ठाणे : नेताच जर चुकीचा असेल तर सगळी यंत्रणाच चुकीच्या मार्गाने जाते. हा माझा आजवरचा अनुभव आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये त्यांची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि हे मी त्यांनाही बोललो होतो, असा टोला मारत वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी नवी मुंबईतील कार्यक्रमात बोलताना माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
नवी मुंबई पोलिस आयुक्लयाच्यावतीने शहरात नशामुक्ती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाला. यावेळी अभिनेते जाॅन अब्राहम यांच्यासह पोलिस अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक हे बोलत होते. आमच्या जिल्ह्यात जो अधिकारी वर्ग आला आहे. प्रामुख्याने नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलींद भारंबे. हे सर्व देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेले अधिकारी योग्यच आहेत. त्याचा आम्हासह जनतेला सार्थ अभिमान आहे. नेताच जर चुकीचा असेल तर सगळी यंत्रणाच चुकीच्या मार्गाने जाते. हा माझा आजवरचा अनुभव आहे.
एकनाथ शिंदे यांच्या कालखंडामध्ये त्यांची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि हे मी त्यांनाही बोललो होतो. त्यावेळी त्यांची हतबलता नव्हती. परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सहन कराव्या लागतात. नजरेला चांगले दिसत नसतानाही त्याकडे दुर्लक्ष करावे लागते. परंतु ती परिस्थिती बदलली आहे. राज्याचे अर्थकारण, औद्योगिकरण, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात अग्रेसर कसा राहिल, असा निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी केला आहे. त्यांच्या भुमिकेला मंत्री मंडळ सहकाऱ्यांनी पाठींबा दिले आहे, असे नाईक म्हणाले. सगळेच शंभर टक्के तुमच्या इच्छेनुसार काम करतील, असे कधीच होणार नाही. परंतु असे लोक जर काही ठिकाणी असलीत तर, त्यांना नजरेत ठेवले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
कधीकधी काळाची गरज निर्माण होते आणि काळानुरुप काही गोष्टींची गरज भागविली जाते. भुतकाळात काही गोष्टी घडल्या तर, त्याला सर्वच जबाबदार लोक जबाबदार असतात असे नाही. परंतु त्या त्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी काही लोक हतबल असतात. परिसरात जे घडते, ते बघण्यापलीकडे हतबल असणाऱ्या लोकांच्या हातात काहीच नसते. सुदैवाने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जी वाटचाल सुरू झाली. ती पाच वर्षात परिणामाभिमुख महाराष्ट्र अशा स्वरुप प्राप्त करेल, असा दावाही त्यांनी केला. मंत्री मंडळातील गोष्टी सांगायच्या नाहीत अशी शपथ घेतलेली असते. परंतु काही गोष्टी सांगाव्या लागतात. पहिल्याच बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी कार्याची दिशा स्पष्ट केली. पारदर्शक जनताभुमिख कारभार करायचा. जनतेशी जवळीक निर्माण झाली पाहिजे. जनता दुखी असता कामा नये. त्याची रि शिंदे आणि अजित पवार यांनी ओढली. सर्वच मंत्री मंडळ घटकांना समजून चुकले की आपल्या चुकूनही चुक करायची नाही, असेही ते म्हणाले. काही गोष्टीमुळे शासनाचा कारभार कसा चालेल, कशी आर्थिक घडी पुढे जाईल, ही विवंचना अनेकांना पडली आहे. परंतु देवेंद्र फडणवीस हे अतिशय दुरदृष्टीचे नेते असल्यामुळे राज्याचे अर्थव्यवस्था आणि जनतेच्या अपेक्षा पुर्णत्वास जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.