आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धिनी केंद्रातील कर्मचाऱ्यांचे केडीएमसी मुख्यालयात धाव

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नसल्याने त्यांनी बुधवारी केडीएमसी मुख्यालय गाठले. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे आपली व्यथा मांडत कर्मचाऱ्यांनी थकीत पगार तातडीने देण्याची मागणी केली. केडीएमसी क्षेत्रात ५ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने आणि ५६ आरोग्यवर्धिनी केंद्रे आहेत. या ठिकाणी अटेंडंट कम सिक्युरिटी गार्ड आणि क्लिनिंग स्टाफ अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या सुमारे १३० कर्मचारी कार्यरत असून ते दररोज सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत काम करतात.

मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. कमी पगारात काम करत असतानाही तो वेळेवर मिळत नसल्याने घरखर्च भागवायचा कसा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. कंत्राटदाराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाते. अटेंडंट कर्मचाऱ्यांना कपातीनंतर सुमारे ८ हजार रुपये, तर क्लिनिंग कर्मचाऱ्यांना सुमारे ७ हजार रुपये हातात मिळत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. याशिवाय सुट्ट्या, सिक लीव्ह आणि बोनस मिळत नसल्याचीही त्यांची तक्रार आहे.

थकीत पगार मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांना लेखी निवेदन दिले. तसेच महापौर हर्षाली चौधरी, उबाठाचे नगरसेवक उमेश बोरगावकर, स्थायी समिती सदस्य महेश गायकवाड, नगरसेवक मधुर म्हात्रे आणि रूपेश सकपाळ यांच्याकडेही आपली समस्या मांडली.

याबाबत केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता, संबंधित कामाचा कालावधी संपला असून नवीन टेंडर प्रक्रिया सुरू आहे. संबंधित दिशा एजन्सीला कंत्राटी कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, तीन महिने काम करूनही पगार मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यावेळी अभय भोईर, संतोष भालेर, विशाल सोरटे, पूजा ठाणगे, रूपाली दातखिळे, सुरेखा सोनवणे, सतीश भालेराव, योगेश बागुल यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.

००००००००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *