आंदोलकांसाठी परमार्थ निकेतनसमोर नवी जागा प्रस्तावित
ठाणे: ठाणे महापालिका मुख्यालयासमोर होणारे मोर्चे, धरणे आणि उपोषणांमुळे सुरक्षा, वाहतूक आणि कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असून या पार्श्वभूमीवर महापालिकेसमोर आंदोलनांना बंदी घालण्याबरोबर हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रस्तावनुसार, आंदोलकांसाठी परमार्थ निकेतनसमोर नवी जागा प्रस्तावित करण्यात आली असून या संबंधिचा प्रस्ताव येत्या २० जुलै रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर केला आहे.
ठाणे महापालिका मुख्यालयासमोर विविध संघटना, राजकीय पक्ष आणि नागरिकांकडून सातत्याने मोर्चे, धरणे, उपोषणे आणि आंदोलने केली जातात. या आंदोलनांदरम्यान मुख्य प्रवेशद्वारासमोर मंडप उभारणे, ध्वनिक्षेपकांचा वापर, घोषणाबाजी तसेच अधिकाऱ्यांची वाहने अडविण्याचे प्रकार घडत असल्याने वाहतूक कोंडी होते. याशिवाय, पालिका सुरक्षा व्यवस्थेवर ताण आणि कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण होतो, असा दावा पालिका प्रशासनाने प्रस्तावात केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराऐवजी सुमारे १०० मीटर अंतरावरील परमार्थ निकेतनसमोरील चौक आंदोलनासाठी अधिकृत जागा म्हणून निश्चित करण्याचा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी आंदोलकांना मंडप उभारण्याची परवानगी देण्यात येईल, तर मर्यादित शिष्टमंडळाला अधिकाऱ्यांशी भेटण्याची सुविधा दिली जाईल.
महापालिका मुख्यालयाच्या गेटपासून १०० मीटर परिसर ”शांतता क्षेत्र” म्हणून घोषित करून त्या परिसरात कोणतेही मोर्चे, धरणे, उपोषणे किंवा आंदोलने करण्यास प्रतिबंध करण्याचा प्रस्ताव आहे. हा नियम सर्व नागरिक, संघटना, युनियन आणि राजकीय पक्षांना समानपणे लागू राहणार आहे, असे पालिका प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. विशेष म्हणजे, या संदर्भात आयुक्तांनी १ डिसेंबर २०२३ रोजीच प्रशासकीय मान्यता दिली होती आणि त्यानुसार २१ डिसेंबर २०२३ रोजी परिपत्रकही जारी करण्यात आले होते. आता २३ जून २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील चर्चेनंतर या निर्णयाला धोरणात्मक स्वरूप देण्यासाठी हा प्रस्ताव येत्या २० जुलै रोजी सर्वसाधारण सभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *