साईराज स्पोर्टस्, आंबेवाडी, ज्ञानेश्र्वर, श्री गणेश यांची पुरुष द्वितीय श्रेणीच्या उपांत्यपूर्व फेरीत.
मुंबई : श्री साईराज स्पोर्टस्, आंबेवाडी मंडळ, ज्ञानेश्र्वर मंडळ, श्री गणेश क्लब यांनी मुंबई शहर कबड्डी असो.ने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष द्वितीय श्रेणीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या भव्य पटांगणावर सुरू असलेल्या पुरुषात आंबेवाडीने ५-५ चढायांच्या डावात वीर नेजाजीचा प्रतिकार ३३-३२ असा संपविला. पूर्वार्धात ११-१९ अशा पिछाडीवर पडलेल्या आंबेवाडीने पूर्ण डावात २७-२७ अशी बरोबरी साधली. त्यामुळे सामन्याचा निर्णय लावण्याकरीता प्रत्येक संघाला ५-५ चढाया देण्यात आल्या. त्यात आंबेवाडीने ६-५ अशी सरशी साधली. साहिल शेलार, भावेश वाघ यांनी आंबेवाडी कडून, तर आदित्य चव्हाण, विजय कदम वीर नेताजी कडून उत्कृष्ट खेळले.
साईराज स्पोर्टस् ने जिजामाता नगर सार्वजनिक गणेश मंडळाचा ३३-२२ असा पाडाव केला. विश्रांतीला ११-०६ अशी आघाडी घेणाऱ्या साईराजने नंतर देखील त्याच तडफेने खेळत आपला विजय साकारला. जिजामाताचा जयदास पायमोळी चमकला. ज्ञानेश्वर मंडळाने श्री गावदेवीला ४५-२८ असे नमवित आगेकूच केली. पूर्वार्धात २५-१० अशी आघाडी घेणाऱ्या ज्ञानेश्वरने उत्तरार्धात आपल जोश कायम ठेवत हा विजय साकारला. राहुल जुईकर, प्रणव कणेकर यांच्या चतुरस्त्र खेळाने ही किमया साधली. श्री गावदेवीचे विकास घाग, आदित्य शेलार बरे खेळले. श्री गणेश क्लबने अमेय बिरमोळे, श्रीकांत मोरे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर हिंदकेसरीचा ३०-१६ असा सहज पराभव केला. हिंद केसरीचा प्रणव वराडकरची लढत एकाकी ठरली. शिवनेरी मंडळाने जय खापरेंश्वरचा ३१-१२ असा, तर श्री साईनाथ मंडळाने बाल उत्कर्षला ३१-११ असे पराभूत करीत आगेकूच केली.
00000