विशेष
राजेंद्र साळसकर
अनेकांना देवीची साडेतीन शक्तिपीठे माहित आहेत. सर्वसाधारणपणे लोकांन अष्टविनायक माहित आहेत.महाराष्ट्रातील ही अष्टविनायकाची क्षेत्रे म्हणजे सर्व गणेशभक्तांची श्रद्धास्थानं. अष्टविनायक म्हणजे मोरगावचा श्रीमोरेश्वर, सिद्धटेकचा श्रीसिद्धिविनायक, पालीचा श्रीबल्लाळेश्वर, महडचा श्रीवरदविनायक थेऊरचा श्रीचिंतामणी, लेण्याद्रीचा श्रीगिरिजात्मज, ओझरचा श्रीविघ्नेश्वर आणि रांजणगावचा श्रीमहागणपती. अष्टविनायक म्हणजे गणेशाची ही स्थानं. या आठही गणेशाच्या मूर्ती स्वयंभू आहेत.
अष्टविनायकातील पहिला गणपती म्हणजे मोरगावचा श्रीमोरेश्वर.गाणपत्य सांप्रदायाच्या साडेतीन पीठापैकी पहिले पीठ म्हणजे मोरगाव हे एक. अष्टविनायकातील हा मानाचा गणपती .अष्टविनायकाच्या यात्रेची सुरूवात श्रीमोरेश्वराच्या दर्शनाने करावी, अशी कथा आहे.समर्थ श्रीरामदासांना `सुखकर्ता,दुखहर्ता..´ही सुप्रसिद्ध आरती याच श्रीमोरेश्वरासमोर स्फुरली.
महाराष्ट्रामध्ये गणेशाची साडेतीन शक्तीपीठे आहेत.मोरगावी कमलासुराचा मयुरेश्वराने वध केला. कमलासुराचे शीर जेथे पडले ते
प्रथम पीठ मोरगाव व जिथे कमरेपर्यंतचा धडाचा भाग पडला ते राजूर येथे दुसरे पीठ. कमरेपासून पायापर्यंतचा भाग जिथे पडला ते पद्मालय हे तिसरे पीठ.महान गाणपत्य मोरया गोसावी यांना क-हा नदीत स्नान करताना त्याच्या ओंजळीत गणपतीची मूर्ती आली.ही मूर्ती घेऊन मोरया गोसावी भाद्रपद व माघी चतुर्थीला मोरगावी जात असत.मोरगावचा मोरेश्वर चिंचवडी आला म्हणून हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. गणपती बाप्पा मोरया हा जयघोष तेव्हापासून सुरू झाला.
पहिले पीठ श्रीक्षेत्र मोरगाव
भूस्वानंदपूर म्हणजेच आजचे प्रचलित मोरगाव. गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ मोरगाव.या क्षेत्राचा आकार मोरासारखा आहे.
ब्रम्ह,विष्णू ,महेश,सूर्य व शक्ती या पंचदेवांनी ॐकारस्वरूपी श्रीगणेशाची तिथे स्थापना केली.उन्मत्त सिंधुरासूराचा वध करून त्याचा सेनापती कमलासूराचाही वध श्रीगणेशाने केला.कमलासूराचे शरीर जमिनीत गाडून त्याच्यावर तो आरूढ होऊन बसला.आजही त्याचे प्रतिक म्हणून विजया दशमीच्या दिवशी मोठा उत्सव होतो.
पुरंदर तालुक्यातील क-हा नदीच्या तीरावर हे क्षेत्र वसलेलं आहे.गावाच्या मध्यभागी असलेलं मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराभोवती पन्नास फू़ट उंचीची तटबंदी असून त्याच्या आत आठ चौकोनांमध्ये गणेशाच्या प्रतिमा आहेत.मंदिराच्या गाभा-यात मयुरेश्वराची रमणीय मूर्ती आहे. सूर्याचे वरदान मिळाल्यामुळे उन्मत्त झालेल्या सिंधू दैत्याचा वध करण्यासाठी गणेशाने अवतार घेऊन व मोरावर स्वार होऊन त्याचा वध केल्यामुळे गणेशाला मयुरेश्वर असे नाव पडले.असे म्हटले जाते मयुरेश्वराची मूर्ती बैठी ,डाव्या सोंडेची ,पूर्वाभिमुख व त्रिनेत्री असून डोळ्यात व नाभीत हिरे बसवले आहेत.मस्तकावर नागराजाचा फणा आहे.ही मूर्ती शेंदूर लावलेली आहे.मृतिका,लोह आणि रत्नांनी बनलेली मयुरेश्वराची मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे आहे.सध्याची मूर्ती तांब्याच्या पत्र्यापासून बनवलेली आहे.शेंदूर लावल्यामुळे तिचा आकार मोठा झाला आहे.शेंदूराचं कवच निखळल्यावर आतल्या रेखीव मूर्तीचं दर्शन होतं. गणपतीच्या डाव्या उजव्या बाजूला सिद्धी – बुद्धी देवतांच्या धातूंच्या मूर्ती आहेत,तर पुढच्या बाजूस उंदीर आणि मोर यांची मूर्ती आहे.इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकातलं हे एकच मंदिर असं आहे,जिथे भव्य आकाराचा दगडी नंदी आहे.
मंदिरातील मयुरेश्वराची मूर्ती पांडवांनी स्थापन केली असल्याचे सांगण्यात येते.गणपतीची मूर्ती चार हात असलेली आहे.वरच्या दोन हातात पाश व अंकुश आणि अन्य दोन हातांपैकी एक हात उजव्या गुडघ्यावर ठेवलेला तर दुस-या हातात गणपतीचे आवडते खाद्य मोदक आहे.
मोरगावचे गणेश मंदिर काळ्या पाषाणाचे आहे.बिदरच्या बादशहाच्या पदरी नोकरी करणा-या गोळे नावाच्या व्यक्तीने हे मंदिर बांधले असे सांगितले जाते.मंदिराच्या परिसरात एकदंत,महोदर,गजानन,लंबोदर,बिकट,विघ्नहर, धूम्रवर्ण आणि वक्रतुंड यांच्या मूर्ती आहेत.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी हे दोन्ही उत्सव मोरगावच्या गणेश मंदिरात मोठ्या उत्साहाने साजरे होतात.तसेच दस-याच्या दिवशीही या मंदिरात उत्सव असतो.मोरगाव देवस्थानचा कारभार चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे चालविला जातो.देवस्थानची धर्मशाळा असून ती देवळाच्या जवळच आहे तसेच गावात अन्यत्रही राहण्याची व्यवस्था होऊ शकते. इथे जाण्याचा मार्ग मोरगाव ते पुरंदर तालुक्यातील क-हा नदीच्या काठी वसले असून पुण्याहून साधारणत: दीड तासात मोरगावात जाता येते.पुणे मोरगाव हे अंतर ६४ किलोमीटर आहे.पुणे येथील स्वारगेट एस.टी. स्थानकाहून नियमित बसेस आहेत.जेजूरीवरून मोरगाव जवळ असून दोन्ही गावातील अंतर १६ कि.मी.आहे.रेल्वेने जायचे झाल्यास जेजूरी वा निरा स्धानकावर उतरून तेथून बसने जाता येऊ शकते.मोरगावच्या भेटी दरम्यान सासवड येथील सोपानदेवाची समाधी ,जेजूरीचा खंडोबा यांचे दर्शन यात्रेकरूंना घेता येऊ शकते.पावसाळ्यात मोरगावला गेल्यास या काळात येथे अनेक मोरांचे दर्शन घडते.
मोरगाव हे पुण्याच्या आग्नेय (दक्षिण पूर्व ) दिशेला स्थित आहे.ते पुण्याहून सासवड – जेजुरी मार्गे केवळ दोन तासांच्या अंतरावर आहे.अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ हा मोरगाव येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनाने केला जातो.
( क्रमश: )👉

