अनिल ठाणेकर

ठाणे- देवेंद्र फडणवीस यांच्या ‘NDA’ सरकारकडून अनेकदा फसवणूक झाल्यामुळे, आज इथे तुम्ही प्रामुख्याने निवृत्ती वय ५८ वरुन ६० वर्षे व्हावं व पूर्वीचीच निवृत्तिवेतन सुविधा मिळावी म्हणून, ‘राज्यव्यापी संप’ करत असताना; तिथे, द. कोरियात जगविख्यात ह्युंदाई कंपनीचे कामगार-कर्मचारीवर्ग याच मुद्द्यांवर लढतायत…पण, या दोन्ही लढ्यांतील गुणात्मक फरक केवढा मोठा आहे? ते निवृत्ती वय, ६० वरुन ६५ वर्षे करण्यासाठी लढतायत आणि त्यांच्या आजच्या वेतन वा निवृत्तीवेतन सुविधा पाहिल्यावर आपले डोळे पांढरे होतील, असे मत धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष असलेले प्रख्यात कामगार नेते, ‘राजन राजे’ यांनी संपकरी शासकीय-कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त केले आहे.

मित्रांनो, जगभरात सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये निवृत्ती वय ६० वर्षांच्या पलिकडे याअगोदरच आहे आणि जपानमध्ये तर, ७०-७५ वर्षांपर्यंत कामगार-कर्मचारी सुखेनैव नोकऱ्या करु शकतात व त्यानंतरही, त्यांच्या औषधोपचाराची व जीवनमानाची परिपूर्ण काळजी घेण्याची कॉर्पोरेटर क्षेत्राकडून व्यवस्था झालेली असते. कुठलाही लढा, हा तुमच्याकडून ‘त्याग’ मागत असतो; तुमची ‘सत्वपरीक्षा’ घेत असतो…वानगीदाखल उदाहरण घ्यायचंच झालं तर, मी गेली चारपाच दशके अध्यक्ष असलेल्या सुल्झर पंप्स (दिघा-अंबरनाथ) कंपनीतील युनियनच्या कडव्या संघर्षाचं देईन…ही कथा, त्या कंपनीची आहे, जिने कामगार-कर्मचारीवर्गाला सहा आकडी (एक लाखाहून अधिक) बोनस व सहा आकडी पगार देऊन वर्ष-२००७पासून सातत्याने औद्योगिक क्षेत्रात एक चमत्कार घडवला होता! मात्र, सगळं उत्तमरित्या चाललं असतानाच; कंपनीत मोठ्या प्रमाणावर ‘कंत्राटी-कामगार पद्धत’ राबवून, कंपनीचा नफा बेसुमार वाढवण्याच्या राक्षसी हव्यासाने, वर्ष २०१९-२०पासून नव्या व्यवस्थापनाने गेली जवळपास ७ वर्षे, युनियनशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल अचानक कामगारांवर कुर्‍हाड चालवायला घेतली. अनेकांना निलंबित केलं; तर, ३ जणांना नोकरीतून काढून टाकले. एवढंच नव्हे, तर जसा तुमच्याकडे ‘मेस्मा’ कायद्याचा वरवंटा फिरवण्याची ‘फसणवीस’जी धमकी देत असतात; तसाच ‘कंपनी-दहशतवाद’ पसरवून (Corporate-Terrorism) कामगारांवर दबाव-दहशत निर्माण करण्याचा, नव्या कामगारघातकी व्यवस्थापनाने करत, बहुतांश संघटनानिष्ठ कामगारांना गेली पाचसहा वर्षे, एक रुपयादेखील पगारवाढ अथवा बोनस न देता…त्यांचं अंदाजे प्रत्येकी १५ लाखाच्या आसपास नुकसान करुनदेखील बहुसंख्य कामगार मूळ संघटनेशी व संघटना-नेतृत्त्वाशी आजवर प्रामाणिक व एकनिष्ठ राहिले आहेत…या जाज्वल्य उदाहरणातून खूप काही शिकण्यासारखं आपल्या सर्वांनाच आहे; कारण, ‘कामगार-चळवळ’ जिवंत राहिली, तर आणि तरच, तुमचे न्याय्य हक्क, तुमचा सन्मान व तुमच्या नोकऱ्या सुरक्षित रहातील… अन्यथा, संपूर्ण देशात लढा देणारा एकमात्र ‘कामगार-पुढारी’ म्हणून, ज्या ‘कंत्राटी-कामगार पद्धती’विरुद्ध निकराने गेली तीनचार दशके मी ‘धर्मयुद्ध’ पुकारलंय व त्यातूनच, माझ्या पक्षाचं नाव ‘धर्मराज्य’ आलंय…त्या ‘कंत्राटीकरणा’तूनच, देशातल्या अवघ्या औद्योगिक व सेवा क्षेत्रात, जशी ‘नव-अस्पृश्यता’ व ‘गुलामगिरी’ आली; तशीच तुमची व पुढील पिढ्यांचीदेखील ‘गुलामा’सारखी अवस्था होईल…कारण, मी तडफडून-तळमळून सांगत होतो; तेव्हाच ती ठिणगी विझवणं सोपं काम होतं;आता, त्या ठिणगीनं वणव्याचं रौद्ररूप धारण केलंय…तेव्हा, सावध व्हा आणि विजय मिळेपर्यंत, आपलं इप्सित साध्य होईपर्यंत निकराने लढा; ‘धर्मराज्य’ची वानरसेना व मी, तुमच्या सदैव पाठिशी आहोत!”असा एल्गार ‘धर्मराज्य पक्ष’ व ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघा’चे अध्यक्ष असलेले प्रख्यात कामगार नेते, ‘राजन राजे’ यांनी संपकरी शासकीय-कर्मचाऱ्यांसमोर व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *