Month: April 2026

 १५ मेपूर्वी मान्सूनपूर्व कामे पूर्ण करा

आपत्ती आराखडा अद्ययावत करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी: आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काळ व प्रभावी मदत मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. सर्व संबंधित विभागांना मान्सूनपूर्व कामे १५ मेपूर्वी पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वय साधून सज्ज राहण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सुनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, पोलिस उपअधीक्षक श्वेता खाडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत तसेच महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, आरोग्य, वीज वितरण, ग्रामविकास, नगरपरिषद तसेच पोलीस विभाग यांचा सहभाग होता. प्रत्येक विभागाने आपापल्या तयारीचा आढावा सादर करताना संभाव्य अडचणी व उपाययोजना मांडल्या. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी धोकादायक झाडे व जीर्ण इमारतींचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. पूरप्रवण क्षेत्रांची अचूक नोंद करून तेथे विशेष दक्षता घेण्यास सांगितले. रस्ते व पुलांची दुरुस्ती वेळेत पूर्ण करून वाहतूक सुरळीत ठेवण्यावर भर देण्यात आला असून वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी आवश्यक साहित्यसाठा व मनुष्यबळ तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आरोग्य विभागाला संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसा औषधसाठा, वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपातळीवर आपत्ती व्यवस्थापन समित्या सक्रिय करून जनजागृती मोहीम राबविण्यावर विशेष भर देण्यात यावा,  मान्सून काळात उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला त्वरित प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे आदेश देताना, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा व प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले. उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दामिनी, सचेत आणि भूकंप या ॲप विषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, हे तीनही ॲप्स आपत्ती व्यवस्थापन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. दामिनी हे ॲप विजेच्या कडकडाट (Lightning) बाबत पूर्वसूचना देते. आपल्या परिसरात पुढील काही मिनिटांत वीज पडण्याची शक्यता असल्यास अलर्ट मिळतो. सचेत ॲपद्वारे पूर, चक्रीवादळ, भूकंप, त्सुनामी इत्यादी आपत्तींबाबत वेळेवर सूचना मिळते तर भूकंप हे ॲप भूकंपाच्या धक्क्यांची माहिती आणि अलर्ट मिळण्यासाठी वापरले जाते. तरी नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 भीम जयंती महोत्सवात रविवारी ‘ प्रबोधन महासभा ‘

नामवंत पत्रकार अशोक वानखेडे, दिवाकर शेजवळ, संविधानतज्ज्ञ ॲड. जयमंगल धनराज मार्गदर्शक नांदेड (२० एप्रिल २०२६) – नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरवादी लोक मंचातर्फे भारतीय संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव नांदेड शहरात येत्या रविवारी २६ एप्रिल २०२६ रोजी दणक्यात साजरा करण्यात येणार आहे.  त्यात संध्याकाळी ४ वाजता शंकरराव चव्हाण सभागृहात ‘ धर्मनिरपेक्ष भारताचे भवितव्य ‘ या विषयावर मराठवाड्यातील ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते सुरेशदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली  प्रबोधन महासभा ‘ आयोजित करण्यात आली आहे. खासदार रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रतापराव चिखलीकर हे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या महासभेत राजधानी दिल्लीतील नामवंत पत्रकार अशोक वानखेडे, मुंबईतील डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजचे माजी प्राचार्य, बहुजन समाज पार्टीचे मुंबई – कोकण क्षेत्राचे प्रभारी ॲड. जयमंगल धनराज, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ हे प्रमुख मार्गदर्शक आहेत, अशी माहिती आंबेडकरवादी लोक मंचाचे महासचिव देविदास मनोहरे आणि पी. एस गवळे यांनी  एका पत्रकाद्वारे दिली आहे. यंदाचे वर्ष हे महाडच्या चौदार तळ्यावरील समता संगराच्या शताब्दीचे आहे. तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्म द्विशताब्दीही राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवात यावर्षी दलित – बहुजन समाजात मोठा जोश आणि चैतन्य संचारले आहे, असे आंबेडकरवादी लोक मंचाचे  संस्थापक – अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.

 पी.आर. जॅग्वार्सने पटकावला टीडब्ल्यूपीएल चषक

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण  ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यातील पोलिस मैदान येथे आयोजित टीडब्ल्यूपीएल क्रिकेट स्पर्धेत पी.आर. जॅग्वार्सने व्ही.पी. पँथर्स संघाला पराभूत करत चषकावर नाव कोरले.  टीडब्ल्यूपीएलचा अंतिम सामना व्ही.पी. पँथर्स विरुद्ध पी.आर. जॅग्वार्स या दोन संघात रंगला. पी.आर. जॅग्वार्ससाठी प्रथम फलंदाजी करत ५ गडी बाद ६७ धावा केल्या. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना व्ही.पी. पँथर्स ने ५ गडी बाद ५९ धावा केल्या. पी.आर. जॅग्वार्स संघाने हा अंतिम सामना ८ धावांनी जिंकला. सामनावीर म्हणून विक्रम विश्वकर्मा (पी.आर. जॅग्वार्स) तर इंडिया आयकॉन मॅन ऑफ द सिरीज विवेक शेलार, ठाणे आयकॉन मॅन ऑफ द सिरीज जुगेश यादव यांचा सन्मान करण्यात आला. पारितोषिक वितरण समारंभाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या महिला संघटक मीनाक्षी शिंदे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक मंदार केणी, युवासेना कार्यकारिणी सदस्य अर्जुन डाभी, नितीन लांडगे, मिलिंद चव्हाण, किरण जाधव, नितेश पाटोळे, पी. आर. जग्वार्स संघाचे मालक रोहित पिंपळकर, प्रकाश कोटवानी, व्ही पी पँथर्स संघाचे मालक विशाल जाधव, ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुडजडे, उपाध्यक्ष अभिजित पवार यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर मंडळी उपस्थित होते.

बीपीसीएल, आयएसपीएल उपांत्यपूर्व फेरीत

 महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ, धर्मवीर, विवेक बाद फेरीत  चषक कबड्डी स्पर्धा मुंबई, दि. २0 (क्री.प्र.) क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांच्या संयोजनाखाली सुरु असलेल्या आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी पुरुषांच्या व्यावसायिक गटात भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), इन्शुअरकोट स्पोर्ट्स प्रा.लि. (आयएसपीएल), ठाणे महानगर पालिका, मीरा-भायंदर महानगर पालिका, मुंबई बंदर आणि संत सोपान काका बँकेने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. महिलांच्या गटात राजमाता जिजाऊ, धर्मवीर, स्वराज्य स्पोर्ट्स, शिवशक्ती आणि विवेक स्पोर्ट्स क्लबने गटविजेतेपद पटकावत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारलीे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त  विक्रोळी पूर्वेला टागोर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात उभारलेल्या क्रीडानगरीत दुसर्‍या दिवशी मॅटवरच्या कबड्डीचा अस्सल व्यावसायिक संघांचा थरार हजारो कबड्डीप्रेमींना याची देही अनुभवता आला. कालच प्रभादेवीत बाजी मारलेल्या बीपीसीएलने आज मैदानात उतरताच आधी रिझर्व्ह बँकेचे ३६-१८ असे डिपॉजिट जप्त करत खणखणीत विजय मिळवला. बीपीसीएलच्या मिलन दहिया आणि प्रसाद दिघोळेच्या खेळापुढे रिझर्व्ह बँकेचे काहीएक चालले नाही. या एकतर्फी विजयानंतर बीपीसीएलने ठाणे महानगर पालिकेविरुद्धचा संघर्ष १४-१३ अशा एका गुणाने जिंकत थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. ठाणे महानगर पालिकेने आपल्या दुसर्‍या सामन्यात रिझर्व्ह बँकेचा ४६-३४ असा धुव्वा उडवत अंतिम आठ संघात प्रवेश केला. बीपीसीएलपाठोपाठ आयएसपीएलने आपल्या दुसर्‍या सामन्यात संत सोपान काका बँकेला ३९-२४ असे नमवत अ गटाचे विजेतेपद पटकावून उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले, तसेच मुंबई पोस्टल आणि सीजीएसटी यांच्यातील अटीतटीचा सामना पोस्टलने १६-१५ असा जिंकला आणि इ गटातून बाद फेरीत धडक मारली. क गटात मिरा भायंदर पालिकेने मिडलाइन रायगडविरुद्धची साखळी लढत ३७-३६ अशी जिंकत बाद फेरी गाठली. युनियन बँक आणि मुंबई बंदर यांच्यातील सामना युनियन बँकेने १६-१४ असा जिंकत ड गटातून बाद फेरीत प्रवेश केला. महिलांच्या गटातही जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. पुण्याच्या राजमाता जिजाऊने आपले दोन्ही साखळी सामने सहज जिंकले. पहिल्या साखळी सामन्यात श्रीराम संघाचा ३५-१० असा फडशा पाडला तर दुसर्‍या सामन्यात भांडुपच्या स्नेहविकास मंडळाची ४०-६ अशी धुळधाण उडवली. या दोन्ही सामन्यात  महेश्वरी वाघ आणि निमिता पडवळ यांचा वेगवान खेळ पाहायला मिळाला. नंदूरबारच्या धर्मवीर कबड्डी संघाने डॉ. शिरोडकर क्लबचा ४६-२४ असा सहज पराभव केला. समृद्धी कोळेकर, हर्षदा सोनावणे, हर्षदा हंडोरे आणि ईश्वरी कोंढाळकर यांनी तुफानी चढाया-पकडींचा खेळ करत आपल्या संघाला मोठे विजय मिळवून दिले. मुंबईच्या शिवशक्ती महिला संघानेही स्वस्तिक आणि पतंगराव कदम संघाचा दारुण पराभव करत बाद फेरीत प्रवेश केला. विवेक स्पोर्ट्स क्लबनेही संजना पोळ आ्िण जीवा श्रीरंगन यांच्या खेळाच्या जोरावर दोन्ही साखळी लढती आरामात जिंकल्या.

 नारी शक्ती वंदन विधेयकावरील सभा तहकूबी महापौरांनी नाकारली

 ठाण्यात भाजपच्या नगरसेवकांचा संताप, भरत चव्हाण यांची तहकूबीची मागणी ठाणे: संसद व राज्याच्या विधानसभांमध्ये `नारी शक्ती वंदन अधिनियम’ विधेयक मंजूर न करणाऱ्या काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्थ ठाणे महापालिकेची महासभा दिवसभरासाठी तहकूब करण्याची भाजपचे नगरसेवक भरत चव्हाण यांची मागणी महापौर व प्रशासनाने नाकारल्यानंतर, उपमहापौर कृष्णा पाटील व गटनेते मुकेश मोकाशी यांच्यासह भाजपाच्या नगरसेवक-नगरसेविकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यापुढील महासभेत पुन्हा हा विषय मांडण्याचा भाजपने निर्धार केला असल्याचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी सांगितले. `नारी शक्ती वंदन अधिनियमा’ला विरोध करीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिलांच्या अधिकाराची भ्रूणहत्या केली. महिला आरक्षणाला विरोध करण्यातून विरोधी पक्षांचा खरा चेहरा समोर आला आहे, याकडे लक्ष वेधत नगरसेवक भरत चव्हाण यांनी महापौर व महापालिका सचिव यांना आजची महासभा काँग्रेससह विरोधी पक्षांच्या भूमिकेच्या निषेधार्ह दिवसभरासाठी तहकूब करावी, अशी मागणी केली. मात्र, या मागणीचे पत्र महापौर व महापालिका सचिवांकडून स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी सभागृहाबाहेर घोषणा देत निषेध केला. या आंदोलनात उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेविका नंदा पाटील, नम्रता कोळी, अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे, काजोल गुणिजन, उषा वाघ, वेदिका पाटील, माधुरी मेटांगे, अनिता भोईर यांच्यासह नगरसेविका सहभागी झाल्या होत्या. नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या माध्यमातून संसद व विधानसभेत महिलांना जादा प्रतिनिधीत्व मिळाले असते. मात्र, काँग्रेससह विरोधी पक्षांकडून विधेयक नामंजूर केले. देशातील ७० कोटींहून अधिक महिलांचा हा अपमान होता, असे भरत चव्हाण यांनी सांगितले. या विषयावर सभा तहकूबीची मागणी भरत चव्हाण यांनी केली होती. तर नगरसेविका नंदा पाटील यांनी अनुमोदन दिले होते.

कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन आढावा बैठक पात्रता पडताळणी करुन पुढील कार्यवाही

पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे निर्देश रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी पात्रतेच्या निकषांची पडताळणी करुन पुढील कार्यवाही करावी असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले. कुवारबाव ग्रामपंचायत सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, उपविभागीय अधिकारी जीवन देसाई, तहसिलदार राजाराम म्हात्रे, नगरपरिषद मुख्याधिकारी वैभव गारवे, नगरसेविका वर्षा ढेकणे, नगरसेवक बंड्या साळवी, पंचायत समिती उपसभापती गजानन धनावडे, जि.प.सदस्य प्रकाश रसाळ, कुवारबाव ग्रामपंचायत प्रशासक तळेकर आदी उपस्थित होते. गेली अनेक वर्षे कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबतची योजना रहिवाशांना समजावून सांगणे आवश्यक आहे. गरीब लोकांना घरे देवून त्यांची जीवनशैली सुधारण्यास यामुळे मदत होणार आहे. याकरिता पात्रता पडताळणी करणे आवश्यक आहे. याबाबतच्या शासन निर्णयाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पालकमंत्री सामंत यांनी उपस्थितांना केले. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकण्यासाठी, खेळण्यासाठी जागा, अंगणवाडी, बालवाडी एकाच आवारात उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यामुळे कुवारबाव झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात उत्तम प्रकल्प होणार आहे, असेही पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

पेटीएम आता भारतीय मालकी कंपनी

मुंबई / रमेश औताडे पेटीएम वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड जी एमएसएमई आणि मोठ्या उद्योगांना सेवा देणारी अग्रगण्य व्यापारी देयक सेवा कंपनी आता भारतीय मालकी कंपनी बनली आहे.  ३१ मार्च २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीसाठीच्या भागभांडवल रचनेनुसार, आता कंपनीच्या इक्विटी शेअर भांडवलापैकी ५०.३ टक्के हिस्सा देशांतर्गत गुंतवणूकदारांकडे आहे, ज्यामुळे भारतीय मालकी आणि नियंत्रणात बहुमत प्रस्थापित झाले आहे. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा सहभाग सातत्याने वाढत आहे. त्यांचे होल्डिंग कू ४ आर्थिक वर्ष २०२६  मध्ये २३.१ टक्के पर्यंत पोहोचले असून, मागील तिमाहीतील २०.३ टक्के आणि एक वर्षापूर्वीच्या १४.० टक्के च्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे. भारतीय म्युच्युअल फंडांकडे कंपनीतील १६.६ टक्के   हिस्सा असून, ४१ म्युच्युअल फंड हे भागधारक आहेत. स्थानिक विमा कंपन्यांनीही आपला हिस्सा वाढवून ५.१ टक्के केला आहे. ही कामगिरी पेटीएमच्या व्यवसायावर भारतीय गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास दर्शवते आणि देशभर मोबाईल देयके व वित्तीय सेवांचा विस्तार करण्यात कंपनीची भूमिका अधोरेखित करते. यासह, पेटीएम भारतासाठी काम करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देत आहे, ज्यामध्ये मालकी हळूहळू देशांतर्गत संस्था आणि गुंतवणूकदारांशी अधिक जुळत आहे. 00000000

 रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य निर्णयाविरोधात निषेध

मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्रातील लाखो ऑटोरिक्षा – टॅक्सी चालकांची उपजिवीका नष्ट करून त्यांचे कुटुंब उद्धवस्त करण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा डाव आम्ही आंदोलन करून हाणून पडणार असल्याचा इशारा कामगार नेते शशांक राव यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी ऑटो रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष मारुती कोंडे म्हणाले, परिवहन मंत्री यांनी या प्रकरणी गांभीर्याने विचार करावा व हा निर्णय मागे घ्यावा. रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे कल्याण शहराध्यक्ष मोहन पाठारे म्हणाले, सरकारने परवाना देण्याअगोदर विचार केला पाहिजे होता. १ मे, २०२६ पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सीचालक निषेध आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्रात १५ वर्ष वास्तव्यास असलेल्यांनाच ऑटोरिक्षा टॅक्सीचे परवाने दिले जातात. परवाने देताना त्यांची पोलिस पडताळणी केली जाते व त्यानंतर ऑटोरिक्षा टॅक्सी चालकांना परवाने दिले जातात. राज्यात बेकायदेशीररीत्या परिवहन मंत्रालयाच्या कृपेने बाईक टॅक्सी सुरू आहे आणि या सेवेवर जाणिवपूर्वक कारवाई केली जात नाही.आता आम्ही रिक्षा-टॅक्सीचालकांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन २८ एप्रिल रोजी परिवहन मंत्री यांना देणार आहे. ४ मे, २०२६ पासून रोज शहरी व ग्रामीण भागांमध्ये प्रमुख ठिकाणी ऑटोरिक्षा टॅक्सी चालक निदर्शने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 नौपाड्यात नालेसफाईला सुरूवात

 ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते शुभारंभ ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका क्षेत्रात यंदा नौपाड्यात प्रथम नालेसफाईला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांच्या हस्ते नालेसफाईला आज सकाळी शुभारंभ करण्यात आला. यंदाच्या पावसाळ्यात नौपाडा परिसरात कोठेही पाणी साचू नये, याची काळजी घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही नगरसेवक संजय वाघुले यांनी दिली. ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी पाणी साचण्याची काही ठिकाणे आहेत. त्यात नौपाड्यातील काही ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचू नये, यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी काळजी घेण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यानुसार नाले सफाईसाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला जात होता. त्यामुळे यंदा शहरात पहिल्यांदा नौपाड्यात नालेसफाई सुरू झाली आहे. प्रभाग क्र. २१ मधील लोकमान्य सोसायटी नाला, सोपान सोसायटी ते एम. एच. हायस्कूल नाला, नाईकवाडी नाला, सर्व्हिस रोडवरील भोईर हॉटेल ते कोपरी ब्रिज चिखलपाडी, रेल्वेमार्गावरील आनंद ब्रिज ते ठाणे प्लॅटफॉर्म क्र. १ आणि एमटीएनएल ते चिखलवाडी येथील नाल्यांच्या सफाईला आज शुभारंभ करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले व शिवसेनेचे माजी नगरसेवक भास्कर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

– जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

 चिखलातून वाट काढत विद्यार्थ्यांची ये जा कल्याण : केडीएमसीच्या अ प्रभाग क्षेत्रातील आंबिवली स्टेशन नजीक असणाऱ्या वाल्मिकी शाळा रस्त्यावर जलवाहिनी बाधित झाल्याने लाखो लीटर पाणी वाया जात असून, विद्यार्थ्यांना चिखलातून पाण्यातून वाट काढीत शाळेत ये जा करावी लागत आहे. समन्वय अभावामुळे गेली चार दिवसापासून प्रशासन भिंजत घोगंडे कारभार समोरा येत असून प्रशासन कधी समस्या मार्गी लावणार अशी मागणी यानिमित्ताने होत आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे आंबिवली स्टेशन नजीक वाल्मीकी शाळा रस्ता परिसरात गेल्या तीन चार दिवसा पासून लाखो लीटर पाणी वाया जात आहे. अमृत अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामात जुनी लाईन बाधित झाल्याने लिकेज मुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून समन्वय अभावामुळे समस्या मार्गी लागत नसल्याचे चित्र दिसत आहे. या संदर्भात माजी नगरसेवक दशरथ तरे यांनी अ प्रभागाचे पाणी खात्याचे उप अभियंता उदय सूर्यवंशी यांना संपर्क साधला असता त्यांनी अमृत अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असून ती जबाबदारी त्यांची असल्याचे सांगत, अंग काढले. तर या कामामुळे, जुनी लाईन बाधित झाल्याने लिकेजमुळे लाखो लीटर पाणी वाया जात असून रस्त्यालगत चिखलाचे साम्राज्य झाले असून लिकेजमुळे पाणी वाल्मिकी शाळेच्या मैदान रस्त्यावर साचत असल्याने या साचलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना ये जा करण्याचा प्रसंग उद्भवला असून हा प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात मागणी जोर धरू पाहत आहे. अ प्रभाग पा.पु. उप अभियंता उदय सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला लिकेज दुरुस्ती काम सोमवारी करण्यात आले असून रस्ता दुरूस्ती संदर्भात अमृत विभागाशी संपर्क केला आहे. अमृत प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता शैलेष कुलकर्णी यांच्याशी रस्ता दुरूस्ती संदर्भात संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.