Month: April 2026

 तर आगग्रस्त `शिवशाही’पर्यंत अग्निशमन दल १० मिनिटांत पोचले असते!

 स्थानिक नगरसेविका नम्रता कोळी यांचे मत ठाणे : सॅटीस पुलावर एस. टी.च्या शिवशाही बसला आग लागल्यानंतर ठाणे अग्निशमन दलाच्या गाडीला पोचण्यासाठी किमान २० ते २५ मिनिटांचा अवधी लागला. मात्र, दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन दलाची गाडी ठेवली असती. तर घटनास्थळी ५ ते १० मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान पोचून शिवशाही बसची आग लवकर आटोक्यात येऊन बस खाक झाली नसती, असे मत भाजपच्या नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी यांनी व्यक्त केले. ठाणे तहसील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीच्या एकत्रित पुनर्विकासात अग्निशमन केंद्राची जागाही घेण्यात आली. त्यामुळे येथील केंद्र साकेत येथे तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. ठाणे रेल्वे स्टेशन, होलसेल मार्केट, पोलिस आयुक्तालय, सिव्हील हॉस्पीटल अशी महत्त्वाची ठिकाणे असल्याच्या पार्श्वभूमीवर दादोजी कोंडदेव स्टेडियमच्या आवारात तात्पुरत्या स्वरुपात अग्निशमन दलाची गाडी ठेवण्याची गरज आहे, याकडे नगरसेविका नम्रता कोळी यांनी महापालिकेचे लक्ष वेधले होते. मात्र, त्याची अग्निशमन दलाकडून दखल घेण्यात आली नव्हती. यापुढील काळात आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोचण्यासाठी अग्निशमन दलाचा एक बंब ठेवण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी केली आहे.

 मराठी सक्ती मागे घेण्यास सांगणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांचा इशारा  ठाकरे गटाची आरटीओ कार्यालयावर धडक कल्याण : मराठी सक्ती मागे घ्या या मागणीसाठी ४ मे पासून आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालक मालक व त्यांचे नेते यांच्यावर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करा, मराठी न बोलणाऱ्या व मराठीचा अपमान करणाऱ्या रिक्षाचालकांनवर गुन्हे दाखल करा नाहीतर आम्ही रस्त्यावर शिवसैनिक उतरू असा इशारा शिवसेना उबाठाचे उपनेते विजय साळवी यांनी कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन द्वारे दिला आहे. यावेळी शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, शिवसेना गटनेते उमेश बोरगावकर, शहर प्रमुख बाळा परब, नगरसेवक संकेश भोईर, विशाल गारवे, नगरसेविका स्वप्नाली केणे, अपर्णा भोईर, सतिश वायचळ, दशरथ तरे, अनिल डेरे, प्रथमेश पुण्यार्थी आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आज कल्याण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्या नंतर शिष्टमंडळाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना निवेदन दिले. रिक्षा चालकांनी मराठी बोलले पाहिजे अपमान करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करा, रिक्षा स्टँड संख्या वाढवा, स्कूल बस मध्ये महिला मदतनीस पाहिजे, वर्षातून चार वेळा बस चेकिंग केली पाहिजे, अवैध रिक्षा चालकांवर कारवाई केली पाहिजे, स्टेशन जवळील वाहतूक कोंडी दुर करणे, मीटर प्रमाणे रिक्षा सुरू करणे आदि विषयांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उबाठाचे उपनेते विजय साळवी यांनी सांगितले की आम्ही विविध मागण्यांचे निवेदन परिवहन अधिकारी यांना दिले आहे. मीटरप्रमाणे रिक्षा चालवणे असे आदेश देऊनही रिक्षा चालक आदेशाचे पालन करीत नाही, याला जबाबदार परिवहन विभाग आहे, परंतु हे युनियनला घाबरतात, त्यांच्या दबावाखाली उप प्रादेशिक अधिकारी काम करतात, सहा असनी गाडीला शहरात परवानगी नसतानाही कल्याण शहरात बारा बारा सिट भरतात. मागील आठवड्यात अकरा माणसे अपघात मध्ये मरण पावली, याला जबाबदार परिवहन अधिकारी आहेत. प्रत्येक स्कूल बस मध्ये महिला मदतनीस ठेवणे आवश्यक असून नाहीतर , बदलापूर सारख्या घटना घडतात. रिक्षांच्या संख्या खूप आहे, त्या मानाने रिक्षा स्टँड कमी आहेत, त्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. मीटर प्रमाणे रिक्षा सुरू करणे आदि मागण्यांचे निवेदन दिले असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कायद्याप्रमाणे कारवाई करावी अन्यथा अधिकार्याविरोधात न्यायालयात जावु असा इशारा उपनेते विजय साळवी यांनी दिला. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी प्राप्त झालेल्या निवेदनाप्रमाणे आम्ही सबंधित कारवाई करू असे सांगितले.

शैक्षणिक, सांस्कृतिक आणि समाज कल्याणाच्या उद्दिष्टांनी, गायक आणि संगीतकार दिलीप महाशब्दे यांच्या हस्ते मनोप्रभा ट्रस्टची स्थापना पूजा अक्षय तृतीयेला १९ एप्रिल, शिर्डी साईबाबा मंदिर घंटाळी रोड नौपाडा येथे करण्यात आली. या स्थापना पूजेचे पौरोहित्य, वेदमूर्ती हेमंत जी वीरकर आणि त्यांचे सहकारी आणि त्यांचे सहकारी गुरुजी संतोषजी कुलकर्णी यांनी केले. मित्र आणि हितचिंतक चंद्रशेखर (आप्पा) महाशब्दे, श्रीनिवास महाशब्दे, मंदिराचे प्रमुख अविनाश मोहिते, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी मुख्य अभियंता मधुसूदन शुक्ल यावेळी उपस्थित होते

श्री राजपूत करणी सेनेचे चिंतन-मंथन शिबीर

रमेश औताडे मुंबई: राजपुत समाजाच्या दुर्लक्षित प्रश्नांवर चर्चा करून ठोस निर्णायक भूमिका घेण्यासाठी श्री राजपूत करनी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष महिपाल सिंह मकराणा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई मराठी पत्रकार संघ येथे चिंतन-मंथन शिबीर झाले. महाराज्य प्रदेश अध्यक्ष श्याम सिंह ठाकूर व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातील, सर्व विभागातील व सर्व तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील राजपुत समुदायतील सर्वांना, समाजाच्या असंख्य दुर्लक्षित प्रश्नांवर चर्चा तसेच ठोस भूमिका घेण्यासाठी एकत्र येण्याचे विनम्र आवाहन या चिंतन शिबिरातून करण्यात आले. महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनीही आरक्षण व इतर महत्वाच्या विषयावर आपली भूमिका चिंतन शिबिरात मांडली. समाजातील सुशिक्षित बेरोजगार, समाजातील युवांवर वाढते व्यसनाचे संकट, समाजातील व वर्तमान परस्थितीतील आरक्षणाचे राजकारण संपले तरच जाती पातीचे राजकारण संपेल असे महिपालसिंह जी मकराणा यांनी सांगितले. यावेळी श्याम सिंह ठाकूर म्हणाले सरकारने जर आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. ००००००००

महापौरच्या पतीला आयुक्तांच्या दालनात प्रवेश दिल्यावरून आयुक्तांच्या दालना बाहेर भाजपा नगरसेवकांचा गोंधळ

सुनिल इंगळे उल्हासनगर: महापौरच्या पतीला पालिका आयुक्तांच्या दालनात प्रवेश दिला तर भाजपाच्या नगरसेवकांना दालनाबाहेरच उभे राहण्यास सांगून त्यांना रोखण्यात आल्याने याचा निषेध करत भाजपा नगरसेवकांनी पालिका आयुक्तांच्या कार्याला बाहेर जोरदार घोषणाबाजी करत तिथेच गोंधळ घातल्याची घटना बुधवारी सायंकाळी महापालिकेत घडली. या घटनेमुळे सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये एकच राडा झाला. त्यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपाचे युती टिकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बुधवारी सायंकाळी महासभा झाल्यावर पालिका आयुक्त यांच्या दालनात शिवसेना गटनेते अरुण आशान आणि शिवसेनेच्या महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम हे गेले होते. त्यावेळी भाजपचे गट नेता राजेश वाधारीया यांना देखील पालिका आयुक्ताच्या दालनात बोलण्यात आले होते. पण त्यावेळी कमलेश निकम हे अरुण आशान सोबत आल्याचे पाहून व त्यांना कोणतेही पद नसताना आयुक्तांच्या दालनात जाऊन दिले गेले आणि भाजपच्या नगरसेवकांना सुरक्षारक्षकांकडून बाहेर रोखण्यात आले याचा राग भाजपा नगरसेवकांना आला. या गोष्टीचा राग येऊन त्यांनी या घटनेचा निषेध करत पालिका आयुक्तांच्या दालना बाहेर घोषणाबाजी करत एकच गोंधळ घातला. त्यावेळी पोलिसांना तातडीने त्या ठिकाणी बोलण्यात आले. या घटनेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच झोपली. याशिवाय काँग्रेसचा एक नगरसेवक असताना महासभेमध्ये महापौरांनी थेट काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका अंजली साळवे यांची विरोधी पक्ष नेते म्हणून महासभेत घोषणा केल्याने त्यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी त्याला जोरदार विरोध केला. या संदर्भात राजेश वधारिया यांनी सांगितले आम्ही सत्तेत असताना शिवसेना आम्हाला विश्वासात न घेता महापौर हे परस्पर निर्णय घेतात. विरोधी पक्ष नेता निवडी प्रकरणी घेतलेला निर्णय हा चुकीचा असून त्या संदर्भात आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागू असा इशारा दिला. शिवसेनेने युती धर्म पाळला नाही आम्हाला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप भाजपने केला. या घटनेबाबत शिवसेना गटनेता अरुण आशान यांनी सांगितले महासभेच्या अगोदर जी ऑडिशन बैठक होते त्या बैठकीमध्ये निर्णय होतात.आणि यामध्ये काय निर्णय घ्यायचे हे बैठकीच्या अगोदर गट नेत्याला कळवले जातात. आजच्या महासभेमध्ये पहिल्यांदा त्यांचे नगरसेवक खाली डम्पिंग ग्राउंड च्या प्रश्नसंदर्भात जमिनीवर बसून ठिय्या आंदोलन सुरू केले. युतीमध्ये असताना सुद्धा महापौरांना आणि प्रशासनाला घेरण्याचा प्रयत्न होता. परंतु त्यांना हे समजायला पाहिजे की आपण युतीमध्ये आहोत ज्यावेळेस युतीमध्ये आपण असतो त्यावेळेस त्यांनी युतीचा त्यांना भान नाहीये. प्रत्येक महासभेच्या वेळी त्यांना गोंधळ घालायचा असतो. आणि आज त्यांनी या पद्धतीत गोंधळ घातला. परंतु जे काही निर्णय झाले ते महापौर सर्वांच्या वतीने सगळ्यांना समक्ष घेऊनच ते निर्णय घेतात. परंतु त्यांची भाषा आता बदललेली आहे हे मात्र नक्की. पालिका आयुक्तांकडून गट नेत्यांना आमंत्रण देण्यात आले होते. माझ्यासोबत कमलेश निकम हे देखील पालिका आयुक्तांच्या दालनात आले होते. सोबत येण्यास आयुक्तांची परवानगी घेतली होती बाहेरील जास्ती लोक आत मध्ये घेऊन येऊ नका अशा आयुक्तांनी सांगितले होते. आयुक्तांनी बोललेले शिवाय कोणी आत जाऊ शकत नाही. त्यामुळे दालना बाहेर उभे असलेल्या भाजपच्या काही नगरसेवकांना थांबायला सांगितलं होतं. गट नेता असल्यामुळे स्वाभाविक आहे माझ्या बरोबर जो व्यक्ती आहे तो आत मध्ये आला. त्याच्यामध्ये पद असो की नसो आयुक्तांनी जर कोणाला बोलवलं असेल तर आणि गटनेता बरोबर असेल तर त्यांना आक्षेप घेण्याचा काही प्रश्न येत नाही असे अरुण आशान यांनी सांगितले . याबाबत शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी सांगितले भारतीय जनता पक्ष सत्तेत राहते, सत्तेचा सहभाग घेते, सत्तेमध्ये भागीदारी घेते. मग महासभेच्या वेळेला खाली बसणं आणि महापौरांच्या विरुद्ध अविश्वास दाखवणे हे कितपत खरं आहे. युती म्हणून युतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे. जर खाली बसून महापौरांच्या विरुद्ध अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला तो चुकीचा आहे. युतीच्या बाबतीमध्ये वरिष्ठ नेते विचार करतील त्याचा निर्णय घेतील. आमचे नेते सक्षम आहेत आमचे नेते निर्णय घेतील असे सांगितले. सत्तेत असताना देखील भाजप आणि शिवसेना या घटनेवरून उल्हासनगर महानगरपालिकेत आमने-सामने आल्याने त्यांच्यात झालेल्या या राड्यावरून या सत्तेला तडा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे बोलले जात आहे.

हिवताप टाळण्यासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे

ठाणे: २५ एप्रिल हा दिवस ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जागतिक हिवताप (मलेरिया) दिन म्हणून राबविला जातो. या दिनी महापालिकेच्या फायलेरिया विभागाच्यावतीने महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी हिवताप टाळण्यासाठी प्रत्येक…

– एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सज्ज

चारा सुरक्षा आराखड्याचे आदेश अशोक गायकवाड अलिबाग: भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २०२६ च्या मान्सूनवर ‘एल-निनो’ या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पशुधनाच्या संरक्षणासाठी व संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण व तातडीचे निर्देश दिले आहेत. राज्यात सर्वसाधारणपणे हिरव्या चाऱ्याची ४३.९८% तर सुक्या चाऱ्याची २५.१२% तूट असते. ‘एल-निनो मुळे पाऊस कमी झाल्यास ही तूट वाढण्याची भीती आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ‘जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना किंवा आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीसाठी निधीला प्राधान्य द्यावे. बिया (पंच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता, मका, ज्वारी, बाजरी यांसारख्या चारा बियाणांचे कार्यारंभ आदेश महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला यांना तातडीने देण्याच्या सूचना मा. मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. ५ मे २०२६ पूर्वी हे आदेश देऊन बियाणे शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. चारा उत्पादन वाढवण्यासाठी शासनाने वैरण बियाणे वाटप, हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन, मिनी टीएमआर आणि कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप यासह विविध योजनांवर भर दिला आहे. विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखडा :- जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पशुधनाची संख्या लक्षात घेऊन स्वतंत्र ‘जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. यात प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश असेलः धरणांचे गाळपेरा क्षेत्र व नदीपात्रालगतच्या जमिनींवर चारा लागवडीची विशेष मोहीम राबवणे. टंचाईच्या काळात चाऱ्याची उपलब्धता राहण्यासाठी मुरघास प्रकल्पांना गती देणे. भविष्यात चारा छावण्यांची वेळ येऊ नये, यासाठी आतापासूनच चारा साठवणुकीचे अचूक नियोजन करणे. पशुसंवर्धन विभागाने जिल्हा उप आयुक्त व स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने या मोहिमेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पशुपालकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व उपलब्ध योजनांचा लाभघ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

कीहोल स्पाइन सर्जरीनंतर ७३ वर्षीय रुग्ण १२ तासांत पुन्हा चालू लागला

दिवा: किम्स हॉस्पिटल्स, ठाणे येथे करण्यात आलेल्या अत्याधुनिक कीहोल स्पाइन सर्जरीनंतर ७३ वर्षीय रुग्णाने अवघ्या १२ तासांत पुन्हा चालण्यास सुरुवात केली. गेल्या महिनाभरापासून तीव्र पायाच्या वेदनांमुळे त्याला दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ उभे राहणे किंवा चालणे शक्य नव्हते. रुग्णाला पायात तीव्र वेदना होत होत्या, ज्या दिवसेंदिवस वाढत गेल्या. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. रुग्णालयात दाखल होण्याच्या दोन दिवस आधी त्याला मल-मूत्र नियंत्रणाशी संबंधित समस्या देखील निर्माण झाल्या, ज्यामुळे परिस्थिती गंभीर बनली. तपासणीत L४–L५ स्तरावरील प्रोलॅप्स्ड डिस्क आढळली. या अवस्थेत मणक्यातील डिस्क सरकून मज्जातंतूवर दबाव आणते, ज्यामुळे तीव्र वेदना, मुंग्या येणे आणि चालण्यात अडचण निर्माण होते. रुग्णाला इतरही सहव्याधी होत्या तसेच तो रक्त पातळ करणारी औषधे घेत होता. त्यामुळे पारंपरिक ओपन सर्जरीमध्ये जास्त रक्तस्रावाचा धोका होता. हे लक्षात घेऊन डॉ. अमोघ झावर, कन्सल्टंट स्पाइन सर्जन यांच्या नेतृत्वाखाली एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या किमान हस्तक्षेप शस्त्रक्रियेत छोट्या छिद्रांद्वारे कॅमेरे आणि विशेष उपकरणांच्या सहाय्याने मज्जातंतूंवरील दबाव कमी करण्यात आला. डॉ. अमोघ झावर म्हणाले, “एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरीमुळे प्रभावित भागावर अचूक उपचार करता येतात आणि स्नायूंना कमी इजा होते. विशेषतः वृद्ध आणि उच्च-जोखमीच्या रुग्णांसाठी ही पद्धत अधिक सुरक्षित आहे.” शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती झपाट्याने सुधारली. तो १२ तासांत चालू लागला आणि ४८ तासांत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तज्ज्ञांच्या मते, एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरीमुळे कमी वेदना, कमी रक्तस्राव, कमी संसर्ग धोका आणि जलद पुनर्प्राप्ती असे अनेक फायदे मिळतात. या प्रकरणामुळे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने वृद्ध रुग्णांनाही पुन्हा स्वावलंबी व सक्रिय जीवन जगणे शक्य होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.