कल्याण : कल्याण शहर परिसरातील ई श्रम पोर्टल वरील नोंदणीकृत स्थलांतरित असंघटित कामगारांना शिधापत्रिका देण्यासाठी शासनाने आदेशित केल्याची माहिती कल्याण शिधावाटप नियंत्रण अधिकारी दत्तात्रय नागरे यांनी दिली आहे.

कामगारांकडे शिधापत्रिका नाहीत अशा कुटुंबीयांना शिधावाटप कार्यालयाकडून शिधापत्रिका नमुना अर्ज या अनुषंगाने वितरित केला जात असून शिधापत्रिका देण्याची विशेष मोहीम राबविण्यात आल्याने  असंघटित कामगारांनी या मोहिमेत सहभाग घेऊन अडचण निर्माण झाल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन शिधावाटप अधिकारी नागरे यांनी केले आहे.

कल्याण  शहरी भागातील शिधा वाटप कार्यालयाकडे शासनाने 15 हजार 209 कामगारांच्या नावाची यादी पाठविली आहे. त्यानुसार  यादीतील संबंधित कामगारांशी भ्रमणध्वनी करून संपर्क साधला गेला आहे. त्यापैकी 11 हजार 510 कामगारांकडे शिधापत्रिका असल्याचे आढळले आहेत. उर्वरित कामगारांनाही लवकरच शिधापत्रिका देण्याचा प्रयत्न येथे सुरू आहे.

शहरातील जे कामगार ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत आहेत. अशांना डाक कार्यालयामार्फत शिधापत्रिकेसाठी अर्ज पाठविले होते. मात्र संबंधितांनी शिधावाटप कार्यालयाशी संपर्क साधला नाही. कल्याण शिधावाटप कार्यालयाशी कामगारांनी संपर्क साधून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन शिधावाटप अधिकारी दत्तात्रय नागरे यांनी कामगार वर्गाला केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *