मालमत्ता कर संकलनात २०० कोटींचा टप्पा पार

 

नाशिक : महापालिकेने डिसेंबर अखेरपर्यंत मालमत्ता कर वसुलीत प्रथमच २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आजवरच्या इतिहासात नऊ महिन्यांत इतकी वसुली कधीही झालेली नाही. थकीत घरपट्टीच्या वसुलीसाठी महापालिकेने राबविलेल्या अभय योजनेतून ५० कोटींची वसुली झाली.
कर संकलन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या अखेरीस मालमत्ता कर वसुलीत नऊ महिन्यात पहिल्यांदा २०२ कोटींचा गप्पा गाठला गेला. २०२४-२५ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी २५० कोटींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात हे लक्ष्य तेवढेच होते. तेव्हा डिसेंबरअखेरपर्यंत १५२ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र आजवरचे सर्व विक्रम मोडून काढत वसुलीत लक्षणीय यश मिळाले.
शहरातील सहा विभागात साडेपाच लाखहून अधिक मालमत्ता आहेत. मालमत्ता कराच्या २७२ कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मध्यंतरी अभय योजना जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात थकबाकी एकरकमी भरणाऱ्यांना दंडातून ९५ टक्के माफी देण्यात आली. या योजनेतून ५० कोटींची वसुली झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एप्रिल ते डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत मालमत्ता करापोटी २०२ कोटींचे संकलन करण्यात आले. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत एकूण २०७ कोटींची वसुली झाली होती. गतवर्षी याच काळात संकलित झालेल्या रकमेच्या तुलनेत ही वसुली ५० कोटींनी अधिक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. चालू आर्थिक वर्ष संपुष्टात येण्यास तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे मालमत्ता कल संकलनाची आकडेवारी आणखी वाढणार आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *