ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांची मागणी
ठाणे -ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागात नुकतीच लागलेली आग, गावदेवी मार्केटमधील भीषण दुर्घटना आणि कळवा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक इमारतींचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, तसेच पालिका मुख्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या केबिनसाठी बंदिस्त करण्यात आलेले टेरेस, सज्जे त्वरित मोकळे करण्यात यावेत, अशी मागणी ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी एका पत्रकार परिषदेत केली आहे. पत्रकार परिषदेला ब्लॉक अध्यक्ष हिंदुराव गळवे, निशिकांत कोळी,  बाबु यादव, दरम्यानसिंग, उमेश कांबळे,  स्मिता वैती,  प्रभात झा, निलेश पाटील, लोकेश घोलप, स्वप्नील कोळी, विजय खेडेकर, रवी डोळस, सुरेश भोईर, हरीचंद्र खरात,  अंजली मयेकर, प्रियांका मयेकर उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत शहर विकास विभागाला लागलेल्या आगीबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, शहर विकास विभागाच्या ठिकाणी पूर्वी तीन टेरेस होती. येथे नागरिक व अधिकारी उभे राहत. कालांतराने जागा कमी पडू लागल्याने हा विभाग पूर्णपणे बंदिस्त स्वरूपात तयार करण्यात आला. आता तेथे हवा खेळती राहण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. इमारतीमधील टेरेस झाकून त्याठिकाणी कार्यालयीन जागा निर्माण करण्यात आल्याने आग लागल्यास धूर बाहेर जाण्याचा मार्ग राहत नाही. जो विभाग नकाशे मंजूर करतो त्याच विभागाने चूकीच्या पद्धतीने कायालये थाटली आहेत. त्यामुळे या विभागाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून टेरेस, सज्जे आणि इतर बंदिस्त भाग तातडीने मोकळे करण्यात यावेत. शहरातील इमारतींचे नकाशे मंजूर करणाऱ्या शहर विकास विभागाने प्रथम स्वतःच्या इमारतीतील सुरक्षेच्या त्रुटी दूर कराव्यात, अशी टीकाही विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. ४० टक्के शहर विकास विभाग हे अनधिकृत आहे असा आरोप देखील त्यांनी केला.
गावदेवी मार्केटमधील आगीचा संदर्भ देताना विक्रांत चव्हाण यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “मूळतः भाजी मंडई म्हणून उभारण्यात आलेल्या या मार्केटमध्ये नंतर कपड्यांसह विविध व्यवसायांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे आग अधिक वेगाने पसरली. इथंही मोकळे टेरेस होते. सज्जे होते. मात्र तत्कालीन सहायक आयुक्त आणि स्थावर अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने  मार्केटमध्ये काही अनधिकृत गाळे उभे राहिले. इथून महिन्याला १० लाखांचा हप्ता वसून होत आहे. त्यात स्थानिक नगरसेवक ही सहभागी आहे. टेरेस मोकळे नसल्यामुळे आगीचा धूर मोठ्या प्रमाणात साचला. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. जर टेरेस मोकळे असते आणि योग्य सुरक्षा व्यवस्था असती तर कदाचित ही जीवितहानी टाळता आली असती. यासाठी तत्कालीन अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. कळवा रुग्णालयाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. रुग्णालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करण्यात यावे, कायमस्वरूपी अग्निशमन दलाची व्यवस्था असावी, तसेच अग्निसुरक्षा उपकरणांची तपासणी करून आवश्यक ती साधने उपलब्ध करून द्यावीत, अशी विक्रांत चव्हाण मागणी यांनी केली. अग्निशमन दलातील सुमारे १७६ रिक्त पदे तातडीने भरावीत आणि संवेदनशील ठिकाणी अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करावी, असेही ते म्हणाले.
शहर विकास विभाग, गावदेवी मार्केट आणि कळवा रुग्णालय या तिन्ही ठिकाणांची स्वतंत्र चौकशी करून सुरक्षा त्रुटी दूर करण्यात याव्यात. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व बंदिस्त टेरेस, सज्जे खुले करणे आणि नियमित सुरक्षा तपासणी करणे आवश्यक असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *