‘चिंतामणी चषक – २०२५’ कबड्डी स्पर्धा
मुंबई : आकांक्षा क्रीडा, अमर क्रीडा, अंकुर स्पोर्टस्, नवोदित संघ यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आयोजित केलेल्या “७व्या चिंतामणी चषक” कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली, तर प्रथम श्रेणी पुरुष गटात हा मान सिध्दीप्रभा फाऊंडेशन, गुड मॉर्निंग स्पोर्टस्, गोलफादेवी सेवा, बंड्या मारुती मंडळ यांनी पटकाविला. मुंबई चिंचपोकळी येथील सदगुरू भालचंद्र महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या कुमार गटात आकांक्षा मंडळाने यश क्रीडा मंडळाचा ४४-२५ असा पाडाव केला. आकांक्षाच्या शंकर साळुंखे, आर्यन पाटील यांनी पहिल्या डावात आक्रमक चढाई पकडीचा खेळ करीत प्रतिस्पर्ध्यावर २ लोण देत २४-११ अशी भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात तोच झंझावात कायम ठेवत १९ गुणांच्या फरकाने सामना खिशात टाकला. यश मंडळाच्या सोहम खोत, श्रावण पवार यांनी दुसऱ्या डावात थोडाफार प्रतिकार केला.पण तो निष्फळ ठरला. काळाचौकीच्या अमर मंडळाने श्री स्वामी समर्थचा ७०-२७ असा धुव्वा उडविला. सुरुवातीपासून तुफानी खेळ करीत अमरने प्रतिस्पर्ध्यावर ३लोण देत विश्रांतीला ४२-२९ अशी आघाडी घेतली. या पिछाडीने नामोहरम झालेल्या स्वामी समर्थवर विश्रांतीनंतर आणखी २लोण देत अमरने गुणांची सत्तरी गाठली. रमेश वायरकर, दर्शन गुरव यांच्या तुफानी चढाया, त्यांना विघ्नेश झावरे, यश दिसले यांची मिळालेली भक्कम पकडीची साथ यामुळेच अमरने ही किमया साधली. श्री स्वामी समर्थचा विराज कोंजवरने एकाकी लढत दिली.
याच गटात अंकुर स्पोर्टस् ने ओम् ज्ञानदीप मंडळाचा प्रतिकार ५२-१४ असा सहज मोडून काढला. मध्यांतराला अंकुरने ३५-०७ अशी मोठी आघाडी घेतल्याने ओम् ज्ञानदीपने नंतर नांगी टाकली. आशिष बदड, दिपेश जोंधळे यांच्या नेत्रदीपक खेळाला अंकुरच्या विजयाचे श्रेय जाते. शेवटच्या सामन्यात नवोदित संघाने जय दत्तगुरु संघाला ५०-२६ असे पराभूत केले. पूर्वार्धापर्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात २०-१८ अशी नवोदित संघाकडे आघाडी होती. उत्तरार्धात मात्र नवोदितच्या अथर्व सुवर्णा, ऋषिकेश साळवी, रजत मुलांनी यांनी चौफेर खेळ करीत सामना एकतर्फी आपल्या बाजूने झुकविला. जय दत्तगुरुच्या आदित्य घोडेराव, नयन मोहिते यांना पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात दाखविता आला नाही. प्रथम श्रेणी पुरुषात गुड मॉर्निंग स्पोर्टस् ने चुरशीच्या लढतीत विकास मंडळाचे आव्हान ४०-३७ असे संपविले. विश्रांतीला २०-१४ अशी आघाडी घेणाऱ्या गुड मॉर्निंगला विश्रांतीनंतर विकासने विजया करीता चांगलेच झुंजविले. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. प्रफुल्ल कदम, साहिल राणे, तन्मय सावंत, शिवांग मगर गुड मॉर्निंग कडून, तर अवधूत शिंदे, अजित पाटील, विराज सिंग विकास कडून उत्कृष्ट खेळले.
याच गटात सिद्धीप्रभा फाऊंडेशनने श्रीराम क्रीडा विश्वस्तला ३९-३२ असे चकवित आगेकूच केली. पहिल्या डावात १६-१४ अशी सिद्धीप्रभाकडे आघाडी होती. मिलिंद पवार, ओमकार पवार, रविकांत सिद्धीप्रभाकडून, तर भावेश महाजन, सौरभ माळी श्रीराम कडून उत्तम खेळले. गोलाफादेवी सेवाने सुनील स्पोर्टस् चा २८-१९ असा पाडाव केला. धनंजय सरोज, विनम्र लाड, अनिकेत झाब्रे यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. सुनील स्पोर्टस् ला अजूनही परेश चव्हाणच्या खेळावर अवलंबून राहावे लागते. त्याला अमेय दळवीने बरी साथ दिली.शेवटच्या सामन्यात बंड्या मारुतीने यंग प्रभादेवीला ३०-१३ असे नमवित आगेकूच केली. पूर्वार्धात २२-०५ अशी आघाडी घेणाऱ्या बंड्या मारुतीने उत्तरार्धात सावध खेळ केला. ओमराज म्हसकर, शुभम चौगुले, गणेश सापते यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. यंग प्रभादेवीचा शिवकुमार पाटील बरा खेळला. अधिक माहितीकरिता प्रवीण राणे(सहसचिव) भ्रमणध्वनी क्रमांक ९७७३६६१२९३ यांच्याशी संपर्क साधावा.
०००