Month: October 2024

ऍड. वैशाली घरत यांना बळीराजा सेनेतून उमेदवारी जाहीर

राजीव चंदने मुरबाड : ऍड. वैशाली घरत मुरबाड विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. बळीराजा सेनेतून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. मुरबाड विधानसभा निवडणुकीत सध्या कोण उमेदवार कोणत्या पक्षातून निवडणुका लढवणार हे चित्र स्पष्ट नसले तरी काही पक्षानी उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. यात अपक्ष उमेदवारही मागे राहिलेले नाहीत. ऍड. वैशाली घरत गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात व समाजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ही उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे हे आमच्या पक्षाचे ध्येय आहे,  त्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. ऍड. घरत ह्या अनेक वर्षांपासून राजकीय, सामाजिक चळवळीत सक्रिय आणि अग्रेसर आहेत.याचा फायदा हा त्यांना या निवडणुकीत होऊ शकतो असा अंदाज आहे. कोट पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखविला तो मी सार्थ करेन. आतापर्यन्तच्या राजकीय इतिहासात मुरबाडमध्ये विधानसभा निवडणुकीत महिलांना कुणीही न्याय दिला नाही. माझ्या पक्षाने मला उमेदवारी देऊन समस्त नारीशक्तीचा सन्मान केला आहे. शेतकरी, महिला, विदयार्थी यांच्या न्याय हक्कासाठी आमचा पक्ष पूर्ण ताकदीनीशी मैदानात उतरला आहे. ऍड. वैशाली घरत

 विक्रमगड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव

प्रकाश निकम यांच्यासाठी कार्यकर्ते आग्रही   योगेश चांदेकर पालघरः विक्रमगड- विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विजयी व्हायचा असेल, तर हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडला पाहिजे, असा आग्रह पदाधिकाऱ्यांतून केला जात आहे. त्यासाठी दबाव गटही तयार झाला आहे. या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांना उमेदवारी द्यावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत  भाजपच्या विष्णु सवरा यांच्याकडून युती नसताना निकम यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी निसटता पराभव झाला होता. तर विक्रमगड मतदारसंघातून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे सुनील भुसारा आमदार आहेत. २०१९ च्या विधानसभेत  डॉ हेमंत सवरा यांचा युती असताना  २१ हजार पेक्षा जास्त  मतांनी सुनील भुसारा यांनी पराभव केला होता, महायुतीच्या विजयासाठी निकमच हवेत गेल्या दोन निवडणुकीचा अनुभव तसेच त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून निकम यांनी केलेली गावनिहाय कामे आणि गावोगाव त्यांचा असलेला संपर्क यामुळे या मतदारसंघातून महायुतीला विजय मिळवायचा असेल, तर निकम यांच्यासारख्या नेतृत्वाला उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यासाठी हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाला सोडला पाहिजे, असा आग्रह शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे. नगरपंचायत, पंचायतसमिती,ग्रामपंचायतीत वर्चस्व या आग्रहासाठी त्यांनी जव्हार मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यातील कोणकोणती सत्तास्थाने कोणा कोणाच्या ताब्यात आहेत, याचा संदर्भ दिला आहे. मोखाडा तालुक्यातील नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे दोन गट व पंचायत समीती शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत, तर सुमारे ८०% ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे सरपंच आहेत. याशिवाय जव्हार तालुक्यात तीन जिल्हा परिषद गटापैकी १ गट शिंदेच्या शिवसेनेकडे तर १ गट भाजपकडे तर  १ गट अजितपवार गटाकडे आहे. तर जव्हार नगरपरिषद ही शिंदेच्या शिवसेनेकडे आहेत तर बऱ्याच ग्रामपंचायतीही शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे तसेच विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषदेचा १ गट पंचायत समितीचा १ गण  शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहेत, आणि  विक्रमगड नगरपंचायतीवर जिजाऊचा झेंडा असला तरी १ नगरसेवक तसेच नंबर २ च्या मतांची संख्या   शिवसेनेच्या शिंदे गटाकडे आहे. या तालुक्यातही बऱ्याच  ग्रामपंचायतीही ताब्यात आहेत. मतदारसंघ न सोडल्यास पराभवाची पुनरावृत्ती विधानसभेच्या मागच्या निवडणुकीत विद्यमान खासदार हेमंत सवरा हे विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते; परंतु त्या वेळी ते त्यांचा पराभव झाला , असे शिंदे गट निदर्शनास आणतो. विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे वर्चस्व कसे आहे आणि शिंदे गटाला डावलून हा मतदार संघ महायुतीतील अन्य पक्षाकडे गेल्यास पराभवाची पुनरावृत्ती कशी होऊ शकते, याचे दाखले कार्यकर्त्यांनी दिले आहेत. महायुतीत दबावाचे राजकारण शिवसेनेचा शिंदे गटाला हा मतदारसंघ सोडणे कसे आवश्यक आहे, यासाठी आणि प्रकाश निकम हेच या मतदारसंघातून महायुतीला कसा विजय मिळवून देऊ शकतात, हे पटवून देण्यासाठी शिवसेनेच्या या मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घालण्यास जाणार असून महायुतीच्या जागावाटपत हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटालाच कसा सोडला जावा, यासाठी आग्रह राहणार आहे. महायुतीत अनेक मतदारसंघासाठी दबावाचे राजकारण सुरू असते तसेच दबावाचे राजकारण आता विक्रमगड विधानसभा  मतदारसंघातही सुरू झाले आहे. निकम यांच्यासाठी शिवसेनेचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ मिळाला पाहिजे, यावर आता शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा भर आहे. हा मतदारसंघ केवळ प्रकाश निकम यांच्यासाठी सोडला जावा आणि त्यांनी गेल्या काही वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या भागातील केलेल्या विकासकामांची परिणती विजयात व्हावी, असा शिंदे गटाचा आग्रह आहे. लोकसभा निवडणुकीसाठी हा मतदारसंघ शिवसेनेच्या शिंदे गटाकडे होता; परंतु ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडून काढून घेऊन तो भाजपने ताब्यात गेला. त्या वेळी हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला असता, तर निकम हे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते; परंतु हा मतदारसंघ त्या वेळी भाजपला गेल्याने निकम यांना थांबावे लागले. या परिस्थितीत किमान आता तरी त्याच्यासाठी हा मतदारसंघ सोडावा असा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचा प्रयत्न आहे. निकम यांचे वरिष्ठांशी चांगले संबंध निकम यांचे शिवसेनेच्या वरिष्ठ तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चांगले संबंध असल्याने तसेच राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत मोठी चुरस असल्याने या परिस्थितीत विक्रमगड  विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या ताब्यातून महायुतीकडे आणण्यासाठी प्रकाश निकम यांना उमेदवारी द्यावी, यासाठी आता जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. कोट जव्हर्स‘मोखाडा आणि विक्रमगड या तीन तालुक्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची मोठी ताकद आहे. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिंदे गट सत्तेवर आहे. कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे शिंदे गटाकडे असल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला आणि त्यातही उमेदवार म्हणून प्रकाश निकम यांना सोडावा, अशी आमची सर्वांची आग्रही मागणी आहे. -रिकी रत्नाकर, युवासेना लोकसभा प्रमुख पालघर 00000

आमदार निकोले यांना डहाणूतून पुन्हा उमेदवारी

 पालघर जिल्ह्यातील पहिली उमेदवारी जाहीर प्रचार नियोजनही ठरले योगेश चांदेकर   पालघरः जनसामान्यांचा नेता आणि राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणून ओळख असलेल्या आ. विनोद निकोले यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची डहाणू विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. पालघर जिल्ह्यात उमेदवारी जाहीर झालेले निकोले हे पहिलेच उमेदवार आहेत. त्यांच्या विजयासाठी आत्तापासूनच प्रचाराचे नियोजन ठरले असून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होऊन पाच दिवस झाले असले, तरी अद्याप अन्य कुठल्याच पक्षाने अधिकृतपणे कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली नाही; परंतु आ. निकोले यांना मात्र अगोदरच उमेदवारी जाहीर झाली आहे. अतिशय छोट्या घरात राहत असलेल्या आणि अजूनही प्रत्यक्षात परसबागेत आणि छोट्या शेतीत काम करत असलेल्या आ. निकोले यांचे पाय कायम जमिनीवर आहेत. जनतेचा आमदार जनसामान्यांच्या प्रश्नावर सातत्याने प्रशासन आणि सरकारची संघर्ष करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. आदिवासींच्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी गेल्या; मात्र त्यांना पुरेशी नुकसान भरपाई मिळाली नसल्याने अशा प्रकरणात थेट प्रशासनाशी दोन हात करून संबंधितांना योग्य ती मदत मिळण्याबाबत त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कामाची दखल म्हणून पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पास्कल धनारे यांचा पराभव करून निकोले निवडून आले होते. प्रश्न मांडण्यातही आघाडीवर वर्षानुवर्ष जनसामान्यात राहून चळवळ उभी करणाऱ्या आणि अतिशय कमी खर्चात निवडणूक लढवून ती जिंकणाऱ्या आमदार निकोले यांचे आकर्षण केवळ पालघर जिल्ह्यालाच आहे, असे नाही, तर संपूर्ण राज्यात त्यांच्या साधेपणाची चर्चा होत असते. केवळ साधा, गरीब आमदार म्हणूनच त्यांची ओळख आहे, असे नाही, तर सामान्यांचे प्रश्न विधानसभेतही तेवढ्याच ताकदीने मांडणारा आणि सातत्याने विधानसभेतील चर्चेत गांभीर्याने भाग घेणारा आमदार म्हणूनही त्यांची ओळख आहे. पालघर जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न मांडणारे आणि राज्यात प्रश्न मांडण्यात सातवा क्रमांक असलेले आ. निकोले धोरणात्मक चर्चेतही तेवढ्याच हिरीरीने भाग घेत असतात. महाविकास आघाडीमुळे पारडे जड टँकरमध्ये बसून सामान्यांपर्यंत पाणी पोहोचवणारा हा आमदार विकासासाठी सातत्याने धडपडतो आहे. त्यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून राज्यात अन्य मित्र पक्षांना किती जागा सोडायच्या, याचा निर्णय महाविकासाकडे घेऊ शकली नसली, तरी डहाणू विधानसभा मतदारसंघाबाबत मात्र महाविकास आघाडीमध्ये त्याबाबत कोणताच संदेह नसल्याने त्यांची उमेदवारी अगोदरच जाहीर करण्यात आली. यापूर्वीच पालघर जिल्हा कमिटीने तलासरी येथील कॉम्रेड गोदावरी शामराव परुळेकर भवन येथे कार्यशाळा घेऊन या कार्यशाळेत विधानसभा निवडणुकीसाठीची प्रचार यंत्रणा कशी राबवायची याची आखणी केली. त्यात ३६५ हून अधिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महिलांचाही त्यात सहभाग होता. माकप आणि महाविकास आघाडीच्या समन्वयामुळे आता डहाणूतील निवडणूक अधिक रंगतदार होणार असून आमदार निकोले यांचे पारडे जड आहे. प्रतिस्पर्धी कोण एवढीच उत्सुकता डहाणू विधानसभा मतदारसंघात वाढवण बंदर होत असून या बंदराचा पुरस्कार भाजप आणि महायुतीने केला असला, तरी महाविकास आघाडी, मच्छीमार संघटना तसेच स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांचा त्याला विरोध आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभेच्या निवडणुकीतही हाच मुद्दा चर्चेला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय पालघर जिल्ह्यात होत असलेले विविध प्रकल्प, त्यासाठी जमिनीचे संपादन आणि त्यात शेतकऱ्याची होत असलेली फसवणूक तसेच विकासाच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या, तरी अद्यापही आदिवासी व अन्य समाज घटकांपर्यंत विकासाचा सूर्य अद्याप उगवलाच नसल्याने त्याबाबत माकप आणि महाविकास आघाडीने उठवलेला आवाज, आदिवासी उपाययोजनातील निधी अन्य घटकांकडे वळवण्याचे प्रकार यावर आता भर असून आमदार निकोले यांच्या विरोधात महायुती कोणाला उमेदवारी देते याकडे लक्ष लागले आहे. महायुतीचा उमेदवार कोणीही असला, तरी आमदार निकोले यांच्या विजयासाठी आतापासूनच कार्यकर्त्यांनी जीवाचे रान उठवले असल्याने निश्चितच निकोले यांचे पारडे जड राहणार आहे.

ढगफुटीच्या पावसात निमखेडी बस स्थानकाचा स्लॅब कोसळला

सोयगाव :भरपावसात निमखेडी बस स्थानकाचा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री एक वाजता घडली दरम्यान रात्रीच्यावेळ असल्याने कोणताही अनर्थ घडला नाही सोयगाव-बनोटी रस्त्यावर असलेल्या निमखेडी फाट्यावर बस स्थानकाचा भरपावसात स्लॅब कोसळून बस स्थानक धोकादायक झाले आहे त्यामुळे शनिवारी पहाटेपासून प्रवाशांची गैरसोय झाली होती दरम्यान रात्रीची वेळ असल्याने कोणताही अनर्थ घडला नसल्याचे प्रशासन कडून स्पष्ट करण्यात आले आहे सोयगाव परिसरात शुक्रवारी रात्री अतिवृष्टी चा मुसळधार पाऊस झाला दरम्यान या वादळीपावसाने निमखेडी बस स्थानकचा स्लॅब कोसळला आहे शनिवारी महसूल कडून घटनेचा पंचनामा करून संबंधित विभागाला अहवाल पाठविण्यात आला आहे.. 00000

 कापुस मोजणी करतांना झाड कोसळले…

शेतकरीसह पाच मजुर कीरकोळ जखमी… वरठाण शिवारातील घटना   सोयगाव;-. कापुस वेचणी करुन एका निबांच्या झाडाखाली कापसाची मोजणी करीत असतांना अचानकपणे झाड कोसळुन त्या खाली शेतमालक व पाच मजुर दबल्याची घटना वरठाण शिवारात शुक्रवार सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नसुन पाचही जणांना  मार लागलेला आहे. वरठाण येथील अशोक धनसिंग सोळंके गट.न १०७  मध्ये शुक्रवारी महीला व पुरुष जवळपास वीस मजुर कीलो प्रमाणे कापूस वेचणी चे काम करीत होते दीवसभर कापुस वेचणी करुन झाल्यावर सायंकाळी पाच सुमारास अचानक वादळीवारा सुटला यावेळी कापुस पावसात ओला होऊ नये यासाठी सर्व गोण्यातील कापूस निबांच्या झाडाखाली आणुन मोजणीचे काम करीत असताना आलेल्या वादळामुळे अचानकपणे निबांचे झाड कोसळले कसे बसे मजुर त्या ठीकाणाहुन पळाले पण यावेळी शेतकरी अशोक सोळंके,मजुर, दीलीप खंडाळे,अजय सुर्यवंशी, शाहरुख तडवी,अनिसा शेख,जया सोनवणे असे झाडाच्या फाद्यांत दबले क्षणाचा विलंभ न करता काही मजुरांनी त्यांना बाहेर काढले जर वेळीच मजुर झाडाखालुन पळाले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती म्हणून देव तारी त्याला कोण मारी असे उद्गागार यावेळी मजुरांचे निघत होते दरम्यान ह्या घटनेत शेतकरीसह पाचही मजुरांना  मार लागलेला आहे.

 अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता आयटी ॲप्लिकेशन्सचे प्रशिक्षण संपन्न

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समिती सभागृहात FST/SST/VST/ VVT व कंट्रोल रुममधील अधिकारी- कर्मचाऱ्यांना CVIGIL App व ESMS App चे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी आदर्श आचारसंहितेबाबत क्षेत्रीय स्तरावर काम करणारे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे यांनी आयटी ॲप्लिकेशन्स विषयी मार्गदर्शन केले तसेच उपजिल्हाधिकारी सुकेशिनी कांबळे-पगारे व तहसिलदार सायली भगत यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

नगरसेविका नीला सोन्स यांनी माजी आमदार नरेंद्र मेहतांवर केले भ्रष्टाचाराचे आरोप

भाईंदर : जनहित की आवाज या माध्यमाद्वारे मिरा भायंदर महापालिकेतील महासभेत आलेल्या विषयांवर नगरसेविका नीला सोन्स आवाज उठवत आहेत. हा विषय लोकांच्या जिव्हाळ्याचा असून, यात न्याय मिळावा असं त्यांनी घेतलेल्या…

 मुलुंड मराठा मंडळात ‘आश्लेषा’ दिवाळी अंकाचा दिमाखदार प्रकाशन सोहळा संपन्न !

मुलुंड मराठा मंडळ या ज्ञाती संस्थेचे कार्य समाजाला दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी आहे – मेजर डॉ. आश्लेषा तावडे -केळकर   ठाणे : सुप्रसिध्द लेखक, संपादक अशोक राजाराम तावडे संपादित आश्लेषा या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा नुकताच १६ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमेच्या मंगल दिवशी मराठा मंडळ मुलुंड, मुंबई या संस्थेच्या चंद्रकांत गणपत देसाई सभागृहात मराठा मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी पुढे बोलताना मेजर डॉ. आश्लेषा तावडे – केळकर यानी मराठा मंडळाच्या कार्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करून आश्लेषा दिवाळी अंकाची जन्मकथा आणि पहिल्या अंकाच्या प्रकाशनाचा हृदयस्पर्शी आढावा घेतला. या अंकाचे संपादक अशोक तावडे यानी भारतीय लष्कर सेवेतून मेजर म्हणून निवृत्त झालेल्या आपल्या कर्तबगार कन्येचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करून आश्लेषा हे आपल्या कन्येचेच नाव या अंकाला ठेवण्याची आठवण सांगितली. मुलुंड मराठा मंडळाचे ज्येष्ठ सभासद अशोक तावडे  यांनी मराठा मंडळाच्या ४६ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून हा प्रकाशन सोहळा घडवून आणला. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष रमेश शिर्के यांच्याबरोबरच अशोक तावडे, मेजर डॉ. आश्लेषा तावडे-केळकर मंडळाचे उपाध्यक्ष अरुण चव्हाण, शिवाजी सावंत, कार्याध्यक्ष महेश चव्हाण, सरचिटणीस अजय खामकर, वाचनालय / अभ्यासिका विभाग प्रमुख मिनल सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या संदर्भात सुप्रसिध्द वृत्तपत्र पत्रलेखक सूर्यकांत भोसले, मंडळातील एक सेवाभावी सेवक सुंदरराज पिल्ले यांच्याबरोबरच मंडळाच्या कर्तबगार महिला कार्यकर्त्या माधुरी तळेकर, रश्मी राणे, ऐश्वर्या ब्रीद व मिनल सावंत यांचाही मेजर डॉ. आश्लेषा तावडे यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. 00000

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचे ११ दरवाजे पुन्हा उघडले!

ठाणे : जिल्ह्यातील महापालिकांसह उद्योग, कारखान्यांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण या आधी ९ ऑगस्टला भरले होते. तेव्हा उघडलेले स्वयंचलित दरवाजे पाणी कमी झाल्यामुळे बंद झाले होते. पण आज परतीच्या…

पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कायदा व सुव्यवस्था प्रशिक्षण संपन्न

 विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर ठाणे,दि.19(जिमाका):- प्रत्येक निवडणुकीत पोलीस दलाने नि:पक्षपातीपणे व निर्भयपणे काम केलेले आहे. लोकसभा निवडणुकांप्रमाणे येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होत असलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्येही सर्व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन नि:पक्षपातीपणे व जबाबदारीने काम करावे, असे मार्गदर्शन कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी केले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांच्या निर्देशाप्रमाणे आज जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे जिल्हास्तरीय पोलीस अधिकाऱ्यांचे “कायदा व सुव्यवस्था” या विषयाबाबतचे प्रशिक्षण पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त संजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नोडल अधिकारी, कायदा व सुव्यवस्था दीपक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षण वर्गास जिल्ह्यातील सर्व उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर पोलीस अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कोणत्याही निवडणुकांमध्ये पोलीस प्रशासनाची महत्वाची जबाबदारी असते. निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर नेमून दिलेल्या कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कर्मचारीसुद्धा तैनात असतात, त्यामुळे मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. निवडणुकीची ड्यूटी ही कायद्याचे पालन करुन डोळ्यात तेल घालून करणे आवश्यक आहे. मॉक ड्रिल्स कधी घ्यावेत याचेही नियोजन करणे गरजेचे आहे. निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर लागणाऱ्या मशीन्सची याची जबाबदारी देखील पोलीसांवर असते व ती आपण काटेकोरपण पार पाडत असतो, त्यामुळे या निवडणुकीतही आपण सर्वजण ती निश्चितपणे पार पडणार आहोत, असा विश्वासही कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला. निवडणूक कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याचीही दक्षता पोलिसांनी घेणे आवश्यक आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्याबाबतची माहिती आपल्या वरिष्ठांना कळवावी. तसेच मतदान केंद्रावर कोणतेही गैरव्यवहार होणार नाही, या दृष्टीने काम करावयाचे आहे, अशा सूचनाही यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. 00000