कल्याण : पारमिता धर्मादाय न्यास, कल्याण (प.) या शैक्षणिक, सामाजिक व बहुउद्देशीय विकासकामे करणाऱ्या संस्थेच्या वतीने नालंदा विद्यालय, कल्याण (पूर्व) येथील इयत्ता १ ली ते ७ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. जागृती मंडळ संचलित नालंदा विद्यालयात आयोजित कार्यक्रमात पारमिता धर्मादाय न्यासाचे अध्यक्ष बालकदास मेश्राम, सचिव मधुसूदन राऊत, खजिनदार ॲड. अनिल मेश्राम, सदस्य विश्वनाथ जांभूळकर, जागृती मंडळाचे उपाध्यक्ष परमेश्वर माटे, सचिव अनिल जांभूळकर, सदस्य थुल तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका आशा पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी शिक्षक भीमराव लोणारे यांनी शाळेची सद्यस्थिती आणि प्रगतीची माहिती देताना सांगितले की, या विद्यालयात प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल व सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
पारमिता धर्मादाय न्यासाचे सचिव मधुसूदन राऊत यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देताना सांगितले की, न्यासाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शालेय साहित्याचे वाटप, वैद्यकीय शिबिरे, महिलांसाठी रोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षण यांसारखे विविध सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत सातत्याने राबविण्यात येतात. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिक्षणात प्रगती करावी आणि उच्च पदांवर पोहोचण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले. जागृती मंडळाचे उपाध्यक्ष परमेश्वर माटे आणि सचिव अनिल जांभूळकर यांनी मनोगत व्यक्त करत पारमिता धर्मादाय न्यासाचे आभार मानले. न्यासाचे खजिनदार ॲड. अनिल मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, स्पष्ट ध्येय निश्चित करून परिश्रमपूर्वक अभ्यास केल्यास वकील, डॉक्टर, अभियंता किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यापासून कोणालाही रोखता येणार नाही.
पारमिता धर्मादाय न्यासाचे अध्यक्ष बालकदास मेश्राम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, मागील वर्षी न्यासाच्या वर्धापन दिनानिमित्त नालंदा विद्यालयातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता. मात्र, यावर्षी शाळेत दहावीचा वर्ग नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षक व व्यवस्थापनाने अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या मुख्याध्यापिका आशा पवार यांनी पारमिता धर्मादाय न्यासाच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमास शिक्षक रमेश पाटील, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
00000000
