Month: October 2024

मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील राष्ट्रीय मराठा पार्टीत

रमेश औताडे मुंबई :मराठा आरक्षण या प्रश्नावर आझाद मैदान दणाणून सोडणारे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबा पाटील यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मराठा पार्टीत प्रवेश केला. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा गाठत, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेत्यांनी व आबा पाटील यांनी केलेला हा महत्वाचा मानला जात असल्याचे पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी यावेळी सांगितले. या निर्णयानंतर मराठा समाजाच्या असंतोषाला एक नवीन दिशा मिळाली आहे. मराठा समाजातील विविध संघटना,  मराठा क्रांती ठोक मोर्चा व इतर संघटनांनी आरक्षणाची ही चळवळ लाखो कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर लढली. मात्र आरक्षण प्रश्न म्हणावा तसा नाही. म्हणून आता समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी पाटील यांच्या प्रवेशाने एक नवी दिशा मिळणार आहे. पार्टी राज्यभारत शंभर ते सव्वाशे उमेदवार उभे करणार आहे.  शेतकरी , शिक्षणात समान संधी, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय हे  जाहीरनाम्याचे प्रमुख मुद्दे असतील. मराठा समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आम्ही कुठलाही त्याग करण्यास तयार आहोत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

 ओवाळणीत एक रुपयाही नको, आमदारकी पाहिजे!

 शर्मिला ठाकरेंची मनसे उमेदवारांकडे मागणी   मुंबई: शिवतीतर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) युवा नेते अमित ठाकरे यांचं औक्षण करण्यात आलं. त्यांच्या अभिनंदनासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या वेळी मनसेच्या इतर उमेदवारांचे देखील औक्षण करण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी खास भूमिका बजावली. त्या औक्षणाच्या वेळी बोलताना म्हणाल्या, “ओवाळणीत एक रुपयाही नको, आता आमदारकी पाहिजे!” त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. माहीम विधानसभेत थेट मुकाबला- माहीम विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या दोन्ही पक्षांमध्ये थेट मुकाबला होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या मतदारसंघात तणाव वाढला आहे. अमित ठाकरे यांना त्यांच्या कुटुंबीयांचा आणि कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा आहे, तर सदा सरवणकर यांच्याकडे शिंदे गटाच्या शिवसेनेचा आधार आहे. मनसेच्या ४५ उमेदवारांची यादी जाहीर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी आपली ४५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत विविध विधानसभांमध्ये मनसेकडून उमेदवार उभे करण्यात आले आहेत. माहीम, वरळी आणि अन्य मतदारसंघांमध्ये मनसेने थेट लढत देण्याची तयारी केली आहे. या निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांना जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 000

दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील फडके रोड गुरूवार, शुक्रवार वाहतुकीसाठी बंद

डोंबिवली : दिवाळी सणानिमित्त डोंबिवली पूर्वेतील फडके रोड तरूणाईने गजबजून गेलेला असतो. दिवाळी पहाट, दीपावली पूर्व संध्या उत्सवी कार्यक्रमांची फडके रोडवर रेलचेल असते. हा सगळा विचार करून वाहतूक विभागाचे पोलीस…

विधानसभा निवडणूकीत मतदान करण्यासाठी नवी मुंबईत विविध माध्यमांतून आवाहन

नवी मुंबई : 20 नोव्हेंबर रोजी होणा-या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नवी मुंबईतील प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन करण्याच्या दृष्टीने स्वीप अर्थात मतदार जागरूकता कार्यक्रमांतर्गत विविध माध्यमांचा वापर करण्यात येत आहे. या अंतर्गत आज दिघा येथील नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 108 मध्ये विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्व सांगत त्यांच्यामार्फत आई-बाबा व कुटूंबिय आणि शेजारी यांना मतदान करण्याकरिता प्रोत्साहित करण्याचे सांगण्यात आले. तसेच नमुंमपा माध्यमिक शाळा क्र. 113, महापे येथेही मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो या विषयावर रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांमार्फत मतदानाचा संदेश प्रसारित केल्याने त्यांना मतदानाचे महत्व कळतेच शिवाय त्यांच्यामार्फत त्यांच्या आईवडिलांपर्यंत तसेच परिचितांपर्यंत मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याचा संदेश पोहचतो. नेरूळ विभागात सेक्टर 29 येथील दैनंदिन बाजारामध्ये मतदार जनजागृती पथकाने भेट देत तेथील व्यावसायिक आणि ग्राहक यांच्याशी संवाद साधत त्यांना मतदानाचा हक्क बजावण्याविषयी सांगितले, तसेच याठिकाणी मतदान करणेबाबत सामुहिक शपथही ग्रहण करण्यात आली. अशाच प्रकारे वाशी विभागात सेक्टर 15 ए येथील कर्मवीर भाऊराव पाटील अर्थात मॉडर्न महाविद्यालय वाशी येथे वर्गावर्गांमध्ये जाऊन युवकांशी संवाद साधण्यात आला व त्यांना मतदानाचे महत्व विशद करण्यात आले. पहिल्यांदाच मतदान करणा-या तरूणांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. त्यांच्यामार्फत त्यांच्या घरी तसेच परिसरातील व संपर्कातील नागरिकांनाही संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावण्याविषयी आवाहन केले जावे असे सूचित करण्यात आले. वाशी हायवे बसथांब्यावरील प्रवाशांमध्येही मतदानाविषयी जनजागृती करण्यात आली. उद्यानांमध्ये जॉगींगसाठी येणा-या नागरिकांसह तेथील कर्मचा-यांसह मतदानाविषयी शपथ घेण्यात आली. त्याचप्रमाणे नेरूळ, वाशी व तुर्भे विभाग कार्यालयांमधील कर्मचारी तसेच विभाग कार्यालयांना भेट देणारे नागरिक यांनी एकत्रितपणे मतदानाची शपथ ग्रहण केली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. यामध्ये नमुंमपा क्षेत्रातील 150 व 151 या दोन विधानसभा मतदारसंघाकरिता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नियुक्त स्वीप नोडल अधिकारी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली बेलापूर विधानसभा मतदार संघाचे स्वीप नोडल अधिकारी तथा वाशीचे विभाग अधिकारी सागर मोरे व ऐरोली विधानसभा मतदार संघाच्या स्वीप नोडल अधिकारी तथा उपआयुक्त अभिलाषा म्हात्रे – पाटील यांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शिक्षण विभागाच्या उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे,  नेरूळ विभाग अधिकारी जयंत जावडेकर, तुर्भे विभाग अधिकारी बोधन मवाडे, दिघा विभाग अधिकारी भरत धांडे, कोपरखैरणे विभाग अधिकारी सुनिल काठोळे यांनीही आपल्या सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सहभाग घेतला. ००००

ठाण्यात आजपासून प्रचाराची रणधुमाळीला सुरूवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव अर्ज भरणार अर्ज भरण्यासाठी शरद पवार आणि राज ठाकरे हे उपस्थित राहणार   ठाणे : आजचा गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे अर्ज दाखल करण्यापुर्वी तिन्ही पक्षांकडून शहरात मिरवणुका काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तर, अविनाश जाधव यांचा अर्ज भरण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. यामुळे गुरूवारपासून ठाण्यातील मतदार संघांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असल्याचे चित्र आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी-पाचपखाडी मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुक लढविणार असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. या जागेची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केली होती. परंतु शिवसेना (ठाकरे गट) या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार आणि उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरूवात करणार आहेत. अर्ज भरण्यापुर्वी त्यांच्याकडून मिरवणुक काढली जाणार असून त्यात ते शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे समजते. कल्याण ग्रामीणमधील मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनासाठी सोमवारी मनसे प्रमुख राज ठाकरे हे कल्याण ग्रामीण भागात आले होते. त्यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील यांची तर, ठाणे शहरातून अविनाश जाधव यांची उमेदवारी घोषित केली. अविनाश जाधव हे सुद्धा गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जाधव यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे हे ठाण्यात येणार आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा निवडणुक लढविणार आहेत. ते सुद्धा गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आव्हाड हे मुंब्रा भागात मिरवणुक काढून शक्ती प्रर्दशन करणार आहेत. ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले भाजपचे आमदार संजय केळकर हे वसुबारसचा मुहूर्त साधत सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पुर्वी ते मिरवणुक काढून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. असे असले तरी त्यांनी मंगळवारी दमाणी इस्टेटमधील दत्त मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपा घर चलो अभियानांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून यामध्ये ४०० बुथवरील पदाधिकारी घरोघरी जाऊन केळकर यांची माहिती पत्रकांचे वाटप करणार आहेत. गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी चंद्र संपूर्ण दिवस-रात्र पुष्य नक्षत्रात रहाणार असल्याने दुर्मिळ असा ‘ गुरुपुष्यामृत योग ‘ आला आहे. या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ( सकाळी ६.३७ ) दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत ( शुक्रवारी सकाळी ६.३७ ) हा योग आहे. गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. तसेच चांगल्या कामांचा प्रारंभ या दिवशी करण्याची प्रथा आहे, असे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.

निवडणुक निर्भय, भयमुक्त, पारदर्शक पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे-राजेश कुमार

अशोक गायकवाड रायगड : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ७ मतदार संघामध्ये निवडणुक निर्भय, भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व सदैव दक्ष राहून पार पाडावी, असे निर्देश पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघ निवडणूक खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी दोन निवडणूक खर्च निरीक्षक नियुक्त केले आहेत. पनवेल, पेण, कर्जत, उरण मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील २००५ च्या तुकडीचे अधिकारी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अलिबाग, श्रीवर्धन आणि महाड मतदार संघांसाठी भारतीय महसूल सेवेतील २०१५ च्या तुकडीच्या अधिकारी ज्योती मीना यांची नियुक्ती केली आहे. त्यांचे मंगळवारी,(दि.२२ ऑक्टोंबर २०२४) रोजी रायगड येथे आगमन झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात (दि. २२) रोजी या दोन्ही खर्च निरीक्षकांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व कार्यान्वयीन यंत्रणाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपजिल्हा निवडणूक अधिकारी नितीन वाघमारे, राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिक्षक रविकिरण कोले, खर्च तपासणी विभागाचे नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम यांचेसह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. यावेळी राजेश कुमार यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी निवडणूक प्रक्रियेदरम्यान बँकांमध्ये होणारे दैनंदिन व्यवहार, संशयास्पद व्यवहारांवर विशेष लक्ष द्यावे. तसेच विधानसभा क्षेत्रनिहाय अतिसंवेदनशील भागाविषयी माहिती जाणून घेतली व अशा भागात विशेष उपाययोजना राबविण्याबाबत उत्पादन शुल्क विभाग, आयकर अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सुचना दिल्या. तसेच निवडणूक खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्य प्रकारे करण्याच्या सुचना दिल्या. इलेक्ट्रॉनिक मिडीया, सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रसिध्द होणा-या जाहिरातींकडे लक्ष देण्याबाबत जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या नोडल अधिका-यांना निर्देश दिले. निवडणूक खर्च निरीक्षकांनी सर्व सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिका-यांकडून निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. निवडणूक काळात प्रलोभन दाखविण्यासाठी साड्या, मद्य, वस्तू, पैसे यांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे सजग राहून अशा बाबींना तत्काळ निर्बंध घालावा व संबंधितांवर कारवाई करावी. उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणा-या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही निर्देश खर्च निरीक्षक राजेश कुमार यांनी दिले.निवडणूक खर्च निरीक्षक ज्योती मीना यांनी सहकारी बँका मार्फत होणारे व्यवहार तसेच राष्ट्रीयकृत बँका मार्फत होणारे व्यवहार यावर करडी नजर ठेवण्याचे निर्देश दिले. पेड न्युज वर देखील विशेष लक्ष ठेवावे असेही सांगितले. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार प्रत्येक यंत्रणेनी कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या.यावेळी सर्व कार्यान्वयीन यंत्रणानी केलेल्या कार्यवाहीचा आढावा सादर केला.यावेळी खर्च निरीक्षक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली आणि आढावा घेतला.

ठाणे, पालघरमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ‘जिजाऊ’ संघटना

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघामधून अपक्ष निवडणूक लढवून दोन लाखाहून अधिक मते घेत सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का देणारे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यासह…

खाजगी बसेसमधून प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारल्यास तक्रार करा – महेश देवकाते

अशोक गायकवाड रायगड: खाजगी बसेसमधून प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारल्यास नागरिकांनी योग्य तक्रारी कळवाव्यात असे आवाहन, पेण जि. रायगडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते यांनी केले आहे. १ नोव्हेंबर २०२४ पासून सुरु होणाऱ्या दिवाळी सणानिमित्त प्रवासी मोठ्या प्रमाणात गावी येत व जात असतात. त्यादरम्यान प्रवासी बसेसकडून जादा भाडे आकारल्याबद्दल वारंवार तक्रारी प्राप्त होत असतात. यास्तव खाजगी वाहतूकदारांकडून प्रवाश्यांकडून जादा भाडे – आकारण्यात येणाच्या प्रवृतीला आळा घालण्यासाठी व रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून २१.१०.२०२४ ते ९.११.२०२४ या कालावधीत खाजगी कंत्राटी प्रवासी बसेसची तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी जादा भाडेदर आकारलेबाबतची तक्रार नोंदविण्याकरिता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय हेल्पलाईन क्रमांक:- २५२२३४-०२१४३ व कार्यालय ई-मेल आयडी:- dyrto.06-mh@gov.in येथे संपर्क साधावा. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण कार्यालयाच्या कार्याक्षेत्रातील खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणापासूनचे कि.मी. प्रमाणे खाजगी, बस मालकांनी पूर्ण बससाठी आकारावयाचे महत्तम भाडे बाबतचा विहित नमुन्यात तक्ता तयार करुन व त्यप्रमाणे येणारा प्रती आसन दर दर्शवून सदर खाजगी कंत्राटी वाहने ज्या ठिकाणाहून सुटतात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच प्रवाश्यांच्या माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. ५० प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय. पेण कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदविण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी योग्य तक्रारी कळवाव्यात असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, पेण जि. रायगड यांनी केले आहे.

‘माझी टीएमटी’ मोबाईल ॲप ची केवळ घोषणा

ठाणे : परिवहन सेवेतील प्रवाशांचा सुट्ट्या पैशाचा त्रास वाचावा यासाठी ठाणे महापालिकेच्या परिवहन विभागाने नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण केलेले माझी टीएमटी हे ॲप केवळ घोषणाच आहे का…

 १५ वर्षांत न फुटलेले नारळ १५ दिवसांत फुटले,

 सुभाष पवार यांचा किसन कथोरेंवर हल्लाबोल   बदलापूर : मुरबाड तालुक्यात १५ वर्षांत फुटले नव्हते, तेवढे नारळ गेल्या १५ दिवसांत मुरबाडमध्ये फुटले, असा टोला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व महाविकास आघाडीचे मुरबाड मतदारसंघातील नियोजित उमेदवार सुभाष गोटीराम पवार यांनी आमदार किसन कथोरे यांना लगावला. सुभाष पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर माध्यमांश संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कथोरे यांच्यावर विविध विषयांवर टीका केली. राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केल्यानंतर सुभाष पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. विद्यमान आमदार किसन कथोरे यांना भाजपातून उमेदवारी जाहिर झाल्यानंतर सुभाष पवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला होता. त्याचवेळी पवार कथोरे यांच्याविरूद्ध मुरबाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे स्पष्ट झाले होते. प्रवेश होताच पवार यांनी कथोरे यांच्यावर विविध विषयांवर टीकास्त्र सोडले. खड्डे संपल्यानंतर मुरबाड मतदारसंघ लागतो, असे म्हणणाऱ्यांच्या कारकिर्दीतच मुरबाड मतदारसंघ खड्ड्यात गेला आहे, अशी टीकाही सुभाष पवार यांनी यावेळी बोलताना केली. मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा आणि बदलापूर शहराचा विकास याच मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. गेल्या १५ वर्षांच्या कारकिर्दीत मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा अपेक्षित विकास झालेला नाही. मुरबाड शहरातील एमआयडीसीतील अनेक उद्योग निघून गेले. त्यामुळे मुरबाडमध्ये तरुणांना रोजगारात वाढ झालेली नाही, ही वस्तूस्थिती आहे, याकडे सुभाष पवार यांनी लक्ष वेधले. एकनाथ शिंदेंबद्दल आदर पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आजही आदर आहे. त्यांच्या सहकार्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक कामे पूर्ण करता आली, असे सुभाष पवार यांनी नमूद केले. मात्र यंदाची विधानसभा निवडणूक लढविण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता. त्यामुळे मला शिवसेनेबाहेर पडावे लागले, असेही सुभाष पवार म्हणाले. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भातपिकासह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली.