अनिल ठाणेकर
ठाणे : शहरात क्लस्टर योजना राबविण्यासाठी “क्लस्टर विकास कंपनी” ला ठाणे महानगर पालिकेकडून सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरूवारी हजारो ठाणेकरांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. तीन हात नाका ते कशीश पार्क येथील क्लस्टर डेव्हलपमेंट कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग असणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी दिली.
खासगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणे ठरविण्याचा अधिकार अप्रत्यक्ष देण्याचा कट रचण्यात आला आहे. यापुढे क्लस्टर डेव्हलपमेंट बाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार सदर कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळे महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन सर्वच लोकप्रतिनिधींचे अवमूल्यन होणार आहे. तसेच, ठाणे महानगर पालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा देखील हा अपमान आणि प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखविल्यासारखे झाले आहे, असा आरोप करीत डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या यांच्या उपस्थितीत मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा नेण्यात येणार आहे.
याबाबत मनोज प्रधान म्हणाले की, या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मूलभूत प्रश्नांना हात घालणार आहोत. या शहरात 4 हजार एकरवर बांधकाम केले जाणार आहे. त्यांना १२.५ चा एफएसआय कोणत्या आधारावर दिला जात आहे? या बांधकामानंतर ठाण्यात किती घरांची निर्मिती होणार आहे? ठाण्यात किती लोक वास्तव्यास येतील? त्यांना पाणीपुरवठा कसा करणार? सांडपाणी आणि मलनिस्सारण याचे नियोजन कसे करणार? जर मालकी हक्काची घरे दिली जाणार आहेत तर ३० वर्षांचे करार का केले जात आहेत. मोठी घरे असणाऱ्यांनाही ३२३ चौरस फुटाचीच घरे देऊन पुढील आकारमानासाठी दर आकारणी का केली जाणार आहे? वाणिज्य वापराच्या सदनिकांना १८० चौरस फुटाच्या पुढे दर का आकारले जाणार आहेत? घरांच्या खालील जमिनीची मालकी ठाणे महानगर पालिकेकडेच का असणार आहे? आदी प्रश्न आम्ही विचारणार आहोत, असे प्रधान म्हणाले.
दरम्यान, या मोर्चात किमान ३ हजार ठाणेकर नागरिक आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या मोर्चानंतरही क्लस्टर कंपनी रद्द करून नियोजनपूर्वक विकास केला नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असेही प्रधान म्हणाले.
