Month: April 2026

टेंबा रुग्णालयात प्रताप सरनाईक यांची धाड, १.६५ कोटींच्या एक्स्पायरी औषधांचा घोटाळा उघड

गोरगरिबांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश; संबंधितांवर गुन्हे दाखल होणार मीरा-भाईंदर : प्रताप सरनाईक यांनी भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी (टेंबा) रुग्णालय येथे अचानक पाहणी करत आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर बोट ठेवले. या…

सावंतवाडी शहर, आसपासच्या गावांना बसला पाऊस – वादळाचा तडाखा…!

सावंतवाडी(प्रतिनिधी)- सावंतवाडी शहर आणि आसपासच्या गावांना काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाचा जोरदार तडाखा बसला. वीजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या  पावसाने लोकांची झोप उडवून दिली. या भागात…

कामगार नेते राजन राजे यांचा सरकारी कर्मचारी संपामध्ये सभा घेऊन जाहीर पाठिबा

अनिल ठाणेकर ठाणे- देवेंद्र फडणवीस यांच्या ‘NDA’ सरकारकडून अनेकदा फसवणूक झाल्यामुळे, आज इथे तुम्ही प्रामुख्याने निवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्षे व्हावं व पूर्वीचीच निवृत्तिवेतन सुविधा मिळावी म्हणून, ‘राज्यव्यापी संप’ करत…

मेट्रो-५ विस्ताराला १८,१३० कोटींची मंजुरी; कल्याण–उल्हासनगर मार्गाला गती

उल्हासनगर–अंबरनाथ–बदलापूरपर्यंत विस्ताराचा मार्ग मोकळा कल्याण :मेट्रो-५ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या विस्तारित मार्गिकेसाठी तब्बल १८ हजार १३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे कल्याण ते उल्हासनगरदरम्यान मेट्रो सेवा लवकरच सुरू होण्याचा…

 खरीप हंगामात रासायनिक खताचे लिंकिंग होणार नाही याची दक्षता घ्या

 जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे निर्देश ठाणे- जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने विविध बाबींवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. खतांचे लिंकिंग होणार नाही याची दक्षता घेणे, घाऊक विक्री केंद्रांची नियमित तपासणी करणे, शेतकऱ्यांमध्ये विशिष्ट ब्रँडचा आग्रह निर्माण होऊ नये यासाठी प्रबोधन करणे, कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे, विक्री केंद्रांच्या खरेदी-विक्री नोंदी व साठ्याची पडताळणी करणे यावर भर देण्यात आला.तसेच बोगस खते, बियाणे व कीटकनाशकांच्या विक्रीवर कठोर कारवाई करावी, खतांच्या बेकायदेशीर वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे, तसेच खत पुरवठा सर्व भागांत समप्रमाणात होईल याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. खत वाहतुकीसाठी पुरेशा वाहनांची उपलब्धता ठेवण्याबाबतही आरसीएफ कंपनी व संबंधित पुरवठादारांना निर्देश देण्यात आले. जिल्हास्तरीय कृषि निविष्ठा संनियंत्रण समितीची सभा २२ एप्रिलला जिल्हाधिकारी, ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे संपन्न झाली. या सभेस समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सहअध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रामेश्वर पाचे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर, मोहीम अधिकारी महेश बनकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक बालाजी शिंदे, विस्तार अधिकारी (कृषि) बी. डी. जावीर, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक नितीन जाधव, राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्सचे उपव्यवस्थापक विकास कांबळे, ठाणे जिल्हा ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष समीर ठाकरे तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.सभेच्या प्रारंभी सदस्य सचिव मुनीर बाचोटीकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून सभेच्या कामकाजास सुरुवात केली. ठाणे जिल्ह्यात सध्या १७४ किरकोळ व २२ घाऊक खत विक्री केंद्र, १५६ बियाणे विक्री केंद्र तसेच १५२ कीटकनाशक विक्री केंद्र कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. रासायनिक खतांची विक्री ePOS मशीनद्वारे तसेच बियाण्यांची विक्री ‘साथी’ पोर्टलद्वारे केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यासाठी एकूण १८० ePOS मशीन प्राप्त झाली असून त्यापैकी १५४ खत विक्री केंद्रांना वितरित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ठाणे जिल्ह्यासाठी अनुदानित रासायनिक खतांचा पुरवठा आरसीएफ कंपनीमार्फत करण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२६ साठी जिल्ह्यास ११,५५० मेट्रिक टन खत साठा मंजूर झाला असून त्यामध्ये ९७०० मेट्रिक टन युरिया व १,५०० मेट्रिक टन सुफला खताचा समावेश आहे. याशिवाय ८५० मेट्रिक टन युरिया व १० मेट्रिक टन डीएपीचा संरक्षित साठाही मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २० गोदामांमध्ये एप्रिल अखेर ८० टक्के व १० मेपर्यंत १०० टक्के खत साठा पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सभेत सांगण्यात आले.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी माती परीक्षण अहवालानुसार शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा यासाठी गावागावांत शेतकरी मेळावे आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच खतांच्या वाहतुकीवर बारकाईने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार पोलीस विभागाची मदत घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.सभेच्या शेवटी मोहीम अधिकारी महेश बनकर यांनी उपस्थितांचे आभार मानून सभा संपन्न झाल्याचे जाहीर केले. ०००००००००००००००

– ‘मिशन भरारी’तून विद्यार्थ्यांचा इस्रो अभ्यासदौरा

 अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल-’रणजित यादव अनिल ठाणेकर ठाणे, ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन भरारी’ या अभिनव शैक्षणिक उपक्रमांतर्गत निवड झालेल्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या अभ्यासदौऱ्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. हा शुभेच्छा समारंभ २७ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन, ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे.मिशन भरारी’ हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवे दालन उघडणारा आहे. या अभ्यासदौऱ्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, संशोधन व आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार असून त्यांच्या आत्मविश्वासात निश्चितच वाढ होईल. सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक सहलीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, तुमची ही भरारी भविष्यात मोठ्या यशाकडे नेणारी ठरो,असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेला नवे क्षितिज मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ‘मिशन भरारी’ या उपक्रमाचे औपचारिक अनावरण प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून २६ जानेवारीला करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून जिल्हास्तरावर निवड झालेल्या ५९ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी २७ एप्रिल ते १ मे या कालावधीत देशातील नामांकित वैज्ञानिक केंद्रांना शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.हा अभ्यासदौरा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांचे मार्गदर्शनातून राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक /वैज्ञानिक संधी उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान आणि तंत्रज्ञान समजून घ्यावे, तसेच मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या अभ्यासदौऱ्याची आखणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाकडून सातत्याने अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले जात असून ‘मिशन भरारी’ हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे.या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी मिळणार असून तिरुअनंतपुरम व कन्याकुमारी येथील विविध वैज्ञानिक व ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे. विक्रम साराभाई अवकाश केंद्र, थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन, केरळ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्युझियम व प्रियदर्शिनी प्लॅनेटेरियम यांसारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. तसेच स्वामी विवेकानंद स्मारक, थिरुवल्लुवर पुतळा व इतर पर्यटन स्थळांनाही भेट दिली जाणार आहे.या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवणे, शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे तसेच विज्ञान व आधुनिक तंत्रज्ञानाबाबत जिज्ञासा निर्माण करणे हा आहे. विद्यार्थ्यांना वैज्ञानिक संशोधन, अवकाश विज्ञान व आधुनिक प्रयोगशाळांचा प्रत्यक्ष अनुभव मिळून त्यांच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीस नवी दिशा मिळणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली.या कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे तसेच विविध मान्यवर व अधिकारी-कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.‘मिशन भरारी’ अंतर्गत सन २०२५-२६ या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून एकूण ५९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात अंबरनाथ तालुक्यातून १६ विद्यार्थी (मराठी माध्यम १२ व उर्दू माध्यम ४), भिवंडी तालुक्यातून १२ विद्यार्थी (मराठी माध्यम ११ व उर्दू माध्यम १), कल्याण तालुक्यातून १० विद्यार्थी (सर्व मराठी माध्यम), मुरबाड तालुक्यातून १० विद्यार्थी (सर्व मराठी माध्यम) तसेच शहापूर तालुक्यातून ११ विद्यार्थी (सर्व मराठी माध्यम) यांचा समावेश आहे. एकूण निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ५४ विद्यार्थी मराठी माध्यमातील (२५ मुले व २९ मुली) तर ५ विद्यार्थी उर्दू माध्यमातील (२ मुले व ३ मुली) आहेत. अशा प्रकारे एकूण २७ मुले व ३२ मुलींचा समावेश असलेला ५९ विद्यार्थ्यांचा गट या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी सहभागी होणार आहे.

 माथेरान मधील वाढती वृक्षतोड पर्यावरणाला बाधा पोहचवणारी

नव्या वृक्ष लागवडीचे नियोजन हवे मुकुंद रांजणे (माथेरान) माथेरान घाटमाथ्यावर होणारी भरमसाठ वृक्षतोड आता माथेरानच्या मुळावर उठली असून यावर्षी माथेरानमध्ये गर्मीचा उच्चांकी नकोसा विक्रम नोंदला गेला त्यामुळे पुन्हा एकदा वृक्ष संवर्धन हा विषय व त्याचे गांभीर्य समोर आले असून माथेरान मध्ये पुन्हा एकदा वृक्ष लागवड व त्याचे संगोपन व्हावे व तो फक्त दिखावा न करता झाडे जगवण्याकरिता प्रयत्न झाला पाहिजे अशी चर्चा समोर येत आहे. माथेरान हे थंड हवेसाठी जगप्रसिद्ध मुंबई पुण्यापासूनचे जवळचे पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी थंड हवेचा आस्वाद घेण्याकरिता देश विदेशातून अनेक पर्यटक घेत असतात परंतु मागील काही वर्षापासून माथेरान मधील हवामानामध्ये कमालीचा बदल घडलेला असून कधी नव्हे ती जाणवणारी गर्मी माथेरान मध्ये आता शिरकाव करू लागली आहे, यावर्षी तर गर्मीचा उच्चांक झाला असेल प्रथमच येथील तापमान 4०अंश सेल्सिअस वर पोहोचले होते त्यामुळे माथेरान पर्यटन स्थळा करता ही धोक्याची घंटा असून स्थानिकांनी वेळेतच सावध झाले नाही तर येणाऱ्या काळात फक्त माथ्यावरील रान मधले रान निघून जाणार असून माथेच राहील अशी भीती व्यक्त केली जात आहे. माथेरानच्या चारी बाजूस असणाऱ्या अनेक वाड्यांमधून येथील डोंगर रांगांमध्ये असलेल्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असून ही कत्तल रोखण्यासाठी वन विभाग सपशेल अपयशी ठरलेला आहे माथेरान येथून नेरळ कडे जाणाऱ्या डोंगर रांगांना तर जंगलच शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती काही वर्षांमध्ये होणार आहे रोजच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून लाकडे जमा करणारी मंडळी घाटामध्ये दिसत असतात परंतु यावरती कारवाई होत नाही. माथेरान मध्ये नैसर्गिक आपत्तीतून अनेक झाडे उन्मळून पडली आहेत परंतु या झाडांना पर्यायी वृक्षारोपण करून जंगल वाढवण्याचे प्रयत्न अपयशी ठरलेला आहे वनविभाग दरवर्षी वृक्षारोपण करते परंतु यातील किती झाडे जगतात हा संशोधनाचा विषय आहे वृक्षारोपण करणे व त्याचे संवर्धन करणे यामध्ये मोठी तफावत माथेरानमध्ये पहावयास मिळत आहे या वेळेला नवीन वनसंवर्धन समिती होणार असून त्यांच्याकडून तरी यावेळी वृक्षारोपण हा फक्त प्रयोग न करता प्रत्यक्ष झाडे जगण्यावर भर देतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माथेरान मध्ये मोठ्या प्रमाणात करंज व इंग्लिश झाडे लावण्यात येतात त्याऐवजी येथील पर्यावरणाला जिवंत ठेवतील अशी झाडेच लावण्यात यावी जेणेकरून येथे पर्यावरण जिवंत राहील अशी मागणी आता स्थानिकांमधून होत आहे. ००००००००००

सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन

कल्याण- सार्वजनिक वाचनालय कल्याणच्यावतीने जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तक प्रदर्शन, तत्काळ सभासद योजना व एक कविता तळ्याकाठी या कार्यक्रमाचे आयोजन प्रबोधनकार ठाकरे सरोवर कल्याण (प) या ऐतिहासिक ठिकाणी करण्यात आले. कल्याण डोंबिवली महानगरपालिका उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याहस्ते पुस्तकगुढीचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. वाचन संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्याच्या उदेशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून तत्काळ सभासद योजनेत जास्तीत जास्त वाचकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांनी केले. वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी डिजिटल युगात ई – बुक्स व ऑडीओबुक्स उपलब्ध असले तरी हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद वेगळाचा असतो असे मत व्यक्त केले. प्रात: काळी फेरफटका मारण्याकरिता येणाऱ्या नागरिकांना विविध प्रकारचे ग्रंथ एकाच ठिकाणी पाहण्याची संधी मिळाली असल्याचे आनंद नागरिकांनी व्यक्त केला. वाचनालयाच्यावतीने सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जातात त्याच अनुषंगाने  सदर पुस्तक प्रदर्शनामुळे वाचनसंस्कृतीला चालना मिळेल असे मत वाचनालयाच्या वाचक सभासदांनी मांडले. “एक कविता तळ्याकाठी” या  उपक्रमांतर्गत तळ्याकाठच्या शांततेचा व निसर्गाच्या सौदर्याचा अनुभव घेत कवी मकरंद वांगणेकर, सुधाकर कांबळी, सिने नाट्य अभिनेता सुधाकर वसईकर, रंगकर्मी सुधीर चित्ते, स्वाती नातू, जया पाटील, संयुक्ता राठोड, मंगला कांकणे, सुरेखा गावंडे अशा अनेक रसिक मान्यवर कवींनी स्व कविता सादर केल्या. तत्काळ सभासद योजनेचा लाभ साहित्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर घेतला. प्रसंगी वाचनालयाचे अॅड. सुरेश पटवर्धन, वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, विजयसिंह परदेशी, बाळकृष्ण धुरी, प्रगती महाविद्यालयाच्या प्रा. मालती पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, वाचक, साहित्यप्रेमी व ग्रंथसेविका आदी उपस्थित होते. ०००००००००००

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसाठी रविवारी मतदान

 मतदारांना फोटो आयडी ओळखपत्र आवश्यक रत्नागिरी : (अशोक गायकवाड )—महाराष्ट्र वैद्यकीय परिषद मुंबईची निवडणूक रविवार २६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वा. या वेळेत होणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील शरीर रचना शास्त्र विभाग खोली क्र.१ आणि खोली क्र.२ अशी दोन मतदान केंद्रे आहे. मतदान केंद्रात मोबाईल, कॅमेरा, वायरलेस संच नेण्यास मनाई असून, मतदारांना ओळख पटविण्यासाठी खालील नमूद पुरविण्यापैकी कोणताही एक पुरावा मूळ प्रतीत फोटो आयडी प्रुफसह सादर करावा लागणार आहे, असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी कळविले आहे. निवडणुकीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात ५५६ मतदार आहेत. ही निवडणूक एकूण ६० उमेदवार लढवित असून, त्यापैकी ९ उमेदवारांच्या मतपत्रिकेतील नावासमोरील चौकटीत X करुन ९ उमेदवारांना मत देण्याचे आहे. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीर रचना शास्त्र विभाग, तळमजला खोली क्र.१ आणि खोली क्र.२ अशी दोन मतदार केंद्र स्थापित करण्यात आली आहेत. १ ल्या केंद्रात १ ते २८०, २८१ ते ५५६ मतदारांसाठी दुसरे मतदान केंद्र स्थापित करण्यात आलेले आहे. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये कर्तव्यार्थ नेमलेल्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींनी भ्रमणध्वनी, ताररहित फोन, वायरलेस संच, कॅमेरा इ. मतदान केंद्रात नेण्यास मनाई आहे. मतदारांना आपली ओळख पटविण्यासाठी पुढील पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा मूळ प्रतीत फोटो आयडी प्रुफसह सादर करावा लागणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र या नोंदणी प्रमाणपत्रावर छायाचित्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी अन्य छायाचित्र असलेले ओळखपत्र, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून देण्यात आलेले ओळखपत्र, भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी जी ओळखपत्रे ग्राह्य धरण्यास मान्यता दिलेली अशी छायाचित्रासह ओळखपत्रे खालीलप्रमाणे- मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक पोस्ट ऑफीसने जारी केलेले छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉपुलेशन रजिस्टर अंतर्गत स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र राज्य सरकार सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमीटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना, आमदारांना जारी करण्यात आलेले ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र. मतदारांनी वरीलप्रमाणे नमूद दस्तऐवजापैकी एक दस्तऐवजाची मूळ प्रत मतदानाच्या वेळी मतदान केंद्राध्यक्षांना सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या मतदारांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जिंदल यांनी केले आहे. ०००००००००

 रिक्षा- टॅक्सी चालकांसाठी मराठी बोलणे अनिवार्य करण्याच्या निर्णयाला भारतीय मराठाचा जाहीर पाठिंबा

महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेलाच प्राधान्य हवे  दिवा, दि. २4 एप्रिल (आरती परब) : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा व टॅक्सी परवानाधारक तसेच चालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य करण्याचा घेतलेला निर्णय आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या निर्णयाला भारतीय मराठा संघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला असून, मराठी भाषेच्या वापराबाबत कोणताही विरोध सहन केला जाणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे. संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात राहून आणि व्यवसाय करताना स्थानिक भाषा म्हणजेच मराठीचा आदर राखणे आवश्यक आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर करणे ही केवळ अपेक्षा नसून आता नियमाचा भाग बनत आहे. या निर्णयाच्या विरोधात कोणी आंदोलन किंवा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय मराठा संघ रस्त्यावर उतरून त्याला प्रतिकार करेल, असा ठाम इशाराही देण्यात आला आहे. “मराठी भाषेचा अपमान किंवा वापरास विरोध केल्यास त्याला योग्य उत्तर दिले जाईल,” असे संघटनेने स्पष्ट केले आहे. याशिवाय, महाराष्ट्रात उपजीविकेसाठी येणाऱ्यांनी स्थानिक संस्कृती आणि भाषेचा सन्मान राखावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. “पोट भरण्यासाठी आलात तर मर्यादेत रहा, अन्यथा येथे राहणे कठीण होईल,” अशा कठोर शब्दांत संघटनेने आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यात भाषाविषयक वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असले, तरी काहींकडून विरोधाची शक्यता नाकारता येत नाही.