वन मंत्री गणेश नाईक यांचे आश्वासन
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर काळू व शाई धरण उभारण्यातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयात जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली जाईल, असे आश्वासन राज्याचे वन मंत्री व ठाण्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी आज येथे दिले.
गडकरी रंगायतनमध्ये आयोजित केलेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी व भाजपचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी काळू व शाई धरणासाठी पुढाकार घेण्यासाठी निवेदन दिले. तसेच त्यांचे ठाणे शहरातील पाणीटंचाईकडे लक्ष वेधले.
ठाणे महापालिकेला स्वतंत्र धरण असावे, यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच या बैठकीला स्थानिक आमदार व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री गणेश नाईक यांनी दिले.
ठाणे महापालिकेसाठी स्वतंत्र धरणाची चर्चा सुमारे २००२ पासून सुरू आहे. मात्र, काळू व शाई ही दोन्ही विविध मुद्द्यांवरून रखडली. दोन्ही धरणांचे भूसंपादन पूर्ण झाले नसून, ग्रामस्थांकडून विरोधही केला जात आहे. यापूर्वी बारवी धरणाची उंची वाढविण्याच्या प्रश्नावेळी संबंधित प्रकल्पग्रस्तांना महानगरपालिका, नगरपालिका व तत्सम प्राधिकरणात नोकरी किंवा एकरकमी मोबदला असे पॅकेज देण्यात आले. त्याला प्रतिसाद मिळून हा प्रकल्प मार्गी लागला. त्याच धर्तीवर काळू व शाई प्रकल्पग्रस्तांना ठाण्यात ४०० ते ५०० चौरस फूटांची सदनिका किंवा एकरकमी पॅकेज असा पर्याय ठेवण्याबाबत विचार करावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
000000
