Month: April 2026

वाहन चालक मालकांच्या अन्यायाविरोधात आंदोलनाचा इशारा

मुंबई / रमेश औताडे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागामध्ये हप्ते वसुलीबाबतचा मोठा भ्रष्टाचार तसेच वाहन चालक मालक यांची आर्थिक लूट, वाहन चालकांवर होणाऱ्या अन्याय त्वरित बंद करावा अशी मागणी ऑल इंडिया चालक मालक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा कामगार नेते रमेश समुखराव यांनी केली. सरकारने आमच्या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार केला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. राज्यातील सर्व जिल्हयामध्ये आर. टी. ओ. अधिकारी ओव्हरलोडच्या नावाखाली वाहन चालक मालकांकडून प्रती महिना सर्रास हप्ते वसुली करीत असतात. आर.टी. ओ. कार्यालयामध्ये वाहन चालक व मालकांची गाडी पासिंग व ड्रायव्हर लायसन्स रिनिव्ह करण्याच्या नावाखाली आर्थिक लूट होत आहे. राज्यातील सर्व चेक पोस्ट वर वाहन पेपर तपासणीच्या नावाखाली वाहन चालक व मालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट केली जाते. राज्यामध्ये वाहन चालक एन्ट्री देत नाही म्हणून वाहन चालकास गंभीर मारहाण केली जाते. गाडी मालक व वाहन चालक यांनी आर.टी.ओ. अधिकारी किंवा वाहतुक पोलिस यांना एन्ट्री नाही दिली तर अक्षरशा पैसे न दिल्यामुळे रागाच्या भरात गाडीला आग लावले जाते अशा अनेक घटना घडत आहेत. असे प्रकार राज्यामध्ये सोशल मिडीयावर आपण सर्व पहात आहोत. गाडी खाली असतानासुध्दा ऑनलाईन नाहक चलन टाकला जातो. राज्यातील शहरी भागामध्ये वाहतुक पोलिस शुल्लक कारणावरून वाहन चालकांकडून मोठया प्रमाणात पैसे वसुली करतात. राज्यातील सर्व राज्य महामार्गावर टोल नाक्याच्या माध्यमातून चुकीच्या पध्दतीने लुटमार चालू आहे असे डॉ एल एच पाडुळे यांनी सांगितले. राज्यातील सर्व टोलनाके बंद करून नवीन धोरण तयार करणे. वाहन चालकांच्या अपघाती मृत्यु पश्यात त्याच्या परिवारास मदत म्हणून तात्काळ १० लाख रुपयाची तरतूद करण्यात यावी व त्या परिवारातील एक सदस्य सरकारी सेवेत रुजू करावे. राज्यातील सर्व महामार्गावर प्रती १०० किलोमीटर अंतरावर वाहन चालकांसाठी स्वतंत्र विश्रांती गृह बनवावे. महाराष्ट्र राज्य सरकारने वाहन चालक अभ्यास आयोग गठीत करावा. अशी मागणी त्यांनी केली.

कोकणातील आंबा-काजू बागायतदार शेतकरी १५ मे ला ‘वर्षा’वर धडकणार!

राजू शेट्टी यांचे प्रतिपादन रत्नागिरी (प्रतिनिधी )– कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना मागणी केल्याप्रमाणे येत्या १५ मे पर्यंत  नुकसान भरपाई न मिळाल्यास हजारो शेतकरी आणि बागायतदार मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.  बालाजी  मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी एल्गार मेळाव्यात शेट्टी  बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  ‘उबाठा’ सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने,जिल्हाप्रमुख दत्ता कदम, बाबा साळवी,नेहा माने आदी  अनेक नेते उपस्थित होते. कोकणातील आंबा -काजू उत्पादक शेतकरी आणि बागायतदार निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.असे असताना सरकारकडून जाहीर झालेली मदत ही शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारी आहे आणि म्हणूनच आता ‘वर्षा’वर धडक दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्याल नुकसान भरपाई म्हणून प्रति झाड २५० रुपये देणे ही क्रूर थट्टा आहे. त्यांना प्रति झाड पाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या मागणीवर भर देऊन, प्रत्यक्षात मागितलेली मदत मिळेपर्यंत हा लढा चालूच राहील असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. कोकणच्या हापूसला जागतिक स्तरावर ‘जीआय’ टॅग मिळाला असला तरी हवामान बदलाच्या संकटामुळे हापूसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मागील दोन- तीन वर्षापासून सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे बागायतदारांचा उत्पादन खर्चही प्रचंड वाढला असून हा खर्च भरून निघणे अवघड झाले आहे. तेव्हा शेतकरी -बागायतदारांनी आता जागे व्हावे आणि १५, मे च्या या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मेळाव्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सरकारकडे पैसा आहे मात्र कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा  असलेल्या आंबा -काजू उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार  तिजोरी का उघडत नाही असा  सवाल करून १५, मे च्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यंदा उत्पादन अत्यल्प झाल्यामुळे शेतकरी- बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशावेळी खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावला आहे तो त्यांनी लावू नये अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला. वाशी मार्केट मधील दलाल आणि अडत्यांनी संगनमत करून दर पाडू नयेत जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतील अशी अपेक्षाही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

 धर्मांतराच्या संशयावरून बजरंग दलाच्या गुंडांची महिलांना मारहाण

घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारावरसुद्धा या गुंडांचा हल्ला मिरा -भाईंदर / अरविंद जोशी रविवारी अजय प्रताप यांच्या घरी प्रार्थना सभेसाठी सुमारे २०-२५ लोक जमले होते. दरम्यान, धर्मांतराचा आरोप करत बजरंग दलाचे काही गुंड घरात घुसले. बजरंग दलाच्या या सदस्यांनी घरात घुसून महिलांवर हल्ला केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या एका पत्रकारावर पोलीस ठाण्याबाहेर बजरंग दलाच्या गुंडांनी हल्ला केला, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे लोक नेहरू नगरमधील बबली यांच्या घरात जबरदस्तीने घुसले. घरातील महिलांवर हल्ला करून त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. नंतर काही लोकांना चौकशीसाठी भाईंदर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री सुमारे साडेआठ वाजता, घटनेचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकार केतन बरिया यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेर जमावाने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, ते घटनास्थळाचे चित्रीकरण करत असताना, आपण पत्रकार असल्याचे सांगूनही जमावाने त्यांना घेरले आणि मारहाण केली. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेले केतन बरिया म्हणाले, “मी पत्रकार आहे आणि माझे काम करत आहे, हे मी वारंवार सांगितले, पण कोणीही ऐकले नाही. त्यांनी मला घेरले आणि विनाकारण मारहाण करण्यास सुरुवात केली.” बरिया यांना जखमी अवस्थेत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी (टेंभा) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस ठाण्याजवळ पत्रकारावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार संघटना आणि वृत्तसंस्थांनी तीव्र निषेध केला आहे. त्यांनी या घटनेला पत्रकार स्वातंत्र्यावरील गंभीर हल्ला म्हटले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी धर्माच्या नावाखाली होणाऱ्या जमाव हिंसाचाराच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली असून, अशा घटनांमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे, असे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात अजूनही कोणाला अटक केलेली नाही.

पनवेलमध्ये लेन्सकार्टचा निषेध आणि आंदोलनाचा इशारा

पनवेल(प्रतिनिधी)-  लेन्सकार्ट  कंपनीच्या काही शाखांमध्ये कार्यरत हिंदू कर्मचाऱ्यांवर त्यांच्या धार्मिक आचरणांबाबत निर्बंध घातले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नवीन पनवेल युवा मोर्चा, भारतीय जनता पक्षाच्या वतीने कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, काही शाखांमध्ये हिंदू कर्मचाऱ्यांना कुंकू, टिळा, गंध लावण्यास तसेच हातावर धार्मिक दोरा धारण करण्यास मनाई करण्यात येत आहे. याशिवाय, काही ठिकाणी हिंदू सण साजरे करण्यावरही बंधने घालण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर असून तो भारताच्या संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन करणारा आहे. या संदर्भात नवीन पनवेल युवा मोर्चा भाजपाचे अध्यक्ष मयूर कदम यांनी पनवेल येथील लेन्सकार्ट व्यवस्थापनाला लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हंटले आहे कि, भारत हा विविध धर्मांचा देश असून प्रत्येक नागरिकाला आपल्या श्रद्धेनुसार व धार्मिक परंपरांनुसार आचरण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही कंपनीकडून विशिष्ट धर्माच्या कर्मचाऱ्यांवर निर्बंध घालणे हे अयोग्य व निषेधार्ह आहे. म्हणूनच, संबंधित प्रकार तात्काळ थांबवून कंपनीने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, याची हमी द्यावी. या संदर्भात कंपनीकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास नवीन पनवेल युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा लेन्सकार्ट व्यवस्थापनाला देण्यात आला आहे. यावेळी मयूर कदम यांच्या समवेत युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पालकांसाठी कार्यशाळा व प्रभाग क्र ६ व ९ येथे इंडोर गेम झोन सुरु करण्याचा माथेरान शिक्षण समितीने घेतला निर्णय

  मुकुंद रांजाणे (माथेरान) माथेरान नगरपरिषदे च्या शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण समितीची सभा सोमवारी नगरपालिकेच्या स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृहात आयोजित बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून  बुधवार दि २२ रोजी अंगणवाडी व माथेरान मधील तिन्ही शाळांच्या पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे. सुप्रसिद्ध मनसोपचार तज्ञ् प्राजक्ता गांगल या मार्गदर्शन करणार आहेत. मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका व मोबाईल पासून मुलांना कसे दूर ठेवता येईल. या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तरुणांमध्ये खेळाची आवड जोपासली जावी यासाठी प्रभाग क्र ६ व ९ येथे इंडोर गेम झोन सुरु करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे या मध्ये टेबल टेनिस, दोन कॅरम बोर्ड, बॅडमिंटन व बुद्धिबळ याचा समावेश असेल.  तसेच वीर हुतात्मा भाई कोतवाल शाळेच्या पत्र्यांना रंग लावणे कामाला देखील मंजुरी देण्यात आली. शिक्षण समितीचे सभापती सुनिल शिंदे, समिती सदस्य प्रतिभा घावरे, केतन रामाने व सुरेखा साळूंखे यांच्या सह नगरपरिषदेचे समीर दळवी यांनी सभेचे कामकाज पाहिले.

माथेरानमध्ये जंगलाला कुंपण, जबाबदार कोण?

जाळीच्या कंपाऊंडमुळे वन्यजीव अडचणीत; प्राणीमित्र संतप्त मुकुंद रांजाणे ( माथेरान ) माथेरानच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर डोंगरदऱ्यांनी  व्यापलेला असून घनदाट वनराई अशी ख्याती असलेल्या माथेरान मध्ये पूर्वीपासून जंगलात मुक्या प्राण्यांचा वावर होता तो आजही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.परंतु सद्यस्थितीत येथील जुन्या बंगल्यांची विक्री होत गेल्याने काही नवीन मालकांनी बंगल्याच्या भोवती संपूर्ण भागात जाळीचे कंपाऊंड टाकण्यास सुरुवात केल्यामुळे जंगल भागातील मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर निर्बंध आले आहेत. त्यामुळे साहजिकच आगामी काळात ह्या प्राण्यांच्या संख्येत घट होणार असून त्यांचा मुक्तसंचार लुप्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येथील एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने जवळपास ३६ एकरांवर असणाऱ्या या बंगल्याच्या सभोवताली जाळीचे कंपाऊंड करत असल्याने हे केलेले कंपाउंड योग्य नसून मुक्या प्राण्यांच्या मुक्तसंचारावर गदा येत आहे.या बंगल्याच्या जवळच मंकी पॉईंट आणि मॅलेट स्प्रिंग हे पाण्याचे स्त्रोत असल्याने याठिकाणी जंगली प्राणी आपली पाण्याची तहान भागवत असतात. परंतु येथील घनदाट जंगलात असणाऱ्या एल्फिन्स्टन बंगल्याच्या नवीन मालकाने बंगल्याच्या सभोवताली तारेचे कंपाउंड केल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासावर गदा आली आहे. यासाठी हे कंपाऊंड ताबडतोब काढून टाकण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी अनेक दिवसांपासून केलेली असून  याबाबत  लेखी पत्र व्यवहार संबंधित विभागाकडे केलेला असताना देखील अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी एक दिवस या भागात येऊन हे कंपाऊंड काढायला हवे असा दिखावा केला होता परंतु काहीच योग्य कारवाई करण्यात आलेली नाही. वनखात्याचे वनपाल यांनीही फक्त एक दिवस नाममात्र पाहणी केली होती.त्यानंतर याभागात कुणीही प्रशासकीय अधिकारी वर्ग फिरकलेले नाहीत त्यामुळे निश्चितच यामागे राजकीय वरदहस्ताने मोठे अर्थकारण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ———————————— माथेरान स्थळासाठी वेगळी नियमावली असून जंगल भाग असल्याने मुक्या प्राण्यांच्या अधिवासाकरिता कोणत्याही वास्तूला कंपाऊंड करता येत नाही.आम्ही लेखी निवेदने देऊनही नाममात्र चार ते पाच जाळ्या काढण्याचा दिखावा नगरपरिषदेच्या सहायक रचनाकार करुणा बांगर यांनी केलेला आहे.बाकी सर्व जाळ्या आजही तशाच आहेत. वनखात्याचे अधिकारी सुध्दा मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यांनाही आपल्या कर्तव्याची जाण नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. संतोष शिंदे—उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माथेरान

ड्रग्स प्रकरणानंतर टिटवाळ्यात सुरक्षेचा विषय गंभीर

 नागरिकांची पोलिसांकडे ठोस कारवाईची मागणी कल्याण : टिटवाळा परिसरात अलीकडे उघडकीस आलेल्या अमली पदार्थ (एम.डी.) प्रकरणामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी एकत्र येत टिटवाळा पोलीस ठाण्यात निवेदन देत तातडीने कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर राबवण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन सादर करताना ॲड. अविनाश शिळकंदे (उच्च न्यायालय वकील व उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना), दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके व रोहित जोशी उपस्थित होते. याआधी पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांना अटक करत मोठी कारवाई केली होती, ज्याचे नागरिकांनी स्वागत केले होते. मात्र त्यानंतर उघडकीस आलेल्या ड्रग्स रॅकेटमुळे परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, टिटवाळा परिसर झपाट्याने विकसित होत असून मोठ्या प्रमाणात नवीन रहिवासी येथे स्थायिक होत आहेत. मात्र भाडेकरू आणि नव्या रहिवाशांची पोलीस पडताळणी प्रभावीपणे होत नसल्याने संशयास्पद हालचालींना खतपाणी मिळत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने काटेकोर पडताळणी यंत्रणा राबवणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांनी पोलिसांकडे सखोल कोंबिंग ऑपरेशन राबवून ड्रग्स विक्री व पुरवठा साखळी मोडीत काढण्याची मागणी केली आहे. तसेच प्रत्येक भाडेकरूची अनिवार्य पोलीस पडताळणी, सोसायट्यांनी रहिवाशांची संपूर्ण माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक करणे, गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि नागरिक-पोलीस समन्वय वाढवणे या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. टिटवाळ्याचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेता सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ ठोस आणि प्रभावी कारवाई करून नागरिकांचा विश्वास परत मिळवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

वालधुनी नदीत केमिकलयुक्त पाणी सोडल्यामुळे गंभीर प्रदूषण

कल्याण : कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २ मधील भवानी नगर, अनुपम नगर, घोलप नगर, विधी परिसर, शिव अमृतधाम व योगीधाम या भागातील नागरिकांना गेल्या अनेक महिन्यांपासून तीव्र पर्यावरणीय समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीमध्ये काही औद्योगिक कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर केमिकलयुक्त दूषित पाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः रात्री ८ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे प्रकार घडत असून नदीचे स्वरूप नाल्यासारखे झाले आहे. या प्रदूषणामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे, वायू प्रदूषणात वाढ होत आहे. नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांना श्वसनाचे त्रास, डोकेदुखी, मळमळ अशा समस्या जाणवत आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना भवानी चौक शाखा, विभाग प्रमुख सतीश वायचळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले आहे. तसेच हे निवेदन केडीएमसी महापौर आणि आयुक्तांना देखील दिले आहे. नदीत सोडले जाणारे केमिकलयुक्त पाणी त्वरित थांबविणे, संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करणे, प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तपासणी करून अहवाल सादर करणे. हवा व पाण्याची गुणवत्ता नियमित तपासणे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे. याबाबत स्थानिक नागरिकांच्या वतीने प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, लवकरात लवकर ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 एनआरसीच्या थकबाकी करावरून केडीएमसी महासभेत गदारोळ

  एनआरसीचे नळ कनेक्शन कापले जाणार कल्याण : कल्याणच्या बंद पडलेल्या एनआरसी कंपनीच्या थकीत कराच्या वसुलीवरून सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात जोरदार वादावादी झाली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एनआरसीमधून कर वसूल होऊ शकला नाही आणि आता काही कोटींचा कर तीनशे कोटींहून अधिक झाल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. कराची थकबाकी असतानाही महापालिका प्रशासनाने एनआरसीचे नवीन पाणी कनेक्शन दिले आणि शिवाय एनआरसीचे भूखंड खरेदी करणाऱ्या लोकांना महापालिकेने ना हरकत पत्रेही दिली.  स्थानिक नगरसेविका उपेक्षा भोईर, स्थानिक नगरसेवक राहुल कोट, रोहन कोट यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करत सर्व बाजूंच्या नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवक राहूल कोट यांनी एनआरसी  कोट्यवधीची थकबाकी प्रकरणी प्रशासनाला पत्र देत, महासभेत उपसूचना मांडित एनआरसी थकबाकी प्रकरणी  विषय लावून धरला आहे. एनआरसीच्या मुद्द्यावरून नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची मागणी केली. जे सुरुवातीला महापौरांनी फेटाळले होते, नंतर चर्चेअंती एनआरसीला दिलेले नळ कनेक्शन तात्काळ खंडित करण्यात यावे आणि महापालिका प्रशासनाने दिलेल्या सर्व परवानग्याही रद्द कराव्यात, असा निर्णय घेण्यात आला. यासोबतच काही नगरसेवक आणि प्रशासनाची समिती स्थापन करावी.  ही समिती एनआरसीद्वारे महापालिकेविरुद्ध विविध न्यायालयात दाखल केलेल्या खटल्यांचा आढावा घेणार आहे. आणि थकीत कर वसूल करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणार.