मुंबई : मानव सेवा प्रतिष्ठान, कुर्ला शाखा यांच्यावतीने यंदा प्रथमच येत्या १८ जानेवारी रोजी कुर्ला (पश्चिम) येथील हनुमान मंदिराजवळील गांधी मैदानात १४ वर्षाखालील मुलांच्या मोफत आंतर शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रथम येणाऱ्या आठ शाळांनाच प्रवेश दिला जाईल. स्पर्धा साखळी आणि त्यानंतर बाद पद्धतीने घेण्यात येईल. प्रथम चार क्रमांक मिळवणाऱ्या संघांना आकर्षक चषक भेट देण्यात येतील. विजेत्या आणि उपविजेत्या संघांतील सर्व खेळाडूंना सुवर्ण, रौप्य पदकानी गौरविण्यात येईल. प्रत्येक सामन्यातील दोन्ही संघातील उत्कृष्ट खेळ करणाऱ्या खेळाडूंना विशेष पारितोषिके देण्यात येतील. मानव सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष विनायक शिंदे यांच्या अध्यक्षपदाखाली स्पर्धेसाठी विशेष संगठन समिती स्थापण्यात आली आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका १४ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंत घेण्यात येतील. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अविनाश महाडिक, क्रीडा शिक्षक, मोबाईल क्रमांक : ९००४७५४५०७ यावर संपर्क साधावा.