महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेलाच प्राधान्य हवे 

दिवा, दि. २4 एप्रिल (आरती परब) : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा व टॅक्सी परवानाधारक तसेच चालकांना मराठी भाषा बोलणे अनिवार्य करण्याचा घेतलेला निर्णय आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. या निर्णयाला भारतीय मराठा संघाकडून जाहीर पाठिंबा देण्यात आला असून, मराठी भाषेच्या वापराबाबत कोणताही विरोध सहन केला जाणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

संघटनेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात राहून आणि व्यवसाय करताना स्थानिक भाषा म्हणजेच मराठीचा आदर राखणे आवश्यक आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर करणे ही केवळ अपेक्षा नसून आता नियमाचा भाग बनत आहे. या निर्णयाच्या विरोधात कोणी आंदोलन किंवा मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय मराठा संघ रस्त्यावर उतरून त्याला प्रतिकार करेल, असा ठाम इशाराही देण्यात आला आहे. “मराठी भाषेचा अपमान किंवा वापरास विरोध केल्यास त्याला योग्य उत्तर दिले जाईल,” असे संघटनेने स्पष्ट केले आहे.

याशिवाय, महाराष्ट्रात उपजीविकेसाठी येणाऱ्यांनी स्थानिक संस्कृती आणि भाषेचा सन्मान राखावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. “पोट भरण्यासाठी आलात तर मर्यादेत रहा, अन्यथा येथे राहणे कठीण होईल,” अशा कठोर शब्दांत संघटनेने आपली भूमिका मांडली आहे. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यात भाषाविषयक वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असले, तरी काहींकडून विरोधाची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *