मुंबई, : भारत-जपान संबंध अधिक मजबूत करण्याची गरज असून भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्दिष्टासाठी जपानसारख्या देशांशी आर्थिक, तांत्रिक व सामरिक सहकार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. पायाभूत सुविधा, उद्योग आणि विकास प्रकल्पांमध्ये जपानचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरत आहे. ‘विकसित भारत २०४७’ ची माहिती देत विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाभिमुख धोरणांना गती देण्यात येत आहे.
विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांनी भेट घेतली. मुंबईतील जपानच्या वाणिज्य दूतावासचे उप-वाणिज्यदूत निशिओ र्यो, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी (आयएफएस) स्वप्नील थोरात, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव मेघना तळेकर, सचिव शिवदर्शन साठ्ये आणि सभापती यांचे सचिव पंडित खेडकर उपस्थित होते.
महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद करत त्यांनी राज्यात गुंतवणूक, उद्योग आणि रोजगारवाढीसाठी जपानी सहकार्याचे स्वागत केले. तसेच भारत आणि जपान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध आगामी काळात आणखी बळकट होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील गुंतवणूकक्षम वातावरणाचा तपशील मांडताना, अहिल्यानगर जिल्ह्यातील सुपा एमआयडीसी परिसरात जपानी कंपन्यांनी ५०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केल्याची माहिती दिली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे सभापती श्री. शिंदे त्यांनी नमूद केले. मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीकडून मिळालेल्या सहकार्याचा उल्लेख करत सभापती शिंदे यांनी भारत-जपान संबंध अधिक बळकट होत असल्याचेही सांगितले.
महाराष्ट्रासह भारताच्या प्रगतीसाठी जपानचा सकारात्मक सहभाग – साटो हितोमी
जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांनी भारत-जपान संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, आर्थिक विकास आणि सांस्कृतिक आदानप्रदानाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले.
भारतात काम करण्याचा दीर्घ अनुभव लाभल्याचा उल्लेख करत त्यांनी मुंबईत कार्य करण्याची संधी मिळणे हा सन्मान असल्याचे नमूद केले.
भारत आणि जपान यांच्यातील सहकार्य गेल्या काही वर्षांत अधिक बळकट झाले असून, विविध क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण आणि लोकांमधील संवाद यांना चालना देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या विकास प्रवासात जपान नेहमीच सहकार्य करण्यास तत्पर राहील. भविष्यात दोन्ही देशांतील मैत्री आणि आर्थिक संबंध आणखी मजबूत होतील, असेही मत जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांनी व्यक्त केले. दरम्यान, सभापती प्रा. शिंदे यांनी जपानच्या वाणिज्यदूत साटो हितोमी यांचे शाल, पुष्पगुच्छ, गौरवचिन्ह, लोकसेवेचा लोकजागर ग्रंथ देऊन स्वागत सन्मान केला.
