‘अवयवदान हेच श्रेष्ठ दान’चा संदेश
हरिभाऊ लाखे
नाशिक: येथील नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या वतीने अत्यंत भक्तिमय वातावरणात १४ व्या नाशिक ते पंढरपूर सायकल वारीला उत्साहात सुरुवात झाली. अनंत कान्हेरे मैदान येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या आरतीने भक्तिमय वातावरणात सायकलस्वार वारकऱ्यांनी विठ्ठलनामाचा गजर करत ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ असा जयघोष केला आणि सायकल वारीच्या माध्यमातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.
याप्रसंगी पोलिस महानिरीक्षक संजय येणेकर, सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) कृष्णा भवर, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी, महापौर हिमगौरी आहेर-आडके, नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरीश बैजल, फाउंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे तसेच माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून वारकऱ्यांना शुभेच्छा देत वारीचा शुभारंभ केला.
यंदाच्या वारीमध्ये सुमारे ३०० सायकल वारकरी सहभागी झाले असून, महाराष्ट्राच्या विविध भागांतील सायकलप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. विशेष आकर्षण म्हणजे मुंबईतील ब्लाइंड संस्थेचे ९ दृष्टिहीन सायकलपटू आणि त्यांच्यासोबत ९ रायडर्स टँडेम सायकलवरून पंढरपूरपर्यंतचा प्रवास करत आहेत. त्यांचा सहभाग जिद्द, आत्मविश्वास, समावेशकता आणि सामाजिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश देणारा आहे. याशिवाय, एका पायाने दिव्यांग असलेले तीन सायकल वारकरीही या वारीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्या जिद्दीला आणि आत्मविश्वासाला सलाम करत नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनने त्यांना पंढरपूरपर्यंतच्या या पवित्र सायकल वारीत सहभागी करून घेतले आहे. त्यांचा सहभाग इच्छाशक्ती, चिकाटी आणि प्रेरणेचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
यंदाच्या वारीची मुख्य संकल्पना “अवयवदान हेच श्रेष्ठ दान” ही असून, समाजामध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्याचा संदेश ही सायकल वारी पंढरपूरपर्यंत पोहोचविणार आहे. विठ्ठलभक्ती, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देत ही वारी पुढे मार्गक्रमण करत आहे.
अशी आहे सायकल वारी…
पहिल्या दिवशी नाशिक- सिन्नर-नांदुर-लोणी-राहुरी-अहिल्यानगर असा प्रवास राहील. अहिल्यानगर येथे मुक्काम होणार आहे. दुसऱ्या दिवशी अहिल्यानगर- करमाळा- टेंभुर्णी- पंढरपूर असा प्रवास करण्यात येणार आहे. मागील तीन वर्षांपासून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या पुढाकारातून पंढरपूर येथे सायकल रिंगण सोहळा आयोजित करण्यात येत आहे. १२ जुलै रोजी सकाळी सहा वाजता राज्यातील विविध भागांतून आलेले सायकलस्वार पंढरपूर शहरात एकत्र येऊन नगर प्रदक्षिणा करतील. त्यानंतर सर्व सायकलस्वारांच्या उपस्थितीत सायकल रिंगण सोहळा होईल.  रिंगण सोहळ्यानंतर सायकलिस्ट संमेलन आयोजित करण्यात येईल. या संमेलनात वर्षभर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सायकलस्वारांचा गौरव व सत्कार करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *