Month: October 2024

 आचारसंहिता कालावधीत अवैध मद्यविरुध्द ११ गुन्हे

८८ हजारांचा माल जप्तः ४ पथकांची करडी नजर-कीर्ती शेडगे   रत्नागिरी : अशोक गायकवाड विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंतच्या कालावधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ११ गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु १७६ लिटर, देशी मद्य ६.६६ लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य १२.२४ लिटर, रसायन १५०५ लिटर असा एकूण रुपये ८८ हजार २५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १५ ऑकटोबरपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतच्या कालावधीत अवैध दारुची निर्मिती, वाहतूक तसेच विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध मद्यावर राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाची करडी नजर असून, त्याविरुध्द कठोर कारवाई करण्याकरिता या विभागाकडून ४ पथके नेमण्यात आली आहेत. परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक रोखणे, रात्रीची गस्त, संशयित वाहनांची तपासणी तसेच अवैध दारु धंद्याना प्रतिबंध करण्याच्या सूचना सर्व पथकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार पथकांकडून अवैध मद्यावर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी विभागाने १ ऑक्टोबर ते दि. १४ ऑक्टोबर या कालवधीत अवैध मद्याविरुध्द एकूण ८० गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात हातभट्टीची गावठी दारु २०३२ लिटर, देशी मद्य १३.६८ लिटर, विदेशी मद्य ९.०० लिटर, गोवा राज्यात निर्मित मद्य २०५.६५ लिटर, रसायन ३११५० लिटर, प्लॅस्टिकचे बॅरल, कॅन व काचेचे ग्लास असा एकूण रुपये १५ लाख ४४ हजार ४१० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची आचारसंहिता लागू झाल्यापासून मुंबई- गोवा, कोल्हापूर-रत्नागिरी, चिपळूण-कराड या महामार्गांवरुन प्रवाशी तसेच माल वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी या विभागाकडून करण्यात येत आहे. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध मद्याविरुध्द अशी कारवाई येथून पुढेही सुरु राहील. जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारुची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व मद्यसाठा, बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास या विभागाचा व्हॉट्स अॕप क्रमांक- ८४२२००११३३ व टोल फ्री क्रमांक- १८००२३३९९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती शेडगे यांनी केले आहे. अवैध मद्यासंदर्भात बातमी / खबर देणाऱ्या व्यक्तीचे नाव या विभागाकडून गुप्त ठेवण्यात येईल. 0000

 किनाऱ्यावरील मच्छिमार बोटींवर नियंत्रणासाठी मनाई आदेश – किशन जावळे

रायगड : अशोक गायकवाड* निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्र मार्गे दारु, पैसा, अंमली पदार्थ व मतदारांना प्रलोभण देण्यासाठी मुफ्त वस्तू (Free bees) यांचा वाहतूक होणार नाही यासाठी व कोणतेही गैरप्रकार टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावरील मच्छिमार तसेच अन्य अवागमन करण्याऱ्या बोटींवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे.* भारत निवडणूक आयोगाने दि.१५ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या प्रसिध्दी पत्रकान्वये महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने, रायगड जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांतील निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणुकीच्या अनुषंगाने समुद्र मार्गे दारु, पैसा, अंमली पदार्थ व मतदारांना प्रलोभण देण्यासाठी मुफ्त वस्तू (Free bees) यांचा वाहतूक होणार नाही यासाठी व कोणतेही गैरप्रकार टाळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावरील मच्छिमार तसेच अन्य अवागमन करण्याऱ्या बोटींवर नियंत्रण ठेवण्याकरीता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी केला आहे. जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर येणाऱ्या सर्व बोर्टीनी अधिसूचित केलेल्या ठिकाणीच सदर बोर्टीचे अवागमन करावे. सदर बोटींनी अधिसूचित केलेल्या ठिकाणा व्यतिरिक्त इतर ठिकाणी आपल्या बोटींचे अवागमन केल्यास, सदर बोट जप्त करुन, कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये सागरी सुरक्षा पोलीस दल यांनी आपली गस्त तीनपटीने वाढवावी. या कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा. मत्स्यविभाग रायगड, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि तटरक्षक दल यांनी विधानसभा निवडणूक कालावधीमध्ये जिल्ह्यातील समुद्रातील आपली गस्त वाढवावी. या कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा. जिल्ह्यातील समुद्र किनारा असणाऱ्या गावांच्या संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांनी त्यांचे स्तरावर विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने समुद्र किनारा विभागातील संबंधित तलाठी, बिट मार्शल, ग्रामसेवकआणि कोतवाल यांची सनियंत्रण समिती गठीत करुन, समुद्र किनाऱ्यावरील गावांमध्ये कोणताही गैरप्रकारहोणार नाही याची दक्षता घ्यावी व सदर कालावधीमध्ये संशयास्पद बोटी अथवा कृती आढळल्यास उचित कायदेशीर कारवाई करुन, अहवाल उलटटपाली सादर करावा. 0000

 ३री राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

 घोरपडे, शेट्टे, ताकमोगे, तांबवेकर, सोमण, आरंडे, गुंजाळ यांना सुवर्णपदक   पुणे १९ ऑक्टोबर २०२४: सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा प्रबोधिनी सायकलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने आयोजित ३-या महाराष्ट्र राज्य ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी संस्कार घोरपडे, सिद्धेश घोरपडे, साहील शेट्टे, मंगेश ताकमोगे, गायत्री तांबवेकर, आभा सोमण, सायली आरंडे, श्वेता गुंजाळ यांनी आपापल्या वयोगटात चमकदार कामगिरी करताना टाईम ट्रायल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. आज या स्पर्धेचे उदघाटन सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडीयाचे उपाध्यक्ष श्री प्रताप जाधव, निगडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री शत्रुघ्न माळी, स्पर्धेचे मुख्य कॉमिशर सुदाम रोकडे, आंतरराष्ट्रीय पंच धर्मेंद्र लांबा, स्पर्धा संचालक दिपाली पाटील, मिलींद झोडगे, मिनाक्षी शिंदे, सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार भिकन अंबे, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सहसचिव अभिजीत मोहिते आदी मान्यवर हजर होते. आज पावसामुळे काही काळ स्पर्धेत व्यतय आला. आज  सर्व वयोगटातील टाईम ट्रायल प्रकारामधील अंतिम स्पर्धा पार पडल्या. आज झालेल्या स्पर्धांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे. टाईम ट्रायल :- युथ बॉईज ५०० मीटर्स – सुवर्ण – संस्कार घोरपडे (पुणे ३८.८९ से.), रौप्य – अर्नव गौंड (पुणे ४२.५२ से.) कांस्य – अनुज गौंड (पुणे – ४२.६२से). युथ गर्ल्स ५०० मी. – सुवर्ण – गायत्री तांबवेकर (पुणे – ४१.८९ से.), रौप्य – ज्ञानेश्वरी माने (पुणे ४१.८९ से.), कांस्य – मुग्धा कर्वे (पुणे – ४६.०२). सब ज्युनिअर बॉईज ५०० मी.  – सुवर्ण –  सिद्धेश घोरपडे (३६.२५ से), रौप्य – प्रणय चिनगुंडे (३९.६० दोघे क्रीडा प्रबोधिनी), कांस्य – संस्कार घोरपडे (पुणे ३९.७९ से), सब ज्यनिअर गर्ल्स ५०० मी. – सुवर्ण – आभा सोमण (४१.०१ से.) रौप्य – गायत्री तांबवेकर (४२.३० से.), कांस्य – श्रीवणी परीट (४४.८१ से. सर्व पुणे). ज्युनिअर:- मुले १००० मी. सुवर्ण – साहील शेट्टे (पुणे १.१३.६०), रौप्य – हरीश डोंबाळे (क्रीडा प्रबोधिनी पुणे १.१४.३१) कांस्य – सोहम पवार (पुणे १.१४.९४) मुली ५०० मी. – सुवर्ण – सायली आरंडे (कोल्हापूर ३९.७१ से.) रौप्य  – आभा सोमण (पुणे ४१.०३से) कांस्य – झायना पिरखान (पालघर ४१.७६ से). मेन ईलाईट (पुरुष खुला गट) १००० मी. – सुवर्ण – मंगेश ताकमोगे (१.१२.०३) रौप्य – वेदांत जाधव (१.१२.३७ दोघे पुणे) कांस्य – मंथन लाटे (ठाणे १.१३.२३) वुमेन ईलाईट (महिला खुला गट) – ५०० मी. – सुवर्ण – श्वेता गुंजाळ (पुणे ३९.८० से) रौप्य – सायली आरंडे (कोल्हापूर ४०.४८ से.) कांस्य – आदिती डोंगरे (क्रीडा प्रबोधिनी, पुणे ४१.८८ से) 0000

या ‘जन्मावर’… या ‘मरणावर’… शतदा प्रेम करावे- संदीप चव्हाण

मुंबई / रमेश औताडे सर्वांना परिचित असलेले गाणे  ‘या जन्मावर …या जगण्यावर … शतदा प्रेम करावे’ संपूर्ण जीवनाचे सार सांगून जाते हे गाणे. मात्र अवयव दान केले तर या ‘मरणावर’  शतदा प्रेम करावे असे आपल्या मृत्युनंतर जग बोलू लागेल. त्यासाठी अवयव दान चळवळ व्यापक करत ‘अवयवदान सैनिकांचे’  जाळे निर्माण करण्याची गरज आहे.  मुंबई मराठी पत्रकार संघ ‘ ‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ या अवयव दान संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करेल असे बित्तंबातमीचे संपादक आणि मुंबई  पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड डोनेशन मुंबई यांच्या वतीने अवयवदान आणि नेत्रदानाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. १४० कोटीच्या देशात मागील वर्षी फक्त १०२० जणांनी केले अवयव दान केले. खेदाची बाब जरी असली तरी अजूनही कोट्यवधी जनतेला अवयव दान म्हणजे काय हेच माहिती नाही. यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे असे ‘द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन’ या अवयव दान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक कुमार कदम, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, अजय वैद्य, हेमंत सामंत,जगदीश भोवड, आदी पत्रकार उपस्थित होते. फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड डोनेशन चे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, उपाध्यक्ष सुनील देशपांडे, प्रशांत पागनीस, नागराज अय्यर, श्रीकांत कुलकर्णी यांनी त्यावेळी अवयव दान संदर्भात मार्गदर्शन केले. जेव्हा आपण अवयव दान करतो तेव्हा शरीर दान शक्य नसते आणि जेव्हा शरीर दान होते असे केल्याने शरीरातील अंतर्गत अवयवांचे दान करता येत नाही. मुळात शरीर दान आणि अवयवदान या दोन भिन्न गोष्टी आहेत. असे पुरुषोत्तम पवार यांनी सांगितले.

अखेर नितीनला आपण श्वास देऊ शकलो नाही- संदीप चव्हाण

मुंबई / रमेश औताडे कमी वयात निधन झालेल्या पत्रकार नितीन चव्हाण यांच्या उपचारासाठी आपण कुठेतरी कमी पडलो, अशी खंत बित्तंबातमीचे संपादक आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी पत्रकार भवनात शुक्रवारी आयोजित शोकसभेच्या वेळी व्यक्त केली. मुंबई मराठी पत्रकार संघाचे दिवंगत सदस्य ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, नितीन चव्हाण व रघुनाथ घानकुटकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पत्रकार भवनात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त देवदास मटाले, विश्वस्त राही भिडे, संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, दूरदर्शनचे जयू भटकर, विलास मुकादम, सदानंद खोपकर आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी संदीप चव्हाण म्हणाले, विजय वैद्य यांचे ग्रंथ प्रेम मोठे होते. पुस्तक त्यांचा प्राण होता. योगेश त्रिवेदी यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या चितेवर त्यांच्या आहुती वृत्तपत्राचा अंक ठेवावा. तर विजय वैद्य म्हणाले होते माझ्या अंत्यात्रेत माझ्या उशीखाली त्या दिवशीचे सर्व वृत्तपत्राचे अंक ठेवा. जिंदगी लंबी नहीं बडी होनी चाहिए असे नितीन चव्हाण सांगायचा. पत्रकारिता माझी कमिटमेंट आहे असे नितीन म्हणायचा. त्याची साता समुद्रापार पत्रकारिता होती. दुबईतून पाच लाख मदत आली. अजून मदतीसाठी शाहरुख खान व अक्षय कुमार यांची भेट घेणार होतो. नितीनसाठी एक नाटकाचा प्रयोग करणार होते. ऑक्सिजन सिलिंडर घेऊन नितीन ऑफिसला जायचा. मात्र अखेर नितीनला आपण श्वास देऊ शकलो नाही. नितीनचा मोबाईल क्रमांक डिलिट करू नका अजूनही अनेकांचे फोन येत आहेत. त्याचा वसा त्याचा मुलगा चालवेल. त्यांच्या कुटुंबाने पत्रकार संघात कधीही यावे संघ तुमचाच आहे. असे चव्हाण यांनी सांगितले. नीला उपाध्ये शिक्षिका होत्या माझ्या त्या आमची माय होत्या. अशी आठवण चव्हाण यांनी सांगितली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांनी या चारही पत्रकारांच्या सोबत पत्रकारिता करताना आलेले अनुभव सांगितले. भिकऱ्यांची संघटना काढून मला अध्यक्ष केले तरी चालेल असे सांगणारे वैद्य पत्रकरितले भीष्माचार्य होते. नितीन चव्हाण व मी सामना मध्ये एकत्र काम करत होतो. ते एक हरहुन्नरी पत्रकार होते. पत्रकार मारुती मोरे व सचिन धानजी यांनी नितीन  यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीसाठी खूप धावपळ केली. अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी आर्थिक मदतीसाठी आवाहन केले मात्र आपण नितीन चव्हाण यांना वाचवू शकलो नाही. असे योगेश त्रिवेदी यांनी सांगितले. विजय वैद्य यांच्या घरी मी सहावीत असताना त्यांच्या घरी वृत्तपत्र टाकत होतो. अशी एक आठवण सदानंद खोपकर यांनी सांगितली. पत्रकार संघाने पत्रकारांच्या आरोग्य निधीसाठी एका मोठ्या फंडाची उपलब्धता करावी असे आवाहन खोपकर यांनी केले. यावेळी बोलताना माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांनी सांगितले की, रघुनाथ घानकुटकर डोळस पत्रकार होते. त्यांच्या दिवाळी अंकात ते जीव ओतून काम करत होते. नीला उपाध्ये या पत्रकार संघाच्या कार्यवाह असताना त्यांनी पत्रकारांच्या मुलांच्या स्पर्धा घेतली होती. स्पर्धेत मला बक्षीस मिळाले ते माझे पाहिले बक्षीस होते. विजय वैद्य यांचे पुस्तकावरील प्रेम खूप मोठे होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार सुरू केला तर पहिला पुरस्कार त्यांनाच मिळायला हवा. नितीन आजारी असतानाही पत्रकारिता करत होता त्यांनी कधीही आजारपणाचा बाऊ केला नाही. तत्वाने जगणारे हे पत्रकार संघाचे हिरे होते. यावेळी राही भिडे यांनी या सर्व पत्रकारांच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले. इतके महान पत्रकार होते हे सर्व. यावेळी देवदास मटाले म्हणाले, आयुष्याची टर्म पूर्ण करण्याअगोदर  नितीन गेला. जे आहे ते छापायचेच असा बिनधास्त पत्रकार होता. विजय वैद्य यांच्याशी माझी छान मैत्री होती. निलाताई मला लाडाने टोण्या म्हणायची. देहदान करा व शोकसभा करू नका असे त्यांनी सांगितले होते. 0000

शहापूर मतदारसंघात 9 हजार मतदारांची वाढ

ठाणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सरू आहे, तर दुसरीकडे लोकशाहीच्या या उत्सवासाठी जिल्हा प्रशासनदेखील सज्ज झाले आहे. त्यानुसार नुकतेच जिल्हा प्रशासनाकडून १८ विधानसभा…

 नाशकातून आता नव्या वेळेत झेपावणार विमाने

‘इंडिगो’चे हिवाळी वेळापत्रक जाहीर; २- २७ ऑक्टोबरपासून अंमलबजावणी   हरिभाऊ लाखे नाशिक : इंडिगो कंपनीने नाशिक विमानसेवेचे हिवाळी सत्रातील वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार नाशिकच्या विमानांच्या वेळांत काही बदल करण्यात आले आहेत. काही शहरांतून नवी आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीही उपलब्ध होणार आहे. येत्या २७ ऑक्टोबरपासून या बदलांची अंमलबजावणी केली जाणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवानगी प्राप्त झाल्यानंतर हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नाशिक विमानतळावरील इंदूर, गोवा, नागपूर, अहमदाबाद, बेंगळुरू, नवी दिल्ली, हैदराबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. त्यांपैकी काही शहरांच्या विमानांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. बेंगळुरूसाठी एक तास आधी, तर हैदराबादसाठी दोन तास आधी विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंदूरची वेळ तीन तास उशिरा, तर अहमदाबाद विमानाची वेळ दुपारऐवजी सायंकाळची करण्यात आली आहे. नवी दिल्ली विमानाच्या वेळेत मात्र कोणताही बदल नाही. दि. २७ ऑक्टोबरपासून नाशिक येथून जयपूरसाठी (व्हाया इंदूर) विमानसेवाही सुरू होत आहे. नव्या वेळापत्रकानुसार नाशिकला अबूधाबी, बँकॉक, कोलम्बो, शिकागो, दुबई, हाँगकाँग, काठमांडू, मॉरिशस, वॉशिंग्टन यांसारख्या ४२ देशांतील शहरांना दररोज आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. वेळांतील बदल नाशिक- गोवा : दुपारी १२.०५ ऐवजी १२ वाजता उड्डाण, १.५० ऐवजी १.४० ला लॅण्डिंग नाशिक-अहमदाबाद : सकाळी १०.४५ ऐवजी सायंकाळी ५.४५ ला उड्डाण, दुपारी १२.१० ऐवजी सायंकाळी ६.५५ ला लॅण्डिंग नाशिक नागपूर : सायंकाळी ४.२० ऐवजी ४.३५ ला उड्डाण, सायंकाळी ६.१० ऐवजी ६.०५ ला लॅण्डिंग नाशिक-हैदराबाद : दुपारी २.२५ ऐवजी १२.३० ला उड्डाण, सायंकाळी ४.२० ऐवजी दुपारी २.१० ला लॅण्डिंग नाशिक-बेंगळुरू : सायंकाळी ४.५० ऐवजी ३.४० ला उड्डाण, सायंकाळी ६.३५ ऐवजी ५.३० ला लॅण्डिंग नाशिक-इंदूर : दुपारी ११.०५ ऐवजी २.४० ला उड्डाण, १२.२० ऐवजी ३.५० ला लॅण्डिंग गोव्याच्या दाबोलिम विमानतळावर लॅण्डिंग गोव्यात आता उत्तर गोवा विमानतळाऐवजी दाबोलिम विमानतळावर नाशिक विमानाचे लॅण्डिंग होणार आहे. या विमानतळावर सेवा शुल्क कमी असल्याने प्रवाशांच्या विमानभाड्यात काहीशी कपात होणार आहे.

 कल्याणकडे ‘मनसे’ लक्ष;

 ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील पुन्हा रिंगणात उतरण्याची शक्यता   कल्याण : २०१९च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विजय मिळालेला एकमेव मतदारसंघ अशी कल्याण ग्रामीण मतदार संघाची ओळख आहे. आगरीबहुल असा हा मतदारसंघ असून मनसेचे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांचा हा मतदार संघ असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. या मतदारसंघातून राजू पाटील हे पुन्हा निवडणुकीला सामोरे जाणारे हे निश्चित असले तरी मनसे प्रमुख राज ठाकरे या मतदारसंघात नेमका कोणता पवित्रा घेणार, याविषयी सर्वाधिक उत्सुकता आहे. गेल्या निवडणुकीत माघार घेऊन निवडणूक न लढवणारे माजी आमदार सुभाष भोईर शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी सज्ज असल्याने ही लढत चुरशीची ठरणार आहे. कल्याण, डोंबिवली, ठाणे महापालिकेतील काही भाग, कल्याण तालुका, अंबरनाथ तालुक्यातील काही भाग, नवी मुंबईतील गावे तसेच कल्याण पूर्वेतील लोकग्राम परिसर अशा विस्तृत परिसरात कल्याण ग्रामीण मतदारसंघाचा विस्तार आहे. या मतदारसंघात आगरी मतदारांचे प्राबल्य असल्याने सर्वच राजकीय पक्षाकडून या मतदाराच्या मतांचे दान मिळविण्यासाठी आगरी चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र काहीही असले तरी यावेळी मातब्बरांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या मतदारसंघाने यापूर्वी दोनवेळा मनसेच्या बाजूने कौल दिला आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी शिवसेनेकडून मनसेला विधानसभेत सहकार्य करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर खासदार शिंदे यांच्या प्रचारात राजू पाटील पुढाकार घेतला होता. त्यामुळे या मदतीची परतफेड शिवसेना आणि डॉ. शिंदे यांच्याकडून होईल, अशी मनसेला अपेक्षा आहे. तर मागील विधानसभा निवडणुकीत भोईर यांना उमेदवारीपासून दूर ठेवळे होते. मात्र शिवसेनेत विभाजन झाल्यानंतर भोईर हे उमेदवारीचे प्रमुख दावेदार झाले आहेत. मतदारसंघात असलेला दांडगा जनसंपर्क आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या मताची जोड त्यांना मिळणार असल्याने महाविकास आघाडीचे आव्हान असणार आहे. महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या भाजपकडूनही या मतदारसंघावर दावा केला जात असून भाजपाचे नंदू परब उमेदवारी मिळविण्यासाठी खटाटोप करत आहेत. तर शिवसेनेकडून डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ठाणे महापालिकेचे उप महापौर रमाकांत मढवी आणि कल्याण तालुकाप्रमुख महेश पाटील यांच्यात चुरस वाढली आहे. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिंदे गटाला सुटल्यास ठाकरे गटाच्या उमेदवाराला शह देण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून भोईर यांच्या मतामध्ये विभाजन करण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गत निवडणुकांची पार्श्वभूमी २००९च्या निवडणुकीत या मतदारसंघातून मनसेकडून रमेश पाटील यांची लढत शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्यामध्ये बरोबरी होती. मात्र त्यावेळी मनसेच्या लाटेत रमेश पाटील यांचा विजय झाला होता. तर २०१४ च्या निवडणुकीत रमेश पाटील यांच्यावर शिवसेनेच्या सुभाष भोईर यांनी मात करत हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात घेतला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांच्यावर मात करत हा मतदारसंघ जिंकला. सुभाष भोईर यांनी यावेळी शांत राहण्याचा घेतलेला निर्णय काहीसा मनसेच्या पथ्यावर पडल्याची चर्चा होती. २०१९ च्या निवडणुकीत मनसेने हा मतदारसंघ जिंकला असला तरी आता परिस्थिती बदलली आहे. 0000

 देवनार डम्पिंगवरील पुनर्वसनाचा मुद्दा वादात

 मानखुर्द मतदारसंघात उमेदवारांना डोकेदुखी   मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडच्या काही भागावर धारावीतील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा मुद्दा आगामी विधानसभा निवडणुकीत मानखुर्द विधानसभा क्षेत्रात गाजण्याची चिन्हे आहेत. देवनार विभागाचा काही भाग अणुशक्ती नगर मतदारसंघात, तर डम्पिंगचा भाग मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा क्षेत्रात येतो. त्यामुळे मानखुर्द-शिवाजीनगर भागातून उभ्या राहणाऱ्या  महायुतीच्या उमेदवारासाठी पुनर्वसनाचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो. देवनार  डम्पिंग ग्राउंडच्या काही भागावर धारावीतील अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकाराने दोनच दिवसांपूर्वी घेतला. त्यामुळे देवनार पुन्हा चर्चेत आले आहे. देवनार डम्पिंग बंद करण्याची प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. मात्र, डम्पिंग ग्राउंड अजून बंद करण्यास प्रशासनाला यश आलेले नाही. वीज निर्मितीतून  ६०० मेगावॅट वीज – देवनार डम्पिंंग येथे वीज निर्मितीचा प्रकल्पही सुरू केला जाणार आहे. दोन टप्प्यांत सुरू केल्या जाणाऱ्या या प्रकल्पातून ६०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. – डम्पिंग ग्राउंडच्या एकूण क्षेत्रफळापैकी काही भागांत पुनर्वसन आणि काही भागात वीज निर्मिती प्रकल्प अशी योजना आहे. सोयी-सुविधांवर भार अनेक वर्षे देवनार डम्पिंंगवर कचरा साठवला जात असल्याने या भागातील जमिनीची गुणवत्ता ढासळली आहे. शिवाय हा भाग प्रदूषितही झाला आहे. अशा ठिकाणी लोकांसाठी घरे बांधणे संयुक्तिक नाही, असा सूर उमटत आहे. डम्पिंग ग्राउंडमुळे या भागातील पायाभूत सोयी-सुविधांवर आधीच ताण आहे. त्यातच हजारो नागरिकांचे पुनर्वसन केले जाणार असल्याने आधीच अपुऱ्या असलेल्या सोयी-सुविधांवर आणखी भार पडण्याची शक्यता आहे. देवनारवर आणखी किती भार टाकणार, हा मुद्दा उपस्थित होत आहे. पुनर्वसनाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याने मानखुर्द मतदारसंघात महाविकास आघाडी या निर्णयाच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न करणार, हे उघड आहे. त्यामुळे या भागातील महायुतीच्या उमेदवाराला डोकेदुखीचा सामना करावा लागेल, असे दिसते. 0000

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावरील ”  थॉटस् ऑफ आंबेडकर ” पुस्तकाचे प्रकाशन

रमेश औताडे मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक भाषणातील विविध पैलूंची विषयावर रचना असलेले ” थॉटस् ऑफ आंबेडकर ” या पुस्तकाचे प्रकाशन शुक्रवारी मुंबई प्रेस क्लब येथे ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक अर्जुन डांगळे  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना नामदेव साबळे म्हणाले, हे पुस्तक आधुनिक भारताचे शिल्पकार महामानव आणि भारतीय घटनेचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे संकलन आहे. बाबासाहेबांचे क्रांतीकारी परिवर्तनवादी विचार हे भारतातल्या शोषित, पिडीत पददलित लोक समुहाच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय लढ्यांना ऊर्जा नि प्रेरणा देणारे विचार आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या विचारा शिवाय इथला सर्वहारा वर्ग त्याच्या मनुवादी बामन, बनिया शोषकाविरुद्ध, शोषकांच्या शासनाविरुद्ध आणि या शोषकांचं रक्षण करणाऱ्या समाज व धर्मव्यवस्थेविरुद्ध सर्वंकष निर्णायक लढा उभारू शकत नाही असे नामदेव साबळे म्हणाले. यावेळी दलित पॅंथर एनएलडी चे केंद्रीय अध्यक्ष सुरेश केदारे, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ, राजकीय विश्लेषक सुनील कदम, दैनिक सार्वभौम राष्ट्र चे संपादक प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक साहित्यिक विचारवंत राजू रोटे तर सूत्रसंचालन केतकी प्रकाशन कार्यकारी संपादक पंकज चाळके यांनी केले. 0000