राज्य अजिंक्यपद खुली बॅडमिंटन स्पर्धा
ऋषिकेश जोगळेकर, विनय पाटील, मृणाल पोद्दार चमकले!
मुंबई येथील पवई येथील आय आय टी येथील बॅडमिंटन कोर्टावर ३ एप्रिल ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या आवाहन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी करत तब्बल ५ सुवर्ण व ४ रौप्य पदकांसह एकूण ९ पदकांची कमाई केली. विविध गटांमध्ये ठाण्याच्या खेळाडूंनी केलेला दमदार खेळ, जिद्द आणि सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे संपूर्ण स्पर्धेत ठाण्याचा दबदबा पाहायला मिळाला.
ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडांगणातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल येथे सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेअंतर्गत चालणाऱ्या ठाणे बॅडमिंटन अकॅडमीतील खेळाडूंनी या स्पर्धेत आपली छाप उमटवत उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन केले. मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशिक्षक मयूर घाटणेकर, अक्षय देवलकर, मितेश हाजीरनिस, तसेच इतर सहाय्यक प्रशिक्षकांच्या सहकार्याने खेळाडूंनी ही यशस्वी कामगिरी साकारली.
पुरुष एकेरी गटात विनय पाटीलने उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. सुरुवातीच्या फेरीत शारविल तेंबुळकरला १५-३, १५-८ अशा सहज पराभूत केले. उपांत्यपूर्व फेरीत राफेल मस्कारेनहासला १५-१०, १५-७ अशा सरळ सेटमध्ये हरवले. उपांत्य फेरीत ऋतुराज चिपटविरुद्ध २१-१९, २१-१० असा प्रभावी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात माजी ठाणे अकॅडमीच्या वरिष्ठ खेळाडूविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
पुरुष दुहेरी गटात नव्याने तयार झालेल्या ऋषिकेश जोगळेकर व विनय पाटील या जोडीने सर्वांना आश्चर्यचकित करत सुवर्ण पदक पटकावले. १६ फेरीत अथर्व बागवे व प्रथमेश कांबळे यांना १५-६, १५-४ अशा सहज पराभूत करत सुरुवात केली. उपांत्यपूर्व फेरीत सोहम फाटक व तेजस प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध १०-१५, १५-१२, १५-१३ असा थरारक विजय मिळवला. उपांत्य फेरीत ठाणे अकॅडमीच्याच माजी वरिष्ठ खेळाडू कृष्ण देसाई व पार्थिव नायर या जोडीविरुद्ध १८-२१, २४-२२, २१-१८ अशा दीर्घ आणि उत्कंठावर्धक सामन्यात विजय मिळवत सर्वांना थक्क केले. अंतिम फेरीत आर्यन वर्मा व कृष्णा मजेठिया या जोडीवर २१-१८, २१-१६ असा विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले.
महिला दुहेरी गटात मृणाल पोतदार हिने आपल्या जोडीदारासह उत्कृष्ट खेळ करत सुवर्ण पदक जिंकले. अंतिम फेरीत ठाणे अकॅडमीच्या अनुभवी जोडी अनामिका सिंग व अनघा करंदीकर यांच्यावर २१-१९, १७-२१, २१-१६ अशा चुरशीच्या सामन्यात विजय मिळवत विजेतेपद पटकावले.
मिश्र दुहेरी गटात सर्वेश यादव व अनामिका सिंग या जोडीने सुवर्ण पदक जिंकत ठाण्याच्या यशात भर घातली. अंतिम फेरीत त्यांनी कडव्या प्रतिस्पर्ध्यांवर १७-२१, २१-१७, २१-१९ असा थरारक विजय मिळवत विजेतेपद मिळवले.
या यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, “या स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी दाखवलेली कामगिरी ही त्यांच्या सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि खेळावरील निष्ठेचे फलित आहे. विशेषतः नव्या जोड्यांनी दिलेली कामगिरी आशादायक आहे आणि भविष्यात ते मोठ्या स्तरावर नक्कीच चमकतील.”
ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा उपायुक्त मीनल पलांडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन करत सांगितले की, “ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे खेळाडू सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत ठाण्याचे नाव उंचावत आहेत. या यशामुळे इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळेल. सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.”
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *