तब्बल १८५१ नागरिकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ
ठाणे : अशोक गायकवाड राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाच्या धोरणानुसार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.२५ जुलै २०२६ रोजी डोंबिवली येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली पूर्व येथील ब्राह्मण सभा हॉल येथे सकाळी १० वाजेपासून आयोजित करण्यात आलेल्या या शिबीराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात तब्बल १ हजार ८५१ लाभार्थ्यांनी विविध शासकीय दाखले व योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेतला.आमदार १४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघ तथा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र दत्तात्रय चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. कल्याण उपविभागीय अधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आजी-माजी नगरसेवक आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शासकीय योजनांचा लाभ थेट सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत सहजतेने पोहोचावा, या मुख्य उद्देशाने आयोजित या शिबिरात दिवसभरात विविध सेवांचे जलद गतीने वाटप करण्यात आले. यामध्ये शैक्षणिक व प्रशासकीय कामांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या इतर विविध प्रमाणपत्रांचा ४१७ नागरिकांनी लाभ घेतला. तर राज्यातील महिलांना शेतकरी दर्जा देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणानुसार ३१६ महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.त्याचप्रमाणे, २०८ नागरिकांना डिजिटल ७/१२ उतारे, १७७ जणांना आयुष्मान भारत कार्ड, १४५ जणांना उत्पन्न प्रमाणपत्र, १२८ जणांना अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल), १०७ जणांना जातीचे प्रमाणपत्र, ८२ ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, आणि ७४ जणांना रहिवासी दाखले प्रदान करण्यात आले. याशिवाय ५६ जणांना नॉन-क्रिमीलेअर दाखले, ४४ नागरिकांना आधार नोंदणी व दुरुस्ती सुविधा, २७ जणांना नवीन शिधापत्रिका (राशन कार्ड) आणि १७ जणांना गावठाणातील स्वामीत्व योजनेअंतर्गत सनद वाटप करण्यात आले.सामाजिक कल्याण व निवृत्तीवेतन योजनांतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १७, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे ७ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे ५ लाभार्थी लाभान्वित झाले. पारंपारिक व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कुंभार समाजातील १५ व्यक्तींना व्यावसायिक सवलतीचे दाखले वाटप करण्यात आले. तसेच ६ जणांना जिवंत सातबारा मोहिमेचा लाभ मिळाला, तर ३ प्रकरणात कमी-जास्त पत्रके तयार करून नोंदी अद्ययावत करण्यात आल्या.नागरिकांना एकाच छताखाली आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने सर्व शासकीय सेवा व दाखले उपलब्ध करून देण्यात आले. महसूल विभागाच्या या धोरणात्मक सुधारणांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी हे विशेष समाधान शिबिर अत्यंत प्रभावी ठरली आहे.
0000
