कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ बाबत जगभरातली परिस्थिती अजूनही स्पष्ट नाही. ‘एआय’ जगाचा चेहरामोहरा बदलून टाकेल आणि कर्मचार्यांची गरज अर्धवट करेल असे फार पूर्वीपासून म्हटले जात आहे. भारतातही ‘एआय’ बद्दल अनेक चर्चा सुरू आहेत आणि असे म्हटले जाते की ते प्रामुख्याने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी गेमचेंजर ठरेल. या मुद्द्याशी संबंधित एक अहवाल समोर आला आहे. त्यावरून दिसून आले आहे की अनेक देशांमध्ये एआय हे नोकर्या कमी होण्यामागील खरे कारण असल्याचे सांगितले जात असले तरी भारतात काम करणार्या लोकांना याची जास्त भीती वाटते.
‘रँडस्टॅड वर्क मॉनिटर’ त्रैमासिक सर्वेक्षणानुसार भारतातील लोक अमेरिका, जर्मनी आणि ब्रिटनच्या तुलनेत ‘एआय’मुळे आपल्या नोकर्या कमी होतील, या भावनेने अधिक चिंतित आहेत. असे सांगण्यात आले आहे की देशात काम करणार्या ५० टक्के कर्मचार्यांना भीती आहे की एआय त्यांच्या नोकर्यांसाठी धोका बनू शकते. विकसित देशांमधील तीनपैकी एका कर्मचार्याच्या मनात ‘एआय’मुळे नोकरी जाण्याची भीती आहे. सर्वेक्षण मुख्यतः ‘बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग’ आणि ‘नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग’च्या कर्मचार्यांसाठी ‘एआय’ हे एक साधन बनत आहे, जे जलद आणि कमी खर्चात काम करू शकते. त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणार्या लोकांना त्यांच्या नोकर्या गमावण्याचा धोका आहे. याशिवाय ‘एआय’ तंत्रज्ञान विशेषतः भारतात झपाट्याने स्वीकारले जात आहे. दहापैकी सात लोक ‘एआय’ ला धोका मानतात.
‘रँडस्टॅड वर्क मॉनिटर’तर्फे एकूण १६०६ लोकांशी चर्चा करण्यात आली आणि त्यापैकी ५५ टक्के पुरुष तर ४५ टक्के महिला कर्मचारी होत्या. या सर्वेक्षणातून दिसून आले आहे की दहापैकी सात लोकांचा असा विश्वास आहे की ‘एआय’ त्यांच्या उद्योगासाठी आणि जॉब प्रोफाइलसाठी धोका बनू शकते. ‘चॅटजीपीटी’सारख्या साधनांबाबत सरकार सावध होत आहे. ‘चॅटजीपीटी’ आणि ‘बिंगचॅट’सारख्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांच्या वाढत्या प्रभावाबद्दल जगभरातील सरकारे सावध होत आहेत. अलीकडेच, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक गीता गोपीनाथ यांनीही ‘एआय’च्या जागतिक नोकर्यांवर होणार्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली होती.