Month: July 2026

 दिव्याच्या साबेगावातील दत्त निवारा सोसायटीत जिना कोसळला

अग्निशमन दलाची तत्परता, पाच रहिवासी सुरक्षित दिवा, दि. ५ जुलै : दिव्यातील साबेगाव परिसरात असलेल्या दत्त निवारा सोसायटीच्या जिन्याचा स्लॅब रविवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाच रहिवाशांची सुखरूप सुटका केली. शीळ अग्निशमन केंद्राला दुपारी १२.५२ वाजता घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान एक फायर इंजिन व एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. ही घटना साबेगाव येथील वैभव धाब्याच्या मागे असलेल्या दोन मजली दत्त निवारा सोसायटीत घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारतीची पाहणी करून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  तसेच इमारतीत अडकलेल्या प्रदीप मालुसरे (५०), प्राजक्ता मालुसरे (४२), चेतन मालुसरे (२१), गणेश राणे (४८) आणि आरोशी कुमडेकर (१४) या पाच रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित सुटका केली. 000000000

युद्धभूमीवरील गिर्यारोहणाचा थरार अनुभवण्याची संधी

२३वे गिरिमित्र संमेलन ११ व १२ जुलैला मुलुंडमध्ये; सियाचीन वीरांचे अनुभव ठरणार मुख्य आकर्षण मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गिर्यारोहण, साहसी क्रीडा आणि राष्ट्रसेवेचा संगम अनुभवण्याची संधी देणारे २३वे ‘गिरिमित्र संमेलन’ ११ व १२ जुलैला…

मागण्या मान्य करा अन्यथा १० ऑगस्टला राज्यभर जेलभरो

कामगार संयुक्त कृती समितीचा इशारा मुंबई, दि. ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने चार श्रम संहिता लागू करू नका व इतर मागण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर ३ जुलैला सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत  महाधरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भर पावसातही पाच हजार कामगारांनी सहभाग नोंदविला. यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत ८ जुलैला कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती बरोबर चार श्रमसंहिता, त्यांचे नियम व कामगारांच्या अन्य मागण्यासाठी विस्तारित बैठक घेण्याचे आश्वासन मंत्रिमहोदयांनी दिले. त्यामुळे कृती समितीने महा धरणे आंदोलन स्थगित केले. मात्र महाराष्ट्र सरकारने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास १० ऑगस्टला राज्यभर जेलभरो आंदोलन केले जाईल,  असा स्पष्ट इशारा कामगार कर्मचारी संयुक्त कृती समितीचे प्रमुख समन्वयक डॉ. डी . एल. कराड यांनी राज्य सरकारला दिला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना दिलेल्या निवेदनात चार श्रमिक संहिता महाराष्ट्रात लागू करू नये,राज्य सरकारने कामगार संघटनांशी चर्चा करावी, किमान वेतन 30 हजार रुपये करावे, कंत्राटी हंगामी निश्चित कालीन कर्मचाऱ्यांना कायम करावे, योजना कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा  व त्यांना ई एसआय, प्रॉव्हिडंट फंड, रजा,बोनस इत्यादी फायदे लागू करावेत, असंघटित कामगारांसाठी  कल्याणकारी मंडळ स्थापन करून त्यांना निधीची व्यवस्था करावी व त्यामार्फत सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजना लागू कराव्यात. या व इतर मागण्या  यावेळी करण्यात आल्या. केंद्र सरकारने चार श्रमसंहिता तसेच नियमही लागू केले आहेत राज्य सरकारनेही नियम प्रस्तावित केले आहेत. या चार श्रमसंहिता व नियमांना कामगार संघटनांचा तीव्र विरोध आहे.  चार श्रमसंहिता व नियमांमुळे कामगारांचा युनियन करण्याचा अधिकार, संप करण्याचा अधिकार, नोकरीत कायम होण्याचा अधिकार  याच्यावर गदा येणार आहे. या श्रमसंहितांमध्ये  सर्वत्र कंत्राटीकरणाला परवानगी देण्यात आली आहे,निश्चित कालीन रोजगार,  शिकाऊ कामगार त्या माध्यमातून कामगार वर्गाचे प्रचंड शोषण सुरू आहे.असंघटित कामगारांसाठी कुठलीही योजना नाही. ऊसतोड कामगार,घर कामगार व  असंघटित कामगारांना सरकारने वाऱ्यावर  सोडले आहे. महागाई आणि बेरोजगारीमुळे कामगार वर्ग अधिच त्रस्त झाला आहे, त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. अशा परिस्थितीत कामगार वर्गाचे हिताचे रक्षण करण्यासाठी कामगार संघटनांशी चर्चा करून धोरण व  कायदे करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी या वेळेला कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने मंत्री महोदय कडे केली. शिष्टमंडळात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे प्रमुख समन्वयक व  सीटूचे प्रदेशाध्यक्ष  डॉ. डी. एल.  कराड, एच. एम. एस. चे प्रदेशाध्यक्ष  निवृत्ती धुमाळ, इंटकचे प्रदेशाध्यक्ष  कैलास कदम, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, मुकेश  तिघोटे, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष चाळके,  आयटकचे ज्येष्ठ नेते सुकुमार दामले इत्यादींचा समावेश होता. आझाद मैदानावर  झालेल्या धरणे आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार,  कामगार नेते  विवेक मॉन्टेरो, निवृत्ती धुमाळ, संतोष चाळके, सुकुमार दामले, कैलास कदम, रवी जोशी, मिलिंद रानडे,मंगला ठोंबरे,महेश करकेरा, उदय भट, मारुती विश्वासराव,  त्रिशीला  कांबळे, स्नेहा सावंत, विजय जाधव, विजय तारमाळे,  बबली रावत, बजरंग चव्हाण, सईद अहमद  इत्यादींनी कामगारांना मार्गदर्शन केले. 000000000

मुसळधार पावसातही मध्य रेल्वेची उपनगरीय सेवा सुरळीत

राजेंद्र साळसकर मुंबई- गेल्या ४८ तासांत मुंबई आणि उपनगरांमध्ये २८० मिमीपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊनही, मध्य रेल्वेच्या मेन, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर लाईनवरील उपनगरीय सेवा सुरळीतपणे सुरू राहिल्या. मेन लाईनवर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सुमारे १५० मिमी, दादर – घाटकोपर पट्ट्यात १२० ते १५० मिमी आणि मुलुंड येथे १६० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. उपनगरीय भागात मुसळधार पाऊस झाला; यामध्ये ठाणे येथे २८४ मिमी आणि कळवा येथे २७० मिमी पावसाची नोंद झाली.हार्बर लाईनवरील वाशी ते पनवेल या पट्ट्यात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. मेन लाईनवरील आग्नेय विभागात (कल्याण ते कर्जत/खोपोली दरम्यान) सुमारे १५० मिमी पाऊस पडला तर मेन लाईनवरील ईशान्य विभागात (कल्याण ते कसारा दरम्यान) २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला. मुसळधार पावसानंतरही मध्य रेल्वेची सेवा कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहिली, ज्यामुळे दररोज प्रवास करणारे लाखो प्रवासी सुरक्षितपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचू शकले. हे मध्य रेल्वेच्या पावसाळ्यासाठीच्या सक्रिय नियोजनाचे यश दर्शवते. ही अखंड सेवा अभियांत्रिकी, परिचालन, विद्युत आणि सिग्नल व दूरसंचार विभागांमधील उत्तम आंतर-विभागीय समन्वय व सांघिक कार्य, तसेच महानगरपालिकांसोबतचा जवळचा समन्वय आणि पूर्वतयारीचे फलित आहे. पावसाळ्यात रेल्वे चालवण्याचे आव्हानात्मक काम हाताळण्यासाठी मध्य रेल्वेने पाणी साचण्यापासून प्रतिबंध करणे, जलनिस्सारण यंत्रणेचे बळकटीकरण आणि संवेदनशील ठिकाणांचे संरक्षण यांवर लक्ष केंद्रित करून व्यापक तयारी केली आहे. विभागातील पाणी साचण्याची शक्यता असलेल्या ११७ ठिकाणांवर १२.५ एचपी ते १०० एचपी क्षमतेचे एकूण २१० ‘हेवी-ड्युटी’ पाण्याचा उपसा करणारे पंप तैनात करण्यात आले होते.शीव – कुर्ला, चुनाभट्टी – कुर्ला, विक्रोळी – कांजुरमार्ग रोड आणि कुर्ला – लोकमान्य टिळक टर्मिनस यांसारख्या पूरप्रवण प्रमुख ठिकाणांची निवड करून, तिथे तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी अभियांत्रिकी उपाययोजनांद्वारे विशेष कार्यवाही करण्यात आली. ठाणे मायक्रोटनेलिंग प्रकल्पामुळे ठाणे स्थानकावरील पाणी साचण्याची दीर्घकालीन समस्या प्रभावीपणे सोडवण्यात आली आहे; यापूर्वी मुसळधार पावसात येथे रेल्वे रुळांच्या पातळीपेक्षा वर पाणी साचत असे. तसेच, जलनिस्सारण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी संपूर्ण नेटवर्कवर पुलांची दुरुस्ती आणि जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्याची कामे हाती घेण्यात आली. पावसाळ्याच्या पूर्वतयारीच्या मोठ्या प्रमाणावरील कामांमध्ये अनेक मोऱ्यांची साफसफाई, बाजूच्या गटारांमधील आणि ‘कॅच-वॉटर ड्रेन्स’मधील गाळ काढणे, रुळांची देखभाल आणि संवेदनशील ठिकाणी रुळांची उंची वाढवणे, बोगद्यांची तपासणी, स्थानकांवरील प्लॅटफॉर्म व रेल्वे इमारतींची गळती रोखण्यासाठी उपाययोजना, तसेच संवेदनशील भागात पावसाळी गस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती यांचा समावेश होता. याव्यतिरिक्त, सोशल मीडियावर पावसाळ्याबाबत मिळणाऱ्या सततच्या अद्ययावत माहितीमुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत झाली. एकत्रित प्रयत्नांमुळे, या हंगामातील अत्यंत मुसळधार पावसाच्या कालावधीत ही मध्य रेल्वेवरील उपनगरीय रेल्वे सेवा सुरक्षितपणे आणि विश्वासार्हतेने सुरू राहिली. शहराची जीवनवाहिनी अविरत सुरू ठेवण्यासाठी मुसळधार पावसात रात्रंदिवस काम करणाऱ्या आघाडीवरील कर्मचारी – जसे की रुळांची देखभाल करणारे कर्मचारी, गँगमेन, ‘परमनंट वे’ कर्मचारी, मोटरमन, ट्रेन मॅनेजर्स, अभियंते आणि सर्व विभागांतील कर्मचाऱ्यांच्या अथक समर्पणाची दखल घेण्यात आली आहे. पावसाळ्यात उपनगरीय सेवा विनाखंडितपणे पुरवण्यासाठी त्यांचे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणचे प्रयत्न अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. 000000000

राजेंद्र साळसकर यांचा श्री छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान

मु़ंबई- अरिहंताणं रक्त सारथी संस्थान,राजस्थान आयोजित महाराष्ट्र गौरव सन्मान-२०२६ या सोहळ्यात जीवनदान ग्रुपचे संस्थापक राजेंद्र साळसकर यांना श्री छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र गौरव सन्मान -२०२६ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात…