कल्याण आणि भांडुप परिमंडलात पीएम सूर्यघर योजनेचा लाभ

 

कल्याण :प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत १३ हजार ८३१ जणांनी अर्ज केले आहेत. यातील २ हजार ४४८ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरु आहे अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते. तर शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे.
महावितरणतर्फे रुफटॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांना सोलर नेट मीटर मोफत देण्यात येत आहे. ग्राहक आणि सोलर रूफटॉप बसवणाऱ्या एजन्सींसाठी महावितरणने मीटर चाचणीची प्रक्रिया अतिशय सुलभ आणि जलद केलेली आहे. त्याचप्रमाणे १० किलोवॅटपर्यंत क्षमतेसाठी त्वरित स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे. या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते. पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांनी https://www.pmsuryaghar.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा असून सर्व सुविधा ऑनलाईन व पेपरलेस उपलब्ध आहेत.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *