नागरिकांची पोलिसांकडे ठोस कारवाईची मागणी
कल्याण : टिटवाळा परिसरात अलीकडे उघडकीस आलेल्या अमली पदार्थ (एम.डी.) प्रकरणामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता वाढली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर संतप्त नागरिकांनी एकत्र येत टिटवाळा पोलीस ठाण्यात निवेदन देत तातडीने कडक सुरक्षा उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या निवेदनाची दखल घेत योग्य त्या उपाययोजना लवकरात लवकर राबवण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन सादर करताना ॲड. अविनाश शिळकंदे (उच्च न्यायालय वकील व उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना), दिलीप राठोड, भाऊसाहेब घोडके व रोहित जोशी उपस्थित होते.
याआधी पोलिसांनी संशयित दहशतवाद्यांना अटक करत मोठी कारवाई केली होती, ज्याचे नागरिकांनी स्वागत केले होते. मात्र त्यानंतर उघडकीस आलेल्या ड्रग्स रॅकेटमुळे परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, टिटवाळा परिसर झपाट्याने विकसित होत असून मोठ्या प्रमाणात नवीन रहिवासी येथे स्थायिक होत आहेत. मात्र भाडेकरू आणि नव्या रहिवाशांची पोलीस पडताळणी प्रभावीपणे होत नसल्याने संशयास्पद हालचालींना खतपाणी मिळत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने काटेकोर पडताळणी यंत्रणा राबवणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी पोलिसांकडे सखोल कोंबिंग ऑपरेशन राबवून ड्रग्स विक्री व पुरवठा साखळी मोडीत काढण्याची मागणी केली आहे. तसेच प्रत्येक भाडेकरूची अनिवार्य पोलीस पडताळणी, सोसायट्यांनी रहिवाशांची संपूर्ण माहिती प्रशासनाला देणे बंधनकारक करणे, गुप्त माहिती यंत्रणा अधिक सक्षम करणे आणि नागरिक-पोलीस समन्वय वाढवणे या उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. टिटवाळ्याचा झपाट्याने होणारा विस्तार लक्षात घेता सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ ठोस आणि प्रभावी कारवाई करून नागरिकांचा विश्वास परत मिळवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
