कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सूर असून या कारवाईला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी विरोध केला आहे. फेरीवाला पथ विक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन अधिनियम २०१४ या कायद्याचे उल्लंघन करून अन्यायकारक कारवाई सुरू असून केडीएमसी क्षेत्रात फेरीवाला कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी केडीएमसी महापौर हर्षाली चोधरी आणि आयुक्त अभिनव गोयल यांना पत्र दिले आहे.
१ मे २०१४ रोजी संपूर्ण देशात फेरीवाला अधिनियमन कायदा लागू करण्यात आला पण इतकी वर्ष उलटूनही आत्तापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. गेल्या अनेक महिन्यापासून महानगरपालिकेने सरसकट कायद्याचे उल्लंघन करून फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांच्या उपजीविचे साधन काढून घेतले आहे. यामुळे शहरातील भाजी विक्रेते फळे विक्रेते फुल विक्रेत व इतर फेरीवाले यांची उपासमार होत आहे.
महानगरपालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर, फ प्रभाग क्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकूर, ग प्रभाग क्षेत्राधिकारी भारत पवार हे पदाचा व शासनाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून डोंबिवली शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील १५० मीटर सोडून व्यवसाय करत असलेल्या फेरीवाल्यांवर अन्यायकारक कारवाई करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. कारवाई करताना फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करताना पंचनामा करणे बंधनकारक असताना सुद्धा बेकायदेशीर साहित्य जप्त करून त्याची लूट करून मर्जीतल्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत हे साहित्य आठवडा बाजारातल्या काही विक्रेत्यांना अर्ध्या किमतीत देत आहेत.
ऑनलाइन भाजी फळे फुले व इत्यादी साहित्य विक्री करणाऱ्या ऑनलाइन कंपन्यांना फायदा होण्यासाठी सर्व फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. तसेच एका राजकीय पक्षाच्या पुरस्कृत आठवडा बाजार जागोजागी सुरू केले आहेत, शेतकऱ्यांच्या नावाखाली बाहेरील जिल्ह्यातील फेरीवाले आणून बाजार भरवले जात आहेत यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्र व शेतकरी भाजी फळे व फुले विक्री करणाऱ्या रोजगार बुडत आहे. फेरीवाल्यांवर कारवाई करण्याच्या आधी त्यांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे परंतु या संदर्भात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. यामुळे हजारो कुटुंब उध्वस्त होऊन त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात या संदर्भात बैठक घेऊन या समस्येवर मार्ग काढला नाही तर सर्व नोंदणीकृत फेरीवाल्यांसहित आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा भालचंद्र पाटील यांनी दिला आहे.
००००००
