रमेश औताडे
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST) पुन्हा एकदा आकर्षक चेहरा पुढे करत अभिनेता रितेश देशमुख यांची ब्रँड ॲम्बेस्टर म्हणून नियुक्ती केली. मात्र, प्रत्यक्षात ‘ लाल परी ’ची अवस्था सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच खालावत चालली असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ब्रँड ॲम्बेस्टर बदलून प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होत असताना, जमिनीवरची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. बसस्थानकांवर स्वच्छतेचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सुविधा बंद, डेपो मधील पंखे बंद अवस्थेत, तसेच इंडिकेटरनुसार बस न लागल्याने प्रवाशांना बॅगा घेऊन धावपळ करावी लागत आहे. परिणामी प्रवाशांचा त्रास वाढत असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हा प्रवास अधिकच कष्टदायक ठरत आहे.
याशिवाय, वाढलेले अपघात, कंत्राटी पद्धतीने भरती केलेले वाहक चालक आणि कर्मचाऱ्यांवरील ताण यामुळे एस टी सेवेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे सरकार विविध सवलतींचा गाजावाजा करत असताना, दुसरीकडे मूलभूत सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे, याआधीही अनेक नामांकित ब्रँड ॲम्बेस्टर नेमले गेले, पण ‘लाल परी’ची स्थिती सुधारण्याऐवजी ती अधिकच ढासळत गेली. त्यामुळे “ब्रँड ॲम्बेस्टर की फक्त दिखावा?” असा सवाल आता सामान्य प्रवाशांकडून विचारला जात आहे. परिवहन विभागाने केवळ प्रतिमेवर नव्हे, तर प्रत्यक्ष सेवेच्या गुणवत्तेवर लक्ष देण्याची गरज आहे.
