Month: April 2026

जन्म-मृत्यूची १०० टक्के नोंदणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

ठाणे : जिल्ह्यामध्ये जन्म-मृत्यूच्या घटनांची १०० टक्के नोंदणी व्हावी आणि प्रत्येक नागरिकाला विहित वेळेत प्रमाणपत्र मिळावे, या उद्देशाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाची जन्म-मृत्यू नोंदणी व जीवनविषयक आकडेवारी संबंधी जिल्हास्तरीय समितीची महत्त्वाची आढावा बैठक आज संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जि.प. ठाण्याचे सहा.गटविकास अधिकारी पंडित राठोड, कल्याण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रशांत गजाकोस, सांख्यिकी अधिकारी सुप्रिया दरेकर, पं. स. भिवंडीचे सहा.गटविकास अधिकारी विनायक लोहकरे, पं. स. शहापूरचे सहा.गटविकास अधिकारी  सुदाम इंगळे, पं. स. अंबरनाथच्या सहा.गटविकास अधिकारी निता खोटरे उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने केंद्र शासनाने विकसित केलेल्या ‘Revamped CRS Portal’ या नवीन संगणक प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्यात आला असून, २४ जून २०२४ पासून ही सुधारित प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असून, मुलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी जन्माची नोंदणी अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार, कोणत्याही घटनेची माहिती प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधितांना विनामूल्य प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे निबंधकांवर बंधनकारक आहे. बैठकीत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च २०२6 या कालावधीत ठाणे जिल्ह्यात ९०.०५ टक्के जन्माच्या आणि ७४.०७ टक्के मृत्यूच्या नोंदी विहित वेळेत पूर्ण झाल्या आहेत. ग्रामीण भागातील उर्वरित नोंदींचा वेग वाढवण्यासाठी आणि शंभर टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा, तालुका आणि गाव स्तरावरील समित्यांनी आपापसात समन्वय ठेवून काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले. बैठकीत प्रलंबित आणि अवैध नोंदणीबाबतही कडक भूमिका घेण्यात आली. १ ऑक्टोबर २०२3 ते 3१ डिसेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अवैध नोंदी रद्द करण्याची प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सुरू असून, अशा नोंदी बाबत तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या नोंदी एक वर्षापेक्षा जास्त काळ प्रलंबित आहेत, त्यांच्यासाठी जिल्हा दंडाधिकारी किंवा उपजिल्हा दंडाधिकारी यांची परवानगी आवश्यक असल्याचे सांगत, जुन्या नोंदींचे डिजिटायझेशन करण्याच्या प्रक्रियेचाही आढावा घेण्यात आला. दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून मिळणाऱ्या माहितीबाबत काही त्रुटी आढळल्याने, संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना गांभीर्याने काम करण्याचे आदेश देण्यात आले असून, अहवाल वेळेवर न पाठवणाऱ्या विभागांवर पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हा निबंधकांनी दिले आहेत. या मोहिमेमुळे जिल्ह्यातील नागरी नोंदणी पद्धत अधिक पारदर्शक आणि गतिमान होईल.

सिव्हिल डिफेन्स प्रशिक्षण केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित नसून समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे

  आमदार संजय केळकर यांचे प्रतिपादन अनिल ठाणेकर ठाणे, महाराष्ट्र शासनाच्या सिव्हिल डिफेन्स कार्यालयर्फे आयोजित बेसिक प्रशिक्षण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आपत्कालीन अधिकारी वर्गाला मुख्य क्षेत्रस्थ नागरिक संरक्षण ठाणे तथा आपत्कालीन कार्यवाही केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम ठाणे पश्चिम येथील तीन हात नाका, एलबीएस मार्गावरील वाहतूक नियंत्रण शाखेच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ५ जून २०२४ ते ९ जून २०२४ या कालावधीत कल्याण येथील ब्राइट स्कूलमध्ये हा प्रशिक्षण कोर्स आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षणादरम्यान आपत्ती व्यवस्थापन, नागरिक संरक्षण तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या अधिकाऱ्यांना ‘सेकंड मार्शल’ श्रेणीतील प्रमाणपत्र देण्यात आले. हे प्रमाणपत्र ठाणे सिव्हिल डिफेन्स विभागामार्फत देण्यात आले असून उपनियंत्रक नागरिक संरक्षण ठाणे विजय बी. तावरे तसेच जिल्हाधिकारी तथा सिव्हिल डिफेन्स नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपनियंत्रक नागरिक संरक्षण ठाणे विजय बी. तावरे, सहायक उपनियंत्रक नागरी संरक्षण अनिल गावित, उपायुक्त क्षेत्रीय नागरी संरक्षण ठाणे कमलेश श्रीवास्तव, उपसंचालक क्षेत्रीय नागरी संरक्षण ठाणे हरिभाऊ शिंग पुरे, विभागीय क्षेत्रीय नागरी संरक्षण ठाणे डॉ. श्रीकांत पाटील, तसेच विविध विभागांतील समन्वयक आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोजकुमार पाटील यांनी केले. स्वागत व परिचय अनिल गावित यांनी करून दिला. आभार प्रदर्शनही अनिल गावित यांनीच केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सोनवणे यांनी केले. यावेळी आमदार संजय केळकर यांनी सांगितले की, सिव्हिल डिफेन्सचे प्रशिक्षण हे केवळ प्रमाणपत्रापुरते मर्यादित नसून समाजसेवेची मोठी जबाबदारी आहे. प्रशिक्षित स्वयंसेवक आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी मिळवलेले ज्ञान प्रत्यक्ष कार्यात उतरवणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. ठाणे शहरासारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता अत्यावश्यक असून सर्वांनी समाजाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहन त्यांनी केले. 0000000

‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’चे नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करा : सुराज्य अभियानाचा इशारा

कल्याण : रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शहरांचे ‘फुफ्फुस’ असलेल्या वृक्षांचा गळा घोटला जात असल्याचे गंभीर वास्तव ‘सुराज्य अभियाना’च्या राज्यव्यापी पाहणीत उघड झाले आहे. नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’ केली…

आयडियल मोफत कबड्डी स्पर्धात्मक शिबीरात ४० खेळाडूंचा सहभाग

  नवी मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे यंग स्पोर्ट्स क्लब-घाटकोपर सहकार्याने शालेय मुलांसाठी मोफत कबड्डी स्पर्धात्मक मार्गदर्शन शिबीर २७ एप्रिलपासून माणिकलाल मैदान-घाटकोपर येथे सुरु होत असून शालेय ४० खेळाडू सहभागी झाले आहेत. नवोदित खेळाडूंना तंत्रशुध्द कबड्डी खेळाची प्राथमिक ओळख करून देत दुखापतीच्या भयाचे निराकरण करण्याचा उद्देश देखील आहे. परिणामी कबड्डी खेळाकडे शालेय खेळाडूंमध्ये कबड्डी खेळाचा प्रसार आणखी अधिक जोमाने होईल. समता विद्या मंदिर, माणिकलाल म्युनिसिपल स्कूल, तुलीप हायस्कूल, अभ्युदय विद्यालय आदी शाळांमधील बहुतांश खेळाडूंच्या उत्स्फूर्त प्रतिसाद व सोयीच्या आग्रहास्तव घाटकोपर-पश्चिम येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रमात वॉर्म अप व कबड्डी कौशल्यावर भर देण्यासाठी अनुभवी कबड्डीपटू व मार्गदर्शक सुनील खोपकर आणि त्यांचे सहकारी सुशांत खळे व सक्षम म्हात्रे उत्सुक आहेत. दोन दिवसीय शिबिरामधील उत्कृष्ट शालेय ४ खेळाडूंना विशेष पुरस्कार देऊन माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते, कबड्डीप्रेमी विजय चव्हाण, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. ००००००००

 कुस्‍तीमहर्षी मामासाहेब मोहोळ, कसोटीपटू सदानंद मोहोळ यांच्‍या पुतळ्यांचे अनावरण

– क्रीडाक्षेत्रातील पितापुत्रांना मामासाहेब मोहोळ शैक्षणिक संस्‍थेची अनोखी मानवंदना पुणेः   स्वातंत्र्यसेनानी  व कुस्‍तीमहर्षी स्व. मामासाहेब मोहोळ व त्यांचे पुत्र कसोटीपटू स्व. सदानंद मोहोळ यांच्या अध्याकृती पुतळ्याचे अनावरण शनिवार २५ एप्रिलला पुण्याजवळील मुळशीत होणार आहे. क्रीडामहर्षी पितापुत्रांना मामासाहेब मोहोळ शैक्षणिक संस्‍थेकडून अनोखी मानवंदना एकत्रितपणे दिले जाणार आहे. नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठान पुणे व मामासाहेब मोहोळ विद्या विकास मंडळ संस्‍थेने या समारंभाचे आयोजन केले आहे. हा समारंभ २५ एप्रिलला सकाळी ११ वाजता मुळशीतील पिरंगुट येथील मामासाहेब मोहोळ संस्थेच्या आयटीआय सभागृहात  होणार आहे. स्वर्गीय मामासाहेब मोहोळ यांच्या पुतळ्याचे अनावरण जेष्ठ विचारवंत माजी आमदार उल्हास दादा पवार यांच्या तर स्व.सदानंद मोहोळ यांच्या पुतळ्याचे व सभागृहाचे अनावरण कसोटीपटू व भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांच्या शुभहस्ते होणार आहे. माजी खासदार अशोक मोहोळ, नानासाहेब नवले, बाळासाहेब गांजवे, दिलीप बराटे, संग्राम मोहोळ, कुणाल मोहोळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मामासाहेब व सदानंद मोहोळ यांचे कार्याचा आदर्श नवीन पिढीपुढे राहावा या उद्देशाने संस्थेने मामासाहेब मोहोळ यांचा पुतळा पिरंगुट येथील विद्यालयात बसविण्यात आला असल्याची माहिती नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक मोहोळ यांनी दिली आहे. चौकट सदानंद मोहोळांच्‍या स्‍मृती जागणार सदानंद नामदेव मोहोळ हे भारताचे  मध्यम-वेगवान गोलंदाज होते. ते १९६० ते १९७१ पर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या मोहोळ यांनी १९६७ मध्ये भारतीय संघासोबत इंग्लंडचा दौरा केला होता. मोहोळ रिव्हर्स स्विंग मध्ये कुशल होते. त्‍यांच्‍या पुतळ्याचे अनावरण चंदू बोर्डे यांच्‍या हस्‍ते होणार असल्‍याने त्‍यांच्‍या क्रिकेट कारकिर्दीला शनिवारी उजाळा मिळणार आहे.

आयएसपीएलकडून बीपीसीएलचा हिशेब चुकता

आमदार चषक कबड्डी स्पर्धा    नीरज मिसाळ ठरला सर्वोत्तम, मिलन दहिया चढाईवीर तर साईप्रसादला पकडपटूचा मान मुंबई : आयएसपीएलने (इन्शुअरकोट स्पोर्ट्स)चार दिवसांपूर्वी झालेल्या पराभवाच्या जखमेवर आमदार चषक स्पर्धेच्या जेतेपदाचे मलम लावण्याचा पराक्रम केला. प्रभादेवीतील अंतिम सामन्यात बीपीसीएलकडून झालेल्या पराभवाचा बदला घेत त्यांनी एका झटक्यात आपला हिशेबही चुकता केला. शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त क्रीडाप्रेमी आमदार सुनील राऊत यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत आयएसपीएल आणि बीपीसीएल यांच्यात झालेल्या जेतेपदाच्या संघर्षाने उपस्थित कबड्डीप्रेमींचे हृदयाचे ठोकेच चुकवले नाही तर हॉलीवूडच्या अ‍ॅक्शनपटाला साजेसा थरारक क्लायमॅक्स सादर केला. पाच-पाच चढायांच्या क्लायमॅक्समध्ये आयएसपीएलने बीपीसीएलवर ९-४ (४६-४१) अशी मात केली. हे आयसएपीएलचे हंगामातील चौथे जेतेपद ठरले आहे. विक्रोळी पूर्वला टागोर नगरातील डॉ. आंबेडकर उद्यानात उभारलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडानगरीत रंगलेल्या कबड्डी महोत्सवाचा शेवट रोमहर्षक झाला. एकीकडे शिवशक्तीने राजमाता जिजाऊचे आव्हान ३२-३० असे मोडीत काढल्यानंतर पुरुषांच्या व्यावसायिक गटात थराराने परमोच्च िंबदू गाठला. पराभवाच्या उंबरठ्यावर असलेल्या बीपीसीएलने १९-३३ अशा पिछाडीवर असताना शेवटच्या पाच मिनीटात डाव फिरवण्याची किमया साधली आणि सामना ३७-३७ असा बरोबरीत सोडवला. या बरोबरीनंतर बीपीसीएल सलग दुसर्‍यांदा आयएसपीएलकडून जेतेपद हिसकावणार असे वाटत होते, पण आयएसपीएलने शेवटच्या पाच मिनिटात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती पाच-पाच चढायांच्या डावात टाळली आणि ९-४ अशा फरकाने बाजी मारत बीपीसीएलविरुद्धचा हिशेब चुकता केला. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने एकतर्फी झाल्याने क्रीडाप्रेमी काहीसे निराश होते. त्यामुळे आयएसपीएल-बीपीसीएल यांच्यातील लढतीत सर्वांना थराराची मेजवानी अपेक्षित होती. पण नीरज मिसाळ आणि राकेश खटकर यांनी सुसाट खेळ करत आयएसपीएलला पहिल्या चार मिनीटातच १०-३ अशी जबरदस्त आघाडी मिळवून दिली. एवढेच नव्हे तर किशोर जाट, वैभव रबाडे यांनी अप्रतिम पकडी करत बीपीसीएलच्या चढाईबहाद्दरना रोखत सामन्यावर २१-१३ अशी पकड घट्ट केली. मध्यंतराला ८ गुणांची आघाडी घेत आयएसपीएलने जेतेपदाच्या दिशेने आपली घोडदौड सुरु केली होती. त्यामुळे उत्तरार्धात बीपीसीएलला आक्रमक खेळाची गरज होती आणि ती गरज मिलन दहियाने पूर्ण केली. त्याने आपल्या वेगवान आणि गुणकारी चढायांच्या जोरावर संघाला कमबॅक मिळवून देण्याचे प्रयत्न केले. तो एकटाच आयएसपीएलला भिडत होता. पण ते कमी पडत होते. अन्य खेळाडूंच्या सावध खेळामुळे बीपीसीएल सामना संपायला शेवटची काही मिनीटे शिल्लक असताना १९-३१ अशी पिछाडीवर होती. १२ गुणांच्या फरकामुळे बीपीसीएलने जवळजवळ सामना गमावला होता. पण तेव्हाच मिलन दहियाचे वादळ घोंगावले आणि त्याच्या चपळाईने बीपीसीएलला पुन्हा सामन्यात आणले. शेवटच्या पाच मिनीटात एकीकडे बीपीसीएल आणि मिलन प्रत्येक चढाईला गुण मिळवत आयएसपीएलच्या जवळ जात होते तर दुसरीकडे आयएसपीएलचे खेळाडू केवळ बचावात्मक खेळ करून वेळ काढत होते. त्यांच्या या घाबरट वृत्तीमुळे बीपीसीएलने अनपेक्षितपणे ३७-३७ अशी बरोबरी साधत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पूर्ण सामन्यावर आयएसपीएलचे वर्चस्व असतानाही सामना बरोबरीत सुटला. पण पाच-पाच चढायांच्या खेळात आयएसपीएलने जोरदार खेळ करत चढायाही केल्या आणि बीपीसीएलच्या चढाईवीरांनाही रोखत आणखी एका जेतेपदावर आपले नाव कोरले. आएसपीएलचे चौथे जेतेपद याआधी आयएसपीएलने राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या व्यावसायिक स्पर्धेत बाजी मारली होती. तसेच अमरावती येथील तिवसा येथे झालेल्या  अखिल भारतीय व्यावसायिक गटाच्या आमदार चषक आणि मग वाशिमच्या आमदार चषकात अजिंक्यपद पटकावले होते. या हॅटट्रिक जेतेपदानंतर त्यांना ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळाच्या स्पर्धेत त्यांच्या यशाची मालिका बीपीसीएलने मोडीत काढली  होती. नीरज मिसाळ बाईकवर स्वार अत्यंत संघर्षपूर्ण अंतिम सामन्यात आयएसपीएलसाठी झुंजार खेळ करणार्‍या नीरज मिसाळला त्याच्या वेगवान चढायांनी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवून दिला. त्याच्या या कर्तृत्वाबद्दल आमदार सुनील राऊत यांनी नीरजला लाखमोलाची बाईक भेट दिली. विजेता आयएसपीएल विजेत्याच्या चषकासह दोन लाख रुपयांचा मानकरी ठरला. उपविजेत्या बीपीसीएलला दीड लाखांचा पुरस्कार लाभला. उपांत्य पराभूत संघांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. बीपीसीएलचा मिलन दहिया सर्वोत्तम चढाईवीर ठरला तर सीजीएसटीच्या साईप्रसाद पाटीलने पकड पटूचा मान मिळवला. स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजक आमदार सुनील राऊत यांच्यासह माजी आमदार रमेश कोरगावकर, महिला विभागप्रमुख रश्मी पहुडकर, नगरसेवक दीपक सावंत, विश्वास शिंदे, म्युनिसिपल कामगार सेनेचे बाबा कदम, मुंबई उपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, कार्याध्यक्ष सुधाकर घाग, सचिव राजेश पडेलकर, उपाध्यक्ष सदानंद माजलकर, संयुक्त सचिव राजेंद्र अनभवणे , प्रसिद्ध कबड्डी निवेदक राणाप्रताप तिवारी यांच्या उपस्थितीत पार पडला.

गोदरेज इंडस्ट्रीजचा भविष्यातील प्रगतीशी मेळ

  मुंबई : गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपने आज आपले नवे ध्येय आणि नवी ब्रँड ओळख प्रस्तुत केली. ग्रुपच्या उत्क्रांतीमधील हा एक निर्णायक क्षण असून, यातून नवी ओळख, धोरण आणि महत्त्वाकांक्षा यांचा भविष्यातील प्रगतीशी मेळ घातला गेला आहे. असे गोदरेज इंडस्ट्रीज चे कार्यकारी संचालक तान्या दुबाश यांनी सांगितले. १२९ वर्षांचा प्रदीर्घ वारसा आणि नव्या स्वरूपातील आधुनिक ऊर्जेने प्रेरित ही ओळख, समूहाच्या कंज्यूमर प्रॉडक्ट्स, रिअल इस्टेट, फायनान्शिअल सर्व्हिसेस, ॲग्रीकल्चर आणि केमिकल्स अशा वैविध्यपूर्ण व्यवसायांमध्ये एक स्पष्ट धोरणात्मक ताळमेळ प्रस्थापित केला आहे. या ऐतिहासिक बदलाची घोषणा मुंबईतील ‘गोदरेज वन’ या समूहाच्या मुख्यालयात आयोजित मीडिया बैठकीत करण्यात आली. गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे नियुक्त अध्यक्ष, पिरोजशा गोदरेज म्हणाले, १८९७ पासून निरंतर निर्मिती, प्रत्येक येणाऱ्या उद्याची’ हे ब्रीदवाक्य आमचा हा विश्वास मूल्ये आणि परिणाम सदैव हातात हात घालून चालले असल्याने पुढील पाच वर्षांत एकूण मार्केट कॅपिटलायझेशन ५ लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. गोदरेज इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी, तान्या दुबाश म्हणाल्या, “ही नवी ब्रँड ओळख आम्ही कोण आहोत आणि आम्ही कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत याचे प्रतिबिंब आहे.

ब्रँड ॲम्बेस्टर बदलले… पण ‘लाल परी’ अजूनही रुग्णालयातच!

 रमेश औताडे मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) पुन्हा एकदा आकर्षक चेहरा पुढे करत अभिनेता रितेश देशमुख यांची ब्रँड ॲम्बेस्टर म्हणून नियुक्ती केली. मात्र, प्रत्यक्षात ‘ लाल परी ’ची अवस्था सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ब्रँड ॲम्बेस्टर बदलून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होत असताना, जमिनीवरची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. बसस्थानकांवर स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद, डेपो मधील पंखे बंद अवस्थेत, तसेच इंडिकेटरनुसार बस न लागल्याने प्रवाशांना बॅगा घेऊन धावपळ करावी लागत आहे. परिणामी प्रवाशांचा त्रास वाढत असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अधिकच कष्टदायक ठरत आहे. याशिवाय, वाढलेले अपघात, कंत्राटी पद्धतीने भरती केलेले वाहक चालक आणि कर्मचाऱ्यांवरील ताण यामुळे एस टी सेवेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सरकार विविध सवलतींचा गाजावाजा करत असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, याआधीही अनेक नामांकित ब्रँड ॲम्बेस्टर नेमले गेले, पण ‘लाल परी’ची स्थिती सुधारण्याऐवजी ती अधिकच ढासळत गेली. त्यामुळे “ब्रँड ॲम्बेस्टर की फक्त दिखावा?” असा सवाल आता सामान्य प्रवाशांकडून विचारला जात आहे. परिवहन विभागाने केवळ प्रतिमेवर नव्हे, तर प्रत्यक्ष सेवेच्या गुणवत्तेवर लक्ष देण्याची गरज आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेविषयी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांचे आवाहन

अशोक गायकवाड रायगड अलिबाग :सन २०२४-२५ या वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https://hmas.mahait.org, या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यानुसार सन २०२५-२६ या वर्षात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत ऑनलाईन सादर केलेल्या अर्जामधील काही अर्ज त्रुटी पुर्ततेकरीता परत पाठविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी अर्ज आपले लॉगिन आयडी तपासून त्यामध्ये दर्शविण्यांत आलेल्या त्रुटींची पूर्तता करुन येत्या ०७ दिवसांत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन फेर सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सुनिल जाधव यांनी केले आहे.