दंड स्वरुपात आकारण्यात येणारी रक्कम कमी करण्याची मागणी

 

ठाणे : शहरात ज्यादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या तसेच बेशिस्तपणे रिक्षा चालवणाऱ्या रिक्षा चालकांवर गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या रिक्षा चालकांकडून १५०० रुपये दंड आकारला जात आहे. दररोज मिळत असलेल्या उत्पन्नातून आर्धी रक्कम दंडाला जात असल्यामुळे अनेक रिक्षा चालक त्रासले आहेत. दंड स्वरुपात आकारण्यात येणारी रक्कम पूर्वी सारखी कमी करण्याची मागणी त्यांच्याकडून जोर धरु लागली आहे. जर मागणी पूर्ण झाली नाही तर, ५ ऑगस्ट पासून बेमुदत रिक्षा बंद ठेऊ असा इशारा रिक्षा चालकांनी दिला आहे. रिक्षा चालकांच्या या संपाला रिक्षा संघटनेचा मात्र विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे.
ठाणे शहरातील वागळे इस्टेट, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, महात्मा फुलेनगर त्याचबरोबर शिवाईनगर, वसंत विहार, पवारनगर, घोडबंदर भागातूनही अनेक नागरिक ठाणे स्थानकापर्यंत प्रवास करतात. या सर्वच भागातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. तसेच ठाणे स्थानकापासून या परिसराचे अंतर देखील जास्त आहे. यासाठी ठाणे शहरात सार्वजनिक वाहतूकीसाठी टीएमटीच्या बसगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. परंतु, या बसगाड्या पुरेशा प्रमाणात नाही. तसेच मीटर रिक्षाने प्रवास करणे नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे अनेकजण शेअर रिक्षाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. स्थानक परिसरातील गावदेवी मंदिर परिसर, गावदेवी मैदान परिसर, सिडको, मासुंदा तलाव परिसर अशा विविध भागात शेअर रिक्षा चालकांचे थांबे आहेत.
शेअर रिक्षा चालक ठाणे स्थानक परिसरापासून ते लोकमान्यनगर पर्यंत प्रति प्रवासी २० रुपये भाडे आकारतात. तर, सिडको ते बाळकूम पर्यंत प्रति प्रवासी २५ रुपये भाडे आकारले जाते. ठाणे स्थानक ते लोकमान्यनगर पर्यंत मीटर प्रमाणे रिक्षा प्रवास केल्यास ६५ ते ७० रुपये भाडे दर होते. तर, सिडको ते बाळकूम पर्यंत मीटर प्रमाणे रिक्षा प्रवास केल्यास ८० रुपये भाडे दर होते. केवळ तीन प्रवासी घेऊन वाहतूक करणे शेअर रिक्षा चालकांना परवडत नाही. त्यामुळे अनेक शेअर रिक्षा चालक बेकायदेशिररित्या चार प्रवासी घेऊन वाहतूक करताना दिसून येतात. या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई वाहतूक पोलिसांकडून केली जाते. त्यामुळे दररोज उत्पन्नातील अर्धी रक्कम दंडासाठीच जात असल्यामुळे आम्हाला ते परवडत नसल्याचे काही रिक्षा चालकांकडून सांगण्यात आले.
लोकमान्यनगर, यशोधन नगर, वागळे इस्टेट, किसनगर या परिसरातील शेअर रिक्षा चालकांनी हा संप पुकारला आहे. वागळे इस्टेट, किसनगर या भागात मोठ्याप्रमाणात औद्योगिक कंपन्या आहेत. त्यामुळे स्थानक परिसरातून याठिकाणी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. बहुतांश कर्मचारी हे शेअर रिक्षाने प्रवास करतात. या संपामुळे या कर्मचाऱ्यांचे हाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दंडात्मक केलेली कारवाई माफ करावी, १५०० रुपये दंड आकारण्याऐवजी पूर्वी प्रमाणे १०० ते २०० रुपये दंड आकारावा, मोबाईलवरुन छायाचित्र काढून दंड आकारु नये, परमिट बंद करा अशा मागण्या या रिक्षा चालकांनी केल्या आहेत.
रिक्षा चालकांच्या मागण्यांसदर्भात वेळोवेळी संघटनेच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला जातो. दंडात्मक कारवाईवरुन ज्या शेअरिंग रिक्षा चालकांनी संप पुकारला आहे. त्या संपाला रिक्षा संघटनेने समर्थन दिलेले नाही. ज्यादा प्रवासी वाहतूक आणि बेशिस्तपणे रिक्षा चालकांवर कारवाई करणे हे वाहतूक विभागाचे काम आहे. त्यामुळे आम्ही चुकीच्या गोष्टींना समर्थन देत नसून ज्या रिक्षा चालकांनी हा संप पुकारला आहे त्यांची समजूत काढण्याचा आम्ही प्रयत्न करु. – विनायक सुर्वे, अध्यक्ष,एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *