– पुनर्वसनाबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याची केली मागणी
कलम २६० च्या नोटिसा स्थगित; पुनर्वसन क्लस्टर योजनेद्वारे त्याच ठिकाणी होणार
कल्याण : कल्याण पूर्वेतील यू-टाईप रस्त्याच्या रुंदीकरणामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांना न्याय व त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पुनर्वसन कृती समितीच्या वतीने गुरुवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाकडे पुनर्वसनाबाबत ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी केली.
कल्याण पूर्व भागातील काटेमानीवली नाका ते तिसगाव नाका या यू-टाईप रस्त्यावरील बाधित नागरिकांच्या पुनर्वसन कृती समितीने गुरुवारी दिलेल्या आवाहनानुसार संपूर्ण कल्याण पूर्व बाजारपेठ बंद ठेवून पालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रचंड उन्हात मोठ्या संख्येने महिला, ज्येष्ठ नागरिक व दुकानदार उपस्थित होते. जवळ पास १८०० लोक यात बाधित होणार आहे. त्यात ८०० च्या वर रहिवासी व इतर छोटे मोठे दुकानदार आहेत.
आयुक्तांनी चर्चेसाठी बोलावल्यावर शिष्टमंडळ मिटींगसाठी गेले. मात्र यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक यांनी काही महिला पदाधिकारी व वरिष्ठ नागरिकांना नाहक धक्काबुक्की करून आंदोलन खराब करण्याचा प्रयत्न केला. फक्त पाच लोक सोडू म्हणत पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष उदय रसाळ यांना ही त्यांनी धक्का बुक्की करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
आयुक्तांसोबत झालेल्या दीर्घ चर्चेत प्रशासनाने दिलेल्या सर्व कलम २६० च्या नोटिसा तात्काळ स्थगित करण्यात येणार. बाधित नागरिकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेद्वारे करण्यात येईल. कोणालाही अनधिकृत ठरवून हटवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही अशी आश्वासने दिली. या आंदोलनास काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नवीन सिंग यांनी पाठिंबा दिला. क्लस्टर योजनेचे अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी मुद्देसूद मांडणी केली. तर समितीचे अध्यक्ष उदय रसाळ, उपाध्यक्ष विष्णु जाधव, सचिव दुर्गेश फडोल व ज्ञानेश डुंबरे यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहून चर्चा केली.
