ठाणे : घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने अवजड वाहनांसाठी ठाणे शहराच्या हद्दीबाहेर नवीमुंबई, मीराभाईंदर आदी ठिकाणी जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्वंकष चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. तसेच मान्सूनच्या अनुषंगाने असलेली धोकादायक झाडे, झाडांच्या फांद्या छाटणे, नालेसफाई आदी कामे देखील लवकरात लवकर हाती घेण्यात येतील असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत नमूद केले.
घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या दालनात (14 जानेवारी) बैठक झाली. या बैठकीस घोडबंदर रोड येथील ‘जस्टीज फॉर घोडबंदर रोड’ फोरमचे प्रतिनिधी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, शहर अभियंता प्रशांत सोनग्रा यांच्यासह वाहतूक पोलीस, महापालिका, मेट्रो, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी वाहतूक विभागाच्या मदतीसाठी सध्या जे वॉर्डन उपलब्ध आहेत त्यात आणखी प्रशिक्षित १०० वॉर्डन तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करण्यात येईल. वाहतूक पोलीस आणि वॉर्डन यांच्यात समन्वय ठेवण्याच्या दृष्टीनेही नियोजन केले जाईल असेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
पावसाळ्यापूर्वी घोडबंदररोडवर करावयाच्या कामासंदर्भात आयुक्तांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेत धोकादायक झाडे तसेच वाढलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम जानेवारी अखेरपर्यत सुरू करण्यात येईल असे वृक्षप्राधिकरणाकडून सांगण्यात आले. तसेच घोडबंदर रोडवरील कचरा हा सकाळ संध्याकाळ अशा दोन सत्रात उचलला जात असला तरी अनेक ठिकाणी नागरिक कचरा टाकतात, अशा नागरिकांना दंड लावण्याची मागणी बैठकीस उपस्थित असलेल्या नागरिकांनी केली. जर दंड लावला तर नागरिक स्वच्छतेबाबत जागरुक होतील अशीही सूचना यावेळी करण्यात आली. तसेच येत्या काही दिवसात घोडबंदररोडवरील रस्त्यांची सफाई यांत्रिकी पध्दतीने करण्यात येणार असल्याचेही या बैठकीत उपायुक्त मनिष जोशी यांनी नमूद केले.
घोडबंदर रोडवर ज्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत ती कामे करत असताना तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक बंद करणे आवश्यक आहे, परंतु तसे होत नसल्याने रस्त्याचे काम नीट होत नाही व रस्ता उंच सखल होत असल्याबाबतचा मुद्दा नागरिकांनी उपस्थित केला. यावर रस्त्याचे काम झाल्यानंतर काही कालावधीसाठी वाहतूक बंद करता येईल किंवा कसे याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. दरवर्षी ज्या ठिकाणी खड्डे पडतात अशी ठिकाणे शोधून तेथे काँक्रिटीकरण करण्याबाबतही आयुक्तांनी सूचित केले. सद्य:स्थितीत सर्व्हिस रोडवर जी कामे सुरू आहेत ती सुरूवातीपासून शेवटपर्यत पूर्ण करावीत, कामात तारतम्य ठेवण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
लेन मार्किंग, दिशा दर्शक, डिव्हायडर, झेब्रा क्रॉसिंग, ज्या ठिकाणी रात्रीच्या वेळी जादा प्रकाशाची व्यवस्था हवी आहे तिथे ती सोय करण्यात येईल, असेही आयुक्त राव म्हणाले. रस्त्याच्या कडेला उभी असलेली बेवारस वाहने उभी असतात ती तात्काळ काढण्याबाबत आरटीओशी संपर्क साधण्यात येईल. घोडबंदर रोडवर लेन मार्किंग, झेब्रा क्राँसिग करण्यात आले आहे. परंतु धुळीमुळे ते झेंब्रा क्रॉसिंग खराब झाले असल्याने त्या ठिकाणी पुन्हा रंगाचे पट्टे करावेत असेही निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले. घोडबंदर रोडवरील किंबहुना महापालिका क्षेत्रातील आवश्यक कामे नियमितपणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही असेही आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.
00000
