टोकण यंत्रासाठीही ९०% अनुदान; शेतकऱ्यांना दिलासा
ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कृषि विभागामार्फत सन २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्यात येत आहे. भात पिकाचे उत्पादन वाढविणे, जमिनीची सुपिकता सुधारणा करणे तसेच मजूर टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने सुधारित भात बियाण्यास ५० टक्के व हिरवळीच्या खताच्या बियाण्यास ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांना तूर व भात पिकासाठी कर्जत-३, कर्जत-७, जया, रत्नागिरी-८ तसेच एमटीयू-१०१० या सुधारित व अधिक उत्पादनक्षम जातींचे बियाणे ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या जाती हवामानास अनुकूल असून चांगले उत्पादन देणाऱ्या असल्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी आणि सेंद्रिय घटकांची वाढ करण्यासाठी धैंचा या हिरवळीच्या खताचे बियाणे प्रति शेतकरी प्रति एकर २० किलो प्रमाणात ९० टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे. धैंचा पिकामुळे जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढून पुढील पिकासाठी पोषक वातावरण निर्माण होते.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित पंचायत समितीच्या कृषि विभागाकडे तात्काळ नाव नोंदणी करावी. अर्जासोबत ७/१२ किंवा ८-अ उतारा, आधार कार्ड तसेच आधारसंलग्न बँक पासबुक यांच्या छायांकित प्रती सादर करणे बंधनकारक राहील.
दरम्यान, शेतीमधील वाढत्या मजूर टंचाईचा विचार करून भात पिकाची टोकण यंत्राद्वारे (Dibbler) पेरणी करण्यासाठी यावर्षीपासून ९० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे. SRT पद्धतीने भात लागवड करण्यासाठी किमान ५ टोकण यंत्रांची आवश्यकता असते. त्यामुळे एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त ५ टोकण यंत्र खरेदीसाठी अनुदान देय राहील. या पद्धतीमुळे वेळ, खर्च व मजुरीची बचत होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद ठाणेच्या अधिकृत https://zpthaneschemes.com संकेतस्थळावर दि. १५ मे २०२६ पर्यंत नाव नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन उत्पादन खर्च कमी करावा आणि उत्पन्नात वाढ साधावी. सुधारित बियाणे व यंत्रांच्या वापरामुळे शेती अधिक फायदेशीर होऊ शकते, असे कृषि विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी सांगितले.
०००००००
