आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
३० खाटांचा निकष शिथिल होणार, कर्करोग उपचार अधिक व्यापक, मनमानी बिलिंगवर बसणार लगाम
मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत लवकरच व्यापक बदल करण्यात येणार असल्याचे संकेत राज्य सरकारने विधानसभेत दिले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी, ग्रामीण भागातील अपुऱ्या आरोग्य सुविधा, ३० खाटांच्या निकषामुळे निर्माण झालेल्या अडचणी, मनमानी बिलिंग आणि कर्करोग उपचारातील मर्यादा यांसारखे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले. त्यांच्या मागण्यांची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आवश्यक सुधारणांचे आश्वासन दिले.
चर्चेदरम्यान ठाकूर यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व नागरिकांसाठी खुली करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, योजना सर्वांसाठी खुली झाली असली तरी संलग्न रुग्णालयांची संख्या अपुरी असल्याने नागरिकांना अपेक्षित लाभ मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. पनवेलमध्ये २४० रुग्णालयांपैकी केवळ ४० रुग्णालये योजनेशी संलग्न असून रायगडमधील अनेक तालुक्यांत एकही संलग्न रुग्णालय नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
योजनेत सहभागी होण्यासाठी असलेली ३० खाटांची अट शिथिल करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच संलग्न रुग्णालयांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करणे आणि क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट कायद्यांतर्गत अधिक पारदर्शक व्यवस्था लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्करोग रुग्णांसाठी पीईटी स्कॅन, केमोथेरपी, रेडिएशन व आवश्यक शस्त्रक्रियांचा समावेश असलेली उपचार पॅकेजेस अधिक व्यापक करण्याचाही निर्णय सरकारने जाहीर केला. कर्करोगासह न्यूरो आणि ऑर्थोपेडिक उपचारांनाही अधिक सक्षम पॅकेज उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या चर्चेमुळे महात्मा फुले जनआरोग्य योजना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जाणार असून त्याचा लाभ रायगडसह संपूर्ण राज्यातील रुग्णांना होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
