मुंबई: महाराष्ट्रातील मुंबई येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल(PTKS) ची उदयोन्मुख जिम्नॅस्ट ईशिता रेवाळे हिची ग्लासगो (स्कॉटलंड) येथे २४ ते २८ जुलै दरम्यान होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी(Commonwealth Games 2026) भारतीय संघात निवड झाली आहे. भारताच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स संघात ईशिताचा समावेश करण्यात आला असून, तिच्यासाठी हा अत्यंत चुरशीचा आणि अभिमानाचा क्षण आहे. अवघ्या सहा वर्षांच्या वयापासून पीटीकेएसमध्ये सराव सुरू केलेल्या ईशिताने कठोर मेहनत, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. तिचे बालपणापासूनचे प्रशिक्षक विशाल कटक दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली ती घडली असून, त्यांच्या प्रशिक्षणाचा तिच्या यशात मोलाचा वाटा आहे.
ईशिताची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा ठरणार आहे. यापूर्वी तिने जून २०२६ मध्ये चीन येथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीसाठी ती सध्या साऊथ एसेक्स, युनायटेड किंग्डम येथे भारतीय संघाच्या परदेशी प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाली आहे.
यावर्षी मे महिन्यात ओडिशा येथे झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ईशिताने अखिल भारतीय क्रमवारीत द्वितीय स्थान पटकावत आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीची छाप पाडली होती. ईशिताच्या या यशामागे तिच्या मार्गदर्शक नीलम बाबरदेसाई, तसेच पीटीकेएसचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू यांचे प्रोत्साहन आणि मोलाचे सहकार्य लाभले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ईशिताने उत्कृष्ट कामगिरी करून भारत, महाराष्ट्र आणि पीटीकेएसचे नाव उंचावावे, अशी आशा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
000000000
