Month: March 2026

 बेतवडे ग्रामस्थांचा बिल्डरविरोधात संताप

बेतवडे ग्रामस्थांचा बिल्डरविरोधात संताप करारातील त्रुटी, RERA नोंदणीचा अभाव; २८ मार्चला मोर्चा कल्याण: दिवा-बेतवडे परिसरात एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाविरोधात ग्रामस्थांचा संताप उसळला असून, करारातील त्रुटी, विकास कामांबाबतची अनिश्चितता आणि जबरदस्तीने जमीन हस्तगत केल्याचे आरोप समोर आले आहेत. गाव समितीला डावलून व्यवहार केल्याचा आरोप करत स्थानिकांनी “ही सरळ फसवणूक” असल्याचे म्हटले आहे. ग्रामस्थांच्या बैठकीत अनेक गंभीर मुद्दे पुढे आले. करारामध्ये विकास कामांची सुरुवात कधी होणार, याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे वकील तृप्ती पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच संबंधित प्रकल्पाची RERA नोंदणी नसल्याचा आरोपही करण्यात आला. “करार व्यवस्थित नसल्याने पुढे मोठे नुकसान होऊ शकते,” असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपस्थितांनी सांगितले की, न्यायालयीन स्थगिती (स्टे) असतानाही बांधकाम सुरू असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे तातडीने न्यायालयात जाऊन स्थगिती आदेश मिळवण्याची आणि कायदेशीर लढा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. पोलीस आयुक्तालयाकडे निवेदन देण्याचा निर्णयही घेण्यात आला असून, “खोटे गुन्हे दाखल करू नका, कायद्याच्या चौकटीत राहूनच लढा द्या,” असे पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले. लोकप्रतिनिधींनीही या प्रकरणात भूमिका मांडली. आमदार राजेश मोरे यांनी फोनद्वारे “ग्रामस्थ जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा देऊ,” असे स्पष्ट केले. नगरसेवक दिपक जाधव यांनीही “ठरलेल्या कालावधीत मोबदला मिळालेला नाही,” असे सांगत ग्रामस्थांना पाठिंबा जाहीर केला. ब्रह्म पाटील यांनी “या प्रश्नात राजकारण आणू नये,” असे मत व्यक्त केले. ग्रामस्थ नेते संतोष केणे यांनी “वाद घालण्यात अर्थ नाही, एकजूट ठेवून कायदेशीर मार्गाने लढा देणे गरजेचे आहे,” असे सांगितले. रमाकांत मढवी आणि काळू कोमासकर यांनीही बिल्डरकडून विश्वासघात व फसवणुकीचे आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर २८ मार्च रोजी मुंब्रा येथे मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “आंदोलन योग्य ठिकाणी आणि कायदेशीर चौकटीतच होईल, मात्र गरज पडल्यास आक्रमक भूमिकाही घ्यावी लागेल,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला. बिल्डरविरोधात “फसवणूक” दर्शवणारे फलक लावण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, विविध गावांमधील ग्रामस्थ आणि संघटनांनी या लढ्याला पाठिंबा दर्शवला असून, आगरी सेनेनेही समर्थन जाहीर केले आहे. “गावपण टिकवण्यासाठी आणि हक्कांसाठी न्यायालयीन तसेच रस्त्यावरची लढाई एकत्रितपणे लढू,” असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

पनवेल महानगर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत शेडगे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान अशोक गायकवाड रायगड- नागोठणे : पनवेल येथील गेली अनेक वर्षे पत्रकारितेमध्ये लेखणीच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय देण्याबरोबरच विविध सामाजिक विषय मार्गी लावणारे पनवेल महानगर प्रेस क्लब चे अध्यक्ष पत्रकार प्रशांत शेडगे यांना नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचा मानाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते प्रदान करून सन्मानित करण्यात आले. नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचा १४ वा वर्धापन दिन मोठया उत्सवात साजरा करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार लोकनेते सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याच बरोबर नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोशियनचे अध्यक्ष अँड.महेश पवार, संस्थापक श्यामकांत नेरपगार, सचिव अनिल पवार व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.पत्रकार प्रशांत शेडगे गेली २० वर्षे पत्रकारितेत सक्रिय असून त्यांनी आता पर्यंत अनेक नामांकित वृतपत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.यामुळे पत्रकार शेडगे यांना पनवेल गौरव पुरस्कार,पनवेल भूषण पुरस्कार,महाराष्ट्र एक्सेलन्स अवार्ड बरोबरच अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यात आणखीन उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याने समाजातील सर्व स्थरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 000000000000

 एकविरा देवी यात्रेसाठी टोलमाफी करण्याची मागणी

एकविरा देवी यात्रेसाठी टोलमाफी करण्याची मागणी विजय देशेकर यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र कल्याण :  २५ व २६ मार्च रोजी लोणावळा येथील कार्लेगडावर एकविरा देवीची यात्रा पार पडणार असून या यात्रेसाठी लाखो भक्त येत असतात. यात्रेसाठी येणाऱ्या एकविरा भक्तांना टोलमाफी करण्याची मागणी टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा एकविरा भक्त विजय देशेकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून केली आहे. लोणावळा परिसरातील एकविरा देवी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक २५ व २६ मार्च रोजी मोठ्या उत्साहात जत्रा व धार्मिक उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी आगरी-कोळी समाजासह लाखो भाविक कुटुंबासह दर्शनासाठी उपस्थित राहतात. अनेक भक्तांनी घेतलेले नवस फेडण्यासाठीही याच दिवशी विशेष गर्दी होत असते. एकविरा आई ही कोळी-आगरी समाजाची आराध्य देवता असून, हा उत्सव समाजासाठी अत्यंत भावनिक व श्रद्धेचा विषय आहे. रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर आदी जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात भाविक स्वतःच्या वाहनांनी येत असतात. त्यामुळे संबंधित मार्गांवरील टोल नाक्यांवर मोठा आर्थिक भार सामान्य भक्तांवर पडतो. शासन विविध सण-उत्सवांच्या काळात भाविकांच्या सोयीसाठी टोलमाफीसारखे सकारात्मक निर्णय घेत असते. त्याच धर्तीवर, दिनांक २५ व २६ मार्च २०२६ रोजी एकविरा आईच्या जत्रेनिमित्त संबंधित मार्गांवरील टोलमाफी जाहीर करण्यात यावी. या निर्णयामुळे लाखो भाविकांना दिलासा मिळेल आणि शासनाविषयी अधिक आत्मीयता निर्माण होईल. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने योग्य तो निर्णय घेण्याची मागणी विजय देशेकर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

कर्जत स्टेशनवर गुटखा तस्करीचा पर्दाफाश उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

अशोक गायकवाड कर्जत : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) कर्जत यांनी अवैध गुटखा व पान मसाला वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून सुमारे ₹ २,००,७१५/- किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी सकाळी कर्जत रेल्वे स्थानकावर करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे हे शनिवारी सकाळी सात ते दुपारी तीन या वेळेत ड्युटीवर होते. यावेळी ट्रेन क्रमांक २२९४४ डाउन इंदौर–दौंड एक्सप्रेस कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सकाळी ७:१२ वाजता दाखल झाली. ट्रेनची नियमित तपासणी सुरू असताना एस-२ डब्यातून दोन व्यक्ती मोठ्या ४ ते ५ बॅगांसह संशयास्पद हालचाली करत उतरताना दिसले. संशय आल्याने त्यांची चौकशी करण्यात आली, मात्र त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यानंतर दोघांना आरपीएफ कर्जत येथे आणण्यात आले. उपनिरीक्षक प्रतिभा साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे गोलू कुमार राजेंद्र कुमार (वय २३, रा. कामोठे, पनवेल), अंकुश कुमार हरी कुमार (वय २१, रा. कामोठे, पनवेल) अशी सांगितली. त्यानंतर त्यांच्या पाच बॅगांची तपासणी केली असता त्यामध्ये विविध प्रकारचा गुटखा, पान मसाला व तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. यामध्ये विमल, राजश्री, रजनीगंधा, तुलसी जर्दा, व्ही -१ तंबाखू आदी ब्रँडचा समावेश असून एकूण ₹२,००,७१५/- किंमतीचा माल जप्त करण्यात आला. सदर मुद्देमाल पंचनामा करून आरपीएफच्या ताब्यात घेण्यात आला. तसेच आरोपींची कर्जत येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक प्रशांत शिंदे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार आरोपी व जप्त माल रेल्वे पोलीस (जीआरपी) कर्जत यांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी कर्जत रेल्वे पोलीस यांनी के.र.नं.३१/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस ) कलम १२३, २७५, २२३, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या कलम ३०(२)(ए) ५९, ३ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या कारवाईत आरपीएफचे कर्मचारी बाबुशा इंगोले व शेषराव खिल्लारे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

२7 गावांमध्ये चर्चा तर होणारच

२7 गावांमध्ये चर्चा तर होणारच क्लस्टर योजनेविरोधात प्रत्येक गावात करणार जनजागृती कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांतील २७ गावांमध्ये क्लस्टर योजना राबविण्यात येणार असून या क्लस्टर योजनेला येथील नागरिकांनी विरोध केला आहे. याबाबत सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने एल्गार पुकारला असून चर्चा तर होणारच या कार्यक्रमाच्या माध्यमातून २७ गावांतील प्रत्येक गावांमध्ये क्लस्टर योजने विरोधात जनजागृती केली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून सोनारपाडा येथील साई बाबा मंदिरात जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या सभेत कशाप्रकारे क्लस्टर योजना २७ गावांवर लादून येथील भूमिपुत्रांना भूमिहीन करण्याचा डाव असल्याचे सांगण्यात आले. क्लस्टर योजना रद्द न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा संघर्ष समिती अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिला आहे. यावेळी समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे, सुमित वझे, रतन पाटील, रामचंद्र पाटील, मधुकर माळी, शिवाजी माळी, संदीप पालकरी, राहुल जाधव, विठ्ठल वायले, तुळशीराम पाटील, हरिश्चंद्र राणे, तकदीर काळन, नगरसेवक  महेश पाटील, जालिंदर पाटील, कैलास जोशी, निलेश खांबायत, माजी नगरसेवक  गणेश  भाने, संदीप माळी, संतोष केणे आदींसह सर्वच राजकीय पक्षांचे, इतर अनेक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. क्लस्टरमुळे पूर्ण गावंच्या गावं उध्वस्त होणार आहेत. याबाबत केडीएमसी आयुक्तांना निवेदने दिली, मोर्चा देखील काढला. त्याअनुषंगाने गावांमध्ये जनजागृती होण्यासाठी सभा लावली होती. जो पर्यंत २७ गावांची स्वतंत्र महानगरपालिका होत नाही तोपर्यंत क्लस्टरचे भूत आपोआप उडून जाईल. यासाठी आमची लढाई शेवटच्या टोकापर्यंत लढणार आणि आमचा विजय होणार असा विश्वास सत्यवान म्हात्रे यांनी व्यक्त केला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आपल्या मर्जीविरुद्ध २७ गावांना समाविष्ट केले आहे. याविरोधात सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समिती लढा देत आहे. या समितीच्या नेत्तृत्वात नुकतेच केडीएमसी मुख्यालयावर आंदोलन करण्यात आले. यामध्ये क्लस्टर आणि कर या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावर सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वांसह बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. क्लस्टर योजनेबाबत माहिती देण्यासाठी २७ गावातील नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांना या सभेसाठी बोलविण्यात आले होते. २७ गावात क्लस्टर योजना नसल्याच्या अफवा पसरविण्यात येत होत्या मात्र क्लस्टर योजनेचे शासन परिपत्रक आणि नकाशे नागरिकांना दिले असून या अफवा पसरवीणार्यांना उत्तर जनताच देणार आहे. या सभेबाबत चर्चा तर होणारच अशी जाहिरातबाजी २७ गावांमध्ये करण्यात आली होती. चर्चा तर होणारच हा संघर्ष समितीचा नवा अध्याय असून यामाध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार असल्याचे सुमित वझे यांनी सांगितले. तर क्लस्टर योजना हि झोपडपट्टी भागासाठी असते मात्र २७ गावांत सरसकट क्लस्टर योजना लादली  आहे. यामध्ये जबरदस्ती जागा अधिग्रहण केली जाणार असून या क्लस्टर योजनेला विरोध असून याबाबत महापालिकेत देखील विरोध केला जाणार असून, कायदेशीर लढाई लढू, वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून देखील लढाई लढण्याचा इशारा भाजपा नगरसेवक महेश पाटील यांनी दिला आहे.

महिलेचा जीव वाचवणाऱ्या धाडसी व्यक्तीचा सत्कार

कल्याण : कल्याण पश्चिम येथील काळातलाव परिसरात एका धाडसी व्यक्तीचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगात संत रोहिदास वाडा येथे राहणारे शैलेंद्र भोईर  यांनी पाण्यात बुडणाऱ्या…

आत्माराम मोरे स्मृती क्रिकेट स्पर्धेत आजपासून

१४ हॉस्पिटलमध्ये चुरस  मुंबई : आत्माराम मोरे प्रतिष्ठान आयोजित लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत ज्येष्ठ पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती चषक आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा जिंकण्यासाठी मुंबई शहर-उपनगर व ठाणे जिल्ह्यातील १४ नामवंत हॉस्पिटल क्रिकेट संघांमध्ये २३ मार्चपासून चुरस होईल. लीलावती हॉस्पिटल विरुध्द केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई आणि बॉम्बे हॉस्पिटल विरुध्द जे.जे. हॉस्पिटल यामधील उद्घाटनीय लढती क्रिकेटपटू प्रवीण तेजाळे व क्रीडाप्रेमी संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी पार्कमध्ये सोमवारी सकाळी ९.१५ वा. होणार आहेत. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेटमधील संघटक हिंदुजा हॉस्पिटलचे अधिकारी जॉय चक्रबर्ती यांचा विशेष गौरव होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे यांनी दिली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने होणाऱ्या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविण्यासाठी गतविजेता नानावटी हॉस्पिटल, उपविजेता ब्रीच कँडी हॉस्पिटल, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-अंधेरी, जे.जे. हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, के.ई.एम. हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, सोमैया हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, के.आय.एम.एस. हॉस्पिटल-ठाणे आदी रुग्णालयीन क्रिकेट संघ दावेदारीच्या रुबाबात अटीतटीच्या लढती देतील. एलआयसी सहप्रायोजित टॉप-१२ संघांना रोख पुरस्कारासह आकर्षक चषक असून सर्वोत्तम क्रिकेटपटू, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज तसेच प्रत्येक सामन्यामधील दोन्ही संघातील एका उत्कृष्ट खेळाडूला पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर निर्बंध

मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर निर्बंध जाळीच्या कंपाऊंडमुळे प्राण्यांचा अधिवास लुप्त होण्याच्या मार्गावर मुकुंद रांजाणे माथेरान : घनदाट वनराई अशी ख्याती असलेल्या माथेरान मध्ये पूर्वीपासून जंगलात मुक्या प्राण्यांचा वावर होता तो आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.परंतु सद्यस्थितीत येथील जुन्या बंगल्यांची विक्री होत गेल्याने नवीन मालकांनी बंगल्याच्या भोवती संपूर्ण भागात जाळीचे कंपाऊंड टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जंगल भागातील मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे साहजिकच आगामी काळात ह्या प्राण्यांच्या संख्येत घट होणार असून त्यांचा मुक्तसंचार लुप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने जवळपास ३६ एकरांवर असणाऱ्या या बंगल्याच्या सभोवताली जाळीचे कंपाऊंड करत असल्याने हे केलेले कंपाउंड योग्य नसून मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर गदा येत आहे यासाठी हे कंपाऊंड ताबडतोब काढून टाकण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अनेक दिवसांपासून केलेली असून विरोधी पक्षनेते सीताराम कुंभार यांनी सुध्दा याबाबत लेखी पत्रव्यवहार संबंधित विभागाकडे केलेला असताना देखील अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी एक दिवस या भागात येऊन हे कंपाऊंड काढायला हवे असा दिखावा केला होता परंतु काहीच योग्य कारवाई करण्यात आलेली नाही. वनखात्याचे वनपाल यांनीही या प्रकरणाकडे वरिष्ठांचा आदेश असतानाही हेतुपुरस्सर कानाडोळा केला असून निश्चितच यामागे मोठे अर्थकारण झाल्याचे संतोष शिंदे यांनी सांगितले. माथेरान स्थळासाठी वेगळी नियमावली असून जंगल भाग असल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासाकरिता कोणत्याही वास्तूला कंपाऊंड करता येत नाही.आम्ही लेखी निवेदने देऊनही नाममात्र चार ते पाच जाळ्या काढण्याचा दिखावा नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी केलेला आहे.बाकी सर्व जाळ्या आजही तशाच आहेत. वनखात्याचे अधिकारी सुध्दा मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांनाही आपल्या कर्तव्याची जाण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. संतोष शिंदे—उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथेरान

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे टी शर्ट अनावरण सोहळा संपन्न

मुंबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने राज्यातील खेळाडूंसाठी खास गणवेश म्हणून रंगीत टी शर्ट तयार केला असून त्याचे अनावरण आज सकाळी १०.३० वाजता पु. ल. देशपांडे ऑडिटोरियम, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी…

सुखटणकर सावित्री मोहन यांना राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत कास्य पदक

मंडगाव, गोवा येथे सुरू असलेल्या  ४८वी भारतीय मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन २0२५-२६ स्पर्धेत  ६५ वर्षावरील मिश्र दुहेरी गटात  दिलीप सुखटणकर व सावित्री मोहन यांना “” कास्य पदक “” मिळाले.  त्यांनी उपउपांत्य फेरीत मणके राम चौधरी…