वृत्त प्रसारित होताच होताच प्रशासन जागे;
सुरक्षिततेसाठी निवारा केंद्रात हलविण्याचा प्रस्ताव
कल्याण : टिटवाळ्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंदिरानगर स्मशानभूमी रस्त्यावरील पालांडे चाळ परिसरात पाणी साचण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या परिसरातील चाळ क्रमांक ३, खोली क्रमांक १ मध्ये राहणाऱ्या ८८ वर्षीय सखूबाई मुरलीधर हिरे यांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांना स्वतःच घरातील पाणी बाहेर काढावे लागले. या घटनेचे वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध होताच तसेच  व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर केडीएमसी प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
एकट्याच वास्तव्यास असलेल्या सखूबाई हिरे यांना सतत घरात शिरणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वयाच्या या टप्प्यावरही घरातील साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत असल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये दिसून येते. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या पावसाळी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्वच्छता निरीक्षक अक्षय कराळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सखूबाई हिरे यांची विचारपूस करण्यात आली तसेच त्यांना बिस्किटे व अन्य आवश्यक साहित्य देण्यात आले. वृद्ध महिलेची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना तात्पुरत्या निवारा केंद्रात स्थलांतरित होण्याची विनंतीही प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याशिवाय, केडीएमसीचे सहायक आयुक्त जयवंत चौधरी हेही पालांडे चाळ परिसराची पाहणी करणार असल्याची माहिती आहे. या भेटीनंतर पाणी साचण्याच्या समस्येवर तातडीने आणि कायमस्वरूपी उपाययोजना जाहीर होणार का, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात पालांडे चाळ परिसरात पाणी साचण्याची समस्या उद्भवत असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे केवळ पाहणी आणि तात्पुरत्या मदतीवर न थांबता प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था उभारून या भागातील नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा देण्याची गरज असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *