करावी लागणार आहे. जवळपास चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी स्थायी समितीला २०२६-२७ या वर्षासाठी कुठलीही करवाढ नसलेले ३०१० कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. या वर्षात पालिकेला जीएसटी अनुदान, स्थानिक संस्था कर व एक टक्का मुद्रांक शुल्क अधिभार, मालमत्ता, नगरनियोजन, पाणीपट्टी, मिळकत कर, परिवहन सेवा उत्पन्न याद्वारे ३०११.८५ कोटी रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली गेली आहेत. शहरातील २८ प्रमुख रस्ते व आठ पुलांची कामे, पंचवटीतील रुग्णालय नुतनीकरण, सिंहस्थ आराखड्यानुसार मंजूर कामांसाठी चालू वर्षात ६०० कोटींचा स्वनिधी, मलनिस्सारण वाहिन्यांचे जाळे, राम काल पथ अंतर्गत सुशोभिकरण, बालाजी कोट ते गणेशवाडी पर्यंत रामझुला पादचारी पूल, मुकणे धरण पाणी पुरवठा योजनेची क्षमता वाढ आदी कामांचा अंतर्भाव आहे. आगामी वर्षात तीन नवीन अग्निशमन केंद्र, खत प्रकल्पाची क्षमता वाढ, नगरसेवकांना प्रत्येकी ८० लाखाचा निधी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात अद्ययावत डायलिसिस केंद्र व चार नवीन शस्त्रक्रियागृह, साधुग्राममध्ये् नेत्र रुग्णालय आदींचा उल्ले्ख अर्थसंकल्पात आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीकोनातून निधी उभारणीचे नियोजन आहे. शासनाकडून मंजूर होणाऱ्या आराखड्यात मनपा हिस्सा म्हणून २०२४ ते २०२६ या दोन वर्षात महापालिकेने एकूण ४२५ कोटींची तरतूद केली. स्वच्छ गोदावरी म्युनिसिपल बाँडद्वारे २०० कोटींचा निधी उभारल्याने केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत २६ कोटी प्रोत्साहनपर अनुदान तसेच अर्बन चॅलेंज फंडमधून प्रकल्पाच्या २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदानास पात्र होता येईल. पाणी पुरवठा विस्तार योजनेसाठी हरित म्युनिसिपल बाँडद्वारे २०० कोटींचा निधी उभारला जात आहे. त्यास अमृत योजनेतून २० कोटी आणि अर्बन चॅलेंज फंडमधून २५ टक्के अनुदानास पात्र होता येईल असे प्रशासनाकडून सांगितले जाते. प्रोत्साहनपर अनुदान मिळाल्यास व्याजाचा कुठलाही भार पडणार नसल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. एकाच वर्षात दोन बाँड्द्वारे निधी उभारून मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजारात सूचीबद्ध होणारी नाशिक ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे. याबद्दल स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत काही सदस्यांनी प्रशासनाचे कौतुकही केले. मात्र, कुंभमेळ्यामुळे मनपा तिजोरीवर मोठा भार पडल्याचे दिसत आहे.

मिरा-भाईंदरमध्ये पदक विजेत्या कुस्तीगीरांसह मान्यवरांचा गौरव सोहळा

मिरा-भाईंदर : मीरा भाईंदर महानगर पालिका यांच्या सौजन्याने तसेच मिरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्याच्या वतीने शहरातील मा. महापौर, मा. उपमहापौर, मा. नगरसेवक आणि विविध स्तरावर पदक प्राप्त कुस्तीगीरांचा…

एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातील सोशल मीडिया पोस्ट्सवर आक्षेप

शैलेश पाटील यांची मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दिवा :  गेले अनेक दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांची सोशल मिडीयावार वारंवार बदनामी केल्या प्रकरणी येथील गणेश पाटील यांच्या विरोधात ठामपाचे प्रभाग क्र.२७ चे नगरसेवक शैलेश पाटील यांनी आज मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल शिंदे यांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या विरोधात वारंवार बदनामी केल्याप्रकरणी संतापही व्यक्त केला आहे. शैलेश पाटील हे दिवा शहरातील तीन टर्म मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले ठाणे महानगरपालिकचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी आज आपल्या  वरिष्ठ नेत्यांवर सोशल मिडीयावरील वारंवार होणारी बदनामी सहन न झाल्याने मुंब्रा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, गणेश निळकंठ पाटील हे वारंवार फेसबुकच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विविध प्रकारे आरोप करीत कार्यकर्त्यांच्या भावाना दुखावतील असे लिखाण करीत आहेत. एकनाथ शिंदे हे मुक्ता बिल्डरला हाताशी धरुन येथील कांदळवन बुजवण्यास सांगून बिल्डींगचे काम करण्यास सांगत आहेत. खाडी बुजवून मुक्ता बिल्डरला बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देत आहेत. गाववाल्यांच्या जमीनी बळकावित आहेत. कांदळवन आणि खाडी बुजविण्याचे काम करीत आहेत. तसेच हिंदु धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या शिव हनुमान मंदिरही पाडण्यास एकनाथ शिंदेच सांगत आहेत. तसेच गणेश पाटील यांचे स्वताचे घर पाडण्यासाठी अधिकाऱ्यांना हाताशी धरुन नोटीस पाठवित आहेत, असे विविध आरोप आणि आक्षेपार्ह लिखाण गणेश निळकंठ पाटील यांनी सोशल मिडीयावर केल्याचे नगरसेवक शैलेश पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. नगरसेवक शैलेश पाटील म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव येथील हनुमान मंदिर पाडण्याच्या कामात मुद्दाहून आणि वारंवार घेत असून लोकांमध्ये धार्मिक भावना भडकविण्यासाठी गणेश पाटील हे मुद्दामहून प्रयत्न करीत आहे, लोकांमध्ये अफवा पसरवून उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे नाव मुद्दामहून बदनाम करण्यासाठी फेसबुक सारख्या सोशल मिडीयाचा वापर करीत आहेत. येथील मुक्ता बिल्डरच्या प्रविण पाटील यांच्याशी कोणतेही सबंध नसताना वारंवार सोशल मिडीयावर वारंवार बदनामी करुन जनतेच्या भावनाही भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे आज आम्ही मुंब्रा पोलीसांत तक्रार दाखल करुन सबंधित गणेश पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे असे शैलेश पाटील म्हणाले.

 पालघर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

पालघर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान खा. डॉ. हेमंत सवरा यांची माहिती अभियानाचा नागरिकांना फायदा होणार योगेश चांदेकर पालघरः महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी, महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्न असतात. या प्रश्नांचे निराकरण करणे आणि जनतेच्या तक्रारी तातडीने निकाली काढणे या सोबतच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मंडलस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती खा. डॉ. हेमंत सवरा यांनी दिली. या अभियानात नागरिकांना विविध योजनांचा मोफत फायदा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  समाधान शिबीर अभियान राबविण्याबाबत शासन निर्णय जाहीर केला. त्यानुसार महसूल विभागाशी संबंधित सेवा तळागाळातील लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अनेक प्रभावी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. अकृषिक रूपांतरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांची यापुढे परवानगी लागणार नाही. सनद प्रणाली संपुष्टात आणणे, एक वेळचे अधिमूल्य भरण्याची नवी तरतूद, तुकडे बंदी कायद्यातील सुधारणा व अभिलेख अद्ययावतीकरण आदी सुधारणांचे लाभ ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, जनता शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित केले आहे. दोन महिन्यांत सहा शिबिरे या अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे महसूल विभागाशी निगडीत दैनंदिन प्रश्न निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदी बाबत जनजागृती करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन करणे नागरिकांचे प्रश्न एकाच दिवसात निकाली काढण्यासाठी मार्च ते मे या दोन महिन्यांत सहा शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. नगरपालिका क्षेत्रातही अभियान छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान शिबिराच्या माध्यमातून मंडलस्तरावर पूर्वतयारी करण्यासाठी १८ ते पाच मार्चपर्यंत वेळ देण्यात आला आहे. ७ मार्च आणि १४ मार्च रोजी मंडलस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर नगरपालिका, नगरपंचायतस्तरावर आठ मे व १५ मे रोजी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती खा. डॉ. सवरा यांनी दिली. सातबारा जिवंत करणे, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करणे, तुकडेबंदी खरेदी, सामाजिक अर्जांची स्वीकृती, नोंदणीकृत दस्तावेजाचे नूतनीकरण, विद्यार्थ्यांचे दाखले, घरे, फेरफार, उतारा अभिलेख दुरुस्ती, अकृषिक जमिनीची पत्रके, सुधारणा, ई- केवायसी आदींबाबत या अभियानात नागरिकांना योग्य ती माहिती दिली जाणार आहे. सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार या सामाजिक उपक्रमात पात्र लाभार्थींचे अर्ज भरून घेण्यात येणार असून त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती या शिबिरात अर्जांना मंजुरी देईल. महसूल, ग्रामविकास, आदिवासी विभाग तसेच अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. तुकडेबंदी कायदाविरुद्ध १५ नोव्हेंबर १९६५ ते १५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत प्रमाणभूत सीमेपेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार व हस्तांतरणाबाबत गावनिहाय यादी तयार करावी, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनमुळे सातबारा मधील इतर अधिकारातील खरेदीचे नाव, इतर अधिकारात नोंदवलेले शेरे तसेच नव्याने प्राप्त अर्जाविषयी फेरफार घेणे,  अनधिकृत व्यवहाराविषयी गावनिहाय माहिती गोळा करून नोंदणीसाठी नोंदणी विभागाकडे पाठवणे, सातबारा अद्ययावत करून शिबिराच्या दिवशी अद्ययावत सातबाराचे वाटप करावे व मंडल स्तरावरील सर्व शाळांचा आढावा घेऊन दाखले वाटप न झालेल्या विद्यार्थ्यांच्या याद्या तयार करून विद्यार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण अर्ज भरून घेऊन शिबिराच्या दिवशी दाखल्यांचे वाटप करावे, मंडळातील सर्व घरे अंतर्गत पट्टे वाटपासाठी बाकी राहिलेल्या लाभार्थींची यादी तयार करणे तसेच संबंधित शासन निर्णयातील तरतुदीनुसार पूर्वतयारीच्या कालावधीत प्रक्रिया पूर्ण करावी व शिबिरात पट्टे वाटप तयार करावे असे आदेश देण्यात आले असून समाधान शिबीर अंतर्गत प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यात येणार आहेत. कोट…

दिवा शहरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे आयोजन

दिवा: दिवा शहरात प्रथमच राज्यस्तरीय भव्य कराटे स्पर्धांचे दिमाखदार आयोजन करण्यात आले. दिवा शहरातील लोकप्रिय प्रभास कराटे स्पोर्ट अकॅडमी यांच्या माध्यमातून प्रोफेसर प्रशांत कसबे यांच्या उत्कृष्ट आयोजन व नियोजनातून ही…

 नवीन शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे विद्यार्थी पन्नास वर्षांनंतर एकत्र

संस्थेसाठी मदतीच्या घेतल्या आणाभाका मुंबई : समाज माध्यमांची किमया घडली आणि १९७५-७६ च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे विद्यार्थी चक्क पन्नास वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले. या आता सत्तरी गाठलेल्या माजी विद्यार्थ्यांनी मग संस्थेला संपूर्ण मदत करण्याच्या परस्पर कौटुंबिक संबंध प्रस्थापित करण्याच्या आणाभाका घेतल्या. आजकाल वॉट्स अप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर सर्वच जण व्यस्त असतात. हे समाज माध्यम म्हणजे दुधारी शस्त्र आहे. याचा वापर विधायक कार्यासाठी केला तर फार मोठा प्रभाव पडतो. दहिसर येथील पूर्णप्रज्ञा माध्यमिक शाळेतील १९७५-१९७६ साली नवीन शालांत प्रमाणपत्र परीक्षेचे विद्यार्थी सुमारे पन्नास वर्षांनंतर एकत्र आले आणि त्यांनी मैत्री सभेचे आयोजन केले. बोरिवली येथे  माजी विद्यार्थ्यांसाठी ‘मैत्री सभा : शाळेतील आठवणींचा मेळा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या समारंभात शाळेतील  माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने  उपस्थित होते. या समारंभात विविध क्षेत्रात  उच्च पदस्थ झालेल्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा आणि  सध्या विविध सेवा संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना एकत्र बांधून परस्पर कौटुंबिक संबंध जोपासणे, व्यवसाय नेटवर्क लिंक्सद्वारे एकमेकांना जोडणे, लहान-मोठी कामे करणाऱ्या आपल्या बंधू-भगिनींना वेगवेगळ्या उंचीवर नेणे, समाजसेवेचे काम एकत्र करणे आणि शाळेतील माजी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे या उदात्त उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून मित्र डॉ. भरत वसानी, डॉ. प्रवीण पुरेचा भाटिया आणि उपेंद्र गोगरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कार्यक्रमाच्या यशाबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले. ००००