देशातील पहिलाच प्रयोग दापोलीत; अद्ययावत लॅबची उभारणी

 

 

ठाणे : नियतीने केलेल्या अन्यायामुळे बोलता आणि कानाने ऐकता न येणार्‍या मुलांसाठी आज अनेक संस्था धडपडत आहेत. या मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे. शिकून हिच मुले स्वत:च्या पायावर उभी राहिली पाहिजेत म्हणून काही संस्था, व्यक्तींचे काम सुरू आहे. भारतातील पहिली कर्णबधीर मुलांसाठीची ‘ए.आय. आणि रोबोटिक्स’ लॅब स्थापन झाली आहे. दापोली येथील इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयातील 30 कर्णबधिर विद्यार्थी ए.आय. (कृत्रीम प्रज्ञा) आणि रोबोटिक्सचे धडे घेऊ लागले आहेत.
स्काय रोबोटिक्स पुणे यांच्या माध्यमातून भारतातील ही पहिली कर्णबधिर मुलांसाठीची लॅब निर्माण करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. स्काय रोबोट़िक्सचे संचालक अभिजीत सहस्त्रबुद्धे व कृष्णमूर्ती बुक्का यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. दापोली या ठिकाणी इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालयात तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना ही मोठी उपलब्धी झाली आहे. आज अनेक मोठ्या शाळांमध्ये देखील ए. आय. आणि रोबोटिक्सचे शिक्षण मिळत नाही. मात्र, या संस्थेने बोलता आणि ऐकता न येणार्‍या या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी हे शिक्षण सुरू केले आहे. त्यासाठी अद्ययावत लॅब तयार करण्यात आली असून आवश्यक संगणक, अभ्यासक्रमाचे सर्व साहित्य उपलब्ध केले आहे. या शाळेतील शिक्षिका श्रद्धा गोविलकर या विद्यार्थ्यांना ए.आय. आणि रोबोटिक्सचे धडे देत आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम शिकविण्यासाठी स्वत: पुणे येथे जाऊन प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ए.आय. व रोबोटिक्सचे धडे देत आहेत.
या कर्णबधिर विद्यालयात दहावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांमधील सर्जनशिलता, नवकल्पना आणि तांत्रिक कौशल्यांना वाव देण्यासाठी स्काय रोबोटिक्सने कर्णबधिर विद्यार्थ्यांना हे व्यासपीठ मिळवून दिले आहे. या मुलांना एकविसाव्या शतकातील कौशल्यांच्या विकासासाठी प्रेरित करावे, त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन व्हावे या हेतूने या ठिकाणी ही सुविधा मोफत देण्यात आली आहे. येथील मूकबधिर विद्यार्थी आता ए.आय. व रोबोटिक्सचे धडे घेत असून त्यांनी कोडिंगचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे. या पुढच्या काळात अ‍ॅप डेव्हलपिंग, गेमिंग असे अभ्यासक्रम देखील त्यांना शिकविले जाणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नव्याने प्रकाश निर्माण होणार आहे.
दापोली येथील डॉ. गंगाधर विनायक काणे यांनी 1984 मध्ये स्नेहदीप संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेच्या अंतर्गत इंदिराबाई वामन बडे कर्णबधिर विद्यालय हे गेली अनेक वर्षे सुरू आहे. या विद्यालयातून आजपर्यंत 280 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन गेले आहेत.
कर्णबधिर असूनही यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी स्वत:चे उद्योग व स्वयंरोजगार सुरू केला आहे. या विद्यालयात कर्णबधिरांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा अद्ययावत आहेत. साऊंड प्रूफ रूम, ऑडिओ मीटर, डॉक्टर स्पीच, समूह श्रवण यंत्र या शिवाय आता संगणक लॅब देखील अद्ययावत झाली आहे.
कोट
स्नेहदीप़ संस्थेच्या अध्यक्ष म्हणून स्मिता सुर्वे या कार्यरत आहेत तर कर्णबधिर विद्यालयाचे अध्यक्ष म्हणून दीपक हर्डीकर हे यशस्वीपणे काम करीत आहेत. नव्या ए.आय. व रोबोटिक्स लॅब संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या शाळेतील विद्यार्थी खरेतर नशिबवान आहेत. आज अनेक चांगल्या प्राथमिक, माध्यमिक आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेतदेखील ए.आय. आणि रोबोटिक्सची लॅब नाही. मात्र, आमच्या कर्णबधिर मुलांना हे शिक्षण घेण्याचे भाग्य मिळाले आहे. ही मुले सामान्य मुलांपेक्षा कुशाग्र बुद्धीमत्तेची असतात. त्यांना आता ए.आय. आणि रोबोटिक्सची आवड लागली आहे.
डॉ. दीपक हर्डीकर, दापोली
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *