शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांचा इशारा
ठाकरे गटाची आरटीओ कार्यालयावर धडक
कल्याण : मराठी सक्ती मागे घ्या या मागणीसाठी ४ मे पासून आंदोलन करणाऱ्या रिक्षा चालक मालक व त्यांचे नेते यांच्यावर कडक कारवाई करत गुन्हे दाखल करा, मराठी न बोलणाऱ्या व मराठीचा अपमान करणाऱ्या रिक्षाचालकांनवर गुन्हे दाखल करा नाहीतर आम्ही रस्त्यावर शिवसैनिक उतरू असा इशारा शिवसेना उबाठाचे उपनेते विजय साळवी यांनी कल्याण उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन द्वारे दिला आहे. यावेळी शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, शिवसेना गटनेते उमेश बोरगावकर, शहर प्रमुख बाळा परब, नगरसेवक संकेश भोईर, विशाल गारवे, नगरसेविका स्वप्नाली केणे, अपर्णा भोईर, सतिश वायचळ, दशरथ तरे, अनिल डेरे, प्रथमेश पुण्यार्थी आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेना उबाठा गटाच्या वतीने आज कल्याण येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्या नंतर शिष्टमंडळाने उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना निवेदन दिले. रिक्षा चालकांनी मराठी बोलले पाहिजे अपमान करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करा, रिक्षा स्टँड संख्या वाढवा, स्कूल बस मध्ये महिला मदतनीस पाहिजे, वर्षातून चार वेळा बस चेकिंग केली पाहिजे, अवैध रिक्षा चालकांवर कारवाई केली पाहिजे, स्टेशन जवळील वाहतूक कोंडी दुर करणे, मीटर प्रमाणे रिक्षा सुरू करणे आदि विषयांबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेना उबाठाचे उपनेते विजय साळवी यांनी सांगितले की आम्ही विविध मागण्यांचे निवेदन परिवहन अधिकारी यांना दिले आहे. मीटरप्रमाणे रिक्षा चालवणे असे आदेश देऊनही रिक्षा चालक आदेशाचे पालन करीत नाही, याला जबाबदार परिवहन विभाग आहे, परंतु हे युनियनला घाबरतात, त्यांच्या दबावाखाली उप प्रादेशिक अधिकारी काम करतात, सहा असनी गाडीला शहरात परवानगी नसतानाही कल्याण शहरात बारा बारा सिट भरतात. मागील आठवड्यात अकरा माणसे अपघात मध्ये मरण पावली, याला जबाबदार परिवहन अधिकारी आहेत. प्रत्येक स्कूल बस मध्ये महिला मदतनीस ठेवणे आवश्यक असून नाहीतर , बदलापूर सारख्या घटना घडतात.
रिक्षांच्या संख्या खूप आहे, त्या मानाने रिक्षा स्टँड कमी आहेत, त्यांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. मीटर प्रमाणे रिक्षा सुरू करणे आदि मागण्यांचे निवेदन दिले असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कायद्याप्रमाणे कारवाई करावी अन्यथा अधिकार्याविरोधात न्यायालयात जावु असा इशारा उपनेते विजय साळवी यांनी दिला. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी प्राप्त झालेल्या निवेदनाप्रमाणे आम्ही सबंधित कारवाई करू असे सांगितले.
