‘द स्कुल्स ऑफ इंडिया  २०२६’ चे खोपोलीत आयोजन
 देशभरातील शिक्षणतज्ज्ञ, संस्थापक, प्राचार्य,एआय संशोधक एकत्र येणार
( राजेंद्र साळसकर )
मुंबई-भारतातील शिक्षण क्षेत्र सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभे आहे. पारंपारिक शैक्षणिक मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वर्गांमध्ये प्रभावी वापर करणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जात्मक व समान शिक्षण पोहोचवणे ही आजच्या काळातील सर्वात मोठी आव्हाने बनली आहेत. याच पार्श्वभूमीवर, भारताच्या शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांवर ठोस उपाय शोधण्यासाठी ‘द स्कुल्स ऑफ इंडिया एज्युकेशन समिट २०२६’ या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत खोपोली येथील ‘नोव्होटेल इमॅजिका’ येथे ही तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद रंगणार आहे. या परिषदेत देशातील आघाडीचे शिक्षणतज्ज्ञ, नामांकित शाळेचे संस्थापक, प्राचार्य, धोरणकर्ते आणि edटेक क्षेत्रातील तंत्रज्ञान संशोधक एकाच छताखाली एकत्र येऊन कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जोडलेल्या मुद्द्यांवर विचारमंथन करणार आहेत, अशी माहिती मालपाणी ग्रुपचे संचालक यशवर्धन मालपाणी यांनी दिली। यावेळी   स्कूल ऑफ इंडियाचे संस्थापक अंकित पुष्पराज वर्मा, ध्रुव स्कूलच्या   संचालिका अनिष्का मालपाणी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्कूल ऑफ इंडियाचे संस्थापक अंकित पुष्पराज वर्मा म्हणाले की या तीन दिवसीय परिषदेत केवळ औपचारिक चर्चा न होता प्रत्यक्षात अंमलात आणता येतील अशा धोरणात्मक रणनीतींवर भर दिला जाणार आहे. प्रामुख्याने अध्यापन पद्धतीतील आधुनिक बदल, अभ्यासातील नावीन्यता, शालेय नेतृत्व व संस्थात्मक व्यवस्थापन, आणि विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य व सर्वांगीण विकास यांसारख्या अत्यंत संवेदनशील आणि मूलभूत विषयांवर सखोल मंथन होणार आहे. यासोबतच जागतिक पातळीवरील शैक्षणिक घडामोडींचा भारतीय शिक्षण पद्धतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन, तंत्रज्ञानाच्या युगात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (AI) चा शालेय शिक्षणात कसा सुरक्षित आणि परिणामकारक वापर करता येईल, यावर विशेष कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन एडटेक उत्पादने आणि शैक्षणिक उपकरणांचे थेट प्रात्यक्षिकही उपस्थितांना पाहायला मिळेल.
परिषदेविषयी माहिती देताना ध्रुव स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिष्का मालपाणी यांनी सांगितले की या महापरिषदेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय शिक्षणाच्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारे दिग्गज व अनुभवी मार्गदर्शक मंडळ या परिषदेला लाभले आहे. यामध्ये ‘अवसरा अकादमी’च्या लक्ष्मी कुमार (सामाजिक प्रभाव व सर्वांगीण शिक्षण), ‘मालपाणी ग्रुप ऑफ स्कुल्स’चे संजय मालपाणी (मोठ्या प्रमाणावरील संस्थात्मक जाळे), आणि ‘ECA व पोदार एज्युकेशन नेटवर्क’च्या डॉ. स्वाती पोपट वत्स (पुरोगामी शिक्षण व संशोधन) यांसारख्या नामांकित तज्ज्ञांचा समावेश आहे.  याशिवाय, शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत ‘Almach AI’ चे रसेल जॉन कॅली, आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाबाबत ‘IB वर्ल्ड स्कुल्स’च्या सीथा मूर्ती आणि ‘केंब्रिज इंटरनॅशनल’च्या अलका पांडे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे, ‘एसपी जैन स्कुल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट’चे परिमल मर्चेंट जागतिक व्यवसाय शिक्षणावर, तर ‘सोशल ब्रिक’च्या मृणाल शाह खेळातून व अनुभवात्मक शिक्षणावर आपले विचार मांडणार आहेत.
परिषदेदरम्यान विशेष प्रदर्शन भरवले जाणार असून यामध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम सोल्युशन्स, टेक स्टार्टअप्स आणि नावीन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे प्रात्यक्षिक सादर केले जाईल. तसेच महत्त्वाच्या घोषणा आणि पत्रकार परिषदांचेही आयोजन करण्यात आले आहे. theschoolofindia.org या संकेतस्थळावर आपले नाव नोंदवा असे आव्हान संयोजकाकडून करण्यात येत आहे
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *