Month: April 2026

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत भात व हिरवळीच्या खताच्या बियाण्यास अनुदान

 टोकण यंत्रासाठीही ९०% अनुदान; शेतकऱ्यांना दिलासा ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कृषि विभागामार्फत सन २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात येत आहे. भात पिकाचे उत्पादन वाढविणे, जमिनीची सुपिकता सुधारणा करणे तसेच मजूर टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने सुधारित भात बियाण्यास ५० टक्के व हिरवळीच्या खताच्या बियाण्यास ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना तूर व भात पिकासाठी कर्जत-३, कर्जत-७, जया, रत्नागिरी-८ तसेच एमटीयू-१०१० या सुधारित व अधिक उत्पादनक्षम जातींचे बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या जाती हवामानास अनुकूल असून चांगले उत्पादन देणाऱ्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि सेंद्रिय घटकांची वाढ करण्यासाठी धैंचा या हिरवळीच्या खताचे बियाणे प्रति शेतकरी प्रति एकर २० किलो प्रमाणात ९० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. धैंचा पिकामुळे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून पुढील पिकासाठी पोषक वातावरण निर्माण होते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित पंचायत समितीच्या कृषि विभागाकडे तात्काळ नाव नोंदणी करावी. अर्जासोबत ७/१२ किंवा ८-अ उतारा, आधार कार्ड तसेच आधारसंलग्न बँक पासबुक यांच्या छायांकित प्रती सादर करणे बंधनकारक राहील. दरम्यान, शेतीमधील वाढत्या मजूर टंचाईचा विचार करून भात पिकाची टोकण यंत्राद्वारे (Dibbler) पेरणी करण्यासाठी यावर्षीपासून ९० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. SRT पद्धतीने भात लागवड करण्यासाठी किमान ५ टोकण यंत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त ५ टोकण यंत्र खरेदीसाठी अनुदान देय राहील. या पद्धतीमुळे वेळ, खर्च व मजुरीची बचत होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद ठाणेच्या अधिकृत https://zpthaneschemes.com संकेतस्थळावर दि. १५ मे २०२६ पर्यंत नाव नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करावा आणि उत्पन्नात वाढ साधावी. सुधारित बियाणे व यंत्रांच्या वापरामुळे शेती अधिक फायदेशीर होऊ शकते,  असे कृषि विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी सांगितले. ०००००००  

तुटलेल्या पाणी व्हॉल्वच्या झाकणावर महापौरांचा संताप

कल्याण : कल्याण पश्चिम शहराच्या पाहणी दरम्यान महापौर हर्षाली चौधरी यांनी रस्त्यावर असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या व्हॉल्वच्या झाकणाच्या खराब अवस्थेबाबत कडक भूमिका घेतली. प्रेम ऑटो जवळील रस्त्यावर हे झाकण तुटलेले आढळले, ज्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ही स्थिती पाहताच महापौर अॅक्शन मोडमध्ये दिसल्या आणि ते तात्काळ दुरुस्त करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना महापौरांनी चांगलेच फटकारले. त्यांनी सांगितले की, अशा तुटलेल्या झाकणामुळे कधीही गंभीर अपघात होऊ शकतो, विशेषतः हे ठिकाण हिंदू स्मशानभूमीजवळ असल्याने नागरिकांची सतत ये-जा सुरू असते. महापौरांनी नाराजी व्यक्त करत विचारले की, एवढी खराब अवस्था असतानाही वेळेवर दुरुस्ती का करण्यात आली नाही. तसेच, कामात कोणतीही हलगर्जी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, स्थानिक नागरिकांनीही आपल्या समस्या महापौरांसमोर मांडल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. महापौरांनी नागरिकांना आश्वासन दिले की, ही समस्या त्वरित सोडवली जाईल आणि शहरातील रस्ते व संबंधित सुविधा प्राधान्याने दुरुस्त करण्यात येतील, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल आणि वाहतूक सुरक्षित व सुरळीत राहील.

कागदावरच मान्सून तयारी, दिवा पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती

आरती परब दिवा : मान्सून तोंडावर आला असतानाही दिवा शहरातील नालेसफाईचे काम अद्याप सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ठाणे महानगरपालिका प्रशासनाकडून मान्सूनपूर्व तयारीचा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात दिव्यातील परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिकेकडून आयुक्तांच्या आढावा बैठका, प्रभागनिहाय निर्देश आणि कामांच्या दाव्यांची माहिती प्रसिद्धी माध्यमांतून दिली जात आहे. मात्र, दिव्यातील मुख्य नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग आणि साचलेला गाळ कायम असल्याने प्रत्यक्ष कामाचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे. त्यामुळे प्रशासनाचा ‘आढावा’ हा केवळ कागदापुरताच मर्यादित असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. दरवर्षी नाले सफाईसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. तरीही पावसाळ्याच्या अगोदर केवळ वरवरची सफाई करून काम पूर्ण झाल्याचे दाखवले जाते, असा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. परिणामी, नाल्यातील गाळ न काढल्यामुळे पहिल्याच पावसात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण होते आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही तासांत ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत नालेसफाई रखडल्यामुळे दिवा शहर पुन्हा पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. “दरवर्षी प्रशासन फक्त बैठका घेते, पण प्रत्यक्षात काहीच होत नाही. कंत्राटदार वरवरची सफाई करून निघून जातात. यंदाही तीच परिस्थिती राहिली, तर नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याला जबाबदार कोण?” – दर्पण गावडे, स्थानिक नागरिक, दिवा मान्सूनपूर्व कामांबाबत प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांवर आता नागरिकांचा विश्वास उरलेला नाही. त्यामुळे तातडीने प्रभावी नालेसफाई करून संभाव्य पूरस्थिती टाळण्याची मागणी जोर धरत आहे.

 कल्याणातील मेट्रो आता खडकपाडा मार्गेच धावणार

शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील कल्याण : कल्याणातील मेट्रो आता खडकपाडा मार्गेच धावणार असून पुढील २ महिन्यांत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.  ठाणे–भिवंडी–कल्याण मेट्रोच्या नव्या मार्गाला राज्य शासनाची अधिकृत मान्यता मिळाली असून प्रकल्पासाठी वाढीव निधीही मंजूर करण्यात आला आहे. महिन्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून अवघ्या ६० दिवसांत प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे नियोजन असून शहराच्या विकासाला गती देणाऱ्या या निर्णयासाठी शहरप्रमुख रवी पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेला केडीएमसी महापौर हर्षाली चौधरी, शिवसेना उपनेत्या व नगरसेविका विजया पोटे, नगरसेवक गणेश जाधव, रोहन कोट, बंदेश जाधव, किरण भांगले, अनघा देवळेकर, प्रतिक पेणकर, रुपेश सकपाळ, माजी नगरसेवक मयुर पाटील, विजय काटकर, श्रेयस समेळ, अरविंद पोटे, युवासेनेचे सुजीत रोकडे, सुचेत डामरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. धामणकर नाका भिवंडी ते कल्याण दुर्गाडी ५ मेट्रो व मेट्रो५ अ म्हणजे दुर्गाडी चौक आधारवाडी -खडकपाडा -भोईरवाडी – उल्हास नगर या मेट्रो च्या  सुधारित कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून एका महिन्यात टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल. यामुळे कल्याण डोंबिवलीकरांचे स्वप्न पूर्ण होईल. यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे आभार शहरप्रमुख रवि पाटील यांनी मानले. यावेळी रवि पाटील यांनी सांगितले की सन २०१५ मध्ये भारतानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भिवंडी – कल्याण मेट्रोच्या कामाचे भुमिपुजन झाले होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे काम थांबले होते, परंतु आता नव्याने पुन्हा काम सुरू होणार आहे, भिवंडी -कल्याण व कल्लाण ते उल्हासनगर पुढे बदलापूर चिखलोली पर्यंत मेट्रो धावणार आहे. पुर्वी मेट्रोचा मार्ग वेगळा होता, त्यामुळे कल्याण पश्चिम भागातील काही नागरीकांना  मेट्रोचा काहीच उपयोग नव्हता, म्हणून मेट्रो चा मार्ग बदलण्यासाठी  सन २०१६ पासून शिवसेना शहरप्रमुख रवि पाटील याचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिल्ली येथे बैठक घेऊन संबंधित अधिकारी यांना मेट्रो मार्ग बदलण्यासाठी बैठक झाली व  त्यानी मान्य केले. नवीन मेट्रो मार्ग आधारवाडी, खडकपाडा बिर्ला  परिसरातील व कल्लाण पश्चिम भागातील पाच लाख नागरिकांना फायदा होणार आहे. ००००००००

तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्ण संख्येत वाढ

रमेश औताडे मुंबई : डोके आणि मान या अवयवाजवळ होणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, त्यातील सुमारे ६२ टक्के प्रकरणं ही केवळ मौखिक कर्करोगाची असून ही वाढ एक चिंतेची बाब ठरत आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे प्रसिध्द सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल च्या संचालक डॉ. सेवांती लिमये यांनी दिली. डोके आणि मान कॅन्सर जागरूकता मोहीम मर्क स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली तोंडाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी दोन मिनिटांची कृती ही मोहीम आहे. नागरिकांना आरशासमोर दोन मिनिटांत स्वयं तपासणी करून तोंडाच्या कॅन्सरच्या सुरुवातीची लक्षणे ओळखण्यास आणि वेळीच उपचार घेण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये नाकाजवळील सायनस, नाकाची पोकळी, तोंड, घसा आणि स्वरयंत्र या भागांमध्ये होणाऱ्या कर्करोगांना समावेश आहे. डॉ. सेवांती त्या पुढे सांगतात की, अनेक टर्शरी केअर रुग्णालयांमध्ये निदान होणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी सुमारे ३० टक्के प्रकरणं ही हेड अँड नेक कॅन्सरची असतात आणि त्यापैकी ६२ टक्के मौखिक कर्करोगाची असतात. ०००००००००

 नाशिक सिंहस्थ कुंभमेळा होणार हायटेक

गर्दीच्या नियोजनासाठी कुंभ ‘एआय स्टॅक’ सज्ज हरिभाऊ लाखे नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा अधिक सुरक्षित, सुरळीत आणि तंत्र ज्ञानाधिष्ठित करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) व्यापक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्यांशी चर्चा करण्यात आली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने ‘कुंभ एआय स्टॅक’ ही संकल्पना मांडली असून यावर काम सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंत्रज्ञानाला प्रशासनाचा कणा मानत कुंभमेळा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा दृष्टिकोन मांडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कुंभ २०२७ हा देशातील सर्वात तंत्रज्ञान-सक्षम कुंभमेळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने मुंबई येथे नुकतीच कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभ धवसे, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, विशेष पोलीस महानिरीक्षक राजेश प्रधान, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, डीआयजी (वायरलेस) जी. श्रीधर, पोलीस अधिकारी राजा रामास्वामी, नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, महा आयटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय काटकर आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळा तंत्रस्नेही व्हावा, या अनुषंगाने मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एमआयटी मीडिया लॅब, भाषिनी, सोकेट. एआय, अद्या.एआय यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या आणि संस्थांचे तज्ज्ञही या चर्चेत सहभागी झाले. कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद यासाठी एआयचा नेमका कसा उपयोग होऊ शकतो, यावर चर्चा झाली. कुंभमेळा प्राधिकरणाने ‘कुंभ एआय स्टॅक’ ही संकल्पना मांडली असून, हजारो सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, सेन्सर्स आणि मोबाईल नेटवर्कमधील माहितीचे विश्लेषण करून तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता या प्रणालीत असेल. त्यामुळे गर्दी वाढण्यापूर्वीच तिचा अंदाज घेऊन उपाययोजना करणे शक्य होणार आहे. नाशिक शहरात सध्या सुमारे १३०० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून त्यात आणखी ४००० कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. याशिवाय स्मार्ट ट्रॅफिक सिस्टीम, पार्किंग व्यवस्था आणि पर्यावरणीय सेन्सर्स यांसारखी पायाभूत सुविधा आधीच उपलब्ध आहे. कुंभमेळ्यासाठी या सर्व यंत्रणांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. भाविकांसाठी ‘कुंभदूत’ हा एआय आधारित डिजिटल सहाय्यक विकसित करण्यात येत असून, साध्या भ्रमणध्वनीपासून स्मार्टफोनपर्यंत सर्वांसाठी तो उपलब्ध असेल. व्हॉट्सॲप, आयव्हीआर, मोबाईल ॲप आणि सार्वजनिक घोषणांद्वारे भाविकांना मार्गदर्शन मिळणार आहे. कुंभमेळ्याचे व्यवस्थापन ‘प्रतिक्रिया आधारित’ न राहता ‘भविष्यवेधी’ (प्रेडिक्टिव ) करण्यावर भर देण्यात येत आहे. संभाव्य गर्दी, स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित अडचणी आधीच ओळखून उपाययोजना करण्याची क्षमता एआय प्रणालीत असेल. तसेच ‘कुंभ एआय सॅन्डबॉक्स’च्या माध्यमातून विविध तंत्रज्ञान उपायांची चाचणी प्रत्यक्ष मेळ्यापूर्वी घेण्यात येणार आहे. २०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे १२ कोटी भाविक सहभागी होण्याची अपेक्षा असून, एका दिवशी २.५ कोटी भाविकांची उपस्थिती राहू शकते. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही प्रमुख स्थळे ३१ किलोमीटर अंतरावर असून १५ जून ते ३० सप्टेंबर २०२७ या कालावधीत हा मेळा पार पडणार आहे.

 आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवावा

 जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे निर्देश अशोक गायकवाड अलिबाग: रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. आपत्ती काळात सर्व यंत्रणानी सतर्क व दक्ष रहावे, तसेच मान्सून पूर्व तयारी करताना सर्व बाबींची काटेकोरपणे तपासणी आणि उपाययोजना करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. नियोजन भवन येथे जिल्हास्तरीय मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, भारतीय तटरक्षक दलाचे अभिषेक कुमार, आपत्ती व्यवस्थापन अधिकार सागर पाठक उपस्थित होते. जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, पावसाळा सुरु होण्याकरिता एक महिन्याचा कालावधी बाकी असून सर्व शासकीय यंत्रणानी अतिधोकादायक व धोक्याची संभावना असलेल्या ठिकाणांची पाहणी करावी. या ठिकाणच्या नागरिकांना मान्सून कालावधीमध्ये सुरक्षित जागी स्थलांतरीत करता यावे यासाठी निवाऱ्याची सज्जता करावी. आपत्ती काळात आपदामित्रांचे सहकार्य खूप महत्वाचे असून ते तात्काळ मदतीला धावून येवून महत्वाची भूमिका बजावत असतात. याकरिता आपदा मित्र हे रायगड जिल्ह्याला लाभलेले एक वरदानच आहे. प्रत्येक विभागांनी आपला नियंत्रण कक्ष २४x७ कार्यान्वित ठेवावा. याकरिता एक समन्वयक अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. जलसंपदा विभागाने आपल्या अखत्यारित असलेली धरणे, मध्यम प्रकल्पांची तपासणी करावी. आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा औषधसाठा, व्हॅक्शीन उपलब्ध ठेवाव्यात. आपत्तीकाळात रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. विविध विभागांचे परिपूर्ण आपत्ती व्यवस्थापन आराखडे जिल्हा प्रशासनास पाठविण्यात यावेत. तसेच रायगड पाटबंधारे विभागाने धरणांची तातडीने तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अतिवृष्टी विचारात घेवून टप्प्या-टप्प्याने धरणांतून विसर्ग करावा अशा सूचनाही जावळे यांनी केल्या. जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, तसेच या काळात पूर्व परवानगी शिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये असे निर्देश ही त्यांनी यावेळी दिले. दरड प्रवण गावांकरिता नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी गावातील लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे. आम्ही तुम्ही एक आहोत या भावनेने सर्वांनी काम करावे. आपणास काही मदत हवी असल्यास याकरिता आम्ही सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पूलांची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तात्काळ करावी व पर्यायी मार्ग सुस्थितीत ठेवावेत. तसेच रस्त्यावरील खडे, साईडपट्टी भरुन घेणे, रस्त्यावरील ब्लिंकर्स, बोर्ड, डायव्हर्शनचे बोर्ड, ब्लॅक स्पॉटवर रिफ्लेक्टर्स बसवावेत. सर्व विभागांकडील शोध व बचाव साहित्यांची दुरुस्ती करून सर्व साहित्य सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी. आवश्यक शोध व बचाव पथक, रुग्णवाहिका, स्थलांतराचे ठिकाण, अन्न पाण्याची व्यवस्था, जेसीबी मशिन्स, वूड कटर्स, बोट, लाईफ जॅकेट, स्पीड बोट, जनरेटर इ. साहित्य व मनुष्यबळ सर्व विभागांनी सज्ज ठेवावेत, असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. तसेच या काळात उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी व तहसीलदार यांनी उत्तम समन्वय राखत काम करावे. नगरपालिका, महानगरपालिकांनी नालेसफाईची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत. तसेच महाड शहरात दरवर्षी पूर परिस्थिती निर्माण होते. अशा पूरपरिस्थितीत मदत कार्य व बचावासाठी आवश्यक पूर्वतयारी व उपाययोजना केली जावी. आपत्तीच्या प्रसंगी रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आदी विभागांनी देखील नागरिकांच्या मदत व सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वतयारी करावी. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले म्हणाल्या की, ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसेवक व सरपंच यांनी समन्वयाने आढावा बैठका घेवून त्याप्रमाणे नियोजन करावे. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी केले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यासह एन डी आर एफ, होमगार्डा,महावितरण, सार्वजनिक बांधकाम, प्रादेशिक परिवहन अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे अधिकारी यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ठाण्यात एस टीची शिवशाही एसी बस भीषण आगीत जळून खाक.

ठाणे : ठाणे स्टेशन जवळील सॅटीस उड्डाणपुलावर दुपारी १:२८ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची शिवशाही एसी बस क्रमांक- MH ०९ EM ९९४२, (चालक श्री. संतोष किसन गवळी, वाहक – मिलिंद सोनावणे, मार्ग – स्वारगेट ते वसई.) या बसला ठाणे रेल्वे स्टेशन बस स्थानक येथून वसईला जाताना सॅटिस ब्रिजवरती आग लागली होती.  प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी, ठाणे नगर पोलीस कर्मचारी, ठाणे नगर वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान १-फायर वाहनासह, १-रेस्क्यू वाहनासह, १- वॉटर टँकर वाहनासह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १-पिकअप वाहनासह व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. सदर आग लागलेली बस ही वसई बस डेपोची असून बस मध्ये  स्वारगेट वरून वसईला जाणारे १० प्रवासी व ठाणे येथून ४ प्रवासी असे एकूण १४ प्रवासी प्रवास करत होते. सदर बसला आग लागताच सर्व प्रवासी व बसचे चालक व वाहक सुरक्षित बसच्या बाहेर आले त्यामुळे अनर्थ टळला परंतू शिवशाही बस पूर्णतः जळून नुकसान झाले आहे. सदर आग लागलेल्या बस मधील डिझेल व ऑइल रस्त्यावरती पसरले होते त्यावरती आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने माती पसरविण्यात आली.  

 रुग्णवाहिकेला उशीर झाल्याने वृद्धाचा रस्त्यातच तडफडून मृत्यू

नागरिकांचा संताप कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  मेवालाल गुप्ता असं मृत व्यक्तीचे नाव आहे. कल्याण स्टेशन परिसरात प्रकृती बिघडल्यानंतर १०८ नंबरवर कॉल करुन रुग्णवाहिकेची मागणी केली, मात्र रुग्णवाहिका तब्बल ४० मिनिटे उशिरा आली, तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील दीपक हॉटेलजवळ एका अज्ञात व्यक्तीला अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. संबंधित इसमाने स्वतः १०८ आपत्कालीन सेवेला फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केली. त्याची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनीही वारंवार १०८ वर संपर्क साधला. तरीही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल ४० मिनिटांचा विलंब झाला. ॲम्बुलन्स मध्ये डॉक्टर ही नव्हता. विशेष म्हणजे, दीपक हॉटेल ते रुक्मिणीबाई हॉस्पिटल हे अंतर अवघे ३ मिनिटांचे असतानाही रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी परिसरात मोठा गोंधळ घालत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेत मदत मिळाली असती तर जीव वाचला असता,असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात १०८ ॲम्बुलन्सवरील डॉक्टर मोहम्मद तोफिक आणि चालक प्रकाश चोरगे यांनी वेगळीच बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री १० वाजून २९ मिनिटांनी कॉल मिळाल्यानंतर ते केवळ १२ मिनिटांत घटनास्थळी पोहोचले होते. संबंधित व्यक्तीची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झालेला होता. ००००००००

केडीएमसी क्षेत्रात फेरीवाला कायदा लागू करण्याची राष्ट्रवादीची मागणी

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सूर असून या कारवाईला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी विरोध केला आहे. फेरीवाला पथ विक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन अधिनियम २०१४ या काय‌द्याचे उल्लंघन करून अन्यायकारक कारवाई सुरू असून केडीएमसी क्षेत्रात फेरीवाला कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चोधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र दिले आहे. १ मे २०१४ रोजी संपूर्ण देशात फेरीवाला अधिनियमन कायदा लागू करण्यात आला पण इतकी वर्ष उलटूनही आत्तापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात या काय‌द्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. गेल्या अनेक महिन्यापासून महानगरपालिकेने सरसकट कायद्याचे उल्लंघन करून फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्या उपजीविचे साधन काढून घेतले आहे. यामुळे शहरातील भाजी विक्रेते फळे विक्रेते फुल विक्रेत व इतर फेरीवाले यांची उपासमार होत आहे. महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर, फ प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर, ग प्रभाग क्षेत्राधिकारी भारत पवार हे पदाचा व शासनाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून डोंबिवली शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील १५० मीटर सोडून व्यवसाय करत असलेल्या फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.  कारवाई करताना फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करताना पंचनामा करणे बंधनकारक असताना सुद्धा बेकायदेशीर साहित्य जप्त करून त्याची लूट करून मर्जीतल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत हे साहित्य आठवडा बाजारातल्या काही विक्रेत्यांना अर्ध्या किमतीत देत आहेत. ऑनलाइन भाजी फळे फुले व इत्यादी साहित्य विक्री करणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांना फायदा होण्यासाठी सर्व फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. तसेच एका राजकीय पक्षाच्या पुरस्कृत आठवडा बाजार जागोजागी सुरू केले आहेत, शेतकऱ्यांच्या नावाखाली बाहेरील जिल्ह्यातील फेरीवाले आणून बाजार भरवले जात आहेत यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्र व शेतकरी भाजी फळे व फुले विक्री करणाऱ्या रोजगार बुडत आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या आधी त्यांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे परंतु या संदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यामुळे हजारो कुटुंब उध्वस्त होऊन त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या संदर्भात बैठक घेऊन या समस्येवर मार्ग काढला नाही तर सर्व नोंदणीकृत फेरीवाल्यांसहित आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा भालचंद्र पाटील यांनी दिला आहे. ००००००